या उत्सवासाठी मुंबई, पुणे अशा शहरांतून कोकणात आपल्या गावी जाऊ इच्छिणार्या चाकरमान्यांसाठी अद्याप काही योग्य नियमावली देण्यात नाही आणि वाहतूकव्यवस्थेबाबत अद्यापही अनिश्चिंतता आहे. एसटीची संख्या कमी. रेल्वे सुरू होण्याची शक्यता असली तरी त्याची संख्या मर्यादीत. चार चार महिने अगोदर रेल्वेचे रिझर्वेशन दरवर्षी केले जाते. पण यंदा रेल्वे बंद असल्यामुळे सगळा बोजा रस्ते वाहतुकीवर आहे. एकीकडे खाजगी बसचालक अवाच्या सवा आकारण करत असताना आता सरकारने एसटी चालू करावी आणि बसेस सोडाव्यात ही अपेक्षा करत आहे. त्यातच राजकीय पक्षांचीही हात धुवून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. मुंबईतील कोकणी मतदार डोळ्यापुढे ठेवून त्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सेना, भाजप, मनसे यांच्यात चढाओढ लागलेली दिसते आहे. पण सामान्य माणसाला सध्या तरी त्याच्याशी काही देणेघेणे नाही. आम्हाला बाप्पाच्या दर्शनाला जाता यावे एवढीच इच्छा आज तरी आहे. एकीकडे कोकणवासीयांना गणपतीसाठी आपापल्या गावी जाता यावे म्हणून आता राजकीय पक्षांमध्येही चढाओढ लागली आहे. शिवसेना कोकणी माणसाला आपला मतदार मानते, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक मंत्री अनिल परब यांनी गेल्याच आठवडयात मंत्रालयात एक बैठक घेऊन कोकणवासीयांसाठी एसटीच्या तीन हजार बसेस तयार आहेत असे जाहीर केले, तर आता ह्या कोकणवासीयांसाठी मनसेही सरसावली आहे. येत्या 4 ऑगस्टपासून मनसे कोकणसाठी बसेसची व्यवस्था करणार आहे. भाजपचे आमदार आशीष शेलार आणि अमित साटम यांनी एसटी बसेसमधून कोकणवासींयना मोफत प्रवास द्यावा किंवा केवळ 20 टक्के भाडे आकारावे, अशी मागणी केली आहे. तसेच, सिंधुदुर्गमधील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तिथे गेल्यावर चाकरमान्यांना 14 दिवसांऐवजी 7 दिवसच विलगीकरणात ठेवावे, अशी मागणी केली आहे.
त्यामुळे कोकणी माणसाचा गणेशोत्सव नीट पार पडावा, संपन्न व्हावा यासाठी राजकीय पक्ष आतुर झाले आहेत. पण साधी गोष्ट आहे की आता एसटीच्या बसेस सुरळीत सुरू करण्याची गरज आहे. खाजगी गाड्यातून गर्दी करून लोक तिकडे जाणारच मग एसटीने गेले तर काय फरक पडतो? अॅडजस्ट करायला कोकणी माणूस नेहमीच तयार असतो. मग त्याची सोय बघून सरकारने काहीतरी सोय करायला काय हरकत आहे? उगाच कोरोनाचा नसता बाउ करून काही निबर्र्ंध लादण्याची आता तरी आवश्यकता आहे असे वाटत नाही.
काही जाणकारांना असे वाटते की, कोरोनातून मुंबई शहर बाहेर येत आहे.पुण्यात त्याचा कहर सुरू आहे. विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी लॉकडाऊन चालू आहे, कोरोनाशी झुंज देताना शासनाचे कंबरडे मोडायची वेळ आली आहे. अशावेळी राज्य सरकार कोकणात जाणार्या गणेशभक्तांसाठी एसटीच्या तीन हजार गाडया सोडण्याच्या तयारीत आहे, याची गरज काय? पण भक्तांना आता अडवू नका. सरकारने काहीही सोय केली पाहिजे. पण कोकणी माणसाला प्रिय असणार्या गणेशोत्सवाला त्याला जाता आले पाहिजे.
अनेकांना वाटते की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड हे जिल्हे कोरोनामुळे ग्रासले आहेत. तिथे अनेक भागांत लॉकडाऊन चालू आहे. एकीकडे एसटीच्या कर्मचार्यांना पगार देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नाहीत. दुसरीकडे, एसटी तोटयात आहे म्हणून शासनाकडे अनुदान मागायचे. त्यातच आता 50 वर्षे वयांवरील एसटीच्या कर्मचार्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना आणली आहे. अशी कारणे सांगून याला अनेकजण विरोध करत आहेत. पण कितीदिवस आपण हे कुरवाळत बसणार आहोत? लोक काही केल्या कोकणात गेल्याशिवाय राहणार नाहीत. मग खाजगीने ते जात असतील तर तोच पैसा सरकारच्या तिजोरीत जावा आणि गरीबांना योग्य दरात जाता यावे असे का वाटत नाही कोणाला?
सध्या एका एसटी बसमध्ये 22 प्रवासी प्रवास करू शकतात. राज्य सरकरने 3 हजार गाड्याची सोय केलेली आहे. म्हणजे तीन हजार गाडयांमध्ये साधारण 66 हजार प्रवासी प्रवास करू शकतील. त्याशिवाय आता मनसेतर्फे सोडण्यात येणार्या बसेस आणि खासगी गाडयांची संख्या वेगळी आहे. म्हणजे दोन-अडीच लाख प्रवासी या मार्गावर असतील. पण याला अनेकांचा विरोध आहे. कोकणी माणसाला गणेशोत्सवाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न चालला आहे. पण तो काही योग्य नाही. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी कोकणाकडे जाणारे रस्ते दुरूस्त करण्याचे प्रयत्न असतात. त्यालाही खिळ बसली आहे. कोकणातील रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता, अनेकजण पुणे-कोल्हापूर मार्गाने कोकणात जातात. या काळात प्रवाशांचे होणारे हाल, रस्त्यात तासन तास वाहनांचा खोळंबा, हे होणारच आहे. त्यातच यंदा ई पास घेऊन जे येतील त्यांनाच जिल्ह्यात प्रवेश मिळेल असा नियम केला आहे. मात्र हे ई पास शासन किती दिवसांत मंजूर करेल, हे माहीत नाही. पण खरे तर आपल्याच मूळगावी जायला ई पासची गरज काय, असा प्रश्न कोकणवासीयांच्या मनात येत आहे. कारण महाराष्ट्रात जिल्हाबंदी आहे. त्यामुळे ई पासची आवश्यकता आहे, असे शासनाकडून सांगण्यात येत आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे तिथेही जिल्हा प्रशासनातर्फे मुंबई-पुण्यातून येणार्या प्रवाशांसाठी नवे नियम करण्यात येत आहेत. यामुळे कोकणवासीयांच्या मनात चीड निर्माण होत आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी शासनाने परप्रांतीयांना मोफत महाराष्ट्राच्या सीमेपार नेऊन पोहोचवले, तेव्हा त्यांच्याकडे कोणता ई पास होता आणि आता हजारोंच्या संख्येने हे परप्रांतीय मजूर पुन्हा येऊ लागले आहेत, आता त्यांच्याकडे कोणता ई पास आहे? हे नियम आमच्या गणेशोत्सवाचे वेळीच का आठवले असा प्रश्न यातून निर्माण होतो. म्हणून नियम शिथील करून कोकणी माणसाला बाप्पाच्या उत्सवासाठी जाता आले पाहिजे.