मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

खबरदारी


भारतातील कोरोना महामारीचा अंत जवळ आला आहे असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी बुधवारी वर्तवला. ही तशी समाधानाची बाब असली, तरी कोरोनाची महामारी, येणाºया लाटा, आकडेवारीत होत असलेला चढउतार, वेगवेगळ्या येणाºया बातम्या, लसीकरणाबाबत येणारी वक्तव्ये पाहता नक्की काहीच अंदाज काढता येत नाही. एकप्रकारचा हा खेळ चालवला आहे का, असे वाटल्याशिवाय राहात नाही.


एकीकडे देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी समाधानाची बातमी होती. ती म्हणजे सोमवारी गेल्या १६० दिवसांतील सर्वांत कमी रुग्ण देशात आढळले. रविवारच्या तुलनेत हे प्रमाण १९ टक्क्यांनी कमी होते, परंतु तरीही येत्या आॅक्टोबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट धडकेल, असा इशारा देण्यात येत आहे. हा इशारा दुस‍ºया-तिस‍ºया कोणी नव्हे, तर केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेच दिला आहे. या इशा‍ºयाचे कारण आहे सध्याचा कोरोनाचा आर व्हॅल्यू किंवा रिप्रॉडक्शन रेट. कोणत्याही विषाणूच्या संसर्गाच्या गतीचे हे मोजमाप आहे. एक व्यक्ती किती लोकांना संसर्ग देऊ शकेल त्याचे अनुमान त्यावरून करता येते. देशातील काही राज्यांत जरी सध्या कोरोनाचे प्रमाण घटले असले, तरी केरळसारख्या राज्यांमध्ये विषाणू संसर्गाचे हे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळेच येत्या आॅक्टोबरपर्यंत तिसरी लाट धडकेल असा इशारा देत तज्ज्ञांनी सरकारला सावध केलेले आहे. त्याचवेळी सौम्या स्वामीनाथन यांनी महामारी संपत आल्याचे संकेत दिले आहेत.

पण आरोग्य विभागाने दिलेल्या इशाºयानुसार, येणा‍ºया तिस‍ºया लाटेचा धोका मुलांना अधिक संभवतो हे सरकारने यापूर्वीच सूचित केलेले आहे. याचे मुख्य कारण मुलांचे लसीकरण अद्याप झालेले नाही, परंतु याचा अर्थ तिस‍ºया लाटेत केवळ मुलेच बाधित होतील असे बिल्कूल नाही, परंतु लसीकरण न झालेल्या मुलांचे आपल्या देशातील प्रमाण मोठे असल्याने त्यांना होऊ शकणा‍ºया संभाव्य संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पूर्वतयारी करण्यास केंद्राने सर्व राज्यांना सांगितले आहे. देशातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत बालरोग तज्ज्ञांची ८३ टक्के, तर सामाजिक आरोग्य केंद्रांत ६३ टक्के कमी असल्याची सरकारचीच आकडेवारी आहे. या परिस्थितीत मुलांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करणे आव्हानात्मक राहणार आहे. त्यामुळेच सरकारने त्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. आकडेवारी कमी होत असताना जोरदार प्रयत्न केले, तर महामारीचा अंत होणे शक्य आहे. त्याचबरोबर चिंतेची बाब म्हणजे अफगाणिस्तानातून आलेल्या नागरिकांपैकी १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा स्थलांतरित नागरिकांपासून होणारा प्रसार रोखणे हे फार मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर बुधवारी काही वृत्तवाहिन्यांवर कोव्हिशिल्ड या लसीबाबत वृत्त प्रसारित केले. अशी वृत्तं का प्रसारित केली जातात याचे संशोधन करण्याची गरज आहे. ते वृत्त म्हणजे कोव्हिशिल्ड लसीचा परिणाम सहा महिन्यांपेक्षा जास्त राहात नाही, असे इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी म्हटले होते. म्हणजे दुसºया देशाच्या कंपनीच्या लसींना मार्केट मिळवण्यासाठी जनतेला घाबरवून टाकण्यासाठी हे नवे लसींचे वॉर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? अशी वृत्ते का दिली जातात? त्यामुळे गैरसमज निर्माण होऊन कोव्हिशिल्ड लसींकडे जनतेने पाठ फिरवली, तर लसीकरणाचा कार्यक्रम आणखी लांबेल आणि ही महामारी रोखणे अवघड होईल. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवर अशा वृत्तांना बंदी घालून गैरसमज पसरवणारी वृत्ते पसरवण्यास बंदी घातली, तर या रोगाचा प्रसारही कमी होईल.


केंद्राने तिसºया लाटेसाठी सज्ज रहा, आॅक्सिजन बेडची सुसज्जता ठेवा, असे आदेश मागच्याच आठवड्यात दिलेले आहेत. लाट येवो अथवा न येवो आपल्याला सज्ज राहावेच लागेल, पण त्याचवेळी गैरसमज पसरवणाºया बातम्या बाहेर येणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. मुलांसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर, व्हेंटिलेटर आदींची सज्जता करण्याबरोबरच कोविड वॉर्डांत मुलांना भरती करावे लागले, तर त्यांच्यासोबत राहण्यासाठी पालकांची व्यवस्था करण्यापर्यंत असंख्य सूचना केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारनेही तयारी केलेली आहे, पण लसीकरणाचा वेग आता वाढवला पाहिजे आणि कोव्हिशिल्डच्या दुसºया लसींचे अंतर कमी केले पाहिजे.

लसीकरणाच्या बाबतीत भारत अजूनही जगापेक्षा खूप मागे आहे. केवळ नऊ टक्के लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. अमेरिकेत हे प्रमाण ५२ टक्के आहे. मुलांच्या लसीकरणासंदर्भात सध्या केवळ झायडस कॅडिलाची लस वगळता मुलांसाठी अन्य लसी उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत तिसरी लाट धडकली, तर काय हाहाकार उडेल याची कल्पनाही करवत नाही.


सध्या कोरोनाच्या वुहानमधून आलेल्या मूळ विषाणूपेक्षा डेल्टा विषाणूच जगभरात धुमाकूळ घालत असल्याचे दिसते. वुहान विषाणूच्या संसर्गापेक्षा डेल्टाच्या संसर्गाचे प्रमाण दुप्पट आहे. तिस‍ºया लाटेमध्ये हा विषाणू आणखी कोणते नवे रूप घेऊन येईल हे सांगता येत नाही. त्यात मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर तो इतर मुलांत फैलावण्याचे प्रमाण फार मोठे असेल, कारण मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर वगैरेंबाबत मुले अनभिज्ञ असतात. त्यामुळे तिस‍ºया लाटेचे हे आव्हान किती मोठे असेल त्याचा अंदाज सरकारने बांधला पाहिजे आणि त्या दृष्टीने सज्जता केली पाहिजे.

राज्य सरकारने केंद्राच्या तज्ज्ञ समितीचा इशारा गांभीर्याने घेऊन युद्धपातळीवर कोणकोणते प्रयत्न केले आहेत आणि येणा‍ºया काळात केले जातील त्याचा तपशील द्यावा आणि जनतेला आश्वस्त करावे. तिसरी लाट आली, तर रुग्णालये अपुरी पडतील, असा इशारा केंद्रानेच दिलेला आहे. त्यासाठी होलिस्टिक होम केअर मॉडेल म्हणजे घरच्या घरी उपचार व्यवस्था निर्माण करा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचेही मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, पण परस्परविरोधी बातम्या, अफवा, वेगळी भूमिका या नादात कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.

राज कपूरचा आवाज मुकेश


२७ आॅगस्ट हा पार्श्वगायक मुकेशचा स्मृतिदिन. मुकेशनी अनेकांसाठी आपला आवाज दिला असला, तरी त्याची ओळख राज कपूरचा आवाज म्हणून वेगळी आहे. आजच्या दिवशी साधारण ४५ वर्षांपूर्वी मुकेशचे निधन झाले तेव्हा राज कपूरचे शब्द तेच होते, माझा आवाज हरपला आहे. मुकेश या नावाने ओळखल्या जाणाºया या गायकाचे मूळ नाव मुकेश माथुर असे होते. मुंबईतील चौपाटी परिसरात राहणाºया श्रीमंत व्यक्ती रायचंद त्रिवेदी यांची कन्या सरला ही मुकेशची पत्नी होती. अठरा वर्षांच्या सरलाने पूजेसाठी देवळात जाण्याचे निमित्त काढले आणि देवळातून निघून थेट मुकेशबरोबर पळून जाऊन लग्न केले होते. खरं तर मुकेश तेव्हा बेघर होते आणि तत्कालीन प्रसिद्ध नट मोतीलाल याच्याकडे राहात होते. लग्नाच्याच दिवशी मुकेशचा २२ वा वाढदिवस होता. पुढे त्यांना ऋता ही कन्या आणि नितीन हा मुलगा झाला. मुलांच्या जन्मांनंतर मुकेशच्या कारकिर्दीला बहर आला आणि त्यांची भरपूर गाणी ध्वनिमुद्रित होऊ लागली.


मुकेश हा दिसायला देखणा असा होता. त्या काळात पार्श्वगायन फारसे विकसित झाले नव्हते. तेव्हा ज्यांना गायला येते त्यांनाच नायक म्हणून भूमिका देण्याची प्रथा होती. त्याप्रमाणे गाण्याचा पोत असलेला मुकेश नायक म्हणून या चित्रपटसृष्टीत आला. मूळचा लुधियाना येथे असलेल्या मुकेशच्या आई-वडिलांचे नाव होते, जोरावर चंद आणि चांद रानी. मोठी बहीण संगीत शिकत असल्याने मुकेशलाही संगीताची गोडी लागली होती. मोतीलाल हे नामांकित अभिनेते त्या काळात गाजले होते. मोतीलाल हे त्यांचे नातेवाईक होते. एकदा एका कार्यक्रमात मुकेशला गाताना मोतीलालनी पाहिले आणि त्याच्या आवाजातील जादूने मोतीलालला मोहिनी घातली. मुकेश मुंबईत आला आणि मोतीलालकडेच राहू लागला. त्यावेळी मोतीलालने त्याच्या संगीत शिक्षणाची व्यवस्थाही केली.

१९४१ मध्ये मुकेशला एका चित्रपटाची संधी मिळाली. त्या चित्रपटातील गाणीही त्याने स्वत:च म्हटली होती. पार्श्वगायन तेव्हा प्रचलित झालेले नव्हते. हा चित्रपट होता निर्दोष. हा काळ आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मोहवणाºया के. एल. सैगल यांचा होता. सैगल यशाच्या शिखरावर होते. त्यामुळे प्रत्येक गायकावर त्याचा प्रभाव होता. तसाच तो मुकेशवर झाला, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच नव्हते. याचदरम्यान पहिली नजर नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला. यातील दिल जलता है तो जलने दो... हे गाणे लोकप्रिय झाले. हा आवाज कुणाचा आहे असे विचारल्यावर कोणीही पैज लावून के. एल. सैगल यांचेच नाव घेत होते, पण अवघ्या २२ वर्षांच्या मुकेशचा तो आहे हे रसिकांना कळले तेव्हा या चित्रपपटसृष्टीला मुकेश या नावाची ओळख झाली. या गाण्याने मुकेशला ओळख दिली.


मुकेशचा दर्दभरा आवाज आजही रसिकांना मोहवतो. ते त्यांच्या आवाजाचे वैशिष्ट्य बनले. त्यानंतर संगीतकार नौशाद यांनी दिलीपकुमारसाठी म्हणून मुकेशकडून अनेक गाणी गाऊन घेतली. मुकेशनी आपला सैगलचा प्रभाव कमी केला आणि स्वत:ची ओळख निर्माण केली. मेहबूब खानचा अंदाज, त्यानंतर मधुमती, मेला, यहुदी, अनोखा प्यार अशा तुफान गाजलेल्या चित्रपटात मुकेशने दिलीपकुमारचा आवाज निर्माण केला, पण १९५० नंतर मात्र मुकेशचा आवाज हा खºया अर्थाने राज कपूरला चांगलाच शोभला. राज कपूरचा अभिनय, शंकर जयकिशनचे संगीत, शैलेंद्रचे गीत आणि मुकेशचा आवाज हे समीकरण यशस्वी संगीताचे बनून गेले.

राज कपूरसाठी मेरा जुता है जपानी (श्री ४२०), किसीकी मुस्कुराहटो पे (आवारा), सबकुछ सिखा हमने, ना सिखी होशियारी (अनाडी), डम डम डिगा डिगा (छलिया) ही राज कपूरसाठी गायलेली वेगळी गाणी होती. राज कपूरसाठी गाताना मुकेश जीव ओतून गात असे. राज कपूरच्या डोळ्यातील भाव आपल्या गाण्यात तरळले पाहिजेत हे त्याने जाणले होते. राज कपूरला उत्तम संगीताची जाण होती आणि ते स्वत: गातही असत. त्यामुळेच मुकेशनी एके ठिकाणी म्हटले होते की, मनात आणले असते तर राज कपूर हे उत्तम गायक म्हणून प्रसिद्ध झाले असते, माझ्यापेक्षा सुंदर गायले असते, इतकी त्यांची गाण्याची जाण चांगली होती, पण मुकेशच्या आवाजावर राज कपूर इतके प्रेम करत होते की, त्यांनी मुकेशला वचन दिले होते. मी आयुष्यभर तुझ्याच गळ्याने गाईन असे राज कपूर म्हणाले होते. राज कपूरचा मुकेशसाठी शेवटचा ठरलेला चित्रपट म्हणजे सत्यम शिवम सुंदरम्. या चित्रपटात राज कपूरने काम केलेले नसले, तरी हा संपूर्ण नायिकाप्रधान चित्रपट होता. त्यातही मुकेशसाठी राज कपूरने एक गाणे निर्माण केले होते.


अर्थात केवळ राज कपूरसाठीच नाही, तर मुकेशने दिलीपकुमार, देव आनंद, राजेंद्रकुमार, सुनील दत्त, धर्मेंद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांना आवाज दिलेली गाणीही खूप गाजली. १९६७ चा सुनील दत्त-नूतनचा मिलन या चित्रपटातील सावन का महिना, पवन करे शोर हे गाणे आजही लोकप्रिय आहे. मुकेशला अनाडीमधील सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी, सबसे बडा नादान चित्रपट पेहचान, जय बोलो हनुमानकी चित्रपट बेईमान आणि कभी कभी मेरे दिल में या कभी कभी चित्रपटातील गीतासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता.

पार्श्वगायनाबरोबरच मुकेश स्टेज शो करत असत. मुकेश स्टेजवर कार्यक्रम सादर करत असताना स्वत: हार्मोनियम वाजवत असे आणि अत्यंत व्यवस्थित सुटाबुटातील पेहराव करून येत तेव्हा ते हँडसम असे दिसत. आपल्या लग्नाचा तिसावा वाढदिवस साजरा करून मुकेश अमेरिकेला गेले होते. अमेरिकेतील डेट्रईड, मिचिगन इथे त्यांचे स्टेज शो होणार होते. २७ आॅगस्ट १९७६ ला नेहमीपेक्षा जरा लवकरच ते उठले आणि आवरून तयारही झाले, पण कपडे घालत असतानाच त्यांना छातीत दुखायला लागले. त्यामुळे डॉक्टरकडे गेले, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जादुई आवाजाचा मुकेश सर्वांना सोडून गेला होता. स्टेज शो सुरू होता. शोमस्ट गोआॅन म्हणतात. त्याप्रमाणे हा उर्वरित शो लता मंगेशकर आणि मुकेशचे पुत्र नितीन मुकेश यांनी पूर्ण केला आणि दुसºया दिवशी मुकेशचे पार्थिव घेऊन ते सगळे भारतात आले. वयाच्या ५३ व्या वर्षी मुकेशचे निधन झाले होते. त्यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर जमले होते. राज कपूरने आज माझा आवाज हरवला आहे, अशा शब्दांत शोक प्रकट केला.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055

बटबटीत कथानकांचा मारा


झी मराठीवरील मालिकांना नक्की काय झाले आहे हा प्रश्न पडतो. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने तर कमालच केली आहे. कथानकात रंजकता असली पाहिजे, कलाटणी असली पाहिजे, संघर्ष असला पाहिजे, पण हे प्रकार विकृतपणे मांडले की त्याची किळस येते. आज ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची अवस्था तशीच झालेली आहे.


रविवारी या मालिकेचा विशेष भाग होता. या भागात स्वीटू आणि ओमच्या लग्नाचा विशेष भाग होता. या भागात ती मालविका त्या दादा साळवींना इतके अपमानित करते आणि तरातरा ओढत नेऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करते. ते वरून उडी मारत असतात. ती त्यांना तिथपर्यंत पोहोचवते. लग्नातल्या गर्दीतून ती घेऊन जाते आणि आत्महत्या करायला सांगते. त्यावेळी तिचे जे संवाद आहेत, बाहेर त्यांना हाताला धरून घेऊन जाणे आहे हे न पटणारे आहे. इतक्या गर्दीत असे चोरून ती कशी काय घेऊन जाऊ शकते असा प्रश्न तर पडतोच, पण या एकूणच मालिकेत काळ, वेळ आणि ठिकाण आणि अंतर याचे काही भानच नाही असे दाखवले आहे.

मालविका साळवींना उडी मारून मरायला सांगते, मरण्यापूर्वी ओमला फोन करायला लावते. ओम तो फोन ऐकून लग्नमंडपातून सेकंदात पळत येतो. या सेकंदात मालविका सगळे अंतर कापते आणि ओम दादांना वाचवतो. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करतो. तोपर्यंत ओम लग्नातून पळून गेला असे भासवून त्या स्वीटूचे लग्न मोहितशी लावून देतात. अरे हा काय पोरखेळ आहे की झिम्मा? ही काय भातुकली आहे की बाहुला-बाहुलीचे लग्न? असले कसले कथानक?


स्वीटूसारखी हुशार मुलगी ओम नाही म्हणून त्या मोहितशी लग्नाला तयार होते, आई आणि घरच्यांसाठी सगळे सहन करते हे कधीही न पटणारे आहे. लग्न नाही झालं म्हणून परत जायचं होतं. कुणाशी तरी लग्न लावलेच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? स्वीटूशी लग्न करण्यासाठी मालविका मोहितला तब्बल वीस कोटी रुपये देते हे न पटणारे आहे.

साळवींना, स्वीटूच्या वडिलांना काहीतरी झाले आहे हे समजल्यावर लग्नातून पळत जाताना ओम रॉकीला मदतीला घेऊ शकला असता, पण झी मराठीच्या मालिकांच्या कथानकांत इतरांपासून काहीतरी लपवून ठेवणे हेच तंत्र प्रत्येक मालिकेत अवलंबिले गेल्यामुळे हा सगळा लोचा होतो. याच मालिकेत लग्नाच्या आधी हळदी जी दाखवली आहे ती हळद साजरी करण्यासाठी मुलाकडची हळद झाल्यावर उष्टी हळद घेऊन अंबरनाथमध्ये सगळे दाखल होतात, तिथला आचरटपणा हा पोरकट वाटतो.


विशेष म्हणजे ओमच्या ऐवजी मोहितशी स्वीटूचे लग्न झाल्यावर मोहितची आई त्यांना घरात घेत नाही. म्हणून शकू या दोघांना आपल्या घरी घेऊन येते. स्वीटू माप ओलांडून खानविलकरांच्या घरात येते. बेडरूममध्ये गेल्यावर मात्र मोहितच्या विचाराने ती भडकते. तुझ्या गळ्यात मंगळसुत्राचा पट्टा बांधला आहे, मी तुझा मालक आहे म्हटल्यावर ती ते मंगळसूत्र काढून टाकते आणि या चार भिंतीच्या आत आपले कसलेही नाते असणार नाही. फक्त लोकांना दाखवण्यासाठी आपण लग्न केले आहे. असे सांगून ते लग्न नाकारते. हाच बाणेदारपणा ती मंडपात दाखवू शकली असती, तर मालिका आणखी चांगली वाटली असती. लग्न हा काही खेळ नाही, मी कोणाशीही लग्न करायला काय निर्जीव आहे का, असे म्हणू शकली असती. या सगळ्या गडबडीत आपले वडील कुठेच नाहीत याचेही तिला समजत नाही हे आणखी विचित्र आहे. ज्या वडिलांवर तिचे खूप प्रेम आहे, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होणारी स्वीटू आपले वडील इथे कुठेच नाहीत म्हणून तिला कसलीही शंका येत नाही. ओम नवरा मुलगा असल्यामुळे त्याचे जाणे लक्षात येते पण वडील कुठे गेले याची जाणीव ना स्वीटूला आहे, ना नलूला होते. दुसºया दिवशी लग्नानंतर ओम हॉस्पिटलमधून दादांना घेऊन येतो तेव्हा नलूला समजते. तोपर्यंत कोणालाही काही माहिती नसते. त्यांची आठवणही होत नाही. त्यामुळे अत्यंत ढिसाळ आणि बटबटीत कथानकात ही मालिका घसरत चालली आहे. सहा महिन्यांपूर्वी ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा तिचे दाखवलेले प्रोमो पाहता ही मालिका हलकीफुलकी असेल, विनोदी असेल असे वाटत होते, पण ती मालिका भयानक असेल, असा कोणीच विचार केला नव्हता.

आपल्या नवºयाला, दादा साळवींना वाचवण्यासाठी ओम लग्नातून गेला होता. त्याच्यामुळे साळवींचा जीव वाचला हे माहिती झाल्यावर नलू ओमला जवळ करते. आपल्या घरात आसरा देते, पण शरद, चिन्या या कोणाला ते कळत नाही. ते सगळे ओमची हिडीसफिडीस करायला लागतात. ओमची अवस्था अत्यंत केविलवाणी केली जाते. ज्याच्यासाठी चिन्या, शरद जीव टाकत होते त्याच्या एकाएकी विरोधात जातात. साळवींचे घर मोठे नाहीये. त्यामुळे नलू अचानक ओमला मदत का करते आहे, त्याला थारा का देत आहे हे त्यांच्या लक्षात आल्याशिवाय कसे राहील? सगळंच अनाकलनीय असे आहे. साळवींना हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर ओम परत लग्नकार्यालयात पळत येतो. त्यावेळी मोहित स्वीटूला मंगळसूत्र घालत असतो. हे तो जवळून पाहतो. त्यावेळी तिथे असलेले कोणीच ओमला कसे काय पाहत नाहीत? तिथून पळून गेल्यावर रॉकी त्याच्या मागे धावतो. तो त्याला अर्धवट सोडून कसा जाईल? त्यामुळे अत्यंत हिणकस आणि भरकटलेले कथानक दाखवून ही मालिका बटबटीत केली आहे.


प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा


9152448055

लाट निर्माण करण्याचा प्रयत्न


काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निमंत्रित केलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला सर्व विरोधी पक्षांनी प्रतिसाद दिला. या बैठकीत केंद्र सरकारविरोधात विरोधकांची एकजूट झाल्याचे पहायला मिळाले. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष पुढील महिन्यात दि. २० ते ३० सप्टेंबर या काळात केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने करणार आहेत. या बैठकीत १९ पक्षांनी भाग घेतला होता. त्यांनी निदर्शनात सहभागी होण्याचे एकमताने ठरवले हे एक फार मोठे आव्हान विरोधकांनी केंद्र सरकारपुढे उभे केलेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू करावी, असे सोनिया यांनी सुचवले. हे नियोजन महत्त्वाचे असते. २०२४ मध्ये मोदी सरकारला, भाजपप्रणीत एनडीए सरकारला १० वर्षं पूर्ण होतील. त्यामुळे लोकशाहीच्या नियमानुसार सरकारविरोधी लाट तयार होत असते. ही लाट कशा प्रकारे वापरायची हे विरोधकांच्या हातात असते. २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाने अशाच प्रकारे मोदींना प्रचारप्रमुख करून २०१४ च्या निवडणुकीची तयारी केली होती. त्यामुळे वेळीच तयारी केली, तर बदल करता येतो हे सातत्याने दिसून आलेले आहे.


भारतीय लोकशाहीतील स्वातंत्र्यानंतरची काही वर्षं सोडली, तर सतत सत्ताधारी विरोधी लाटा तयार होत असतात. पंडित नेहरूंची १७ आणि लालबहादूर शास्त्री यांची दोन वर्ष सोडली, तर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना दहा वर्षांनी बरोबर अशा लाटेचा सामना करावा लागला होता. अशा लाटेत चांगले काम केले तरी फारसा उपयोग नसतो. त्यामुळेच आणीबाणीच्या काळात वीस कलमी आर्थिक योजना आणूनही इंदिरा गांधींची लोकप्रियता घसरत गेली आणि त्यांना सत्तेपासून दूर जावे लागले. विरोधकांनी जनता पक्षाची लाट निर्माण केली, सगळे एक आले आणि सत्तांतर झाले. दोन वर्षांत हे सरकार कोसळले आणि पुन्हा दोन टर्म काँग्रेसला मिळाल्या. त्यातली पहिली ५ वर्ष इंदिरा गांधी आणि नंतरची पाच वर्ष राजीव गांधी यांनी सत्ता सांभाळली, पण सलग दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तांधर झाले. त्यावेळी दोन वर्ष अगोदरच भारतीय जनता पक्षाने तयारी केली होती. त्यामुळे भाजप एकदम ८५ संख्येवर पोहोचले आणि त्यांच्या मदतीने व्ही. पी. सिंग सरकार आले होते, पण दहा वर्ष झाल्यावर सत्तांतर होते ही भारतीय लोकशाहीची सवय झालेली आहे.

त्यानंतर थोडी अस्थिरता निर्माण झाली. राजीव गांधी हत्येच्या लाटेत पुन्हा १९९१ ला काँग्रेसचे सरकार आले, पण ते पाच वर्ष अल्पमतातच चालवले गेले. १९९६, १९९८ या अल्पकाळातील राजवटी ठरल्या, पण १९९८ चे १३ महिने आणि नंतरची पाच वर्ष अशी भाजपला सलग दोन वेळा सत्ता मिळाल्यावर मतदारांनी पुन्हा सरकारविरोधी लाट निर्माण करत काँग्रेसला झुकते माप दिले. यूपीए १ आणि यूपीए २ अशी सलग दोन वेळा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारे स्थापन झाली. मतदार दोन वेळा संधी देतात या नियमाने भाजपने पूर्ण तयारी केली. नेतृत्व कोण करणार हे दाखवले आणि मोदीलाट निर्माण झाली. आता २०२४ च्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला हीच सलग दहा वर्ष, सलग दोन टर्म सत्ता मिळाली याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या या सवयीचा फायदा उठवण्याचे धोरण विरोधकांनी आखले. त्याप्रमाणे सोनिया गांधींच्या आवाहनला सर्वच विरोधी पक्षांनी ज्याप्रकारे प्रतिसाद दिला त्यावरून ही बैठक यशस्वी झाली असे म्हणावे लागेल.


त्यामुळे केंद्र सरकारविरोधात वातावरण तयार करणाºया काँग्रेसच्या भूमिकेला बहुतेक सर्व नेत्यांनी मान्यता दिली, परंतु त्यांच्यासमोर नजीकच्या काळात उभी असलेली मोठी परीक्षा उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची आहे. अपरिहार्यता बाजूला ठेवून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे हे सोनिया यांचे विधान महत्त्वाचे व सूचक आहे. विरोधक एकत्र आले तर त्याचे नेतृत्व कोणी करावे हा मुद्दा तूर्त बाजूला ठेवावा अशी व्यवहार्य सूचना पश्‍िचम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. राहुल गांधी यांनीही अपवादात्मक सामंजस्याचे दर्शन घडवत, केवळ एकी पुरेशी नसून पर्यायी कार्यक्रम दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वात मोठे आव्हान तेच आहे. विरोधकांनी एकत्र येणे ही घटना तात्कालिक असू शकते. त्यांचे ऐक्य दीर्घकाळ टिकणे जास्त आवश्यक आहे. जनतेने त्यांच्यावर विश्‍वास का ठेवावा? हे त्यांना पटवून द्यावे लागेल हे फार महत्त्वाचे मत आहे.

भाजप व मोदी सरकारच्या विरोधात अन्य पक्षांनी एकत्र येण्याच्या हालचालींना सध्या गती मिळालेली दिसते. मध्यंतरी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एक अनौपचारिक बैठक झाली. ममता बॅनर्जी यांनी दिल्ली भेटीत सोनिया, अरविंद केजरीवाल आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. संसदेच्या नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या एकजुटीचे दर्शन घडले होते, मात्र सभागृहात त्यांची संख्या कमी असल्याने त्यांना हवा तो परिणाम साधता आला नाही. पेगाससवर चर्चा घडवून आणणे त्यांना जमले नाही; पण ते हळूहळू एकत्र येत आहेत. भाजपचा पराभव करणे अशक्य आहे हा समज पश्‍िचम बंगाल, केरळ व तामिळनाडूने खोटा ठरवला. त्यामुळे त्यांच्यात थोडा आत्मविश्‍वास निर्माण झाला असावा. तरीही विरोधकांच्या ऐक्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे काँग्रेस हाच सध्या राष्ट्रीय स्तरावरील एकमेव विरोधी पक्ष आहे. बैठकीत सहभागी झालेले इतर सर्व पक्ष प्रादेशिक व छोटे आहेत. ओडिशातील बिजू जनता दल, केजरीवालांचा आप, तेलंगण राष्ट्रीय समिती, वायएसआर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष हे पक्ष अपेक्षेप्रमाणे या बैठकीत सहभागी झाले नव्हते. हे लक्षात घेतले पाहिजे. कारण त्यांच्या प्रादेशिक अस्मिता आणि त्यांच्या नेत्यांचे अहंकार मोठे आहेत. दुसरे म्हणजे त्यांना काँग्रेस नको आहे. भाजपला पर्याय काँग्रेस नको आहे, तर नवे नेतृत्व, नवी आघाडी असली तर चालणार आहे.


भाजप आणि काँग्रेसला लांब ठेवायचे असेल, तर बंगालमध्ये तृणमूल व डाव्यांना एकत्र यावे लागेल, काँग्रेस व समाजवादी जनता दलास कर्नाटकात, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल आणि काँग्रेस यांना तर केरळात डावे आणि काँग्रेस यांना एकत्र यावे लागेल. प्रत्येक राज्यात अनेक पक्षांना सत्तेची आकांक्षा आहे. येथे राजकीय अपरिहार्यता बाजूला ठेवण्याचा सोनिया यांचा मुद्दा म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. हे सोनिया गांधी करू शकतात. अर्थात भाजप ज्या पद्धतीने बहुसंख्याकवाद रेटत आहे त्याला पाठिंबा मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. त्यामुळे खुले विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांची गळचेपी होत आहे, ते योग्यच आहे असे समजणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे जनतेला समजेल अशा भाषेत पर्यायी दृष्टी सादर करावी लागेल, हा राहुल यांचा मुद्दा विरोधकांना विचारात घ्यावा लागेल. आपल्याला विरोध कोण करू शकतो हे आधीच जाणून घेण्यासाठी मोदी सरकार संघपरिवाराच्या मदतीने वेगवेगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या वापरण्याच्या प्रयत्नात आहे. स्वयंसेवी संघटनांवरील निर्बंध असोत, चित्रपटांच्या फेरतपासणीचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न असो, लव्ह जिहादचा कायदा असो; त्यामुळे लोकशाही मूल्ये, घटना यांना दूर सारण्याचा प्रयत्न होत आहे, ते नागरिकांच्या हिताच्या विरोधी कसे आहे हे विरोधी पक्षांना जनतेस पटवून द्यावे लागेल; पण किमान आपसातील मतभेद दूर करून एकत्र येण्याची गरज त्यांना कळली हेही नसे थोडके.

अर्थात भाजपकडे असणारे सकारात्मक केलेल्या कामाचे मुद्दे, ३७० कलमासारखे मुद्दे अनेक आहेत. त्यातच राममंदिराचे निर्माण झाले, तर विरोधकांना पुन्हा वनवासात जावे लागेल इतकी मोठी लाट तयार होईल, पण विरोधी पक्षांची होत असलेली एकजूट फार महत्त्वाची आहे.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055

जन आशीर्वाद यात्रेला शाप


एका वेगळ्या हेतूने किंबहुना आगामी काळात येणाºया निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्यानेच शपथ घेतलेल्या ३९ मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितली होती. हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होते, हे अगदी स्पष्ट होते. अर्थात आपण केलेले काम, सरकार काय करत आहे, ते सांगण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाने करणे यात गैर काहीच नाही. तसा तो देशभरातून विविध केंद्रीय मंत्री करत होतेच; पण मुंबई ते कोकण या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मात्र एक शाप लागला. जनतेचा आशीर्वाद मिळण्यापूर्वीच त्यांना अटक करण्याची वेळ आली. अर्थात हा जो प्रकार झाला तो निश्चितच धक्कादायक आहे, वाईट आहे. पुरोगामी म्हणवून घेणाºया महाराष्ट्रात हे व्हायला नको होते.


राजकारणात वादग्रस्त वक्तव्ये करून, लोकांच्या भावना दुखवून, शिवराळ भाषा वापरून एकमेकांवर जी चिखलफेक केली जात आहे, ते थांबण्याची कुठे तरी गरज आहे. वैयक्तिक आकसातून आपण कुठे तरी घसरतो आहोत, हे जाणकार, अनुभवी नेत्याकडून अभिप्रेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलण्याच्या ओघात झाली असेल चूक की, हिरक महोत्सव की अमृत महोत्सव नक्की शब्द सुचला नसेल; पण त्याचे इतके भांडवल करून त्यावरून आक्षेपार्ह वक्तव्य करायची काहीच गरज नव्हती. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना ती संधी शिवसेनेने दिली होती. आज आपण जे काही आहोत ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहोत, हे आजही ते कबूल करतात. त्याच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर दर्शन घेतले होते. नारायण राणे यांना कोणते वक्तव्य केल्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान होतो, याची चांगली जाण आहे. नियम, कायदे सर्व काही नारायण राणे कोळून प्यायलेले आहेत. त्यामुळे कोणत्या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची जाण असताना त्यांच्याकडून सोमवारी असे वक्तव्य झाले, हे फार आश्चर्यजनक म्हणावे लागेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ही जन आशीर्वाद यात्रा कोकणात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात शापीत ठरली, असे म्हणावे लागेल. अर्थात याचे नक्की परिणाम आगामी काळात दिसून येतील. नारायण राणे यांच्या अटकेचे परिणाम मतदारांवर, त्यांच्या मतदारसंघावर, भाजपवर नेमके काय होतात, यासाठी कोणत्या तरी निवडणुकांमधील निकालच सांगतील. त्यावेळी जनता आशीर्वाद देणार की, शाप देणार हे कळायला किमान सहा महिने लागतील; पण अशा प्रकारे जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचे काम शिवसेनेकडून केले गेले आणि आपले शक्तिप्रदर्शन त्यांनी केले हे नक्की. ठाकरे सरकारने ही जन आशीर्वाद यात्रा रोखली. ही जन आशीर्वाद यात्रा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेने काढलेली होती. त्यांच्या आदेशाने काढलेली होती. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व होते. त्यामुळेच या यात्रेला आशीर्वाद लाभणार की, शाप हे येत्या काळात दिसेल.

खरं म्हणजे चिखलफेक करण्याची संस्कृती आता संपवण्याची गरज आहे. आज देशात अनेक महासंकटे असताना, आपण एकमेकांची उणीदुणी काढत बसतो हे काही चांगले नाही. दुसरा किती वाईट आहे, मूर्ख आहे, बेकार आहे हे सांगण्यापेक्षा मी कसा चांगला आहे, माझे काम कसे चांगले आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री चुकीची माहिती देतात हे सांगण्यासाठी आपण चुकीचे वक्तव्य का करावे, असा विचार नारायण राणे यांनी केला असता, तर ही जन आशीर्वाद यात्रा थांबली नसती.


अर्थात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या वक्तव्याचे परिणाम सकाळीच समजले होते. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्या वाक्याचे भाजप कधीच समर्थन करणार नाही; मात्र पक्ष त्यांच्या पाठिशी असेल, असे स्पष्ट केले होते. त्याचवेळी नारायण राणे यांना जर पोलिसांनी अटक केलीच, तर जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार ही यात्रा पूर्ण करतील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे अटक होणार हे नक्की झालेच होते; पण यामुळे खºया अर्थाने महाराष्ट्राची नाचक्की संपूर्ण देशात झालेली आहे. एका केंद्रीय मंत्र्याला, मोदी सरकारमधील एका महत्त्वाच्या मंत्र्याला वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अटक करण्याची वेळ आली, हा संदेश संपूर्ण देशभरात जात आहे. तो संदेश भाजपसाठीही धोक्याचा आहे. सगळीकडे जन आशीर्वाद यात्रा सुरळीत पार पडत असताना, कोकणात मात्र ती यात्रा शापीत ठरावी हे चुकीचे आहे.

नारायण राणे यांना मोदी सरकारने चांगले खाते दिले आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या फार अपेक्षा आहेत. कोकणात उद्योग, लघुउद्योग, रोजगार या दृष्टीने ते चांगले काम करू शकतात. नारायण राणे यांची कामाची शैली चांगली आहे; पण हे सगळं करण्यासाठी जिभेवर ताबा असण्याची गरज आहे. नेमका तो नसल्यामुळे हा फटका बसला आणि ही यात्रा शापव्रत झाली, असे म्हणावे लागेल.

सत्तेत नसलेले सध्या सुखी


सध्या देशात, राज्यात इतके प्रश्न आहेत, इतक्या समस्या आहेत की, ते सोडवणे कोणाएकाचे काम नाही. किंबहुना कोणाला ते सुटतील, अशी परिस्थितीही नाही. त्यामुळे सध्या सुखात कोण आहे असे विचारले, तर सत्तेत नसलेले सध्या सुखात आहेत, असे सांगावे लागेल, कारण सरकारच्या नावाने शंख करणे, खडे फोडणे, टीका करणे हे सोपे काम आहे; पण आपण जर सत्तेत आलो, तर हे प्रश्न सोडवू शकू का, असा प्रश्न जर त्यांनी मनाला विचारला, तर त्याचे उत्तर नाही असेच असेल, म्हणूनच ते सत्तेत नाहीत म्हणून सुखात आहेत.


२०१९च्या नोव्हेंबरपासून आलेल्या कोरोना संकटानंतर सगळीच समीकरणे बदलून गेली. महाराष्ट्रातील राज्य चालवणे ही सोपी गोष्ट नव्हतीच. आता ठाकरे सरकार ते चालवून दाखवत आहे; पण ते अवघड असेच काम आहे. तीच अवस्था केंद्रातील सरकारबाबतही आहे. अर्थात ही सुरुवात एकाएकी झालेली नाही. कोरोना हा एक हल्ला होता; पण त्याशिवाय काही जुनी कारणे त्यामागे आहेत.

त्यापैकी एक म्हणजे ९०च्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेत अवतरलेली आर्थिक पुनर्रचनेची प्रक्रिया आता नव्या आणि कठीण अशा टप्प्यावर आहे. टीकेस पात्र ठरेल, अशा अर्थविश्लेषकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाºया सुधारणांचा पल्ला आपण गेल्या अडीच दशकांत गाठला आहे, परंतु आता इथून पुढची वाटचाल तितकीशी सोपी नाही, तर अत्यंत संघर्षाची असणार आहे. नेमक्या या वळणावरच सत्तेवर आलेल्या मोदी सरकारपुढचे ते फार मोठे आव्हान आहे, तसेच कोरोनाच्या वातावरणात आलेले ठाकरे सरकारचे झालेले आहे. त्यामुळे सध्या केंद्रात किंवा राज्यात जे विरोधात आहेत, ते सुखी आहेत.


गेल्या पाच-सात वर्षांत लागलेली अनुदानांना कात्री, वस्तू आणि सेवाकराची रचना, भूसंपादन, कामगार कायद्यातील बदल अशांसारख्या सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम घडवणाºया बदलांच्या रचनेतच आपली आर्थिक नीती घुटमळते आहे. आर्थिक पुनर्रचनेचे हे नवे पर्व आहे. नव्या पिढीच्या दृष्टीने इथून पुढच्या काळात मोठी कसोटी आहे.

याचे कारण २४ जुलै, १९९१ रोजी नरसिंहराव सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक पुनर्रचना पर्वाची घोषणा केली. त्यावेळी सध्या सत्तेत असलेल्या भाजपने आणि डाव्या पक्षांनी या धोरणाला विरोध केला होता. आज त्याच धोरणाचा अवलंब भाजप सरकार करत आहे, हा भाग वेगळा; पण त्या घटनेला आता २ तपे पूर्ण झाली, म्हणजेच आपल्या देशातील आर्थिक पुनर्रचना कार्यक्रम आता तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.


१९९१ नंतर या जगात प्रवेश केलेली पिढीही आता पंचविशीच्या टप्प्यावर आली आहे. या तरुणाईला वेध लागले आहे, ते सुधारणांच्या वा आर्थिक पुनर्रचनेच्या दुसºया पिढीचे. मुळात आर्थिक धोरणांमध्ये या पहिल्या टप्प्यात जे सारे बदल घडले त्यांचा व्याप केंद्र सरकारच्या कार्यकक्षेपुरताच सिमीत होता. आयात-निर्यातीवरील बंधने मुक्त करण्यापासून परकीय भांडवल आणि तंत्रज्ञानाचा भारतीय अर्थकारणातील प्रवेश सुलभ बनवण्यापर्यंत तसा विरोध कधी झाला नाही. यातून काहीतरी वेगळे मिळेल, असा विश्वास या क्षेत्रात होता. त्यामुळेच उद्योजक, ग्राहक, उत्पादक, निर्यातदार, कामगार अशा घटकांचा त्या बदलांना विरोध नव्हता.

परंतु आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. सुधारणांची आगेकूच जमीन, श्रमशक्ती यांसारख्या उत्पादक घटकांच्या कक्षेला येऊन भिडली आहे. या तसेच अन्य कारणांमुळे आर्थिक पुनर्रचना कार्यक्रमाची अंमलबजावणी कठीण ठरणार आहे. त्यातच ठप्प झालेली रोजगार निर्मिती हा एक फार मोठा प्रश्न आहे. वस्तू व सेवाकराची प्रणाली लागू करण्याबाबत विविध राज्यांचे आक्षेप त्याचाच परिणाम आहे. अन्नधान्यांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ घडवण्याबाबत केंद्र सरकारने हात आखडता घेताच उठणारा गदारोळ, कामगारविषयक कायद्यांची जुनी चौकट सुधारण्याचा विषय काढला की, हातघाईवर येणारे डावे पक्ष आणि कामगार संघटना हे त्याचेच परिणाम आहेत. या परिणामांना तोंड देत वाटचाल करण्याचे काम मोदी सरकारला करावे लागत आहे, तर राज्यात लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली कोंडी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, ओबीसींचे प्रश्न, शेतकº­यांचे प्रश्न, अतिवृष्टी, महापुरांची आलेली संकटे ही मालिका पाहता ठाकरे सरकारलाही फार मोठा संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत विरोधकांचे काम सोपे आहे, म्हणून ते सुखात आहेत; पण केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकारे आपली वाटचाल एक आव्हान स्वीकारून करत आहेत, हे महत्त्वाचे आहे.


दुसरी बाब म्हणजे आर्थिक पुनर्रचनेचा हा पुढील टप्पा उलगडताना आपल्या देशातील विविध घटकांची किमान अर्थसाक्षरता उंचावणे आवश्यक आहे, म्हणजे १९९१मध्ये उभे जग आणि जगाची अर्थव्यवस्था आखाती युद्धाच्या सावटाखाली होती. आजची जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या लाटेखाली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात सापडली आहे. त्याचप्रमाणे तालिबानमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही परिणाम होणार आहे, याचा विचार करावा लागत आहे. ही मंदी विरळ कधी होईल, याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे, म्हणजे जानेवारी २००८पासून सतत १२ वर्ष मंदीचा झटका आणि फटका आहेच. एकीकडे शेअर बाजाराचा निर्देशांक विक्रमी उसळी घेत असताना, सर्वसामान्यांच्या हातात काही पडत नाही, हा विरोधाभासही चिंतेचा आहे, म्हणूनच अर्थनितीच्या बदलातील दोन तपांनंतर थोडे सिंहावलोकन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. व्यापक, सखोल चिंतन-मनन घडून येण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात नेमके हेच घडू शकले नाही. समोर येईल त्या आर्थिक आव्हानांचा सामना करतच पुनर्रचना पर्वाचा चेहरा साकारत गेला. साधारणपणे २०००पासून २००८पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जोमाने आगेकूच करत राहिली. रस्ते, प्राथमिक शिक्षण, उपजीविका, रोजगार, ग्रामीण आरोग्य यांसारख्या बाबींवर सरकारी खर्चाची ओंजळ ओणवी झाल्याने एकीकडे विकासाची प्रक्रिया सर्वसमावेशक बनवण्याला गती येण्याबरोबर दुसरीकडे देशांतर्गत क्रयशक्तीचेही भरणपोषण घडले, परंतु असा वाढीव खर्च सोसायचा, तर सरकारी तिजोरीची स्थिती मजबूत हवी. त्यासाठी कर महसूल उदंड प्रमाणात गोळा होत राहिला पाहिजे. करदरांमध्ये वाढ जारी करून वाढीव कर महसूल जमा करण्याचा पर्याय टाळायचा, तर देशाच्या उत्पादनातील वाढीचा सरासरी वेग चांगल्यापैकी सशक्त हवा. देशातील आर्थिक पुनर्रचना कार्यक्रमाची भविष्यकालीन वाटचाल मोठी कसोटीची ठरणार आहे. त्यामुळे आजवर उपेक्षित राहिलेली शेती, खुरटलेला संघटित रोजगार, तरुणाईचे मोठे प्रमाण, वाढते शहरीकरण, अपेक्षा प्रचंड उंचावलेला मध्यमवर्ग आणि आक्रमक बनलेले माध्यमांचे विश्व यांना सरकारला सतत तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे आज सत्तेत नसलेले या संकटांना सामोरे न जाता सुखी असणार आहेत.

प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055

तालिबानास्त्र


सध्या जे अफगाणिस्तानातील राजकारण सुरू आहे, ते पाहता अमेरिकेने तालिबानला दरवाजे उघडल्याचेच चित्र दिसत आहे. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आणि भारताने तेथील नागरिकांना भारतात येण्यासाठी दिलेल्या सुविधा पाहता तालिबानला मोकळे रान करून देण्याचा प्रकार झाला आहे. म्हणजे, अफगाणिस्तानची सत्ता विनासायास तालिबानच्या हाती लागली काय, त्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे.


रोज नवनवे प्रकार समोर येत आहेत; पण जे लोक आपण भारतात आणत आहोत किंवा अन्य देशात हलवले जात आहेत, त्यांच्यामधूनही कोणी गनिमी कावा करून तालिबानी अतिरेकी प्रवेश करण्याची शक्यता आहे, याकडेही लक्ष ठेवावे लागेल.

विशेष म्हणजे पत्रकार परिषदेमधून मानवाधिकारांच्या जतनाची ग्वाही देणाºया तालिबान्यांचे हस्तक घरोघरी जाऊन अमेरिका आणि नाटोला गेल्या वीस वर्षांत मदत केलेल्यांना हुडकत आहेत. एका पत्रकाराचा शोध घेताना त्याच्या नातलगाची त्यांनी हत्याही केली. महिलांना नोकºयांवरून काढून टाकण्यात आले आहे. पुन्हा एकवार नव्वदच्या दशकातले काळे दिवस अफगाणिस्तानमध्ये परतत असल्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे अमेरिकेने तिथले लष्कर का हलवले, असा प्रश्न निर्माण होतो. अमेरिकेचा खर्चाचा बोजा वाढला, लष्कर पोसावे लागले आणि अर्थव्यवस्था डबघाईला आली, म्हणून लष्कर माघारी घेतले; पण त्यामुळे पुन्हा एकप्रकारची अशांतता निर्माण झालेली आहे, ही चिंतेची बाब आहे.


या परिस्थितीत प्रश्न आहे तो म्हणजे तालिबानला अटकाव करणारे आज कोणीच उरलेले नाही का? अमेरिकेने एकेकाळी ब्रेझनेव्हच्या आदेशानुसार सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात घुसवलेले तीस हजार सैनिक परतवून लावण्यासाठी मुजाहिद्दांना शस्त्रास्त्रे पुरवली. तेथूनच तालिबानचा उदय झाला आणि ती शक्तिशाली होत गेली. ११ सप्टेंबर, २००१च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर सगळीच जागतिक समीकरणे बदलून गेली. अमेरिकेला आपणच निर्माण केलेल्या या भस्मासुराविरुद्ध युद्ध पुकारावे लागले आणि आता वीस वर्षे अब्जावधी डॉलर पाण्यासारखे खर्च करून नामुष्कीजनक माघार घेऊन अमेरिकेने अफगाणिस्तान तालिबान्यांना धुडघूस घालण्यासाठी मोकळे करून दिले आहे. सध्याच्या तालिबानी राजवटीचा खरा कल आज आहे तो चीन आणि रशियाकडे. अफगाणिस्तानला दरवर्षी चार अब्ज डॉलरची मदत परदेशातून मिळते आणि सरकारचा ७५ टक्के खर्चही विदेशी मदतीच्या बळावरच भागवला जातो. त्यामुळे तालिबान्यांपाशी सत्ता भले आली असेल, परंतु ती चालवण्यासाठी जो पैसा लागेल, तो मिळवण्यासाठी देशातील नैसर्गिक संसाधने हाच त्यांच्यासाठी मोठा आधार आहे. चीनला नेमके हेच हवे आहे. पाकिस्ताननंतर आता अफगाणिस्तानमध्ये चीन आपला प्रभाव वाढवत नेईल.

अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्ता अशी मोकाट राहू देणे जगाच्या हिताचे निश्चितच नाही. त्यामुळे अमेरिकेने अधिकृतपणे जरी काढता पाय घेतलेला असला, तरी चीनच्या जवळ जाणाºया तालिबानच्या विरोधी शक्तींना छुपे पाठबळ देण्यासाठी कदाचित आज ना उद्या सीआयएचसुद्धा पुढे सरसावल्यावाचून राहणार नाही.


तालिबानला सध्या सर्वात प्रबळ विरोध चालला आहे, तो पंजशीर खोºयातून. हा एकमेव प्रांत असा आहे की, जिथे तालिबानची डाळ कधीही शिजली नव्हती. अहमदशहा मसूदचा मुलगा अहमद मसूदने नुकताच आपला तालिबान्यांविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ज्या अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला कार्यकारी अध्यक्ष घोषित केले, तेही सध्या पंजशीर खोºयातच असावेत. पंजशीरमधून तालिबानला पहिले आव्हान मिळालेच आहे. शिवाय देशाच्या विविध भागांतून राष्ट्रध्वज हटविण्याविरुद्ध जो जनतेचा उठाव सुरू झालेला दिसतो, तोही तालिबानी वर्चस्व वाटते तेवढे सर्वव्यापी नाही, हे सिद्ध करते. वीस वर्षांपूर्वीचा काळ आज नाही. आजची अफगाणिस्तानमधील नवी पिढी शिकलेली आहे. तिला नागरी स्वातंत्र्याचे मोल निश्चितच कळते.

अफगाणिस्तानी तालिबान ही मुख्यत्वे ४२ टक्के लोकसंख्या असलेल्या पश्तुनी जमातीची आहे. उर्वरित लोकसंख्येपैकी ताजिक २७ टक्के, शियापंथीय हजारा ९ टक्के, उज्बेक ९ टक्के आहेत. शिवाय ऐमक, तुर्कमेन, बलुच अशा इतर छोट्या जमातीही आहेत. या सगळ्यांचा तालिबान्यांना विरोध आहे. त्यांच्या हाती शस्त्रास्त्रे आली, तर तालिबान्यांविरुद्ध लढण्यासाठी ते नक्की पुढे सरसावतील यात शंका नाही.


ही सर्व परिस्थिती पाहता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्याचा विचार करावा लागेल. दहशतीच्या बळावर आलेली कोणतीही सत्ता कायम टिकू शकत नाही, हे त्यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी सत्ता भले काहीवेळ प्रभावी राहते, परंतु ती कायमस्वरूपी नसते. तालिबानचेही असेच आहे. जसजशी तालिबान डोईजड होईल, तसतसा तिला विरोधही वाढेल. एकीकडे तालिबान अफगाणिस्तानात मानवाधिकारांचे आणि महिलांच्या अधिकारांचे हनन करीत असताना आणि पुन्हा आपले रानटीपण दाखवीत असताना, सध्याची नवी पिढी उठाव केल्याशिवाय राहणार नाही. अफगाणिस्तानात जे नवे सरकार सत्तारूढ होईल ते सर्वसमावेशक असले पाहिजे, अशी दोहा करारातील प्रमुख अट आहे. तालिबान्यांना तसे करण्यास भाग पाडणे, मानवाधिकारांचे रक्षण करणे ही खरं तर मैदान सोडून बाहेर पडलेल्या अमेरिकेची ती नैतिक जबाबदारी आहे. ती अमेरिकेने घेतली नाही, तर हे अशांततेचे ढग सर्वदूर पसरतील आणि जागतिक शांतता धोक्यात येईल.

अशावेळी भारताची भूमिका महत्त्वाची असेल. भारताला या कुरापतींचा त्रास होणार हे नक्कीच आहे, कारण जेव्हा चीन-पाकिस्तानसारखे शेजारी शत्रू राष्ट्र तालिबानची पाठराखण करण्यासाठी सरसावतात, तेव्हा ती मदत म्हणजे भारताविरोधात टाकलेले तालिबानास्त्र असते हे लक्षात घेतले पाहिजे. ते तालिबान अस्त्र अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधले खेळणे झाले असेल, तर त्याचा खेळ भारतात रंगणार नाही, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

सनसनाटी व्यक्तिमत्व


भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन झाले. आॅगस्ट महिना हा भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात गेले दोन वर्षे वाईटच जाताना दिसत आहे. अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज या महत्त्वाच्या नेत्यांचे आॅगस्ट महिन्यात निधन झाले. आता कल्याण सिंह यांचे आॅगस्ट महिन्यात निधन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात कल्याण सिंह यांचे वेगळे महत्त्व आहे. वेगळे स्थान आहे. वेगळे योगदान आहे. त्यामुळे त्यांची दखल ही घ्यावीच लागेल. वास्तविक भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारात व्यक्तीस्तोम माजवले जात नाही. तो पक्ष व्यक्ती केंद्रीत नसला, तरी पक्षासाठी योगदान आणि वेगळी भूमिका मांडणाºयांची नोंद म्हणून कल्याण सिंह यांचे नाव वेगळ्या प्रकारे घ्यावे लागेल. तसे कल्याण सिंह कायम वादग्रस्त आणि सनसनाटी म्हणूनच पक्षात राहिले; पण ते एक दखलपात्र नेते होते.


उत्तर प्रदेशचे माजी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री लखनऊ येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला; पण त्यांना कोणी कधीच विसरू शकणार नाही, कारण भाजपच्या इतिहासात अयोध्यातील राम मंदिर, बाबरी मशीद आणि कल्याण सिंह ही पर्व कायमची असणार आहेत. खरं तर कल्याण सिंह यांनी भारतीय जनता पक्षामध्ये असताना, राज्यात आणि केंद्रात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपालदेखील राहिले होते. १९९०च्या दशकात उत्तर प्रदेशात भाजपचा प्रचार-प्रसार करण्यात आणि सत्ता स्थापनेत कल्याण सिंह यांचा मोलाचा वाटा होता. कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर, १९९२ रोजी पाडली, तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मशीद पाडल्याप्रकरणी दोषमुक्त केलेल्या ३२ जणांमध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह कल्याण सिंह यांचाही समावेश होता. त्या काळात नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान होते. कारसेवकांना सगळीकडून अडवले जात असताना, नरसिंहराव यांनी कल्याण सिंह यांना तंबी दिली होती की, कोणत्याही परिस्थितीत बाबरीला धक्का लागला नाही पाहिजे; पण बाबरी पाडली आणि कल्याण सिंह यांनी लगेच राजीनामा दिला. आपण बाबरी वाचवू शकलो नाही, जनमतापुढे झुकलो, असे सांगत त्यांनी आपले कार्य पूर्ण केले आणि सर्वांना सुखद धक्का दिला. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या कार्यातील सर्वात मोठा अडसर होता तो बाबरी मशिदीचा. तो दूर करण्यात सिंहाचा वाटा या सिंहाचा होता, म्हणून कल्याण सिंह यांचे वेगळे स्थान आहे.

अनेकवेळा कल्याण सिंह यांची कारकीर्द चर्चेत आणि वादग्रस्त ठरली. कल्याण सिंह यांचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत अनेकदा मतभेद आणि वाद झाले. त्यानंतर १९९९मध्ये सार्वजनिकरित्या अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर टीका केल्यामुळे सिंह यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. भाजपमधून काढल्यानंतर कल्याण सिंह यांनी राष्ट्रीय क्रांती दल नावाने स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि २००२ ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात जोरदार प्रचार केला आणि त्यांच्या पक्षाने चार जागा मिळवत ७०पेक्षा जास्त जागांवर भाजपला नुकसान पोहोचवलं. २००३ मध्ये ते समाजवादी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले; मात्र त्यांची सपासोबतची मैत्री जास्त काळ टिकली नाही आणि जवळपास पाच वर्षांनी २००४ मध्ये ते पुन्हा भाजपवासी झाले, परंतु त्यांच्या भाजपमधील पाच वर्षांच्या गैरहजेरीत बरीच राजकीय समीकरणं बदलली होती. २००७मध्ये पुन्हा भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवत निवडणूक लढवली; पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे अगदी तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये परतलेल्या सिंह यांनी पुन्हा २००९ मध्ये सपासोबत हातमिळवणी केली आणि लोकसभेत खासदार झाले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी राष्ट्रीय क्रांती दलाचे तब्बल २०० उमेदवार उभे केले; मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. पक्ष बदलण्याचा आणि ठाम राजकीय भूमिका नसल्याचा फटका त्यांना स्वत:च्या अतरौली मतदारसंघातही बसला. ज्या मतदारसंघातून कल्याण सिंह ८ वेळा निवडून आले होते, त्या पारंपरिक अतरौली मतदारसंघात त्यांच्या सून प्रेमलता यांचा पराभव झाला. त्यानंतर कल्याण सिंह २०१३ मध्ये पुन्हा भाजपमध्ये परतले आणि त्यांनी राष्ट्रीय क्रांती दल या पक्षाचं भाजपमध्ये विलिनीकरण केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या १४-१५ वर्ष भाजपपासून लांब राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी कल्याण सिंह यांनी एका सभेत भावुक होऊन भाषण दिलं आणि त्यांच्या संघ आणि भाजपसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, संघ आणि भाजपचे संस्कार माझ्या रक्तातील प्रत्येक थेंबात सामावलेले आहेत. त्यामुळे मी आयुष्यभर भाजपात राहणार आणि ज्या दिवशी माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल, त्यादिवशी माझा मृतदेह भाजपच्या झेंड्यात गुंडाळून यावा, अशी माझी इच्छा आहे. अखेर तेच घडले; पण जोपर्यंत बाबरी मशिदीचा उल्लेख होईल तोपर्यंत कल्याण सिंह यांचे नाव सर्वांच्या स्मरणात राहिल आणि त्यांचे सनसनाटी व्यक्तिमत्व लोकांना आठवत राहिल.

चोर पोलीस खेळ


कोणता धंदा केव्हा तेजीत येतो याचे व्यावसायिक गणित प्रत्येक व्यावसायिकाचे असते. मालाचा साठा करणे, माल केव्हा मार्केटमध्ये आणणे, कोणते दिवस चांगले, टंचाई केव्हा निर्माण होते याचे नेमके वेळापत्रक प्रत्येक व्यावसायिकाकडे असते. हे गणित ज्याला जमते तो व्यवसायात यशस्वी होतो. मग धंदा तो कोणताही असला. रात्रीचा, काळा धंदा असला, तरी कोणते काम केव्हा करायचे याचे गणित ठरलेले असते. पोलिसांनी दुर्लक्ष केले, म्हणजे सगळे धंदे मोकाट चालतात. कोणत्यावेळी माणसे बेसावध असतात, हे पोलीस जाहीर करतात आणि त्याचा लाभ सामान्य माणसांना न होता चोराचिलटांना होतो, असे वास्तव आहे. सरकार आणि पोलीस प्रशासनातील नियोजनात होणारा गोंधळ हे गुन्हेगारी जगताचे प्रेरणा स्थान आहे. पोलीस यंत्रणा राजकीय नेत्यांचे संरक्षण, त्यांच्या सभा आणि दौरे यात गुंतत असेल, तर गुन्हेगार, चोराचिलटांना ती संधी निर्माण होते, म्हणूनच चोर पोलीस किंवा गुन्हेगारी जगत आणि पोलिसांचे प्रमाण याचे काहीतरी गुणोत्तर जमणे आवश्यक आहे.


             आता सणवार, समारंभ असल्यामुळे चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. त्यांचा धंदा तेजीत आहे. लग्नाचा सीझन नसला की, मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते. याशिवाय मोबाईल चोर, पाकिटमारी असे अन्य धंदे फावल्या वेळात केले जातात. या सगळ्यांचे नियोजन करणे तेवढे सोपे नाही; पण आमची प्रशासकीय यंत्रणा ते नियोजन यशस्वी होण्यास हातभार लावतात. आधी मोटारसायकली चोरी करायची मग त्याच मोटारसायकलवरून येऊन मंगळसूत्र खेचायचे. डोळ्यादेखत मंगळसूत्र, चेन खेचण्याचे प्रकार होतात; पण त्याबाबतची तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. अर्थात त्यांनी तरी कुठंकुठं लक्ष ठेवायचे? नेत्यांच्या यात्रा सुरू आहेत तिथे लक्ष ठेवा. मोर्चे आहेत तिथे लक्ष ठेवा. लसीकरणाची केंद्र आहेत, तिथे लक्ष ठेवा. कुणी विनामास्क, कोरोनाचे नियम पाळत नाही तिकडे लक्ष द्या. ही अवांतर कामे वाढल्याने आणि पोलिसांची संख्या कमी असल्याने चोरांचे फावते. किती लोकसंख्येच्या प्रमाणात किती पोलीस असले पाहिजेत याचे काही नियोजन आहे की नाही?

            पोलिसांनी जर मनात आणले, तर हे चोर पकडणे अवघड नसते. कोणत्यावेळी कोणता पोलीस कुठे जातो याचे वेळापत्रक जसे रस्त्यावरचे विक्रेते, अवैध वाहतूक करणारे, चोरटे यांच्याकडे असते, तसेच कोणता चोर कशा पद्धतीने चोरी करतो, त्याची चपळता कशी आहे, तो मोटारसायकल कशी वाकडी करून मधून घुसवतो, तोंड झाकण्यासाठी कसे नाटक करतो, चेन मंगळसूत्र कसे खेचतो, याची सगळी माहिती पोलिसांकडे असते. कोरोनाच्या मास्कमुळे तर चोरांना सोपेच झाले आहे. पूर्वी तोंडाला मास्क लावून येणारे तोंड लपवणारे गुन्हेगार असत. त्यामुळे कोणी तोंडाला मास्क घातलेला दिसला की, पोलीस त्याला संशयीत म्हणून अडवत असत; पण आता आयतेच मास्कचे कारण मिळाले आहे. एटीएम लुटण्याचे प्रकारही गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पहायला मिळाले आहेत. पूर्वी एटीएम सेंटरमध्ये तोंडावरचा मास्क काढा अशी सूचना असायची; पण आता कोरोनामुळे मास्कशिवाय प्रवेश नाही. चोरांचे फावणारच ना मग?


पोलिसांकडून सामान्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत ही ओरड फार आहे. चोर, गुन्हेगारांपेक्षा सामान्य माणसांनाच पोलिसांची भीती वाटते. या सारखे दुर्दैव काय असेल? सर्वात प्रथम आपले मंगळसूत्र किंवा चेन खेचली गेली, म्हणून तक्रार देण्यासाठी सामान्य माणूस गेला तर त्याला पोलीस इतकी हिडीस फिडीस करतात की, या माणसाची चेन चोरीला गेलेली नाही, तर ती याने चोरली आहे, अशा अविर्भावात पोलीस वावरतात. आधी तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. मग विचारतात, किती तोळ्याचे होते तुमचे गंठन? जर उत्तर दिले की, तीन तोळ्यांचे होते. तर लगेच विचारतात पावती आहे काय? पावती घेऊन कोणी हिंडतो काय? कोणीतरी आज माझे मंगळसूत्र मारणार आहे. चला पावतीबरोबर घेऊन गेलेले बरे, असा विचार करून महिलांनी बाहेर पडले पाहिजे, असे गृहखात्याला वाटते काय? असे पोलिसांना वाटते काय? कशी शुक्लकाष्ट काढायची आणि सामान्य माणसाला जेरीस आणायचे याचे चांगले ज्ञान पोलिसांना असल्यामुळे ते बरोबर सामान्य माणसांची छळवणूक करतात आणि या चोरट्यांना पाठीशी घालतात. माणूस चोरी झाल्या झाल्या पोलिसांकडे जाणार ना? की, ते काही तरी मदत करतील म्हणून? पण जर पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे आधी पोलीस ठाण्यात न येता पावती घेऊनच मग आला तर लगेच का नाही आला? आता तो कुठल्याकुठे लांब गेला असेल की, म्हणून छळणार. पावती बघू? तुमचे नाव काय? त्या महिलेने सांगितलेले नाव आणि पावतीवरचे नाव वेगळे असते. ती सांगते अहो साहेब, हे गंठन माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी घातले होते त्यामुळे त्यांच्या नावाने ही पावती आहे. मग बोलवा तुमच्या वडिलांना किंवा म्हणजे हुंडा घेतला काय? तुमची कुठे चोरी झाली आहे? वडील का तक्रार करीत नाहीत? असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण करून त्या माणसाला अक्षरश: पिळून काढतात. जर एखादी महिला म्हणाली, पावती मिस्टरांच्या नावावर आहे, तर पोलीस म्हणतात मग तक्रार त्यांना करू देत. त्यांचे मंगळसूत्र तुमच्याकडे कसे आले? आता एक पतीच आपल्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो याचे ज्ञान असूनही असे निरर्थक प्रश्‍न विचारून पोलीस त्या सामान्य माणसाला छळतात. याचे कारण असे की, चोरांना आणि चोरीचा माल विकत घेणाºया दोघांनाही पाठिशी घालण्यासाठी ही सारी धडपड चाललेली असते. बुरखा लावून मोटारसायकलवरून फिरणाºयांना पोलीस का अडवत नाहीत? कोरोनाचे निमित्त आहे. तोंड का झाकून घेतले आहे? मग हेल्मेट का घातले नाही? असे का पोलीस विचारत नाहीत? तोंडावर रूमाल बांधून झाकून गेलेली मोटारसायकल जवळून गेली की ओळखायचे की, इथून दहा किलोमीटर अंतरापर्यंतचा मार्ग हा चोरांसाठी सुरक्षित आहे. एकही पोलीस इथे आता येण्याची शक्यता नाही.

पूर्वी चोर पोलीस हा खेळ असायचा. या चोर पोलीस खेळातही मुले एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करायची. ज्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेतले आहे ते पोलीस मात्र चोरांना पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळेच चोर पोलिसांचा हा खेळ सुरू आहे. या चोर पोलिसांच्या खेळात आणि लहान मुलांच्या खेळात हाच फरक आहे. लहान मुलांच्या खेळात पोलीस चोरांना पकडतात आणि चोर पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करतात; पण इथे चोर पोलीस एकत्रितपणे सामान्य माणसाला पकडण्याचा प्रयत्न करतात. त्याला लुटल्यावर चोराला पळायला नकळत पोलीस मदत करतात, असे वास्तव आज जाणवू लागले आहे. त्यासाठी पोलिसांवरचा अतिरिक्त ताण कमी करणे गरजेचे आहे.


बिटवीन द लाईन्स/ प्रफुल्ल फडके\\

मनोबंधन


रक्षाबंधन हा सण आपल्याकडे साजरा केला जातो; पण पहिले रक्षाबंधन कोणी कुणाला केले? ती राखी कशी होती, हा प्रश्न अजून कुणी कुणाला विचारला नाही; पण खरे पहिले रक्षाबंधन कोणी केले असेल, तर ते महाभारतात द्रौपदीने श्रीकृष्णांना केलेले होते. अश्वमेघ यज्ञावेळी अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा यावरून शिशुपालाने श्रीकृष्णांचा आणि तेथील उपस्थितांचा अपमान केला होता. त्यावेळी शिशुपालाची शंभरी भरेपर्यंत श्रीकृष्ण गप्प बसले आणि त्यानंतर आपले सुदर्शन चक्र सोडले आणि शिशुपालाचा वध केला. वध करून सुदर्शन चक्र परत आले तेव्हा क्षणभर श्रीकृष्ण विचलीत झाले, तेव्हा ते सुदर्शन चक्र बोटात अडकण्याऐवजी बोटाला लागले आणि रक्त भळाभळा वाहू लागले. त्यावेळी कसलाही विचार न करता सम्राज्ञी असलेल्या द्रौपदीने आपल्या भरजरी साडीचा पदर फाडून त्याची पट्टी श्रीकृष्णांच्या बोटाला धावत येऊन बांधली आणि तो रक्तपात थांबला. ती पहिली राखी. त्यागाची. त्यावेळी या चिंधीच्या प्रत्येक धाग्याचा मी ऋणी आहे, हे बंधन मला तुझे रक्षण करण्यासाठी बांधलेले मनोबंधन आहे, हे कृष्णांनी वचन दिले आणि त्यानंतर वस्त्रहरणाच्यावेळी याच बंधनाची उतराई होण्यासाठी त्यांनी द्रौपदीची लाज राखली आणि भावाचा धर्म निभावला.


आज शिशुपालाकडून सुटलेले चक्र परत येऊन कोणाच्या बोटाला लागणार नाही; पण ते दीड वर्षापासून सुरू असलेले मृत्यूचे चक्र जे चीनप्रांतातून आले आणि कोरोना कोव्हिड-१९ नावाने जे सर्वांना छळत आहे, त्यापासून रक्षण करण्याची आता जबाबदारी आहे. पहिली लाट, दुसरी लाट आता तिसºया लाटेची प्रतिक्षा, अशी त्या कोरोनाची शंभरी भरत आली असली, तरी आपल्या भावांचे आणि बहिणींचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. बहिणींनी भावांना मास्कची राखी बांधायची आहे. मास्कशिवाय कुठे जाऊ नका, असे सांगायचे आहे. भावांनी बहिणींना लसीकरण केले का, हे आवर्जून विचारायचे आहे. या संकटापासून तर आपण बाहेर पडणार आहोतच; पण जागतिक पातळीवर दुसरे संकट येऊ पाहते आहे, ते म्हणजे तालिबानी संकट.

महिलांची कोंडी करणारी तालिबानी राजवट शेजारील प्रांतात अफगाणिस्तानात येऊन दाखल झालेली आहे. या राजवटीचा कुठेही इथे स्पर्श होणार नाही आणि आपल्या देशातील बंधुभगिनी सुखासमाधानाने राहतील, अशी या निमित्ताने आपण अपेक्षा करायची आहे.


भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी आपण प्रतिज्ञा शाळेत असताना म्हणायचो; पण ही प्रतिज्ञा विसरण्यासाठी आहे का? हे बंधुत्व, हा बंधुभाव नंतर कुठे गेला? दररोज प्रत्येक क्षणाला अनेक ठिकाणी महिला अत्याचाराला बळी पडत आहेत, त्यांची अब्रू लुटली जात आहे. हे प्रकार का घडतात? आपल्या समोर घटना घडत असताना, आम्ही मदतीला का धावून जात नाही? स्मार्ट फोन आल्यापासून तर एक प्रकार अत्यंत निंदनीय असा बघायला मिळतो आहे. तो म्हणजे एखादा अपघात झाला, दुर्घटना घडली, भांडणे-मारामारी झाली, कोणी कोणाची छेड काढत असेल, तर अनेक जण तो क्षण, ते दृश्य आपल्या मोबाईल कॅमेºयात बंदीस्त करण्यासाठी धडपडतात; पण तोपर्यंत त्याचा जीव गेलेला असतो. त्याला फोटोची, व्हिडीओ क्लिपची गरज नाही तर मदतीची, उपचारांची गरज असते; पण अशा घटना, अपघात घडत असताना अनेक जण कॅमेºयात गुंतत असतात, त्यांनी आपल्या मनाला काही बंधन घालून घेतले, मनोबंधन घालून घेतले, तर खºया अर्थाने ते रक्षाबंधन होईल, कारण त्या संकटात सापडलेला तो कोणाचा तरी भाऊ असतो, कोणाची तरी बहीण असते. त्यामुळे फक्त आपल्याच बंधू आणि बहिणीचा विचार न करता सारे भारतीय माझे बांधव आहेत, याचा विचार केला पाहिजे, तर खºया अर्थाने ते रक्षाबंधन होईल.

रक्षाबंधन हा एक दिवसाचा सण न राहता ती नैतिक जबाबदारी असली पाहिजे. एक दिवसाची कोणी कुणाची बहीण असत नाही, तर ते आजन्म असे पालन करण्याचे व्रत असते. ही मनोवृत्ती तयार करण्याची आज गरज आहे. आज जातीपातीत, धर्मात मनुष्य विभागला जात आहे. प्रत्येक जण आपल्या जातीपुरता, धर्मापुरता विचार करत आहे; पण संपूर्ण मनुष्यजातीचे रक्षण करण्याची ही वेळ आहे. कोरोनाच्या संकटाने कधी कोण कोणत्या जातीचा, धर्माचा, गरीब की श्रीमंत असा विचार केला नाही. समोरून येणारा शत्रू सरसकट हल्ला करत असतो. अशावेळी सगळे भेदभाव विसरून सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. कोरोना योद्धे म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ते डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी सर्वांना सरसकट मदत करत असतात. अशावेळी त्यांचे रक्षण करणे, त्यांना सहकार्य करणे, त्यांचा सन्मान करणे हे खरे रक्षाबंधन, मनोबंधन असेल. अनेक जण डॉक्टरांवर हल्ले करतात, हॉस्पिटलमध्ये दंगा करतात, नर्स आरोग्य कर्मचाºयांशी गैरवर्तन करतात, हे प्रकार थांबले पाहिजेत, तर खºया अर्थाने रक्षाबंधन साजरा केला, असे म्हणता येईल. देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक खरे आपल्या रक्षाबंधनाचे कार्य पार पाडत असतात. एका सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाºयांशी नुकतेच बोलण्याची वेळ आली होती, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेला विचार फार महत्त्वाचा आहे. सीमेवरच्या शत्रूला आम्ही मारत नसतो, तर या सीमेच्या आत असलेले माझे बांधव आहेत, त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून आमच्या हातात शस्त्र आहेत. आमच्या हातात शस्त्र शत्रूला मारण्यासाठी नाही, तर आमच्या बांधवांचे रक्षण करण्यासाठी आहे. शत्रूवर आमचा कसलाही राग नाही; पण आमचे आमच्या भारतीयांवर प्रेम आहे, त्या प्रेमापोटी आम्ही लढत असतो. हा विचार प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. सीमेवर लढणारा सैनिक हा प्रत्येक भारतीयांचा विचार करतो, तर आम्ही तसा विचार करायला काय हरकत आहे? हेच मनोबंधन आज असण्याची गरज आहे.

शिव नीतीचे दर्शन घडवणारे ‘जय शिवराय’


आपल्याकडे फार प्राचीन काळापासून विदूर नीती, चाणक्य नीती, कृष्ण नीती, इसापनीती असे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत. त्यातून बोध घेऊन जगण्याचा मार्ग दाखवला जातो, पण चारशे वर्षांपूर्वीचे आमचे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नीतीचा अभ्यास केला तर ती पण एक सर्वश्रेष्ठ नीती आहे. या नीतीचा उहापोह करून कोणत्या वेळी कसा विचार करावा, कसा निर्णय घ्यावा, याचा बोध देणारे पुस्तक म्हणजे ‘जय शिवराय’. शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या ओघवत्या आणि लोभस अशा गोड, सात्विक भाषेतून या नीतिमूल्यांचे दर्शन घडते तेव्हा हा एक धर्मसिंधू असल्याचा भास होतो. आपल्याकडे कोणताही बाका प्रसंग उभा राहिला, कोणतेही संकट उभे राहिले की, त्याला धर्मसंकट असे म्हणतात. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा तो धर्मसिंधू. असाच सध्याच्या काळात कसे वागले पाहिजे, कोणती भूमिका घेतली पाहिजे हे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतून बघताना फार काही शिकायला मिळते. हे महत्त्वपूर्ण काम प्रशांत देशमुख यांनी ‘जय शिवराय’ या पुस्तकातून केले आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाकडे हे पुस्तक असले पाहिजे. आपल्याकडे पोथ्या, पुराणे असतात, ग्रंथ असतात, त्याची पारायणे आपण करतो तशी या जय शिवराय या पुस्तकाची पारायणे होण्याची गरज आहे, त्यावर मनन, चिंतन होण्याची गरज आहे. प्रत्येक खेपेला वेगवेगळ्या भूमिकेतून ते वाचले गेलेपाहिजे, असे सर्वांगसुंदर असे हे पुस्तक.


छत्रपती शिवाजी महाराज समजणे इतके सोपे काम नाही. त्यांचे चरित्र इतिहास किंवा रंजन म्हणून न पाहता एक नीतिवचनांचे शिक्षण देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले, तर या देशात खºया अर्थाने शिवशाही प्रकट होईल आणि सर्वजण सुखी होतील. किती पुढचा विचार करणारे आमचे राजे होते. आपल्या माणसांचा विचार करणारे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य विविध पैलूंतून उलगडून समोर येतात तेव्हा हे पुस्तक म्हणजे केवळ ग्रंथ न राहता ते आपल्याला आधार देणारे, मनाला उभारी देणारा आपला मित्र होऊन जाते.

शिवरायांच्या आयुष्यात आलेले प्रसंग या पुस्तकात आहेतच, पण आजच्या परिस्थितीत शिवराय असते, तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हे सुचवण्याचे अचूक काम प्रशांत देशमुख या महान लेखकाने केले आहे असे म्हणावे लागेल. या पुस्तकात एकूण ५५ लेख आहेत. या पंचावन्न लेखांमधून छत्रपती शिवराय वेगळ्या पद्धतीने उलगडत जातात. नव्याने समजतात. आजच्या तरुणांना, सामान्य माणसांना, महिलांना, व्यावसायिकांना, राजकारण्यांना मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहेच, पण खºया अर्थाने शिवरायांचे विचार माणसांच्या मनात रुजवणारे हे पुस्तक आहे. शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा आपण वाचतो, त्यातून आनंद मिळतोच, अभिमानही वाटतो, पण त्याची मानसिक तयारी कशी झाली, त्या निर्णयापर्यंत ते कसे पोहचले, त्यांनी हा नेमका निर्णय कसा घेतला, यावर प्रकाश टाकणारे हे बोधप्रद असे पुस्तक आहे, म्हणून शिवचरित्राबाहेरच शिवराय आपल्याला या पुस्तकातून कळतात.


शिवरायांच्या अफाट कर्तृत्वावर अफाट प्रेमाने त्यांचा विचार जाणून घेऊन तत्कालीन आणि सद्य परिस्थितीची तुलना करत लिहिलेले हे पुस्तक असल्याने हे पुस्तक वाचकाला मार्गदर्शन करत राहते. पेरते व्हा मधून काय पेरले म्हणजे काय उगवते हा विचार मांडताना सुरतेच्या स्वारीवरील कथेचा भाग समोर येतो आणि शिवरायांच्या दूरदृष्टीचा परिचय घडत जातो. आपल्याकडे आपण अपयश आल्यावर खचून जातो, पण अपयशातील प्रयत्नही फार महत्त्वाचे असतात हे आमचे जाणते राजेच जाणतात. म्हणून तर त्यांना जाणता राजा म्हणतात हे उलगडते. म्हणूनच अपयशातील प्रयत्नांचे कौतुक आमचे राजे करतात. या कौतुकात पुढच्या यशाचे रहस्य दडलेले असते. हे खरे महाराज आपल्यासमोर या पुस्तकातून येतात. महाराजांसाठी जीवाला जीव देणारे वतनदार, मावळे कसे होते आणि त्यांचा आदर, सन्मान महाराज कसे करत होते याचे दर्शन या पुस्तकातून होते.

महाराजांनी माणूस वाचायला शिकवला, नेता कसा असावा, याचे उदाहरण घालून दिले. आपल्या ध्येयावर कसे ठाम असावे, केव्हा स्थितप्रज्ञ असावे हे त्यांनी वागून, जगून दाखवले. याचे दाखले आजच्या काळातील तुलनेसह या पुस्तकातून समोर येतात. आजचे राजकारणी, पोलीस यंत्रणा, समाजसुधारक, नेते, नोकरदार या सगळ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे हे पुस्तक आहे. आजचे राजकारणी, आजचे विरोधक, प्रस्थापित या सगळ्यांना हे पुस्तक बरेच काही सांगून जाते. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण होतात. काही गोष्टी वादग्रस्त केल्या जातात. अशी परिस्थिती कशी हाताळायची असते, यावर भाष्य हे पुस्तक करते.


शिवरायांनी कोणतीही गोष्ट विनाकारण केली नाही. कोणतीही गोष्ट चुकीची केली नाही. त्या प्रत्येक गोष्टीमागे जे महत्त्वाचे कारण होते ते कथेबाहेर जाऊन त्याची नेमकी कारणमीमांसा हे पुस्तक करते आणि त्याचा गूढ, न समजलेला अर्थही हे पुस्तक पोहचवते. त्यामुळे या पुस्तकातून राजांचा इतिहास नव्हे, तर राजांचे तहहयात असे स्वरूप, धोरण समजते. राजे हा कधी भूतकाळ होऊ शकत नाहीत, तर शिवराय हे जीवन जगण्याचे, जीवनाचा संघर्ष करणारे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान देणारे, कठीण प्रसंगात किंवा कोणत्याही आनंदी प्रसंगातही कसे वागायचे, कसा विचार करायचा याचा बोध देणारे हे पुस्तक आहे. आज अशा पुस्तकांची गरज आहे. साध्या सोप्या आणि ओघवत्या भाषेत सांगितलेल्या या तत्त्वज्ञानाबद्दल शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे अभिनंदन करावे लागेल.

प्रफुल्ल फडके/वाचन संस्कृती


9152448055

नाटककार प्र. ल. मयेकर


१९८० चे दशक आपल्या नव्या दमाच्या आणि वेगळ्या पठडीतील नाटकांनी गाजवले ते आणखी एक नाटककार म्हणजे प्रभाकर लक्ष्मण मयेकर. अनेक वेळा नाटकाचा प्रयोग सादर करण्यापूर्वी श्रेयनामावलीत कधी प्र. ल. मयेकर असे म्हणत, तर कधी संपूर्ण नावानिशी त्यांचा उल्लेख प्रभाकर लक्ष्मण मयेकर असा केला जायचा, पण त्यांनी आपल्या शैलीने दमदार नाटके त्या काळात दिली आणि रंगभूमीच्या आपल्या सांस्कृतिक ठेव्यात आपल्या नावाची नोंद केली.


मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनचे तुफान गाजलेले अजरामर नाटक म्हणजे ‘पांडगो इलो रे..’ मच्छिंद्र कांबळी, सखाराम भावे यांच्या भूमिका आणि अरुण नलावडे यांचे दिग्दर्शन याने प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचे हे नाटक तुफान गाजले होते. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेला एका उंचीवर नेऊन लोकप्रिय केले. त्यातील पहिले नाटक वस्त्रहरण होते, पण त्यापाठोपाठ आलेले तुफान लोकप्रिय झालेले नाटक म्हणजे पांडगो इलो रे.. हे नाटक. या नाटकाचे मालवणीबरोबरच मराठीतही लिखाण केलेले होते. पांडुरंग आला रे आला... पण मालवणीतील गोडवा, त्याची लज्जत प्रेक्षकांना लागल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात किंवा अन्य भागांतही पांडुरंग आलाचे प्रयोग लावले, तर प्रेक्षक आम्हाला मालवणी भाषेत हे नाटक बघायला आवडेल हे सांगून ‘पांडगो इलो रे इलो’चा प्रयोग करायला लावायचे. या नाटकाने प्र. ल. मयेकरांना खूपच प्रसिद्धी मिळाली होती, पण मयेकर एका पठडीत अडकून पडले नाहीत. फक्त विनोदी नाटक करायचे या फंदात न पडता त्यांनी विविध विषयांवर नाटके लिहिली.

मयेकरांचे आणखी एक गाजलेले नाटक म्हणजे ‘रातराणी’. रातराणी हे प्रभाकर लक्ष्मण मयेकरांचे नाटक भद्रकाली या संस्थेने २२ जानेवारी १९८७ रोजी प्रकाशित केले. भक्ती बर्वे, अरुण नलावडे, उदय म्हैसकर आणि सतीश पुळेकर या दमदार कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी या नाटकातून पहायला मिळते. या नाटकात मयेकरांची प्रतिभा खºया अर्थाने खुलताना दिसते. त्यांच्यातील लेखक जाणवतो. कारण एखाद्या पाश्चात्त्य नाटकाच्या कथेवर आधारित किंवा रूपांतरित वाटावे असे हे नाटक होते, पण प्र. ल. मयेकरांचे हे स्वत:चे असे स्वतंत्र नाटक आहे. नाटक पाश्चात्त्य वाटण्याचे कारण यातील पात्रे. अ‍ॅना स्मिथ ही अँग्लो इंडियन पियानोवादक स्त्री आहे. भक्ती बर्वे-इनामदारने ती रंगवली होती. याशिवाय सॅली स्मिथ (अरुण नलावडे) हा व्हायोलिनवादक तिचा नवरा, डॉ. जिमी क्रॉफर्ड म्हणजे उदय म्हैसकर हा अ‍ॅनाचा डॉक्टर मित्र आणि देवेन माहिमकर म्हणजे सतीश पुळेकर हा कॉलेजमध्ये शिकणारा व्हायोलिनवादक, अशी चार-पाच पात्रे. त्यातील पात्रांमुळेच यातला माहौल परकीय वाटावा अशी परिस्थिती. प्र. ल. मयेकरांनी लिहिलेल्या संहितेत प्रचंड ताकद दिसून येते. या नाटकात स्त्री-पुरुष संबंध पियानो-व्हायोलिनच्या नात्याच्या माध्यमातून प्रकट होताना दिसतात. रातराणी जशी उत्तररात्री फुलते तशीच पन्नाशी उलटलेल्या अ‍ॅना स्मिथची गोष्ट आहे ही. या नाटकात अ‍ॅनाची वेगवेगळी रूपे दिसतात. यात ती प्रियकराची प्रेयसी आहे, नवºयाची बायको आहे, मुलाची आई आहे, एका सज्जन माणसाची मैत्रीण आहे, तरुण मुलाची वयस्कर मैत्रीण आहे. अशी विविधरंगी भूमिका, शिवाय अँग्लो इंडियन वाटेल अशी अभिनेत्री म्हणून त्यावेळी एकच नाव समोर आले ते भक्ती बर्वे-इनामदार! तिने मयेकरांच्या या संहितेचे सोने केले होते.


मयेकरांचे आणखी एक गाजलेले नाटक म्हणजे रानभूल. मयेकरांच्या लेखणीला विनय आपटे यांचे दिग्दर्शन आणि संजय मोनेंसारखा कलाकार असल्यावर ते किती छान असणार हे सांगण्याची काही गरज नाही, पण व्यावसायिकदृष्ट्या हे नाटक तुफान यशस्वी झाले होते.

प्र. ल. मयेकर हे खरे तर राज्य नाट्य स्पर्धेने रंगभूमीला दिलेले वरदान म्हणावे लागेल. राज्य नाट्य स्पर्धांतून जसे नवनवे कलाकार मिळतात तसेच चांगले लेखकही मिळतात. असेच मिळालेले हे लखक. एकेकाळी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया राज्य नाट्य स्पर्धेत दोन नाटकांनी मयेकरांना सर्वोत्कृष्ट लेखनाची बक्षिसे मिळवून दिली, हे ते यश. यापैकी अथं मनुस जगन हं आणि मा अस साबरिन या त्या दोन नाटकांतून मयेकरांनी माणुसकीबद्दलचे जे चिंतन रंगभूमीवर आणले होते, ते त्यांनी व्यावसायिक केले नाही. राज्य नाट्य स्पर्धा, एसटीच्या नाट्य स्पर्धा, एमएसएबीच्या नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा यांतून हे नाटक तुफान गाजले. या नाटकांनीच तर व्यावसायिक नाटककार म्हणून क्षमता असलेला मी नाटककार आहे, हे मयेकरांनी दाखवून दिले.


व्यावसायिक रंगभूमीवरचे मोठे नाव म्हणजे चंद्रलेखा ही नाट्य संस्था आणि मोहन वाघ. त्यांनी दीपस्तंभ, रमले मी, गोडीगुलाबी अशी पाठोपाठ नाटके मयेकरांची आणली. चंद्रलेखाचे हुकमी नाटककार म्हणून वसंत कानेटकरांचे नाव जोडले होते. त्या नावाबरोबर एक नाव जोडले गेले ते प्रभाकर लक्ष्मण मयेकर. संवाद व घटना यांतून उभ्या राहणाºया नाट्यपूर्ण प्रसंगांची रेलचेल त्यांच्या व्यावसायिक नाटकांमध्ये असे. त्याआधी, स्पर्धेसाठी केलेल्या नाटकांतही नाट्यमयता होतीच, पण अथं मनुस जगन हं मधली आदिवासींची अगम्य भाषा खुद्द मयेकरांनीच निर्माण केलेली होती! मनुस.. किंवा? साबरिन..सारखी निराळ्याच संस्कृतीतली, परंतु माणूसपण दाखवून देणारी नाटके प्रेक्षकांना रुचणार नाहीत, हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे प्रेक्षकांना काय लागते आणि स्पर्धकांना काय लागते याचा विचार करत लिखाण करणारे जाणकार नाटककार होते. स्पर्धेची नाटके ही प्रेक्षकांना आवडोत न आवडोत ती परीक्षकांना आवडणे महत्त्वाचे असते. व्यावसायिक नाटक टाळ्यांसाठी हवे असते. हे नेमके मर्म जाणत लिहिणारे ते नाटककार होते. प्रेक्षकांना विषय ओळखीचा नि आपला वाटेल अशी काळजी घेऊनच लिहू लागले. प्रत्येक व्यक्तिरेखा ठसठशीत असल्याने गुंतवून ठेवी. पुढे, नाटकाची कथा आजच्या काळातली हवी, हा संकेत झुगारून त्यांनी लिहिलेले तक्षकयाग काहीसे हिंदुत्ववादी विचार मांडणारे होते. रमले मी या नाटकात वंदना गुप्ते आणि संजय मोने यांचा मस्त अभिनय बघायला मिळायचा. हे नाटक बºयापैकी ती फुलराणीची आठवण करून देणारे होते, पण प्रेक्षकांना त्या नाटकाने रमवून टाकले होते. वंदना गुप्तेंनी त्यातील भूमिका अफलातून केली होती.

दीपस्तंभ या नाटकाने खºया अर्थाने डॉ. गिरीष ओक यांना ओळख दिली होती. सुजाता कानगो आणि गिरीष ओक यांचे हे नाटक तुफान चालले होते. प्र. ल. मयेकरांच्या या नाटकाने गिरीश ओक यांच्यातील खलनायक बाहेर काढला होता. त्यामुळेच गिरीश ओक यांना अनेक नकारात्मक भूमिका मिळत गेल्या, पण व्यावसायिक रंगभूमीवरील यशस्वी आणि नव्या कलाकारांना नावारूपाला आणणारी दमदार नाटके प्र. ल. मयेकरांनी लिहिली होती आणि ती कायम स्मरणात राहतील अशीच आहेत.


तिसरी घंटा/ प्रफुल्ल फडके

9152448055

तालिबानी


गेल्या काही दिवसांपासून तालिबान आणि अफगाणिस्तान हे चर्चेचे विषय झाले आहेत. वृत्तवाहिन्यांवर सतत त्याच विषयावरच्या बातम्या येताना दिसत आहेत. तालिबान हा एक कटू शब्द झाला आहे. ती एक वाईट संस्कृती आहे, असे सर्वत्र बोलले जाते. पूर्वी जसे जुलमी राजवट, जहागीरदारी लागून गेली काय, असे वाक्प्रचार वापरले जायचे तसे एखाद्याने काही हुकूम काढला की, लगेच तालिबानी निर्णय घेतला असे बोलले जाते. म्हणूनच हे तालिबान, अफगाणिस्तान नेमके काय आहे? अफगाणिस्तानातच तालिबानी का निर्माण झाले हे समजून घेणे आवश्यक आहे.


अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबान संघटनेला २००१ मध्ये अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला होता, पण हळूहळू या संघटनेने स्वत:ची पाळेमुळे पुन्हा देशात रोवली आहेत. तालिबानचे सैनिक अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल शहराच्या सीमेपर्यंत पोहोचले आणि अफगाणिस्तानातील सर्व मोठ्या शहरांवर तालिबाननं कब्जा केला आहे. आता संपूर्ण हुकूमत ही तालिबानने मिळवली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना पळून जाण्यास भाग पाडले. नाहीतर त्यांनी त्यांना जिवंत फासावर लटकावले असते. असे प्रकार यापूर्वी तिथे घडलेले आहेत.

तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा आहे. म्हणजे पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना तालिबान म्हणून संबोधलं जातं. साधारण ९० च्या दशकात सोव्हिएत संघ आपले सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलवत होतं, त्याचदरम्यान देशात तालिबान संघटना उदयाला आली. पश्तो आंदोलन सुरुवातीला धार्मिक मदरशांमधून सुरू झालं. या माध्यमातून कट्टर सुन्नी इस्लामचा प्रसार-प्रचार केला जायचा. त्यासाठी सौदी अरेबियाने आर्थिक पुरवठा केला होता. याचदरम्यान दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वेगाने वाढला. सप्टेंबर १९९५ मध्ये त्यांनी इराणशी लागून असलेल्या हेरात प्रांतावर ताबा मिळवला. त्यानंतर एक वर्षाने तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरावरही नियंत्रण मिळवलं होतं. त्यावेळी अफगाणिस्तानची सत्ता बुºहानुद्दीन रब्बानी यांच्या हाती होती. ते त्यावेळी सोव्हिएत सैनिकांचा विरोध करणाºया अफगाण मुजाहिद्दीन संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. परंतु तालिबानने सर्वप्रथम रब्बानी यांनाच सत्तेवरून हटवलं होतं. तीन ते चार वर्षांच्या कालावधीत १९९८ येता-येता सुमारे ९० टक्के अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला होता.


सोव्हिएत संघाचे सैनिक परतल्यानंतर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरिक मुजाहिद्दीन सत्ताधाºयांचे अत्याचार आणि अंतर्गत कलहाला कंटाळले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुरुवातीला तालिबानचं स्वागत केलं. भ्रष्टाचारावर अंकुश, अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा, रस्तेबांधणी तसंच विशिष्ट पद्धतीची प्रशासन यंत्रणा उभारणं, लोकांना सुविधा पुरवणं यांसारख्या कामांमुळे सुरुवातीच्या काळात तालिबान संघटना लोकप्रिय झाली. याचदरम्यान तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले. यामध्ये हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरीत्या फासावर लटकवणे, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणे, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता. तसेच पुरुषांनी दाढी वाढवणं आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणाºया बुरख्याचा वापर करणं सक्तीचं करण्यात आलं. विशेष म्हणजे, तालिबानने टीव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली. १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली. हा अतिरेक सुरू झाला. एकीकडे जग बदलत असताना, ग्लोबल होत असताना, माहिती तंत्रज्ञानाकडे झुकत असताना तालिबानी कायद्यांमुळे अफगाणिस्तान मागास बुरसटलेल्या विचारांना कवटाळत होता. त्यानंतर तालिबानवर मानवाधिकाराचं उल्लंघन आणि सांस्कृतिक गैरवर्तणुकीशी संबंधित अनेक आरोप होऊ लागले. याचंच एक उदाहरण म्हणजे २००१ मध्ये पाहायला मिळालं. त्यावेळी तालिबानने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा विरोध होऊनसुद्धा अफगाणिस्तानातील बामियान येथील भगवान बुद्ध यांची प्रतिमा नष्ट केली. सुमारे दोन हजार बुद्ध मूर्तींची त्यांनी तोडफोड केली आणि जगाला हादरवून सोडले. बुद्ध म्हणजे शांततेचे प्रतीक, पण या निर्बुद्ध लोकांनी शांततेवर, अहिंसेवर हल्ला करून दहशतवादाला स्वीकारले. तालिबानची स्थापना आणि त्याला बळकटी देण्याचे आरोप पाकिस्तानने नेहमीच फेटाळून लावले आहेत, पण सुरुवातीच्या काळात तालिबानी आंदोलनाशी संबंधित लोक पाकिस्तानातील मदरशांमधूनच निघाले होते, यात काहीही शंका नाही. आजही पाकिस्तान त्यांचे समर्थन करत असते. या तालिबानी प्रवृत्तीमुळेच तर ओसामा बिन लादेनला आसरा पाकिस्तानने दिला होता, पण अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले आणि पाकिस्तानचा दहशतवादाला खतपाणी घालणारा चेहरा समोर आला. अफगाणिस्तानवर तालिबानचं नियंत्रण होतं, त्यावेळी त्यांना मान्यता देणाºया तीन देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होता. ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटरवर कट्टरवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तालिबानकडे वेधलं गेलं. हल्ल्याचा मुख्य आरोपी ओसामा बिन लादेन आणि अल कायदाच्या हल्लेखोरांना शरण दिल्याचा आरोप तालिबानवर लावला गेला. ७ आॅक्टोबर २००१ रोजी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला केला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तेथील तालिबानचं शासन संपुष्टात आलं, पण जगातील सर्वात मोठ्या शोधमोहिमेदरम्यान ओसामा बिन लादेन आणि तालिबान प्रमुख राहिलेला मुल्ला मोहम्मद उमर तसंच इतर सहकारी अफगाणिस्तानातून पळून जाण्यात यशस्वी ठरले. तालिबान संघटनेतील अनेक नेत्यांनी पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात आश्रय घेतला. तिथूनच ते आपला कारभार चालवू लागले, मात्र पाकिस्तान सरकारने क्वेट्टामधील तालिबानचं अस्तित्व कधीच मान्य केलं नाही. याच तालिबानने मुल्ला उमरचा मृत्यू झाल्याची माहिती दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लपवून ठेवली होती. मुल्ला उमरचा मृत्यू कथितरीत्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाकिस्तानमधील एका रुग्णालयात झाला होता. यावरून तालिबानी नेत्यांना आसरा देणारे पाकिस्तान हे मुख्य केंद्र आहे हे लक्षात येते. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला. अनेक टप्प्यात चर्चा होऊन अखेरीस हा करार झाला होता. सुरुवातीच्या काळात शहरं आणि लष्करी तळांवर हल्ले करणाºया तालिबानने यानंतर विशिष्ट प्रकारच्या लोकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानची जनता पुन्हा एकदा भयभीत झाली. तालिबानने पत्रकार, न्यायाधीश, शांतता कार्यकर्ते आणि मोठ्या पदावरील महिलांना निशाणा बनवलं. म्हणजेच तालिबानने आपली कार्यपद्धती बदलली, पण कट्टरवादी विचारसरणी सोडली नाही. हेच जगाच्या दृष्टीने घातक असे चित्र आहे.

खबरदारी

 


सध्या अफगाणिस्तानातील असलेली परिस्थिती ही जगाच्या आणि भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब बनत चालली आहे. तालिबानने ताबा मिळविल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आता काळे ढग दाटून आले आहेत. शरियत लागू करण्याचे तालिबानचे इरादेही लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत सार्वजनिक जीवनात बिनधास्त वावरणाºया महिलांनाही बंदिस्त राहावे लागणार आहे. महिलांना सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन जरी तालिबानने केले असले, तरी प्रत्यक्षात तसे काही होईल, अशी अपेक्षा करणे शक्य नाही, परंतु त्याचे पडसाद अन्यत्र आणि भारतात उमटू न देणे हे फार महत्त्वाचे आहे. चांगल्या गोष्टींचे अनुकरण होत नाही; पण वाईट प्रवृत्तीचे अनुकरण केले जाते. त्यामुळे त्या धर्मातील समाजाने जर तालिबानची री ओढण्याचा प्रकार जगातील अन्य देशांत व भारतात केला, तर त्याला रोखणे फार महत्त्वाचे असेल. या समाजातील लोक काही शास्त्रीय गोष्टींनाही विरोध करत असतात. पोलिओचा डोस घेण्यास या धर्मियांचा विरोध असतो. त्याचप्रमाणे सध्या कोरोना लसीबाबतही हे लोक अंधश्रद्धेपोटी विरोध करताना दिसतात. त्यामुळे ही प्रवृत्तीच पुढे तालिबानी वृत्तीला खतपाणी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतासारख्या संवेदनशील देशात आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.


तालिबान्यांची मानसिकता ही बुरसटलेली आहे. जुन्या कबिल्यांमध्ये राहणाºया लोकांची जी मानसिकता होती, तिचेच प्रदर्शन आताच्या तालिबान्यांनी मांडले आहे आणि त्याचा फटका अफगाणिस्तानात आतापर्यंत मुक्तपणे संचार करणाºया सगळ्यांनाच बसणार आहे. मुलींना शाळेत जाण्यास आणि महिलांना एकटीने फिरण्यास तालिबानी राजवटीत बंदी असणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये महिला काम करू शकतील, याचीही शक्यता मावळली आहे. ज्या महिला सार्वजनिक जीवनात काम करायच्या, स्वत:चे व्यवसाय करायच्या, त्यांच्यावरही तालिबानने कडक निर्बंध आणले आहेत. टीव्हीवर ज्या महिला ‘अँकर’, म्हणून काम करायच्या, त्यांनाही बुरखे घालण्यास बाध्य करण्यात आले आहे. ज्या विदेशी महिला पत्रकार काम करीत आहेत, त्यांनीही बुरखा परिधान केल्याचे दिसत आहे. कारण, त्यांच्यापुढे वेगळा पर्यायही नव्हता. हे फार घातक आहे. त्याचे अनुकरण तालिबान समर्थक देश पाकिस्तान, बांगलादेश करतील आणि त्याचे फॅड आपल्या देशात सोडण्याचे प्रकार झाले, तर ते धोकादायक असेल. यासाठी देशाची एकजूट महत्त्वाची आहे. ती प्रवृत्ती इथे शिरता कामा नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अफगाणिस्तान तालिबानला रोखू शकले नाही. तालिबानी प्रवृत्ती जगभर फोफावत चालली आहे, म्हणूनच ती घातक आहे. त्याचा प्रसार आपल्याकडे होणार नाही यासाठी पावले उचलावीच लागतील.

महिलांना सरकारमध्ये भागीदारी देऊ, असे सांगत असतानाच तालिबान्यांकडून महिलांवर कडक प्रतिबंध लादले जात आहेत. त्यामुळे जे काही घडत आहे, ते भयंकर आहे. मानवी मूल्ये पायदळी तुडविणारी तालिबानी राजवट अफगाणिस्तानला पाषाणयुगात घेऊन जाणार, असेच दिसते. पण ती लाट तिथवरच रोखली पाहिजे. सगळ्यांना माफ केले आहे, असे एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना छळायचे, हा दुटप्पीपणा तालिबान्यांकडून होताना दिसतो आहे. टीव्हीवर जे दाखवले जात आहे, जबरदस्तीने मुंडण, हातपाय बांधून गुडघ्यावर सरपटणारे सामान्य नागरिक हे पाहून खूप वाईट वाटते. त्यामुळे तालिबानच्या मनात काय दडले आहे, हे समजायला वेळ लागत नाही. फार पूर्वी अफगाणिस्तानवर भारतीय शासकांची राजवट होती. ज्या महाराजा रणजीत सिंगांचा पुतळा लाहोर येथे तोडण्यात आला, ते महाराजा रणजीत सिंग तिथले शेवटचे भारतीय शासक होते, हे लक्षात घेतले पाहिजे. अफगाणिस्तानातील मुली पाश्चिमात्य कपडे परिधान करून शाळा-महाविद्यालयांमध्ये जात होत्या. पाकिस्तानातील मलालाला विरोध करणारी प्रवृत्ती, रणजीत सिंगांचा पुतळा तोडणारी प्रवृत्ती पाहता आपल्या जवळच्या पाकिस्तानातही तालिबानी प्रवृत्ती फोफावली आहे, हे स्पष्ट झाले आहे. तिला भारतात कुठे शिरकाव करता येणार नाही, यासाठी प्रयत्न करणे हे सरकार पुढे फार मोठे आव्हान आहे.


एकेकाळी भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण तिथे होत होते. अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेला ‘खुदा गवाह’ हा शेवटचा चित्रपट तिथे तयार झाला; पण त्यापूर्वी धर्मात्मा हा फिरोज खानचा चित्रपट अफगाणिस्तानातीलच होता. अनेक चित्रपट तिथे बनले आहेत; पण तालिबानचा क्रूर चेहरा अफगाणी लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे तालिबानी नेते कितीही आश्वासने देत असले, तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच मिळेल त्या साधनांचा वापर करून लोक देशाबाहेर जाण्यासाठी धडपड करीत आहेत. तालिबानी राजवटीतल्या अफगाणिस्तानात तिथल्या सामान्य लोकांना भविष्य अंधकारमय दिसत आहे. पूर्वी पुराण कथात राक्षस, क्रूर राजे आक्रमण करून एखादे राज्य हिसकावून घेत होते. तोच प्रकार आपल्याला इथे घडताना दिसतो आहे. इथल्या महिला तर जास्तच भयभीत झाल्या आहेत, कारण ज्या पद्धतीने तालिबानने निर्बंध लागू करायला सुरुवात केली आहे, ते पाहता महिलांवर प्रचंड दबावही आहे. महिलांची अब्रू सुरक्षित राहील किंवा नाही, याबाबत कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे, त्यांना गुलाम बनवून ठेवले जाईल की काय, अशी भीती आताच सतावत आहे. राक्षसी प्रवृत्ती यापेक्षा वेगळी नसते. त्यामुळे या आक्रमणाच्या प्रवृत्तीतून सावरण्यासाठी आपल्याला आता खंबीर बनले पाहिजे. देशहिताच्या, संरक्षणाच्या आड कोणतेही राजकारण येता कामा नये. तालिबानी, पाकिस्तानी प्रवृत्तीला पोषक, अशी कोणतीही वक्तव्ये विरोधकांकडून होणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

चिरतरुणांच्या साखळीतील अमेय वाघ


मराठी चित्रपटसृष्टीत चिरतारुण्याचे वरदान घेऊन आलेल्यांची एक साखळी आहे. त्यातला पहिला कलाकार म्हणजे सचिन पिळगांवकर. दुसरा स्वप्नील जोशी आणि त्याच परंपरेत गेल्या सात वर्षांपासून एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे अमेय वाघ. हे कलाकार कधी आपली वयाची पंचवीशी ओलांडतच नाहीत. कायम तरुणच असतात. सचिनला मारून मुटकून कट्यार काळजात घुसलीमध्ये वयस्कर केला, ती भूमिका त्याने चांगली केलीही; पण त्याच्यातील तारुण्य तिथेही लपून राहिले नाही. स्वप्नील तर अजूनही बाळकृष्णच वाटावा. तसाच अमेय वाघ हा पण अजूनही शाळकरी फास्टर फेणे वाटावा असाच तरुण आहे. तो कधी मोठा होणार नाही. कलाकार म्हणून मोठा होईल; पण वयाने मोठा होणार नाही, या परंपरेतला तो आहे. तोच आता नव्याने कारटेल या वेब सिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.


यापूर्वी अमेयने काही वेब सिरीज केल्या आहेत; पण कारटेलमधली त्याची भूमिका वेगळी आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी बोलण्याचा योग आला आणि या भूमिकेबद्दल त्याने भरभरून सांगितले. कारटेल ही १४ भागांची वेब सिरीज आहे. यात त्याची भूमिका धवल जाधव या नावाची आहे. तो एक पर्यावरणवादी असा आहे. नंतर राजकारणाकडे वळतो, अशी ती भूमिका आहे. या भूमिकेविषयी काही विशेष अभ्यास केला का? किंवा कोणता वर्तमानातील राजकारणातील, पर्यावरणाशी संबंधित युवा नेता डोळ्यापुढे ठेवला का, असे विचारले असता अत्यंत प्रांजळपणे अमेयने सांगितले की, असे काहीही नाही. मी फक्त माझ्या दिग्दर्शकांचे ऐकतो आणि ते सांगतील तशी भूमिका करतो. त्यांनी या भूमिकेचा इतका अभ्यास केलेला असतो की, मला वेगळे काही करावे लागत नाही. दिग्दर्शकाला सरेंडर करणे हे महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे मी करत असतो. ही स्क्रीप्ट अत्यंत दमदार आहे, त्यामुळे मला ही भूमिका आवडली आहे.

अमेय वाघ म्हटल्यावर सर्वांना सर्वात आधी आठवतो तो २०१५ला आलेल्या दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतील कैवल्य. या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या विशेषत: मुलींचा लाडका नायक बनला होता. त्याची सहजता, संवादफेक, थोडासा बेफिकीर असा स्वभाव आणि त्याचे दिसणे सर्वांनाच आवडले होते. त्यामुळे त्याची तीच प्रतिमा अनेकांना कायम आवडली; पण अमेय वाघ हा सर्वच माध्यमातून यशस्वीपणे संचार करणारा कलाकार आहे.


नाटक किंवा रंगभूमी, छोटा पदडा किंवा टीव्ही आणि रुपेरी पडदा अर्थात चित्रपट ही सर्व माध्यमे यशस्वीपणे केल्यावर आता लोकप्रिय होत चाललेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो आपली छाप पाडण्यासाठी आतुर झालेला दिसतो. वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या सानिध्यात राहू इच्छीतो. या सर्व माध्यमांमधून काम केल्यावरही नेमके कोणते माध्यम आवडते, असे विचारल्यावर अमेय वाघ दिलखुलासपणे सांगतो की, माझे सर्वात आवडते माध्यम हे नाटक आहे. रंगभूमीवर रोज नवनवे प्रयोग करता येतात, प्रेक्षकांची थेट वाहवा मिळते, अभिनयात जिवंतपणा येतो आणि तो टाळ्यांचा कडकडाट मिळतो, तेव्हा खरा आनंद मिळतो; पण आज कोरोनामुळे नाटकाचे प्रयोग होत नाहीत, ही खंत आहे. लवकरात लवकर हे कोरोनाचे संकट दूर होवो आणि पुन्हा प्रेक्षकांचे पाय नाट्यगृहाकडे वळावेत त्यांच्यासमोर नाटक साजरे करावे, अशी खूप मनापासून इच्छा आहे. आज रंगभूमीवरील कलाकार, बॅकस्टेज आर्टीस्ट यांचे यामुळे हाल होत आहेत, अनेकांचे आर्थिक गणित बिघडून गेले आहे, त्यामुळे लवकरात लवकर नाटक सुरू होणे आवश्यक आहे, असेही अमेयने बोलून दाखवले.

अमेय वाघ हा गेली तेरा वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे. जोशी की कांबळे, आईचा गोंधळ, बिल्लू, लागली पैज, अय्या, पोपट, शटर, घंटा, मुरंबा, फास्टर फेणे, हायजॅक, गर्लफ्रेंड, धुरळा, झोंबिवली असे त्याचे चित्रपट या काळात आले. मुरंबा या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला उत्कृष्ट अभिनयाचे फिल्म फेअर अ‍ॅवॉर्डही २०१८मध्ये मिळाले होते. तिशी ओलांडलेल्या वयात शाळकरी वयातील फास्टर फेणेच्या भूमिकेत तो प्रेक्षकांच्या समोर येतो, तेव्हा तो त्या भूमिकेसाठी इतका परफेक्ट वाटतो की, याच्याकडे वय थांबवण्याचे, काळाला थांबवण्याचे काही औषध आहे का? किंवा उलटी गिनती करत मागे जाण्याचा काही फॉर्म्युला आहे का, असे वाटल्या वाचून राहत नाही. झोंबिवली हा २०२१ मधला त्याचा प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेला महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे; पण एकूणच आजवर अमेयने ज्या भूमिका केल्या आहेत त्या सिलेक्टेड अशाच आहेत.


झी मराठी वाहिनीवर सात वर्षांपूर्वी तुफान गाजलेल्या दिल दोस्ती दुनियादारीनंतर तर त्याने मागे वळून पाहिलेच नाही; पण छोट्या पडद्यावर फार काळ न अडकता त्याने वेब सिरीजकडे आपला मोर्चा वळवला. कास्टींग काऊच वुइथ अमेय अँड निपुण या वेब सिरीजमधून त्याने आपले वेगळेपण दाखवले. त्यानंतर बॉयगिरी या वेब सिरीजमध्ये तो चमकला. नेटफ्लिक्सच्या गाजलेल्या सिक्रेट गेम्सच्या दुसºया सीझनमध्ये अमेय वाघ चमकला. गेल्यावर्षी त्याने असूर या वेब सिरीजमधून प्रेक्षकांना दर्शन दिले होते. त्यानंतर आता तो कारटेलमधून प्रेक्षकांच्या समोर येत आहे.

२०१६नंतर अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे देशभरात अनेक प्रयोग झाले. या नाटकाने रंगमंचावरील त्याचा सहज आणि अफाट वावर प्रेक्षकांनी अनुभवला होता. मूळचा पुणेकर असल्यामुळे रंगमंचावरची आवड असणे स्वाभाविकच असते. पुणेकरांच्या पसंतीची पावती घेतल्यानंतर जगभरात सगळी पसंती मिळते, हा तर फॉर्म्युलाच. त्यामुळे पुण्यातला हा वाघ रंगभूमी, छोटा पडदा, रुपेरी पडदा, ओटीटी प्लॅटफॉर्मवर संचारताना दिसतो आहे. इस जंगल के हम हैंशेर म्हणत वावरणारा हा वाघ पुणेरी असला, तरी चिरतरुण गोंडसपणाचे वरदान घेऊन आलेला आहे.


प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन

9152448055\\

कारावासाची संस्कृती

 


कालपर्यंत जे खूप चांगले काम करत होते, ते अचानक कसल्या तरी अडचणीत, भानगडीत सापडतात आणि त्यांच्या नशिबात तुरुंगवास येतो. आयुष्यभर कमावलेली इज्जत, अब्रू धुळीला मिळते. असे भल्याभल्यांच्या वाट्याला येताना आपण गेल्या काही वर्षांपासून पाहत आहोत. जे आपल्याला आदर्शवाद शिकवत होते किंवा ज्यांची प्रेरणा घेणे अभिमानाचे होते, जे लोक कोणाचे आयडल, आदर्श होते, तेच अचानक काळ्या यादीत जातात. अशा घटनांना किती महत्त्व द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. किंबहुना ज्या व्यक्ती अशाप्रकारे कारावासात जातात त्यांच्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे? ही कारावासाची संस्कृती आपल्याकडे का रुजते आहे? केव्हापासून आहे?


२०१७पर्यंत डीएसके विश्व म्हणून करिअर मार्गदर्शन करण्यासाठी दररोज सकाळी डी. एस. कुलकणी हे बिल्डर, उद्योजक तरुणांना मार्गदर्शन करायचे. मराठी तरुणांना व्यवसायात पुढे या म्हणून मार्गदर्शन करायचे. त्यांची व्याख्याने दररोज सकाळी आकाशवाणीवरून असायची. लहानपणापासून कशाप्रकारे संघर्ष करून ते मोठे झाले हा एक आदर्श होता. न फसवणारा बिल्डर अशी त्यांची ख्याती होती. इतकेच नाही तर शेअर मार्केटमध्येही त्यांचा शेअर लिस्टेड झाला होता. अचानक एखादे वादळ यावे याप्रमाणे आर्थिक अडचणीत ते सापडतात आणि गेली तीन वर्ष ते तुरुंगवासात आहेत. सहकुटुंब तुरुंगात आहेत. आयुष्यभर जमा केलेली इज्जत, अब्रू, नावलौकीक एकाएकी धुळीला मिळू शकते? घोटाळेबाज, फसवणूक करणारे म्हणून लेबल लागते आणि सगळं बदलून जाते.

अशी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. क्रीडा क्षेत्रासाठी, डान्सबारला विरोध करून तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी धडपडणारे कार्यसम्राट आमदार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील हे युवा पिढीचे आदर्श होते. अचानक कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याच्या निमित्ताने त्यांचे नाव पुढे येते आणि गेले दोन महिने ते तुरुंगात आहेत. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना डान्सबारवर बंदी घालावी यासाठी एक लाख महिलांचा मोर्चा काढून डान्सबारवर बंदी घालणारे आमदार म्हणून त्यांची आतंरराष्ट्रीय स्तरावर ख्याती झाली होती. इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्सच्या पत्रकारांनी त्यांचे इंटरव्ह्यूव्ह घेतले होते. कर्नाळा स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी आलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज, तायक्वांदो आणि स्पोर्टस अकॅडमी उभी केली होती. यातून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे काम घडत असतानाच एखादा बँकेचा घोटाळा पुढे येतो आणि हे सगळे पुसले जाते. कालचे हिरो एका रात्रीत झीरो होतात? हे न पटणारे आहे? भले-भले प्रतिष्ठित लोक, नेते, कार्यकर्ते अचानक कोणत्यातरी घटनेने तुरुंगात जातात आणि होत्याचे नव्हते होण्याची वेळ येते. त्यातून सावरणे सोपे नसते. ईडीच्या ससेमिºयातून दोन वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर छगन भुजबळ यांनी जी फिनिक्स भरारी घेतली आहे, ती याबाबतीत वाखाणण्यासारखी आहे; पण ही कारावासाची संस्कृती ज्याप्रकारे आज फोफावती आहे, ते कुठे तरी समाजकार्याला बाधक आहे.


माणसं अडचणीत येऊ शकतात. आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी अगदी भ्रष्टाचार केलेलाच असेल असे नाही; पण कोणतीही संस्था उभारताना फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. ती नावारूपाला येण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागते. नावारूपाला आल्यावर अचानक काही तरी घडते आणि संस्था बरबाद केली जाते. हा जो खेळ सातत्याने पहायला मिळतो, त्यावर कुठे तरी मंथन होणे गरजेचे आहे. विशेषत: सहकार क्षेत्रात हे प्रकार फार पहायला मिळतात. अनेक मोठे लोक या पायी कारावासात जातात. त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधीही न देता संस्था मोडीत काढल्या जातात. हा एकमेव उपाय आहे का? संस्था वाचवण्यासाठी काही पर्याय असले पाहिजेत. उद्योगात निर्माण झालेल्या अडचणी आणि पैसा कुठे तरी थांबल्यामुळे लागलेला हा ब्रेक असतो. त्यावर तोडगा काढला पाहिजे. आज जे सुपात आहेत तेच उद्या जात्यात येऊ शकतात. आजचे आदर्श उद्याचे खलनायक होणार असतील, तर आदर्शावरचाच लोकांचा विश्वास उडेल. यासाठी कोणतीही कारवाई करताना त्यातील राजकारण बाहेर काढून सुधारण्याची, दुरुस्ती करण्याची संधी दिली, तर कारावासात जाणाºया चांगल्या विभूतींना काळिमा लागणार नाही.

अनेक बँका, संस्था मोडीत निघतात. त्या उभे करणारे तुरुंगात जातात. बँकेत पैसा अडकलेले बरबाद होतात. माध्यमे त्याच्या बातम्या करून आपली जागा व्यापतात; पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. विजय मल्ल्या हा एकेकाळचा हिरो होता. हजारो लाखो लोकांना रोजगार देणारा, देशाला भरपूर महसूल देणारा दारू उत्पादक होता. त्याने उभ्या केलेल्या दारूच्या बिअरच्या कंपन्या ब्रँड आजही तेजीत आहेत. त्याच्याकडून सरकारला महसूल मिळत आहेच. असे किती तरी फसलेले लोक असतात. त्यांना बाहेर पळून जाण्यास भाग पाडण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधून सेटलमेंट करणे आवश्यक असते.


आज सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आॅडीट होते, धाडी टाकल्या जातात. त्यात काही सापडल्यावर दंडात्मक कारवाई करून अशा लोकांना धडा शिकवता येईल व महसुलातही वाढ होईल; पण आज ही कारावासाची जी संस्कृती उभी होताना दिसत आहे ते चित्र कुठे तरी बदलण्याची गरज आहे. कालपर्यंत जे सज्जन, हिरो, आदर्श होते त्यांची प्रतिमा एकाएकी खराब होणे हे चांगले नाही. आपल्याकडे पूर्वीच्या काळात अनेक पापी लोक, राक्षस असायचे त्यांनी एखादे सत्कर्म केले असेल, तरी परमेश्वर त्यांच्यावर कृपा करायचा अशा कथा आपण ऐकल्या आहेत. मग या लोकांच्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.

कात टाकण्याचा प्रयत्न


आॅगस्ट महिन्याच्या दुसºया पंधरवड्यापासून झी मराठीने कात टाकण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. तीन नव्या मालिका आणि एका जुन्या थांबलेल्या मालिकेचे पुनरागमन हे महत्त्वाचे पाऊल उचलून आपला घसरलेला टीआरपी सावरण्याच्या हालचाली केल्या आहेत. येत्या रविवारी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर स्वीटू ओमचे लग्न एकीकडे असतानाच या आठवड्यात ती परत आलीय ही नवी मालिका देवमाणूसच्या जागी सुरू झाली. तर त्यापाठोपाठ रात्रीस खेळ चाल-३चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. देवमाणूस मालिकेने दोन तासांचा अखेरचा एपिसोड घेऊनही समाधानकारक शेवट झाला नाही, तर ती मालिका पुन्हा सुरू होण्याचा असंबद्ध संकेत देत मालिका संपवली. त्या जागी ती परत आलीय ही मालिका सोमवारपासून सुरू झाली.


आपल्याकडे हॉरर भयपटांच्या मालिका या ठराविक फॉर्ममध्येच का असतात हे समजत नाही. पूर्वीच्या काळात रामसे बंधू, मोहन भाकरी हे लोक ज्याप्रकारे एक ठराविक साचेबद्ध भयपट आणत त्याचप्रकारे ती परत आलीयचे कथानक दिसते. कॉलेजचे मित्र-मैत्रिणी एका फार्म हाऊसवर मस्ती करत असतात. यात एक साधीभोळी असलेली निलांबरी या मुलीला जबरदस्तीने पाण्यात उतरायला सांगितले जाते. तिची इच्छा नसताना हे मित्र तिला स्वीमिंग पूलमध्ये ढकलतात आणि त्यात ती बुडून मरते. त्यामुळे हे घाबरलेले आठ-दहा मित्र पुरावे नष्ट करून पळून जातात की लगेच आणि दहा वर्षांनंतर हे मोठे झालेले मित्र अचानक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येतात आणि एक गेट टुगेदर करण्याचे ठरवतात आणि एका फार्म हाऊसवर येतात. या फार्म हाऊसचा केअर टेकर विजय कदम दाखवला आहे, म्हणजे ज्याप्रकारे काही तरी करून तीन-चार जोडपी महाबळेश्वरमध्ये आणायची आणि एकेकाला मारायचे, असे रामसे बंधूंचे कथानक असायचे तसेच आता हे आठ-दहा मित्र-मैत्रिणी त्या फार्म हाऊसवर जमले आहेत. आता एकेकाचा बदला ती निलांबरीचे भूत घेणार हे स्पष्ट इथे दिसते आहे. त्यात घाबरवणे, भास, किंकाळ्या हे प्रकार रामसे फॉर्म्युल्याप्रमाणेचे दाखवले आहेत. विजय कदमचे पात्रही रामसेच्या चित्रपटात जगदीप किंवा कधी सदाशिव अमरापूरकरने केलेल्या पुराना मंदिर, हवेली या चित्रपटांप्रमाणेच घेतले आहे. विशेष म्हणजे दहा वर्षांनी भेटलेले हे मित्र चर्चा करताना हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कोणी बनवला याचा विचार करतात, तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण हा ग्रुप कोणीच बनवलेला नसतो. तरीही सगळे अ‍ॅडमिन असतात. तो निलांबरीच्या भुताने बनवलेला असतो, म्हणजे आजकालची भुतेही किती टेक्नॉलॉजीत तरबेज आहेत, याचे प्रत्यंतर इथे येते. मालिकेला किती भागांना परवानगी मिळाली आहे तोपर्यंत हे भीतीचे किंकाळ्यांचे प्रकार दाखवत एकेकाचा बदला, खून होताना पहायला मिळेल. कोणा एकावर तरी संशय दाखवला जाईल आणि भुताचा मुखवटा घालून कोणी भलताच हे खून करेल, असे काही इथे दिसते. या पलीकडे आपल्याकडची भुतं काही करू शकत नाहीत हे दिसून येते.

मात्र रात्रीस खेळ चालेमधील भुतांनी तर उच्छाद मांडायचे आता ठरवले आहे. रात्री अकरा वाजता सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांना थोडे उत्साही करण्याचा प्रयत्न केला आहे. रात्रीस खेळ चाले-३ ही मालिका सुरू झाल्यानंतर लॉकडाऊनमुळे महिनाभरात बंद पडली होती. त्याचे कथानक अत्यंत रंजक घेतले होते; पण आता पुन्हा ती पहिल्यापासून दाखवणे शक्य नसल्याने त्यातील काही भाग एडिट करून आणि नव्याने त्याचा शोध घेत ही मालिका सुरू झाली आहे. शेवंताचे अण्णांबरोबर संसार करण्याचे स्वप्न ती अण्णांना बोलून दाखवते; पण दोघांचे भटकते आत्मे असतात. त्यामुळे ते एकमेकांना स्पर्श करू शकत नाहीत. आता या आत्म्यांना शरीराची ओढ लागलेली आहे. त्यासाठी इंदूला घेऊन आलेले अभिराम आणि त्याची दुसरी बायको कावेरीच्या शरीरावर शेवंताचा डोळा आहे. इंदूने घराबाहेर काढल्यामुळे शेवंता कावेरीच्या शरीरात शिरून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येते. आता अण्णांनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिरामचे शरीर घ्यायचे सोडून ते काही तरी करामती करणार. मागच्या भागात शेवंताने कावेरीचे शरीर घेतले होते, तर अण्णांनी सुषमाच्या नवºयाचे शरीर घेतले होते. त्यामुळे फारच गोंधळ उडाला होता. आता तिथपर्यंत नेत ही मालिका पुन्हा रंजक वळणावर आणली जाईल. दत्ता, माधव, छाया यांना आणून पुन्हा घर भरले जाईल. पांडूची एंट्री, तर झाली आहेच. भुताटकीचे बीज पहिल्याच भागात पांडूने रोवले आहे. त्यामुळे ही मालिका लवकर पकड घेईल आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा आनंद देईल यात शंका नाही. रात्रीस खेळ चाले-१पेक्षा रात्रीस खेळ चाले-२ अधिक चांगला होता. रात्रीस खेळ चाले-३ सहा महिन्यांपूर्वी सुरू झाली, तेव्हा ती त्याहून चांगली होणार, असे वाटत असतानाच लॉकडाऊनमुळे ती मालिका अचानक ठप्प झाली; पण हा कोंडमारा बाहेर काढत ही मालिका पुन्हा एकदा एका नव्या रंजक वळणावर येईल आणि प्रेक्षक रात्रीचे अकरा वाजण्याची वाट पाहतील यात शंकाच नाही; पण यामुळे झी मराठी वाहिनी कात टाकण्याचा प्रयत्न करत आहे हे नक्की.


छोटा पडदा/प्रफुल्ल फडके

9152448055\\

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

महायुद्धाच्या खाईत


तब्बल २० वर्षांच्या अवधीनंतर अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा करण्यात तालिबानी यशस्वी ठरले. त्यांनी आता राजधानी काबुलवरही कब्जा केला आहे. तालिबान्यांनी अफगाणी अध्यक्षांच्या प्रासादावरही कब्जा केला असून, आता देशातील युद्ध संपले असल्याचीही घोषणा त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेसारख्या महासत्तांची भूमिका, चीनचा दृष्टीकोन, भारत-चीन तणावाचे संबंध, भारत-पाक संबंध, चीन-पाकिस्तान आणि तालिबान्यांची मैत्री हे पाहता आगामी काळातील जागतिक शांततेच्या दृष्टीने अमेरिकेचे प्रयत्न, भारत ही संभाव्य युद्धभूमी झाली, तर जग तिसºया महायुद्धाच्या खाईत ओढले जाईल त्याचीच ही नांदी म्हणावी लागेल.


विशेष म्हणजे अफगाणिस्तानचे अध्यक्षच देश सोडून पळून गेले आहेत. अत्यंत वेगवान पद्धतीने घडलेल्या या साºया घटना विस्मयकारक आहेत. इतक्‍या अल्पावधीत तालिबानी पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा करतील, असे कोणालाही वाटले नव्हते. ९ जुलैला तालिबान्यांनी त्या राज्यातील महत्त्वाचे प्रांत काबीज करण्यास सुरुवात केली आणि जेमतेम सवा महिन्यात ते काबुलपर्यंत पोहोचलेसुद्धा. काबुल विमानतळावर सध्या अफरातफर माजली असून, त्या विमानतळावर अमेरिकन फौजांनी नियंत्रण केले असल्याचे सांगितले गेले आहे. हे नियंत्रण केवळ आपल्या सैनिकांना तेथून सुरक्षित हलवण्यापुरते मर्यादित आहे. याचे नेमके काय परिणाम होतील हे सांगता येत नाही. २० वर्षांपूर्वी ९/११ या अमेरिकेवरील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार करण्याचा विडा उचलला होता. लादेनला पाकिस्तानने थारा दिला होता आणि दहा वर्षांनी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले होते. हे पाहता पाकिस्तान आणि तालिबान्यांचे संबंध किती जवळचे आहेत, हे लक्षात येते. त्यामुळे तालिबान्यांचा असलेला अड्डा पाकिस्तान आणि त्यांना रसद पुरवणारा चीन ही आगामी काळात भारताची डोकेदुखी ठरू शकते. त्यासाठी युद्ध छेडले जाऊ शकते. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला युद्धाच्या खाईत लोटणे, हे जगातील कोणत्याही देशाला परवडणारे नाही. कारण एवढी मोठी बाजारपेठ असुरक्षित झाली, तर त्यांच्या अर्थव्यवस्था युद्धाशिवाय डबघाईला येतील. त्यामुळे अमेरिकेने याचा विचार करून तालिबानला संपवले पाहिजे जेणेकरून पाकला जरब बसेल आणि चीनला धडा शिकवता येईल.

अमेरिकन सैन्याला किंवा नाटोच्या फौजांना तेथे राहायचे नाही, हे खूप आधीपासूनच ठरले आहे. ३१ आॅगस्टपर्यंत अफगाणिस्तानातील आपले सारे सैन्य माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेने केली होती. त्याची प्रक्रिया अमेरिकेने खूप आधीपासूनच सुरू केली होती व त्यानुसार त्यांनी आपला तेथील सारा बाडबिस्तरा आवरला आहे. सध्या केवळ तीन हजार अमेरिकन लष्कर अस्तित्वात होते व तेही तेथून माघारीच्या प्रयत्नात आहे, म्हणजेच येत्या दोन दिवसांत तेथील अमेरिकन सैन्य पूर्ण मागे घेतले जाईल आणि अफगाणिस्तानवर तालिबान्यांची एकहाती सत्ता पुन्हा प्रस्थापित होईल. जगाच्या दृष्टीने ही एक अत्यंत घातक घटना आहे.


मुळातच तालिबानी एका विकृत स्वरूपाच्या धोरणाने पछाडलेले लोक आहेत. त्यामुळे जगापुढे पुन्हा दहशतवाद्यांचा नवा धोका उभा राहिला आहे. केवळ अफगाणिस्तानवर ताबा मिळवून तालिबानी स्वस्थ बसणार नाहीत. त्यांना आता मोठे पाठबळ मिळाले आहे. जराशी स्थिरता मिळाल्यानंतर तालिबानी पुन्हा एकदा जगाच्या कोणत्याही भागात दहशत पसरवण्यास सिद्ध होणार आहेत. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ ला हल्ला झाल्यानंतर त्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार ओसामा बिन लादेनला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने नोव्हेंबर २००१ला अफगाणिस्तानवर हल्ला करून त्या देशावर कब्जा केला.

पाकिस्तानात लपून बसलेल्या लादेनला शोधून काढून त्याचा खात्मा केला गेला. दरम्यानच्या काळात तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमरचाही मृत्यू झाला; पण तरीही तालिबान्यांनी आपले अस्तित्व कायम टिकवले. त्यांचे अनेक म्होरके या २० वर्षांच्या लढाईत गमावले गेले; पण तालिबान कधीही विखुरली नाही किंवा ती पूर्णपणे गलितगात्र झाली नाही. अफगाणिस्तानवर अमेरिकेचा कब्जा असतानाही आणि तेथे अश्रफ घनी यांचे सरकार सत्तेवर असतानाही त्या देशातील बराच भाग तालिबान्यांनी आपल्या कब्जात ठेवला होता व त्यांचा ज्या भागावर कब्जा होता तेथे सुमारे दीड कोटी नागरिक वास्तव्याला होत. हे अमेरिकेचे आणि मित्र देशांचे अपयशच म्हणावे लागेल. अमेरिकेने केवळ लादेनच्या 'अल-कायदा'वर लक्ष केंद्रित केले होते व 'अल-कायदा'चा पूर्ण खात्मा करायचा हे आमचे पहिले लक्ष्य असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगितले होते. या काळात तालिबान्यांवर नियंत्रण मिळवण्याचा किंवा त्यांचा नायनाट करायचा निर्धार त्यांनी कधीच व्यक्‍त केला नव्हता. अफगाणिस्तानच्या स्थानिक सरकारला त्यांची सक्षम लष्करी यंत्रणा उभारण्यासाठी प्रामाणिकपणे मदत केली. त्यांना पैसा, शस्त्रे आणि प्रशिक्षण दिले. शिस्तबद्ध आणि धडाकेबाज लष्कर उभारणीसाठी अमेरिका आणि नाटो फौजांनी अफगाणिस्तानला बरीच मदत केली होती; पण हेच प्रशिक्षित मनुष्यबळ तालिबानी गनिमांचा सामना करण्यास साफ अपयशी कसे ठरले? तालिबानी येत आहेत, हे समजल्यानंतर अनेक प्रांतातील लष्करी जवानांनी शस्त्रे फेकून देऊन चक्‍क पळ काढला. आपल्याला पाहून लष्करी जवानच पळ काढीत आहेत, हे पाहून तालिबान्यांचे धाडस वाढले आणि त्यांनी पूर्ण वेगाने आपले इप्सित साध्य केले. जोपर्यंत अमेरिका आणि नाटो देश तेथे वास्तव्याला होते, तोपर्यंत त्यांचे हस्तक म्हणून देशाची सूत्रे त्यांनी हलवली; पण अमेरिकेने तेथून माघार घोषित केल्यानंतर त्यांनी स्वत:च्या हिमतीवर देशाचा कारभार हाकण्याची जी सिद्धता दाखवणे अपेक्षित होते ती अध्यक्ष घनी यांनी अजिबात दाखवली नाही. देशाचे नेतृत्वच नेभळट असेल, तर त्या देशाची लक्षावधी जवानांची प्रशिक्षित फौजही कशी कुचकामी ठरते याचे अफगाणिस्तान हे नवे उदाहरण जगापुढे आले आहे. त्यामुळे आगामी महायुद्धाच्या नांदीत भारताचे असणारे नेतृत्व किती खंबीर आणि दरारा निर्माण करणारे आहे याचा विचार करून आपली एकजूट महत्त्वाची असणार आहे.


अफगाणिस्तानातील या घडामोडींनतर आता भारतालाही बरीच सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यात ३७० कलम रद्द करून भारताने केलेल्या फार महत्त्वपूर्ण कामगिरीमुळे पाक, चीन हे देश चिडले आहेत. त्यासाठी ते तालिबान्यांचे अस्त्र सोडण्याची शक्यता आहे, म्हणूनच देशाच्या खंबीर नेतृत्वाची आता जबाबदारी वाढली आहे.