भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतिदिन. ते भारतीय जनता पक्षाचे एकमेव नेते आहेत की, त्यांचा कोणीच तिरस्कार करत नाही. सगळ्यांनी त्यांच्याकडे आदरानेच पाहिले. स्वप्न सत्यात पाहणारे, कविमनाचे वाजपेयींनी भाजप सत्तेवर येईल हे स्वप्न कित्येक वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यावेळी कधीच शक्य होणार नाही, असे सगळीकडे बोलले जात होते. यावरून एक लक्षात घेतले पाहिजे की, परिस्थिती सतत बदलत असते. कोणी इथे कायमचा नसतो. आज एखादा पक्ष संपला असे वाटत असताना, तोकधी उभारी घेईल हे सांगता येत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष.
१९७७ साली सत्तेवर आलेले जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला, तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यातील मित्र खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने हाक दिली होती ती की, अंधेरे में एक चिंगारी... अटलबिहारी अटलबिहारी. यामागचे कारण म्हणजे जनता पक्षाच्या स्थापनेनंतर इंदिरा गांधींच्या आणीबाणीतील दडपशाही विरोधात जेव्हा सर्व जण जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक झाले होते, तेव्हा अंधरे में एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश अशी घोषणा होती. ती यशस्वी झाली होती; परंतु जयप्रकाश नारायण यांच्या निधनानंतर जनता पक्षच अंधारात गेला. त्यामुळे या अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती म्हणजे अटलबिहारी वाजपेयी नावाची चिंगारी होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने स्थापनेनंतर ही घोषणा सर्वात प्रथम केली. जनता पक्षाचा भारतीय जनता पक्ष झाल्यानंतर अंधकारातून बाहेर काढण्यासाठी प्रकाश नसला, तरी एक चिंगारी आम्हाला पुरेशी आहे, हा विश्वास भाजपच्या माध्यमातून अटलजींनी दिला होता. वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता; पण त्याचवेळी ही चिंगारी भविष्यात देशाचे पंतप्रधानपदावर जाईल, भाजप सत्तेवर येईल हा आशावाद, विश्वास अटलजींनी दिला होता. पक्ष स्थापन झाला, तेव्हा भाजप प्रत्यक्ष निवडणुकीत उतरला नाही. १९८०च्या लोकसभेच्या मुदतपूर्व झालेल्या निवडणुकीत भाजपने निवडणुका लढवल्या नाहीत; पण शक्तिप्रदर्शन करून एक नवी चिंगारी, ठिणगी पडली आहे, आता त्या ठिणगीचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, असाच इशारा दिला होता. आज जे भाजपचे वादळ दिसत आहे, लाट दिसत आहे, त्यामध्ये या चिंगारीची भूमिका महत्त्वाची आहे. चिंगारी बनलेल्या अटलजींनी दाखवलेला आशावाद महत्त्वाचा आहे. कमल जरूर खिलेगा हे त्यांनी एकही खासदार नसताना भाकीत केले होते. त्यामुळे त्यांच्या आशावादाला दाद द्यावी लागेल. अटलबिहारी वाजपेयी हे कवी आहेत. जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हणतात. त्याप्रमाणे सगळीकडे अंधकार असतानाच त्यांनी भाजपला मिळालेली सत्ता पाहिली होती. हा आशावाद, स्वप्न पाहण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे.
इंदिरा गांधी १९८०ला जरी पुन्हा सत्तेवर आल्या, तरी त्यांची राजवट संपुष्टात आपण आणू शकतो याचा विश्वास अटलजींना होता. फक्त काळाच्या आणि घटनेच्या महिमेपुढे काही चालत नाही, त्याचा फटका भाजपला बसला नाही, तर अपघाताने पंतप्रधान झालेले राजीव गांधी १९८५ मध्ये पंतप्रधान झालेच नसते. खलिस्तानची चळवळ सुरू झाल्यानंतर शीख अतिरेक्यांचा सुळसुळाट झाला होता. सुवर्ण मंदिरावर त्यांनी ताबा घेतला होता. त्यावेळी सुवर्ण मंदिरात लष्कर घुसवण्याशिवाय पर्यायच नव्हता. इंदिरा गांधी तसा निर्णय घेत आहेत, म्हटल्यावर अटलजींनी भाजपच्या माध्यमातून त्याबाबत पाठिंबा दिला होता. विरोधकांनी देशहितासाठी सरकारला सहकार्य करायचे असते ही सभ्यता वाजपेयींनी दाखवून दिली होती. अर्थात आॅपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपचा पाठिंबा असला, तरी इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकाकडून झालेल्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीख विरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपने विरोध केला होता; परंतु इंदिरा गांधींच्या हत्येच्या लाटेनंतर जनमत काँग्रेसच्या बाजूने गेले आणि १९८४-८५च्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या, तरीही भाजप देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले; मात्र त्यानंतर वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपने मागे वळून पाहिलेच नाही. सतत चढत्या क्रमाने भाजपच्या यशाचा आलेख वाढत गेला. त्यानंतर भाजपवरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता. त्यामुळेच रामजन्मभूमीच्या विहिंप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. १९९५च्या मार्चमध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपला विजय मिळाला. भाजपच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात अडवाणी यांनी वाजपेयी यांचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. काँग्रेसला उत्तम पर्याय भाजप आणि नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी आहेत, हे देशाला भाजपने दाखवून दिले. १९९६च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली; पण लोकसभेत विश्वासमत प्रस्ताव चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले. १९९८च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली. अखेर १९९८च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. या दुसºया खेपेत वाजपेयींनी स्वत:च्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्यामुळे १९९९च्या निवडणुकीत रालोआ भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आला. पूर्णकाळ पंतप्रधान बनण्याचे भाजपचे स्वप्न साकार झाले. भाजपच्या राजकारणातील हे चढउतार आज सर्वच राजकीय पक्षांनी अभ्यासले, अटलजींचा अटल विश्वास समजून घेतला, तर आज रसातळाला चाललेले पक्षही फिनिक्स पक्षांप्रमाणे भरारी घेऊ शकतील.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा