२७ आॅगस्ट हा पार्श्वगायक मुकेशचा स्मृतिदिन. मुकेशनी अनेकांसाठी आपला आवाज दिला असला, तरी त्याची ओळख राज कपूरचा आवाज म्हणून वेगळी आहे. आजच्या दिवशी साधारण ४५ वर्षांपूर्वी मुकेशचे निधन झाले तेव्हा राज कपूरचे शब्द तेच होते, माझा आवाज हरपला आहे. मुकेश या नावाने ओळखल्या जाणाºया या गायकाचे मूळ नाव मुकेश माथुर असे होते. मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाºया श्रीमंत व्यक्ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेशची पत्नी होती. अठरा वर्षांच्या सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून निघून थेट मुकेशबरोबर पळून जाऊन लग्न केले होते. खरं तर मुकेश तेव्हा बेघर होते आणि तत्कालीन प्रसिद्ध नट मोतीलाल याच्याकडे राहात होते. लग्नाच्याच दिवशी मुकेशचा २२ वा वाढदिवस होता. पुढे त्यांना ऋता ही कन्या आणि नितीन हा मुलगा झाला. मुलांच्या जन्मांनंतर मुकेशच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांची भरपूर गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली.
मुकेश हा दिसायला देखणा असा होता. त्या काळात पार्श्वगायन फारसे विकसित झाले नव्हते. तेव्हा ज्यांना गायला येते त्यांनाच नायक म्हणून भूमिका देण्याची प्रथा होती. त्याप्रमाणे गाण्याचा पोत असलेला मुकेश नायक म्हणून या चित्रपटसृष्टीत आला. मूळचा लुधियाना येथे असलेल्या मुकेशच्या आई-वडिलांचे नाव होते, जोरावर चंद आणि चांद रानी. मोठी बहीण संगीत शिकत असल्याने मुकेशलाही संगीताची गोडी लागली होती. मोतीलाल हे नामांकित अभिनेते त्या काळात गाजले होते. मोतीलाल हे त्यांचे नातेवाईक होते. एकदा एका कार्यक्रमात मुकेशला गाताना मोतीलालनी पाहिले आणि त्याच्या आवाजातील जादूने मोतीलालला मोहिनी घातली. मुकेश मुंबईत आला आणि मोतीलालकडेच राहू लागला. त्यावेळी मोतीलालने त्याच्या संगीत शिक्षणाची व्यवस्थाही केली.
१९४१ मध्ये मुकेशला एका चित्रपटाची संधी मिळाली. त्या चित्रपटातील गाणीही त्याने स्वत:च म्हटली होती. पार्श्वगायन तेव्हा प्रचलित झालेले नव्हते. हा चित्रपट होता निर्दोष. हा काळ आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मोहवणाºया के. एल. सैगल यांचा होता. सैगल यशाच्या शिखरावर होते. त्यामुळे प्रत्येक गायकावर त्याचा प्रभाव होता. तसाच तो मुकेशवर झाला, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच नव्हते. याचदरम्यान पहिली नजर नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. यातील दिल जलता है तो जलने दो... हे गाणे लोकप्रिय झाले. हा आवाज कुणाचा आहे असे विचारल्यावर कोणीही पैज लावून के. एल. सैगल यांचेच नाव घेत होते, पण अवघ्या २२ वर्षांच्या मुकेशचा तो आहे हे रसिकांना कळले तेव्हा या चित्रपपटसृष्टीला मुकेश या नावाची ओळख झाली. या गाण्याने मुकेशला ओळख दिली.
मुकेशचा दर्दभरा आवाज आजही रसिकांना मोहवतो. ते त्यांच्या आवाजाचे वैशिष्ट्य बनले. त्यानंतर संगीतकार नौशाद यांनी दिलीपकुमारसाठी म्हणून मुकेशकडून अनेक गाणी गाऊन घेतली. मुकेशनी आपला सैगलचा प्रभाव कमी केला आणि स्वत:ची ओळख निर्माण केली. मेहबूब खानचा अंदाज, त्यानंतर मधुमती, मेला, यहुदी, अनोखा प्यार अशा तुफान गाजलेल्या चित्रपटात मुकेशने दिलीपकुमारचा आवाज निर्माण केला, पण १९५० नंतर मात्र मुकेशचा आवाज हा खºया अर्थाने राज कपूरला चांगलाच शोभला. राज कपूरचा अभिनय, शंकर जयकिशनचे संगीत, शैलेंद्रचे गीत आणि मुकेशचा आवाज हे समीकरण यशस्वी संगीताचे बनून गेले.
राज कपूरसाठी मेरा जुता है जपानी (श्री ४२०), किसीकी मुस्कुराहटो पे (आवारा), सबकुछ सिखा हमने, ना सिखी होशियारी (अनाडी), डम डम डिगा डिगा (छलिया) ही राज कपूरसाठी गायलेली वेगळी गाणी होती. राज कपूरसाठी गाताना मुकेश जीव ओतून गात असे. राज कपूरच्या डोळ्यातील भाव आपल्या गाण्यात तरळले पाहिजेत हे त्याने जाणले होते. राज कपूरला उत्तम संगीताची जाण होती आणि ते स्वत: गातही असत. त्यामुळेच मुकेशनी एके ठिकाणी म्हटले होते की, मनात आणले असते तर राज कपूर हे उत्तम गायक म्हणून प्रसिद्ध झाले असते, माझ्यापेक्षा सुंदर गायले असते, इतकी त्यांची गाण्याची जाण चांगली होती, पण मुकेशच्या आवाजावर राज कपूर इतके प्रेम करत होते की, त्यांनी मुकेशला वचन दिले होते. मी आयुष्यभर तुझ्याच गळ्याने गाईन असे राज कपूर म्हणाले होते. राज कपूरचा मुकेशसाठी शेवटचा ठरलेला चित्रपट म्हणजे सत्यम शिवम सुंदरम्. या चित्रपटात राज कपूरने काम केलेले नसले, तरी हा संपूर्ण नायिकाप्रधान चित्रपट होता. त्यातही मुकेशसाठी राज कपूरने एक गाणे निर्माण केले होते.
अर्थात केवळ राज कपूरसाठीच नाही, तर मुकेशने दिलीपकुमार, देव आनंद, राजेंद्रकुमार, सुनील दत्त, धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांना आवाज दिलेली गाणीही खूप गाजली. १९६७ चा सुनील दत्त-नूतनचा मिलन या चित्रपटातील सावन का महिना, पवन करे शोर हे गाणे आजही लोकप्रिय आहे. मुकेशला अनाडीमधील सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी, सबसे बडा नादान चित्रपट पेहचान, जय बोलो हनुमानकी चित्रपट बेईमान आणि कभी कभी मेरे दिल में या कभी कभी चित्रपटातील गीतासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता.
पार्श्वगायनाबरोबरच मुकेश स्टेज शो करत असत. मुकेश स्टेजवर कार्यक्रम सादर करत असताना स्वत: हार्मोनियम वाजवत असे आणि अत्यंत व्यवस्थित सुटाबुटातील पेहराव करून येत तेव्हा ते हँडसम असे दिसत. आपल्या लग्नाचा तिसावा वाढदिवस साजरा करून मुकेश अमेरिकेला गेले होते. अमेरिकेतील डेट्रईड, मिचिगन इथे त्यांचे स्टेज शो होणार होते. २७ आॅगस्ट १९७६ ला नेहमीपेक्षा जरा लवकरच ते उठले आणि आवरून तयारही झाले, पण कपडे घालत असतानाच त्यांना छातीत दुखायला लागले. त्यामुळे डॉक्टरकडे गेले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जादुई आवाजाचा मुकेश सर्वांना सोडून गेला होता. स्टेज शो सुरू होता. शोमस्ट गोआॅन म्हणतात. त्याप्रमाणे हा उर्वरित शो लता मंगेशकर आणि मुकेशचे पुत्र नितीन मुकेश यांनी पूर्ण केला आणि दुसºया दिवशी मुकेशचे पार्थिव घेऊन ते सगळे भारतात आले. वयाच्या ५३ व्या वर्षी मुकेशचे निधन झाले होते. त्यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर जमले होते. राज कपूरने आज माझा आवाज हरवला आहे, अशा शब्दांत शोक प्रकट केला.
प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा