कलाकारांना राजमान्यता असल्याशिवाय आपल्या कलेला काही अर्थ आहे असे वाटत नाही. त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना जोपर्यंत आपल्या कलेचे कौतुक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून होत नाही तोपर्यंत त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत नाही. याचे कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कलोपासक होते, कलेचे दर्दी होते. त्यामुळे कायम कलाकारांच्या पाठीशी राहून कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कलेला राजमान्यता म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी दिलेली पाठीवर थाप हेच समीकरण गेली ५० वर्षं दिसत होते.
चित्रपटसृष्टीतील सर्वाेच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार, देशातील मानाचा भारतरत्न पुरस्कार मिळवणाºया लता मंगेशकर असल्या काय किंवा लिटील चॅम्प्सचे छोटे कलाकार असोत, सर्वांना शिवसेनाप्रमुखांना आपला पराक्रम दाखवताना आनंद वाटायचा. त्यामुळेच काय होते हे समीकरण? कलाकारांना शिवसेनाप्रमुख आपले का वाटायचे? काय दैवीशक्ती त्यांच्यात होती हे पाहण्यासाठी थोडे मागे जावे लागेल.
इरावती कर्वे यांची कथा आहे ‘परिपूर्ती’ या नावाची. या कथेत त्या एके ठिकाणी व्यासपीठावर गेलेल्या असताना, त्यांची ओळख थोर विदुषी, लेखिका, विचारवंत अशा अनेक बिरुदावलींनी करून दिली जाते, पण तरीदेखील ही ओळख अपूर्ण आहे असे त्यांना वाटत असते, पण एकदा रस्त्याने त्या जात असताना दोन खेळणारी मुले एकमेकांशी बोलताना ‘अरे ती बघ आमच्या वर्गातल्या मुलाची आई’ अशी इरावतीबार्इंची ओळख करून देतात. आई ही ओळख करून दिल्यानंतर त्यांना आपली ओळख पूर्ण झाली, परिपूर्ती झाली असे वाटते. अगदी त्याचप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसेनेने कलाकारांची पाठ थोपटली, कौतुक केले की, कलाकारांना परिपूर्ती झाल्यासारखे वाटते. सर्वच कलकार, क्रीडापटूंचे कौतुक हे शिवसेनाप्रमुख करायचे, पण आपण आज फक्त चित्रपट कलावंतांचाच विचार करणार आहोत. पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत किती कलाकारांच्या कलेचे कौतुक शिवसेनाप्रमुखांनी केले याची गणतीच नाही.
शिवसेनेच्या स्थापनेनंतर फक्त जनतेच्या मदतीसाठी उतरणे हे ध्येय शिवसेनाप्रमुखांनी राखले होते. साधारण १९७० च्या सुरुवातीला मराठी, हिंदी चित्रपटांच्या निर्मितीचे प्रमाण वाढू लागले तसे त्यांच्या समस्याही वाढू लागल्या. अनेक कलाकारांना अडचणी येऊ लागल्या. ‘मोलकरीण’सारखे दर्जेदार चित्रपट काढणारे निर्माते गजानन शिर्के यांनी या गोष्टी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बोलून दाखवल्या. त्यावर उपाय म्हणून चित्रपट कलावंतांच्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी शिवसेना चित्रपट शाखा सुरू करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दादरच्या विष्णू भुवन लॉजवरच्या पहिल्या माळ्यावर १९७० मध्ये चित्रपट शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाचा नारळ फोडण्यासाठी चॉकलेट हीरो देवानंद याला आमंत्रित केले होते. देवानंदच्या हस्ते शिवसेनेच्या चित्रपट शाखेचे उद्घाटन झाले तेव्हा त्यावेळी सर्व चित्रपट निर्माण करणाºया संस्थांना आमंत्रित केले होते. सर्वांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. विशेष म्हणजे गुरुदत्त हा जातीने उपस्थित होता. त्यावेळी सर्व कलाकारांना खूप आनंद झाला होता. साक्षात बाळासाहेब ठाकरे आपल्या पाठिशी असल्यावर आता आपल्या अडचणी संपल्या, हा विश्वास तिथेच कलाकारांना मिळाला. तो शब्द बाळासाहेबांनी कायम पाळला. चित्रपट शाखेचे शाखाप्रमुखपद गजानन शिर्के यांना दिले, तर हे कार्यालय सांभाळण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी शिवसैनिक सदानंद देऊलकर यांना देण्यात आली आणि या चित्रपट शाखेचा शुभारंभ झाला.
त्यानंतर आसपासच्या सर्व स्टुडिओंनी, रूपतारा, रणजीत स्टुडिओ यांनी आपल्या स्टुडिओत शिवसेना चित्रपट शाखेसाठी कार्यालय सुरू केले आणि या शाखेची वाटचाल वेगाने सुरू झाली. रामदयाल नावाचे एक निर्माते होते. त्यांनी संजय खानला घेऊन ‘हसिनों का देवता’ म्हणून चित्रपटाची निर्मिती सुरू केली होती, पण संजय खान हा चित्रपट तारखा पुढे ढकलून, शूटिंग कॅन्सल करून रखडवत होता. त्यामुळे निर्मात्यांचे पैसे अडकून पडले होते, खर्च वाढत चालला होता. ही गोष्ट रामदयाल यांनी शिवसेनाप्रमुखांच्या कानावर घातली. शिवसेनाप्रमुखांनी तातडीने संजय खानला बोलावून घेतले. आपल्या भाषेत समजावले आणि मार्ग काढून हा चित्रपट पूर्ण केला. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांना शिवसेनेबद्दल आत्मियता वाटू लागली. शिवसेनेकडे गेल्यावर आपली कामे होतात हे लक्षात आल्यामुळे चित्रपट कलावंत सभासद होत गेले. त्यामुळे हे कलाकार कायम बाळासाहेबांसाठी काहीतरी आपण केले पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे कल्याणजी आनंदजी, शंकर जयकिशन अशा कलाकारांनी शिवसेनेचा स्थापना दिवस, शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, मार्मिकचा वर्धापन दिन अशा निमित्ताने कार्यक्रम करायला सुरुवात केली. शंकर जयकिशन नाइट, कल्याणजी आनंदजी नाइट, आर. डी. बर्मन नाइट, किशोर कुमार नाइट, वैजयंती माला नाइट अशा प्रकारे रफी, मुकेश, आशा भोसले, महेंद्र कपूर असे कलाकार शिवसेनेसाठी उत्साहात कार्यक्रम करू लागले. हे सगळं शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमापोटी, विश्वासापोटी घडत होते. म्हणजे बाकीच्या राजकीय पक्षांना गर्दी जमवण्यासाठी सिनेकलावंत आणावे लागतात. प्रचारसभांना अभिनेते लागतात, पण शिवसेनेच्या गर्दीचा आणि कामाचा फायदा कलाकार घेत होते. शिवसेनेला गर्दी जमवण्यासाठी कधी कलाकारांची गरज भासली नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच एक हुकमी एक्का होता. नाहीतर मनात आणलं असतं तर आख्खं बॉलिवूड शिवसेनाप्रमुखांच्या प्रेमाखातर प्रचाराला उतरले असते, पण तसा कधीही कलाकारांचा फायदा बाळासाहेबांनी घेतला नाही. आपण कलाकारांच्या पाठीशी राहायचे आहे, त्यांची मदत नाही घ्यायची हा फार मोठा विचार होता.
राजीव गांधींच्या आग्रहाखातर सुपरस्टार अमिताभ बच्चन काँग्रेसमधून इलाहाबाद मतदारसंघातून हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून लोकसभेत गेला, पण काँग्रेसने त्याला बोफोर्स प्रकरणात अडकवले. त्यावेळी अमिताभ बच्चन शिवसेनाप्रमुखांना भेटायला आला आणि मदत मागितली. बाळासाहेबांनी फक्त, तू काही केलं नाहीस ना? घाबरू नको. मी तुझ्या पाठीशी आहे, असा विश्वास दिला आणि त्या प्रकरणातून त्याला बाहेर काढले. कलाकारांना कोणत्याही राजकारणाने विटाळता कामा नये हे बाळासाहेबांचे ध्येय होते. १९८२ साली कुलीच्या शूटिंगच्या वेळी अमिताभला अपघात झाला होता तेव्हा सर्वात प्रथम शिवसेनेची अॅम्ब्युलन्स पोहोचली होती. बेंगलोरवरून मुंबईत आल्यावर त्या काळात शिवसेना ब्रीच कँडीपाशी सतत अमिताभसाठी झटत होती. कारण बाळासाहेब हे कलाकारांचे पाठीराखे होते.
१९९२ च्या बॉम्बस्फोटानंतर संजय दत्त अडकला होता. त्याला अटक झाली होती. एक नायक रातोरात खलनायक झाला. त्यावेळी काँग्रेसचे खासदार आणि मंत्री असलेले सुनील दत्त बाळासाहेबांना भेटायला आले. आपण या प्रकरणाने खूप दु:खी असल्याचे सांगितले. त्यावेळी सुनील दत्त यांच्या पाठीवर हात ठेवून शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते की, काळजी करू नको, मी त्याला सोडवतो. त्याप्रमाणे बाळासाहेबांनी संजय दत्तला या प्रकरणातून बाहेर काढले.
दादा कोंडके यांची शिवसेनाप्रमुखांशी मैत्री आणि सेना प्रेम तर जगजाहीर आहे. पहिलाच चित्रपट ‘सोंगाड्या’ काढल्यावर टॉकीज मिळत नव्हते आणि हिंदी निर्मात्यांनी अडवणूक केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी कोहिनूर टॉकीजवर केलेले आंदोलन आणि लावलेले ‘सोंगाड्या’चे फलक हा शिवसेनेच्या इतिहासातील फार मोठा अध्याय आहे. १४० आठवडे हा चित्रपट तिथे चालला. त्यानंतर दादा कोंडके अखेरपर्यंत शिवसैनिक म्हणूनच जगले.
‘अलबेला’सारख्या चित्रपटाची निर्मिती करणारे आणि शेकडो चित्रपटांत भूमिका केलेले अभिनेते मास्टर भगवान, पण त्यांचा शेवट फार वाईट झाला. अखेरच्या काळात आर्थिक ओढाताण होती. पैसे नव्हते. तेव्हा त्या काळात बाळासाहेबांनी त्यांना २५ हजार रुपयांची मदत केली होती. आजारपणाचा सगळा औषधोपचाराचा खर्च शिवसेनाप्रमुखांनी केला होता. मुंबईत कलाकार बनायला येणारे कलाकार शिवसेना मुंबईत आहे म्हणून येऊ लागले ते यासाठीच. रणजीत भूतकर म्हणून एक कलाकार होते. त्यांनाही अशीच आर्थिक मदत म्हणून शिवसेनाप्रमुख पगार दिल्याप्रमाणे दरमहा पैसे देत होते. कलाकार जगला पाहिजे हे त्यांचे ध्येय होते. म्हणून ते कलाकारांच्या पाठीशी होते.
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया ज्यांनी घातला त्या दादासाहेब फाळके यांचीही परिस्थिती फार चांगली नव्हती, पण त्यांचा मुलगा देवदत्त हा मुंबईत अगरबत्ती विकून गुजराण करतो हे समजल्यावर त्याला मानधन सुरू करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. हा कलाकारांबद्दल असलेला जिव्हाळा फार महत्त्वाचा होता. कलाकारांची कदर कलाकारच करू शकतो. बाळासाहेब स्वत: जातीवंत कलाकार होते. त्यामुळेच ते कायम कलाकारांच्या पाठीशी राहिले.
नाना पळशीकर हे एक ज्येष्ठ कलाकार होते. त्यांनाही त्यांच्या राहत्या घराची काही समस्या निर्माण झाली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख मदतीसाठी धावले होते. आय. एस. जोहर हा एक विनोदी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक होता. तोही एका प्रकरणात अडकला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनीच त्याला मदत केली आणि त्यातून सोडवले होते. शिवसेना चित्रपट शाखेच्या माध्यमातून कलाकारांच्या पाठीशी राहण्याचे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा कलाकारांना विश्वास देणारे शिवसेनाप्रमुख होते. या चित्रपट शाखेचे अध्यक्षपद शाखाप्रमुख म्हणून गजानन शिर्के स्वत: सांभाळत होते. कार्यालय प्रमुख म्हणून सर्व कलाकारांच्या समस्या जाणून त्या शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचे काम सदानंद देऊलकर करत होते. तशी यंत्रणाच शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केली होती.
धर्मंेद्र, मनोज कुमार, संजीव कुमार, किशोर कुमार हे तर शिवसेनाप्रमुखांच्या गळ्यातील ताईत होते. त्यांना शिवसेनाप्रमुखांबद्दल प्रचंड प्रेम होते. केवळ अडचणी सोडवण्यासाठीच नाही, तर बाळासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी हे कलाकार आवर्जून येत असत. कलाकारांना शिवसेनाप्रमुखांकडून एक प्रकारची ऊर्जा मिळत असे. आपले सच्चे पाठीराखे ते आहेत हे कलाकारांना वाटत असे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्याकडे कधीही अपेक्षेने पाहिले नाही. कसलीही अपेक्षा केली नाही. त्याला मदत केली म्हणजे तो आपल्या शिवसेनेसाठी काम करेल, असा विचारही बाळासाहेबांनी केला नाही. फक्त कलाकार म्हणून पाहिले. त्याची जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, प्रांत पाहिला नाही की पक्ष पाहिला नाही. निरपेक्षपणे फक्त त्याच्यातील कलाकार जाणला. नाहीतर सुनील दत्त काँग्रेसचे खासदार, मंत्री होते तरीही त्यांच्यातला कलाकार जाणून मदत केली. अमिताभ बोफोर्समध्ये अडकला तेव्हा काँग्रेसचा खासदार होता, नंतर समाजवादी पार्टीशी जवळीक होती, पण शिवसेनेत या असे आमंत्रण कधी दिले नाही. कलाकारांना मदत केली, त्यांच्या पाठीशी राहिले, पण तुमच्या लोकप्रियतेचा फायदा आमच्या पक्षाला द्या असे कधीच बोलले नाहीत. कारण शिवसेनाप्रमुख हेच इतके मोठे होते की त्यांचा त्यांच्या कामावर विश्वास होता. आपण जिथे जाऊ तिथे गर्दी जमणारच, त्यासाठी कलाकारांना वेठीस धरणे त्यांना मान्य नव्हते.
आत्ताही जे कलाकार शिवसेनेसाठी काम करतात ते स्वयंस्फूर्तीने करतात, पण अन्य पक्षाच्या विचारांचे कलाकार असले तरी त्यांना तितकाच मान शिवसेनेत मिळतो. कारण भेदभाव करणे हे शिवसेनेच्या आणि शिवसेनाप्रमुखांच्या रक्तात नसते. आज आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, सुशांत शेलार हे तरुण कलाकार पक्षाची जी जबाबदारी घेत आहेत ते स्वयंस्फूर्तीने घेत आहेत. वास्तव कशात आहे, कलाकारांचे पाठीराखे कोण आहेत, हे समजल्यावरच उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत दाखल झाल्या. कारण कलाकारांची कदर करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख झालेली आहे. आज शिवसेनाप्रमुख नसले तरी कलाकार उद्धव ठाकरे यांना भेटायला जातात आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन येतात. ही परंपरा फार चांगली जपली जात आहे.