रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

अत्यंत योग्य निर्णय


केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाºया राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, असे करण्यात आले आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. हा एक चांगला निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. धाडसी आणि स्पष्ट निर्णय घेण्यात मोदी सरकारची ख्याती आहे. त्या ख्यातीत आता आणखी भर पडली आहे. हा निर्णय घेतल्याने काँग्रेसला दु:ख होणे स्वाभाविक आहे; पण अशा पुरस्काराला राजीव गांधींचे नाव देणे चुकीचेच होते. स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येक गोष्टीला गांधी-नेहरू यांचीच नावे देण्याची प्रथा पाडली आहे. त्यामुळे लाचार लोकांना त्यांच्याशिवाय दुसरे कोणी महान होते हे वाटतच नाही; पण पंतप्रधान मोदी आणि सरकारने हा खेलरत्नच्या पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय आहे. केवळ विरोधासाठी विरोध आणि मोदींना विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रकार अनेक जण करतील; पण ते आतून सुखावले असतील, कारण असा निर्णय पूर्वीच होणे आवश्यक होते. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे; पण राजीव गांधींचा आणि खेळाचा संबंध काय? चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा दादासाहेब फाळके या नावाने दिला जातो. तसाच क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीच्या नावानेच असला पाहिजे. ही भूमिका एकदम योग्य आहे. त्यामुळे त्या पुरस्काराचा सन्मान वाढला आहे. खेलरत्नला राजीव गांधी यांचे नाव असल्यामुळे तो एखादा खाजगी संस्थेचा पुरस्कार असल्यासारखे वाटत होते. त्याचे महत्त्व सर्वोच्च पुरस्कार असे वाटत नव्हते. भारतरत्न, पद्म या तोडीचा पुरस्कार असताना, तो पुरस्कार कोणत्याही राजकीय नेत्याच्या नावे असणे चुकीचेच होते. त्यासाठी ध्यानचंद यांचे नाव हे अगदी बरोबर आहे. हा पुरस्कार आपल्याकडे १९९१नंतर सुरू झाला. त्याचदरम्यान राजीव गांधींचे निधन झाले होते, म्हणून त्यांचे नाव भावनेच्या भरात काँग्रेस सरकारने केले; पण त्यामुळे त्या पुरस्काराचे महत्त्व कमी झाले होते. ज्यावेळी सचिन तेंडुलकरला भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी होत होती, तेव्हा काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार हा राजीव गांधी खेलरत्न आहे, त्यामुळे भारतरत्न देण्याची गरज नाही, असे म्हटले होते; पण त्या पुरस्काराला राजीव गांधींचे नाव जोडले गेल्यामुळे तो भारतरत्नच्या तोडीचा पुरस्कार आहे, असे कधीच कोणाला वाटत नव्हते. त्यामुळे जनतेच्या दबावाने सचिनला भारतरत्न देणे भाग पडले. तेव्हाच खरे, तर राजीव गांधी यांचे खेलरत्नचे नाव काढणे आवश्यक होते; पण मनमोहन सिंग सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही; पण ही सरकारची चूक आता मोदी सरकारने सुधारली आहे हे योग्य आहे.


प्रत्येक ठिकाणी राजीव गांधी आणि गांधी-नेहरू यांचे नाव देण्याची जी प्रथा काँग्रेसने पाडली होती त्याला हे चांगले उत्तर आहे. २०१० साली सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी मुंबईत शिवसेनेने केली होती. ती मागणी योग्य होती, कारण त्यावेळी त्यांच्या सागरी उडीला शंभर वर्ष पूर्ण झाली होती; पण महाराष्ट्रात असूनही काँग्रेस नेत्यांनी सावरकरांचे नाव न देता राजीव गांधींचे नाव दिले गेले. शिवसेना त्यावेळी खूप दुखावली होती. प्रत्येक ठिकाणी त्या-त्या क्षेत्रातील योग्य व्यक्तीचे नाव देणेच योग्य असते. क्रीडा क्षेत्रातील पुरस्काराला ध्यानचंद यांचेच नाव योग्य आहे. बाकी रस्ते, पूल, उद्याने आहेत त्यांना द्या हवे, तर पाहिजे त्यांची नाव; पण क्रीडा, कला, साहित्य, नाट्य या क्षेत्रातील पुरस्काराला राजकीय नेत्यांचे नाव हे योग्य नाही. मोदी सरकारने कोणालाही न जुमानता हा घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे. त्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन.

हा निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, भारतभरातील नागरिकांकडून मला खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यासाठी अनेक विनंत्या येत आहेत. त्यांच्या मतांसाठी मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करीत, खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, असे करण्यात येत आहे. मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते, ज्यांनी भारताचा सन्मान वाढविला. आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्यांच्या नावावर ठेवला जाणे योग्य आहे, असे ट्विट मोदी यांनी केले. भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. ही योग्यच बाब होती. आता या पुरस्काराला वजन प्राप्त झाले आहे. नावातच सर्व काही आहे. तो काही काँग्रेसतर्फे दिला जाणारा पुरस्कार नाही. त्यामुळे राजीव गांधींच्या नावाचा तिथे काहीही संबंध नाही. हा केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार असल्याने त्या क्षेत्रातील वजनदार व्यक्तीच्या नावानेच तो पुरस्कार असणे उचित आहे. तीस वर्षांची ही चूक पंतप्रधान मोदींनी सुधारली हे फार महत्त्वाचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: