चित्रपटसृष्टीचे आणि शुक्रवारचे महत्त्व फार मोठे आहे. सिनेरसिक नेहमीच शुक्रवारची वाट पाहत असतो. या शुक्रवारी कोणता सिनेमा प्रदर्शित होणार याची त्याला नेहमीच उत्सुकता असते, पण चित्रपटाच्या प्रदर्शनाचे आणि शुक्रवारचे कारण काय आहे? आठवड्याचा सुरुवातीचा दिवस हा सोमवार असताना चित्रपट सोमवारी का प्रदर्शित होत नाहीत? किंवा कोणत्याही महिन्याच्या एक तारखेला ते का प्रदर्शित होत नाहीत? योगायोगाने आज एक तारखेला शुक्रवार आलेला आहे हा भाग वेगळा, पण चित्रपट प्रदर्शनाचे आणि शुक्रवारचे काय महत्त्व आहे ते आपण आज पाहुया.
शुक्रवार हा आठवड्यातील कामाचा शेवटचा दिवस असतो. नंतर दोन दिवस शनिवार, रविवार सुट्टीचे असतात. त्यामुळे विकेंडला शुक्रवार म्हटले जाते. अनेक ठिकाणी फक्त रविवारीच सुट्टी असली तर शनिवार हा हाफ डे पकडतात किंवा तो व्यवहारात कधी कधी पकडतही नाहीत. बँकांचे सर्व व्यवहार पूर्वी शुक्रवारवरच असायचे. लास्ट फ्रायडे हा तर महत्त्वाचा, पे डे असायचा. मग काम संपले की मजा करायला, कुटुंबासमवेत चित्रपट पहायला जायला शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस. म्हणजे पुढचे शनिवार, रविवार विश्रांती घेता येते, पण एवढेच कारण नाहीये तर शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अनेक कारणे आहेत.
यापैकी पहिले कारण म्हणजे, फिल्मी फ्रायडे किंवा चित्रपट रिलिज होणारा शुक्रवार हे फॅड किंवा प्रथा आपल्याकडे हॉलिवूडमधून आलेले आहे. हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट 'गॉन विथ द विंड'ही १५ डिसेंबर १९३९ ला प्रदर्शित झाला होता. त्यादिवशी शुक्रवार होता. हा चित्रपट प्रचंड चालला, गाजला. तेव्हापासून हॉलिवूडमध्ये शुक्रवारीच चित्रपट प्रदर्शित करण्याची प्रथा रूढ झाली. 'गॉन विथ द विंड' हा एक रोमँटिक चित्रपट होता. मार्गारेट मिशलच्या 'गॉन विथ द विंड' या कादंबरीवरच तो बेतला होता. हा चित्रपट अमेरिकेतील यादवी युद्ध सिव्हील वॉरच्या वातावरणात काढला होता. या चित्रपटाची पटकथा, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्वातच मोठी बाजी मारत राष्ट्रीय पातळीवरचे मोठे ८ पुरस्कार मिळवले होते. त्याची जगभर ख्याती झाली होती. तेव्हापासून हॉलिवूडमध्ये प्रत्येक शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होऊ लागले.
भारतात मात्र हॉलिवूडचे हे फिल्मी फ्रायडेचे किंवा शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याचे अनुकरण १९६० पासून सुरू झाले. त्यापूर्वी 'नीलकमल' नावाचा एक गाजलेला चित्रपट हा सोमवारी प्रदर्शित झाला होता. हा नीलकमल वेगळा आहे. मनोजकुमार, वहिदा रेहमानचा नीलकमल नाही. हा राज कपूरचा नीलकमल होता. तो सोमवारी प्रदर्शित झाला होता, पण हॉलिवूडमध्ये क्लासिक कलात्मक चित्रपट हे शुक्रवारी प्रदर्शित होऊ न यशस्वी होतात असा विश्वास हिंदी चित्रपटसृष्टीला झाला आणि १९६० ला पहिला हिंदी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हिंदीतील पहिला शुक्रवारी प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे १९६० चा 'मुगले आझम'. हा चित्रपट तुफान चालला आणि तेव्हापासून बॉलिवूडमध्ये फिल्मी फ्रायडे सुरू झाला.
विकेंड हे कारण असले, तरी आपल्याकडे चित्रपटसृष्टीत श्रद्धा-अंधश्रद्धा खूप असतात. शुक्रवार हा लक्ष्मीचा वार असल्याने आपण गुंतवलेला पैसा निघावा या श्रद्धेने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभावा म्हणूनही शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होत असतात. आपल्याकडे चित्रपटसृष्टीत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख सर्वधर्मांचे लोक एकत्रित काम करत असतात. या सर्वांचाच शुक्रवार हा पवित्र वार आहे. त्यामुळे तो सर्वमान्य झाला. तेव्हापासून तो चित्रपट प्रदर्शनाचा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
काही तरी वेगळं करायचं म्हणून अन्य वारीही चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत, तर काहीवेळा शुक्रवार सोडून अन्य वारी काही हेतूने चित्रपट प्रदर्शित करायचे असतील तर प्रदर्शकांना जादा पैसेही मोजावे लागतात. कारण आठवड्याचा करार असतो. गुरुवारच्या अखेरच्या दिवसअगोदर एखादा चित्रपट घालवायचा असेल तेवढ्या दिवसाचे पैसे मोजावे लागतात. तरीही अनेक चित्रपट हे बिगर शुक्रवारही प्रदर्शित झालेले आहेत. त्यांनीही चांगला बिझनेस केला आहे, पैसा कमावलेला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट फ्लॉपही झालेले आहेत, तसेच अन्य वारी प्रदर्शित झालेले चित्रपट हिट ठरलेले आहेत.
२००६ ला राकेश ओमप्रकाश मेहरा याने 'रंग दे बसंती' हा चित्रपट बुधवारी प्रदर्शित केला होता. हा चित्रपट तुफान चालला होता. अर्थात तो बुधवारी प्रदर्शित करण्याचे कारण चाकोरीबाहेर पडून लक्ष वेधण्याचे, प्रमोशनचा एक भाग होता. त्याचा फायदा त्यांना झाला. त्यानंतर काही वर्षांनी 'सुल्तान' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तोही चांगला चालला होता. त्यामुळे शुक्रवारशिवाय चित्रपट प्रदर्शित केले, तर फ्लॉप होतात असे नाही, पण हॉलिवूडचे अनुकरण आणि पडलेली ती प्रथा म्हणून शुक्रवार हा फिल्मी फ्रायडे म्हणून ओळखला जातो.
फर्स्ट डे-फर्स्ट शो
चित्रपट पाहण्याची मजा ही खरी तर रात्रीच्या म्हणजे ९ च्या शो ची, पण पूर्वी मॅटिनी, ३, ६, ९ असे चित्रपट असायचे. मॅटिनी शो हा वेगळा असायचा. त्यामुळे शुक्रवारी प्रदर्शित होणाºया चित्रपटाचा फर्स्ट डे-फर्स्ट शो हा ३ चा असायचा. हा शो पाहणे म्हणजे काय अप्रुप असायचे. मी अमुक एक मोठे काम केल्याच्या थाटात फर्स्ट डे-फर्स्ट शो पाहिला हे अभिमानाने सांगण्यात तरुणांना आनंद वाटायचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा