साधारणपणे १९७० च्या दशकात श्रीनिवास भणगे यांचे एक नाटक हौशी रंगमंचासाठी आले. त्याचे पुस्तक स्वरूपातही वितरण जोरात झाले होते. त्या नाटकाचे नाव होते ‘घालीन लोटांगण’. त्या काळात कॉलेजच्या गॅदरिंगला जी नाटके सादर केली जायची त्यात श्याम फडके लिखित ‘तीन चोक तेरा’, मधुसूधन कालेलकर यांचे ‘पदरी पडलं पवित्र झालं’, वसंत कानेटकरांचे ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ आणि त्यानंतर ‘घालीन लोटांगण’ हे श्रीनिवास भणगे यांचे नाटक असायचे. सतत कुठल्या ना कुठल्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये यापैकी एक नाटक असायचेच. त्यामुळे नाटकांचे हौशी रंगमंचासाठी आणि व्यावसायिक रंगमंचासाठी अशी विभागणी असायची, पण हौशी रंगमंचावर गाजलेले एक नाटक व्यावसायिक रंगमंचावर गाजवण्याचा चमत्कार बेर्डे मंडळींनी केला. ‘घालीन लोटांगण’चे ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ असे नामांतर करून नव्या रूपात आले आणि त्या नाटकाने इतिहास घडवला.
मुळात श्रीनिवास भणगे यांची स्क्रीप्ट अत्यंत दमदार होती. हौशी मंचावर केल्यावरही सुमार अभिनय करणारे कलाकारही हशा घेत असत. अर्थात ती हशा आणि टाळ्यांची दाद लेखकाला होती, पण लेखकावर कुरघोडी करत दिग्दर्शक आणि अभिनयाच्या जोरावर शांतेच्या कार्ट्याच्या टीमने कहर केला होता. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा यांची जुगलबंदी या नाटकात पहायला मिळायची. हसून हसून पोटात दुखणे म्हणजे काय त्याचा प्रेक्षक अनुभव या नाटकातून घेत होते. म्हणजे एकीकडे विजय चव्हाण ‘मोरूच्या मावशी’चा धुडघूस घालत होता, तर दुसरीकडे हे कार्ट सगळ्यांना याड लावत होतं.
या नाटकात शांताची भूमिका नयनतारा करायची. नयनतारा ही ‘नाथ हा माझा’सारख्या नाटकातून फटकळ स्वरूपाची भूमिका करणारी म्हणून ओळखली जात होती. कारण ‘नाथ हा माझा’ या नाटकातील प्रियाचे खूप प्रयोग तिने केले होते. त्यामुळे ती विनोदी अभिनेत्री असेल किंवा चांगली विनोदी भूमिका करू शकते हे कोणी मान्य करणे शक्य नव्हते. कारण त्यापूर्वी ‘बाळा गाऊ कशी अंगाई’सारख्या चित्रपटातून तिने भूमिका केल्या होत्या, पण एक जबरदस्त टायमिंग सेन्स असलेली विनोदी अभिनेत्री आपण आहोत हे सिद्ध करायला नयनताराला ‘शांतेच्या कार्ट’ या नाटकाची मदत झाली. या नाटकात शाम्या म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, व्यंकटेश म्हणजे सुधीर जोशी आणि शांता नयनतारा हे सतत एकमेकांवर कुरघोडी करत असतात. त्यामुळे प्रत्येकाला आपली जागा दाखवून देण्याची चांगली संधी होती.
शाम्याला बायको कशी असावी यासाठी शांता घालत असलेल्या अटी आणि त्या लिहून घेताना शाम्या यात नयनतारा लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुगलबंदी असायची. त्यात कधी नयनतारा, तर कधी लक्ष्या एकमेकांवर कुरघोडी करत. प्रत्येक प्रयोगागणिक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असल्याने या नाटकाला रिपिट आॅडियन्स कायम लाभला होता. सहकलाकारांमध्य्येही रवींद्र बेर्डे, रुही बेर्डे, उज्ज्वला जोग चांगले भाव खाऊन जात होते.
सुधीर जोशी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा प्रेमपत्र लिहिण्याचा प्रसंग असाच धमाल करणारा. बायकोला घाबरून राहणारा व्यंकटेश घरात प्रेमपत्र आल्यावर बायकोवर कशी मात करतो हे दाखवताना नयनतारा आणि सुधीर जोशी यांची झालेली जुगलबंदी प्रेक्षकांना खिळवून ठेवायची. हे नाटक खºया अर्थाने टीमवर्क होते. म्हणजे साधारण बहुतेक नाटके ही एका कलाकाराभोवती गाजतात. ‘मोरूची मावशी’ मावशीभोवती फिरते, ‘तो मी नव्हेच’ लखोबा आणि पणशीकरांभोवती फिरायचे, पण ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकात मात्र लक्ष्मीकांत, नयनतारा आणि सुधीर जोशी या तिघांभोवती फिरत होते. फार कमी नाटकांत इतके चांगले टीमवर्क असायचे. १९७० च्या दशकात आलेल्या ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकात अशी टीम जमली होती. त्या काळातील विनोदाचा बादशहा म्हणून गाजलेला राजा गोसावी, नयना आपटे, अशोक सराफ, प्रकाश इनामदार आणि मच्छिंद्र कांबळी असे दिग्गज त्यावेळी होते. त्यानंतर चांगले टीमवर्क असलेले ‘शांतेचं कार्ट’ हे नाटक होते.
त्या काळात नाटकाची नावे बदलून पुन्हा आणायची एक लाटच आली होती. राजा गोसावी, नयना आपटे यांचे ‘नवरा माझा मुठीत गं’ हे नाटक भरपूर चालल्यानंतर पुन्हा ‘पती पत्नी आणि ती’ या नावाने ते आले. कारण त्या काळात हिंदी सिनेमाशी नाटकाची स्पर्धा असायची. संजीवकुमारचा ‘पती पत्नी और वह’ हा चित्रपट गाजत असल्याने ‘नवरा माझ्या मुठीत गं’ या नाटकाचे नामांतर झाले होते. विजय तेंडुलकरांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक गाजले होते. त्याची जोरदार चर्चा होती. त्यामुळे ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ असे नामकरण करून घालीन लोटांगण आले. बाळ कोल्हटकरांचे त्या काळात ‘उघडले स्वर्गाचे द्वार’ हे वसिष्ठ विश्वामित्र संघर्षावरचे नाटक आले होते. ते गाजत असतानाच लक्ष्मीकांत बेर्डेचे ‘बिघडले स्वर्गाचे दार’ हे नाटक आले होते. तेही नाटक जुनेच नाव बदलून आलेले होते, पण नामांतर झालेले सर्वांगसुंदर नाटक म्हणून ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ याचा उल्लेख करावाच लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा