आज भारतीय स्वातंत्र्याचा पंचाहत्तरावा, म्हणजे अमृत महोत्सवी वर्धापन दिन आहे. सध्या हयात असलेल्या लोकांपैकी ९० टक्के किंवा जास्तच लोक म्हणायला हरकत नाही की, ते स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेले आहेत; परंतु या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, ज्यांनी आपले रक्त सांडले आणि जे घरापासून दुरावले त्यांचे स्मरण करणे हा कृतज्ञता भाव आहे. आजच्या दिवशी त्या हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केल्याशिवाय खरा स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. आज आपण स्वतंत्र आहोत ते त्यांच्यामुळेच, त्यामुळे त्यांच्या ऋणात राहणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय स्वातंत्र्य दिवस प्रतिवर्षी १५ आॅगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते, तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो; पण या दिवशी उफाळून येणारे देशप्रेम हे फक्त एक दिवसापुरते मर्यादित असता, कामा नये. राज्य सरकारने तर हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षभर साजरा करण्याचे ठरवले आहे. हे खूप चांगले आहे.
१७७० पासून जवळपास दीडशे वर्ष भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची आणि कडक केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्यापूर्वीच ब्रिटिशांपासून या भारतीयांचे स्वत:चे असे राज्य असले पाहिजे ही गर्जना लोकमान्य टिळकांनी केली होती. स्वराज्याची हाक लोकमान्यांनी दिली होती. त्यानंतर २०व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली; परंतु अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीत बळी गेलेले हजारो क्रांतिकारक, त्यानंतर ब्रिटिशांना जेरीस आणणारे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, चापेकर, सावरकर यांनी स्वराज्यासाठी अतोनात यातना सोसल्या होत्या, म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे लक्षात घेतले पाहिजे. आज अनेक ठिकाणी दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल, अशी गाणी लावली जातात; पण हातात शस्त्र घेऊन सशस्त्र क्रांती झाली आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपतराय अशा अनेकांनी रक्त सांडले म्हणूनच ही स्वातंत्र्याची मजा आपल्याला उपभोगता येते आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. महात्मा गांधींनीही आपल्या परीने शांततेच्या मार्गाने ब्रिटिशांना विरोध केला. सविनय कायदेभंग चळवळीचे नेतृत्व केले. १९२९ साली लाहोरच्या सत्रात काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली, त्यामागे लोकमान्य टिळकांचा विचार होता. १९३० साली काँग्रेसने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्यासाठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लीम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले आणि त्यांनी आॅल इंडिया मुस्लीम लीगची स्थापना केली. दुसºया महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य आणि युद्ध हे सांभाळता येणार नाही, तसेच दुसºया बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. या असंख्य प्रयत्नांनंतर दिनांक १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला; पण जाता-जाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणाºया अनेक शीख माणसांना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक यामध्ये मारलेही गेले. १९०५ साली इंग्रजांनी बंगालची फाळणी केली होती, तेव्हा लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, बाळ गंगाधर टिळक या लाल-बाल-पाल या त्रिकुटाने पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रातून कडाडून विरोध करून ही फाळणी मागे घेण्यास लावली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी सूडबुद्धीने भारताचे तुकडे करायचेच हे धोरण ठरवले होते. त्याचाच एक भाग पाकिस्तानची निर्मिती आणि भारताची फाळणी हा होता. पंजाबचा काही भाग पाकिस्तानात गेला. बंगालचा काही भाग पाकिस्तानात गेला. या ब्रिटिशांच्या क्रूर आणि सुडाच्या सत्तेपासून भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले; पण सुराज्य मात्र मिळाले नाही. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने देशात सुराज्य स्थापन होईल, अशा अपेक्षा करण्याची वेळ आलेली आहे. स्वातंत्र्यानंतर ३७० कलमाचा आधार घेत भारताचे असलेले काश्मीर स्वतंत्र ठेवण्याचा अधमपणा आपल्याकडून झाला होता. ती चूक मोदी सरकारने दुरुस्त केली आणि दोन वर्षांपूर्वी भारताची ताकद जगाला दाखवून दिली. त्यामुळे खºया अर्थाने हा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यासारखा दिवस आहे. या दिवसाच्या निमित्ताने आता सुराज्याची अपेक्षा बाळगायला हवी.
स्वतंत्र भारत हा २६ जानेवारी, १९५० रोजी प्रजासत्ताक राष्ट्र झाला. भारताचे संविधान तयार करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत, तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले.
पण आता ७५ वर्षांनंतर स्वातंत्र्याचा स्वैराचार सुरू असताना, सुराज्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे. रोजगार, आरोग्य, किमान सुविधा आणि देशाची प्रगती यासाठी सार्वत्रिक प्रयत्न यशस्वी होण्यासाठी शासन आणि प्रशासनातील भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. दप्तरदिरंगाई थांबली पाहिजे, हीच अपेक्षा यानिमित्ताने करावी लागेल. आज देशाची लोकसंख्या १४० कोटींच्या घरात गेलेली असताना, त्यातील कोट्यवधी लोक हे रोजगारापासून वंचित आहेत. त्यात गेल्या दीड वर्षात आलेल्या कोरोनाच्या परिस्थितीने जिगणे नकोसे झाले आहे. पुन्हा आपण पारतंत्र्यात गेलो काय अशी अवस्था आहे. दारिद्ररेषेखाली जगणाºयांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. शासकीय अहवालानुसार ही आकडेवारी १८ टक्क्यांच्या आसपास असली, तरी दिसणारे चित्र पाहता हा आकडा ४० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. लाखांचा पोशिंदा असणारा अन्नदाता शेतकरी आत्महत्या करत आहे, कर्जबाजारी झालेला आहे, नापिकीने गांजला आहे. त्याला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संप करावा लागतो. हे चित्र सुराज्याचे नाही. स्वातंत्र्य झाले, आता सुराज्य झाले पाहिजे. रस्ते, पाणी, रोजगार, शेती यासाठी होणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. बँका भ्रष्टाचाराने बरबटल्यामुळे त्या रोजगार निर्मितीला अर्थसहाय्य करत नाहीत. या पातळीवर आता सुराज्याची स्थापना करण्याची वेळ आलेली आहे. स्वराज्य झाले आता सुराज्याचा प्रयत्न हवा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा