कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. भाषाप्रभू शिरवाडकरांचा आजचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळींत, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ. ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले. केवळ कवी असलेले वि. वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे, या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कवितांबरोबरच त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. याशिवाय कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णत: लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंतांच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्य व्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे.
कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि अविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानायचे. त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखन प्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो. हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. अविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामिलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे.
कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाच वेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते अहंकार, अनुभव आणि अविर्भाव ही साहित्याचीच नव्हे, कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाजजीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातियता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानायचे.
क्रांती ही साहित्याची प्रेरणा आहे, असे ते मानायचे. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन म्हणायचे. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. माणसाचे सारे अस्तिव म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. अविर्भावाने साहित्याचे रूप ठरते, तर अनुभवाने त्याचा आशय निश्चित होतो. अनुभव या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्षाशी येणारा संबंध असा नसून, लेखकाच्या मनात उद्भवणारी एक भावावस्थेतील जाणीव असा आहे. म्हणजे लौकिक अनुभवानंतरची लेखकाची भावावस्थाच कलाकृतीचा आशय निश्चित करते. अविर्भाव आणि अनुभव यांच्या संयोगाने साहित्याचे पोत तयार होत असले, तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाकडे आहे.
कुसुमाग्रज हे नाटककार होते. त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण, त्याच्या मीपणाचे एक सूत्र व्यक्त होत असते. नाटकात अनेक पात्रे असतात, पण ती पात्रे लेखकाच्या दृष्टीने अनेक मीच असतात. इतर वाङ्मयप्रकारापेक्षा लेखकाचे मीपण नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्याच्या संघर्षात सापडते, असे सांगून त्यांनी त्यासाठी स्वत:च्या नाटकांची उदाहरणे दिली आहेत. नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग होय. अशा विविध पैलू असलेल्या भाषाप्रभूच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो ही आनंदाची बाब आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा