नवरा हा बायकांच्या दृष्टीने चेष्टेचाच विषय असतो. तो जेवढा प्रिय असतो तेवढाच तो बावळट असतो, असं बायकांचं ठाम मत असतं. तो प्रामाणिक असतो, तर कधी शेण खाणारा असतो. कसाही असला, तरी तो आपल्या मुठीत राहणारा आणि प्रसंगी मिठीत राहणारा असावा लागतो. त्यामुळेच मराठी चित्रपटात नवरा हा विषय घेऊन असंख्य चित्रपट झाले. अनेक निर्मात्यांनी नवरा हा शब्द आपल्या चित्रपटाच्या नावात ठेवले आणि हे चित्रपट चाललेही, म्हणजे नवरा हा कुंकवाचा धनी म्हणून कितीही नवरा बावळट असला, तरी अनेक निर्मात्यांचे भाग्य या नवºयाचा टिळा लागून उजळले आहे, हे नक्की. त्यामुळे नवरा हा शब्द घेऊन सातत्याने चित्रपट बनत गेले.
मराठी चित्रपटसृष्टीतील एक चित्रमहर्षी म्हणजे व्ही. शांताराम यांच्या बरोबरीने काम केलेल्या अनंत माने त्यांनी १९७७मध्ये शंकर पाटील यांच्या कथेवर रंजना आणि राजा गोसावी या दोघांना घेऊन काढलेला चित्रपट, म्हणजे असला नवरा नको गं बाई. राजा गोसावी, शरद तळवलकर रंजना असे कलाकार असलेल्या या रहस्यमय चित्रपटात नवरा या शब्दाचीच तिडीक असणारी आणि एका खुनाच्या घटनेत नकळत फसलेली नायिका दाखवली आहे. तिला वाचवण्यासाठी उभा केलेला खोटा नवरा नंतर कसा खरा नवरा होतो आणि असला नवरा नको गं बाई म्हणता म्हणता त्याला स्वीकारले जाते, असे कथानक असलेला हा चित्रपट.
व्ही. शांताराम यांच्यावर टीका करण्याची संधी दादा कोंडके यांनी कधीच सोडली नव्हती. पांडु हवालदारमध्ये मुंबईतील गटारातून पिंजरा आणि चंदनाची चोळी काढण्याचे दृष्यही दादांनी चित्रीत केले होते. त्यामुळे व्ही. शांताराम यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या असला नवरा नको गं बाई म्हटल्यावर दादांनी लगेच ह्योच नवरा पाहिजे हा चित्रपट १९८०मध्ये काढला. फाड फाड इंग्रजी बोलणारा दादांचा नायक आणि घरातून पळून आलेली जयश्री टी. शिकलेली असूनही अडाणी वागणारी, अशी नायिका यांचा हा चित्रपट. यात जयश्री टीचे वडील शरद तळवलकर आहेत. भोळ्या दादांच्या प्रेमात पडलेली जयश्री टी इथे ह्योच नवरा पाहिजे म्हणते.
१९८२मध्ये कमलाकर तोरणे यांचा नवरे सगळे गाढव हा चित्रपट आला होता. यातही शरद तळवलकर होतेच. याची नायिका पद्मा चव्हाण होती, तर नायक कुलदीप पवार. याशिवाय उषा नाईक, धुमाळ, रत्नमाला असे दिग्गज कलाकार यात होतेच. पुरुषांचा तिरस्कार करणारी नायिका पद्मा चव्हाणने रंगवून शेवटी कुलदीप पवार या बिलंदर ग्रामीण तरुणाच्या प्रेमात पडेपर्यंत हा नवरा आपली करामत दाखवतो.
मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक यशस्वी निर्माता-दिग्दर्शक आणि नायक म्हणजे सचिन पिळगांवकर. सचिननी १९८४मध्ये नवरी मिळे नवºयाला हा एक सुपरहिट मल्टीस्टार चित्रपट काढला आणि प्रेक्षकांच्या तो आजही पसंतीस पडणारा चित्रपट आहे. अशोक सराफ, संजय जोग, निवेदिता जोशी, दया डोंगरे, आशालता, श्रीकांत मोघे अशा मान्यवर कलाकारांची जंत्री असलेला हा एक यशस्वी चित्रपट. या चित्रपटातूनच सचिनला त्याच्या खºया आयुष्यातील नवरी मिळाली ती म्हणजे सुप्रिया सबनीस पिळगांवकर. याची कथा, पटकथा, संवाद वसंत सबनीस यांचे होते.
१९८४मध्येच रंजना व अशोक सराफ या सुपरहिट जोडीचा बिनकामाचा नवरा हा मुरलीधर कापडी दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. ग्रामीण राजकारणातील धमाल विनोदी असा हा सुपरहिट चित्रपट होता. रंजना व अशोक सराफ यांच्याशिवाय कुलदीप पवार, मधुकांबिकर, प्रकाश इनामदार, नीळू फुले, माया जाधव, दिनकर इनामदार अशा कलाकारांची मोठी फौज असलेला हा जबरदस्त चित्रपट होता. याचीही कथा, पटकथा, संवाद हे वसंत सबनीस यांचेच होते. काही काम न करणाºया बिन कामाच्या नवºयाला वठणीवर आणणारी बायको यात दाखवली होती. विशेषत: रंजनाने केलेली यातील भूमिका खूपच गाजली होती.
१९८८मध्ये गौराचा नवरा हा चित्रपट आला होता. याची कथा, पटकथा, निर्माती, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका उषा चव्हाणचीच होती. दादांपासून थोडी लांब झाल्यावर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काढलेला हा चित्रपट. यातून दादांना टाँट मारण्याचा प्रकारही दादांच्या तालमीत तयार झालेल्या उषा चव्हाणने केले होते. यात मुद्दाम एक हाफ चड्डीतील दादांसारखे बोलणारे पात्र तिने घेतले होते. यात उषा चव्हाणचा नायक लक्ष्मीकांत बेर्डे दाखवला आहे, तर सविता प्रभुणे, कुलदीप पवार असे अन्य कलाकार यात आहेत. हा चित्रपट फारसा चालला नाही; पण उषा चव्हाणची निर्मिती म्हणून त्याला महत्त्व आहे.
१९९४मध्ये दाक्षिणात्य निर्माता ए. राधास्वामी यांनी लक्ष्मीकांत बेर्डेला डोळयांपुढं ठेवून चिकट नवरा हा चित्रपट आणला होता. तुफान विनोदी अशा या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, पूजा पवार, विजय चव्हाण, विजय गोखले, रूही बेर्डे, वत्सला देशमुख, शमा देशपांडे, जयवंत वाडकर हे कलाकार होते. अत्यंत कंजूष आणि काटकसरी असलेला चिकट नवरा यात लक्ष्मीकांत बेर्डेनी साकारला होता. त्याच्या कंजूषपणाला, चिकटपणाला कंटाळून त्याची बायको पूजा पवार त्याला सोडून जाते; पण नंतर त्याला वठणीवर आणले जाते आणि त्या चिकटपणाचा काही उपयोग नाही हे त्याला शिकवणारी अचिकट बायको, असा या चित्रपटाचा विषय होता. लक्ष्मीकांत बेर्डे आणि रूही बेर्डे या चित्रपटात शांतेचं कार्ट नाटकानंतर प्रथमच एकत्र आले होते; पण हा रूहीचा खरा नवरा कालांतराने प्रिया अरुणचा नवरा झाला.
२००४मध्ये सचिन पिळगांवकरनी नवरा माझा नवसाचा हा एक उत्तम विनोदी चित्रपट आणला होता. थोडासा बॉम्बे टू गोवा या स्टाईलने जाणारा चित्रपट मुंबई ते गणपतीपुळे या नवस फेडायला जाणाºया नवरा-बायकोच्या विनोदी कथानकामध्ये गुंतणारा चित्रपट. कुठेही विनोदाला अश्लीलतेचा स्पर्श होणार नाही, द्विअर्थी होणार नाही, याची संयमी खबरदारी घेत सचिनने या चित्रपटाची मांडणी केली होती. सचिनचा हुकमी एक्का अशोक सराफ यात होताच. याशिवाय सुप्रिया पिळगांवकर, किशोरी शहाणे, कुलदीप पवार, रिमा लागू, जयवंत वाडकर, जॉनी लीव्हर, सोनू निगम, वैभव मांगले, विकास समुद्रे, विजय पाटकर, विनय येडेकर, अतुल परचुरे, सुनील तावडे, जयंत तारे, प्रदीप पटवर्धन अशा विनोदी कलाकारांची फौजच उभी केली होती. प्रत्येकाने आपल्या कामाला यात न्याय देत हा नवसाचा नवरा यशस्वी केला होता.
याशिवायही नवरा हा विषय आणि शब्द घेऊन अनेक चित्रपट बनले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही १९८९मध्ये नवरा बायको नावाचा चित्रपट काढला होता. कथा, पटकथा, संवाद अण्णासाहेब देळुगांवकर असलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, वर्षा उसगांवकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. छगन भुजबळ यांची निर्मिती असलेला हा एक चित्रपट होता. याशिवाय चालू नवरा भोळी बायको, नवरा माझ्या मुठीत गं, माझा नवरा तुझी बायको, चतुर नवरा चिकणी बायको, उतावळा नवरा, नवरा माझा भवरा, असे अनेक चित्रपट बनले.
प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा