गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

लोकशाहीचे रक्षक


भारतीय लोकशाही ही अतिशय समृद्ध होती. ती आज आहे की नाही, हा संशोधनाचा विषय आहे; पण अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने लोकशाहीतील सुसंस्कृतपणाचा अस्त झालेला आहे, हे लक्षात येते. याचे कारण अटलबिहारी वाजपेयी असताना, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कधी द्वेषाचे राजकारण नव्हते. सहकार्याचे आणि अभ्यासाचे राजकारण होते. सभागृह ही विचाराने चालत होती. आज त्याचाच अभाव जाणवू लागलेला आहे.


सभागृह बंद पाडण्यासाठी नाही, तर कामकाजासाठी, चर्चेसाठी असतात. सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी परस्पर सहकार्याने देश चालवायचा आहे, हे धोरण वाजपेयींच्या काळापर्यंत होते. म्हणूनच अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक पंडित नेहरूंनी केले, राजीव गांधींनी केले. इंदिरा गांधींचे कौतुकही अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते, कारण जे काही करायचे ते देशहितासाठी करायचे एवढाच विचार फक्त तेव्हा होता. ही सशक्त लोकशाहीची साक्ष होती. सत्ताधारी आणि विरोधक ही लोकशाहीची प्रमुख चाके आहेत. देश चालवण्याची जबाबदारी दोघांचीही आहे, ही भावना विकसीत करण्यासाठी अटलजी, राजीव गांधी, अशी व्यक्तिमत्वे महत्त्वाची ठरतात.

आज सत्तेच्या जोरावर विरोधकांच्या सदस्यांना निलंबित करणे, विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडणे, सभापतींना अश्रू ढाळायची वेळ येणे हे काही चांगले लक्षण नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, कारण आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. हुकूमशाहीच्या दिशेने जाणारे नेतृत्व देशाने नेहमीच नाकारले आहे. त्यांच्याकडे सत्ता असली, तरी आपलेपणा कधी राहिलेला नाही.


सत्ताधारी म्हणजे देशाचे मालक आणि चालक आहेत आणि विरोधक म्हणजे शत्रू आहेत, असा विचार अलीकडे रुजताना दिसत आहे. त्यामुळे भारतातील राजकारण हे याला गाडा रे त्याला गाडा या दिशेने जाताना दिसत आहे. सत्तेत नसलेले विरोधक हे सभागृहातील वेगळ्या दृष्टीने विचार करणारे आहेत, हे समजून घेण्याची गरज आहे. आज दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. एकमेकांना संपवणे, परस्परांचा आदर न करणे या राजकारणामुळे फक्त विरोधकच नाही, तर सत्तेतील स्वपक्षीयही दुखावले जात आहेत, याचा विचार होताना दिसत नाही. लोकशाहीत आपल्या विरोधकांचे महत्त्व ज्यांना समजते ते उत्कृष्ट राज्यकर्ते असतात. ते लोकशाहीचा सन्मान राखणारे असतात. अटलजींचे राजकारण हे अशा सभ्यतेचे होते. विरोधकांनाही ते सभ्यतेने वागवत, त्यांचा आदर सन्मान करत असत. त्यामुळेच अटलजींची लोकप्रियता अफाट होती. त्यांनी वादळ निर्माण केले; पण लाट नाही निर्माण केली. लाट ओसरू शकते; पण ते कायम प्रवाहीतच राहिले. हा उच्च विचार होता. याचे कारण विरोधकांचे महत्त्व त्यांनी जाणले होते. दीर्घकाळ विरोधात असल्यामुळे असेल कदाचित; पण विरोधकांचे देशाच्या राजकारणात, लोकशाहीत, जडणघडणीत काय महत्त्व असते हे अटलजींनी दाखवून दिले होते. त्यामुळेच ते स्वपक्षीयांबरोबरच विरोधकांनाही आवडायचे. १९८४ ते १९८९ या काळात राजीव गांधी पंतप्रधान होते, तेव्हाच अटलजींना किडनीचा त्रास होत होता. त्यांच्यावर त्या काळात भारतात उपचार होणे शक्य नव्हते. परदेशात जाणे आवश्यक होते. ही गोष्ट राजीव गांधींना समजली. त्यावेळी राजीव गांधींनी आपल्या कार्यालयात अटलजींना बोलावले होते. राजीव गांधींनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रसंघात भारतातर्फे जाणाº­या शिष्ठमंडळात तुमचा समावेश करण्यात आलेला आहे. या संधीचा फायदा घेत परदेशात उपचार करून घ्या. त्यानंतर राजीव गांधींनी सर्व प्रतिनिधींना सांगितले की, अटलजींना उपचार पूर्ण झाल्याशिवाय न्यूयॉर्कहून परत येऊ देऊ नका. आपला विरोधकही सक्षम, निरोगी असला पाहिजे, तो जगला पाहिजे ही खरी लोकशाही आहे. लोकशाहीचे चार स्तंभ म्हणतात त्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांना पहिले दोन महत्त्वाचे खांब म्हटले जाते ते यासाठीच. दोघांनी मिळून एकत्रित येऊन देशाचा कारभार चालवायचा आहे. पंतप्रधान पदाइतकाच विरोधीपक्ष नेताही महत्त्वाचा आहे. हे तेव्हाच दिसून येते, जेव्हा लोकशाहीचा सन्मान केला जातो. सत्ताधाº­यांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्यासाठी आपण विरोधी पक्षात नाही, तर सत्ताधारी पक्षाचा निर्णय चुकत असेल, तर त्याची जाणीव करून देण्यासाठी विरोधी भूमिका असणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीत चुका शोधणे म्हणजे विरोधी पक्ष नाही तर नाण्याची दुसरी बाजू तपासून घेण्याचे काम विरोधकांनी करायचे असते. सत्ताधाº­यांनी चांगले निर्णय घेतले आहेत, त्याचे समर्थन विरोधकांनी करायला हवे. ३७० कलम असो वा आणखी काही निर्णय त्याचे कौतुक विरोधकांनी केले नाही. त्याचा परिणाम २०१९च्या निवडणुकीत विरोधकांना बसला. त्यामुळे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना हे भान सत्ताधारी आणि विरोधकांनी बाळगणे आवश्यक आहे, तर त्यांना लोकशाहीचे रक्षक म्हणता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: