मान्याच्या वाडीच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गडबड चालली होती. सगळे ग्रामपंचायत सदस्य जमले होते. ग्रामपंचायतीचे सदस्य जमले की, गावात लगेच त्याची वार्ता पसरते आणि गावातल्या चावडीत लगेच चर्चा करायला सगळे जमतात. आजही पारावर परबत्या पाटील, दौलती माने, रंगा माने, साहेबराव माने, असे अनेक जण ग्रामपंचायतीत काय गरमागरम चर्चा होणार आणि काय भानगड आहे हे बघायला जमले होते.
इतक्यात ग्रामपंचायतीची मिटींग संपली अन् येकेक सदस्य यायला लागला. विरोधी पक्षनेता जित्याभाऊ माने बाहेर आल्याबरोबर समद्यांनी त्याला गाठलाच. ‘काय भानगड हाय? कशापायी मिटींग बुलावली?’ साहेबरावानं टोकलंच. तसा जित्याभाऊ म्हणाला, ‘आता समजलंच की... सरपंच सांगत्यालच की समदं... न्हाई म्हंजी घरटी सांगावा बी यील अन् गावात रिक्षा बी फिरल.... घोडा मैदान काई लांब न्हाई आता..’
‘बास का आता?’ साहेबराव फुरफुरला, ‘किती आडवेडं घ्याल? आँ.. आता नसंल सांगायचं तर ºहाउंदे..’
‘काय राव साहेबराव... आव लगीच रागाला येताय व्हय? आवं म्होरल्या ऐतवारी गावात शिबीर घ्याचं ठरलाय... ठरलाय म्हंजी काय तसा हुकूमच आलाय ना जिल्ह्याकडून...’ जित्यानं पाल्हाळ लावलं.
‘पर कसलं शिबीर म्हणायचं?’ रंगा मान्यानं तोंड खुपासलं. तसा जित्याभाऊ म्हणाला, ‘सरकारनं फतवा काडलाय... परत्येक गावाचं लसीकरण शंभर टक्के झालं पायजेल. या महामारीपासून त्येवडा येकच उपाय हाय... ३१ तारकेच्या अगुदर जिल्हा कोरोनामुक्त करायचाय... त्यासाठी लशीकरण हुंबळाक व्हायला पायजे.’
बघता-बघता ही बातमी गावात पसरली. वेगळी रिक्षा फिरवायची गरजच भासली नाही. गावात निसता लसीकरण शिबिराचाच गवगवा. जोरदार तयारी. मांडव काय, खुर्च्या काय, बोलूच नका. तालुक्यातनं डाक्टरांच पथक येणार, आमदार येणार, कारखान्याचं चेअरमन येणार, तहसीलदार येणार, डाक्टरांबरोबर छान छान नर्स येणार म्हणून सगळे जण खूश. आन एकच उत्साह सुरू.
अन् येकदाचा रविवार उजाडला. मान्याच्या वाडीची लोकसंख्या दोन हजारांच्या आसपास हुती. त्यात चिल्लीपिल्लीच पाचशेच्या घरात होती. त्यामुळं तब्बल १५०० डोस घेऊन आरोग्य पथक शिबिरात पोहोचलं. मंडपात कनातीला लागून ठिवलेल्या खुर्च्यांवर गावकºयांनी अगुदरच मायंदाळ गर्दी केली होती.
शिबिराचं उद्घाटन हारतुरे स्वागत, भाषण झाली अन् प्रत्यक्ष शिबिराला सुरुवात झाली. आरोग्य अधिकाºयांनी माहिती द्यायला सुरुवात केली, ‘तर मान्याच्या वाडीतील ग्रामस्थांनो, नमस्कार... आता आपण लसीकरणाला सुरुवात करत आहोत. आपल्याला दहा-दहा जणांचे कट करायचे आहेत. एकावेळी दहा-दहा जणांना बोलावलं जाईल. प्रत्येकाला टोकन दिलं जाईल. टोकन नंबर पुकारला की, त्यानं पहिल्या दहा खुर्च्यांवर यायचं. सर्वांनी अगुदर नाष्टापानी करून घ्या म्हंजी लसीकरणाला सुरुवात हुईल. कुनाला काई शंका असली तर विचारा.’
निसतीच कुजबूज. कोण काहीही बोललं न्हाई; पण केव्हा काय बोलतील याचाही पत्ता नाही.
सखुबाई, पारूबाई, हौसाबाई, कोंडाबाई, अनुबाई हा ढालगज बायकांचा ग्रुप अगदी नटून थटून आला होता. त्यांच्यात चर्चा सुरू झाली. ‘आदी काई लोकांना घिउ द्यात.. मंगच आपन घिऊ’ हौसाबाई म्हणाली. तशी पारूबाई म्हणाली, ‘अगदी माझ्या मनातलं बोललीस.’
ऐंशी वर्षांचे हणमंतराव लईच चेकाळले होते. गावात नर्स बाया आल्यामुळे मुद्दाम सलगी करत कायतरी प्रश्न विचारायला म्हणून नर्सकडे गेले, ‘म्याडमबाई... येक शंका हाय... न्हाई म्हंजी पानी गरम करायला कुटं चूल, इस्टू दिसना...’
नर्स वैतागली अन् म्हणाली, ‘गरम पानी कशाला? हितं काय अंगुळ्या करायला न्हाई बोलावलं.. फक्त इंजंक्शन घ्यायचं अन् जायचं.’
तसं हसत हणमंतराव गूळ काडत म्हणालं, ‘आव मॅडमबाई.. ते इंजक्शन द्याचं मंग सुई पाण्यात उकळाया गरम पानी नको का? आमच्या लानपणी ती पटकीची साथ आली हुती... तवा अशीच टोचाटोची झाली व्हती. तंवा इंजक्शनची सुई उकळून परत्येकाला इंजक्शन दिलं जायचं. स्वच्छ करून, म्हणून इचारलं.’
नर्स हसायला लागली, ‘अहो काका... आता जमाना बदललाय... आता सुई उकळायला लागत नाही... एकदा टोचली की, फेकून देतात. प्रत्येकाला वेगळी सुई असते. यूज अँड थ्रो.’
हणमंतराव चुकचुकलं, ‘काय राव आजकाल मालाची गॅरंटीच नाई म्हणा की.. येकदा वापरलं की सुई बिगडून जातीय? आलेकालेकालेका... लई वंगाळ दिस आल्यात.. कलयुग म्हणायचं... माल काय चांगला नाय... न्हाई म्हणलं माल काय चांगला न्हाय आजकाल.’
तशी हणमंतरावाची बायको पुढं आली अन् त्यांना खेचून म्हणाली, ‘मला समजतंय बरं समदं.. तुमाला कंचा माल चांगला हवाय ते.. तकडं लाकडं गेली मसनात...तरी माल बगायला येताय....’ नर्स नाक मुरडून पुढे गेली. सगळे हसायला लागले.
तिकडं आरोग्य अधिकारी मधूनच माईकवरून पुकारत होता, ‘ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांनी सटीफिकेट बाजूच्या टेबलवरून घ्यावे.’
इकडं हौसाबाई, पारूबाई बोलायला लागल्या. ‘अगं बया...आजवर इकती इंजक्शन घेतली, पण कदी सर्फतिकीट न्हाई मिळालं. ते देवीचं सर्फतिकीट तर आपल्या दंडावरच गोल खून उमटायची. परत्येकाच्या दंडावर पोस्टाचा शिक्का मारावा, तशी खून हायच.’
‘या बया... तर आता ही सर्फतिकीट घिऊन करायचं काय?’ पारूबाईनं शंका विचारली तशी हौसाबाई म्हणाली, ‘इचार की त्या नेत्याला.’
जित्याभाऊला या बायकांनी अडवला अन् विचारलं, ‘काय वं पुडारीसायेब.. त्या सर्फतिकीटाचं काय करायचं? का फिरम करून घरात लावायचं? ’
‘आव मावशी... ते लई कामाचं हाय... इंजक्शन घेतल्याचे सर्फतिकीट असलं म्हंजी बसमदून, झालंच तर मंबईला गेला, तर लोकलमधून प्रवास करायला परमीशन मिळनार हाय. लई भारीतलं सर्फतिकीट हाय ते.’
हौसाबाई, पारूबाई लई खूश झाल्या. पारूबाई म्हणाली, ‘लई भारी की मंग.. आव हे सर्फतिकीट म्हंजी यसटी रेल्वेचा मोफत पासच म्हणा.. पारे आपण की न्हाई गणपतीनंतर अष्टविनायकाची यात्राच करू. आता या मोफत सर्फतिकीटावरून प्रवास करू. मला मुंबईला बी जायचं हाय... तू बी चल माझ्यासंकट’.
या चर्चा आरोग्य अधिकाºयानं ऐकल्या अन् तो खाली आला अन् म्हणाला, ‘मावशी आवं कायतरी करू नका.. तो काय मोफत पास नाही.. तुम्ही लस घेतली याचं ते सर्टीफिकेट आहे.. त्याचा बाकी काई उपयोग नाही.’
आता हौसाबाई चिडलीच, ‘मग सुक्काळीच्या ते कशापायी वाटतुयास रं बिनकामाचं... सुरळी कर अन् घाल ते...’
आरोग्य अधिकारी दचकलाच अन् म्हणाला, ‘कुठं?’
तशी हौसाबाई म्हणाली, ‘चुलीत... आणकी कुटं?’
तसे सगळं गाववालं जोरात हसायला लागले आणि चेहरा पाडून आरोग्य अधिकारी कावरा बावरा होऊन निघून गेला.
प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा