शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

संशयकल्लोळची धमाल


मराठी रंगभूमीला पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे. त्यातील काही नाटके ही चिरतरुण असतात. त्यापैकीच एक नाटक म्हणजे ‘संगीत संशयकल्लोळ’. किती संचात आणि किती कलाकारांनी हे नाटक केले याचा हिशोबच नाही, पण आजही तितकेच ते सुंदर वाटणारे नाटक आहे. अर्थात प्रत्येक संच आणि दिग्दर्शकांनी त्यात काही कालानुरूप बदल केले, पण मूळ संहितेला धक्का लागणार नाही याची काळजीही बºयापैकी घेतली गेली. त्यामुळे हे नाटक गेली १०५ वर्षं टिकून राहिले आहे. कालानुरूप नाटके बंद पडतात. एखादा कलाकार गेल्यावर काही नाटके बंद पडतात, पण सतत नवनव्या संचात येणारे हे एव्हरग्रीन असे नाटक आहे.

संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी १९ व्या शतकात लिहिलेले आणि एकविसाव्या शतकातही सुरू असलेले असे एक विनोदी नाटक आहे. २० आॅक्टोबर, १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला होता. तत्पूर्वी या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला होता. तब्बल २२ वर्ष म्हणजे १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते, मात्र त्यानंतर गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात ३० पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्करांचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते. त्यामुळे त्यांनी संहितेला योग्य अशी पदे रचली होती. त्याकाळात ही सर्व गाणी पदे सादर होत असत आणि रात्र रात्र नाटके चालत असत, पण कालांतराने त्यातील ठराविक पदेच घेतली जाऊ लागली. आता तर मोजकीच तीन-चार पदे वापरली जातात.


‘संशयकल्लोळ’ या नाटकात अश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका विनोदी अंगाने जाणाºया पण नकारात्मक स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे. लेखकाने पुरुष पात्रांची नावे महिन्यांप्रमाणे, तर स्त्री पात्रांची नावे नक्षत्रांवरून ठेवली आहेत. फाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे. या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते आणि नाटक, बघणा‍ºयांची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते. यात १९७० ते १९९० पर्यंत शरद तळवलकर यांनी फाल्गुनराव ही भूमिका दीर्घकाळ केली. या नाटकात शरद तळवलकरांचा विनोदी ढंगाने संवादफेक आणि सहगायक कलाकारांचे सुमधुर गायन याचीच जुगलबंदी असायची. शरद तळवलकरांच्या टायमिंगला दाद द्यायची का गाण्याला द्यायची असा प्रश्न पडायचा, कारण अनेक दिग्गज गायकांनी यात भूमिका केलेल्या आहेत. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, प्रकाश घांग्रेकर, शरद जांभेकर अशा कितीतरी दिग्गजांनी यातील विविध पदांवर आपले नाव कोरले आहे.

बोलता बोलता गायचे आणि गाता गाता बोलायचे, हा देवल आणि किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांचा आत्मा ‘संशयकल्लोळ’मध्येही राखला गेला आहे. प्रशांत दामले यांनी २०१६ मध्ये हे नाटक पुन्हा नव्या संचात आणले होते. यात स्वत: राहुल देशपांडे यांनी भूमिका केली होती, पण अन्य विनोदी नाटकांत प्रेक्षकांच्या मनावर पकड घेणाºया प्रशांत दामले यांना यात फाल्गुनराव सापडला नाही. त्यात ‘गेला माधव कुणीकडे’मधील माधवच जास्त डोकावत होता किंवा प्रशांत दामलेची बोलण्याची लकबच जाणवत होती. शरद तळवलकर यांच्या फाल्गुनरावाची सर त्याला आली नाही हे मान्य करावे लागेल. राहुल देशपांडे यांनी संगीताची परंपरा जपली होती.


‘संगीत संशयकल्लोळ’मधील काही पदेही अजरामर आहेत. ती अजूनही रेडिओवर ऐकताना किंवा रेकॉर्ड लावून ऐकताना आनंद मिळतो. यात, कर हा करीं धरिला, चिन्मया सकल हृदया, धन्य आनंददिन पूर्ण मम, मजवरी तयांचें प्रेम, मृगनयना रसिक मोहिनी, संशय का मनि आला, सुकांत चंद्रानना पातली, ही बहु चपल वारांगना, हृदयि धरा हा बोध, ही गाणी कायम लक्षात राहणारीच आहेत. वेगवेगळ्या गायक कलाकारांनी ती सादर केली, पण प्रत्येकाची एकेका पदावर छाप आहे. यामध्ये सुकांत चंद्रानना हे पद प्रभाकर कारेकर हे आपल्या मेहफीलीत हमखास सादर करायचे. धन्य आनंद दिन या गाण्यावर शरद जांभेकर यांच्या लोभस आवाजाची मोहेर आहे, तर कर हा करि धरिला शुभांगे आणि मृगनयना रसिक मोहिनी ही गाणी वसंतराव देशपांडे यांनी सादर केल्यावर त्याला वन्स मोअर हमखास असायचाच. त्याचप्रमाणे ही बहु चपल वारांगना हे पद प्रकाश घांग्रेकर यांच्या आवाजात ऐकताना अत्यंत आनंद मिळायचा. तसाच आनंद हृदयी धरा बोध खरा हे गीत रामदास कामत म्हणायचे तेव्हा होत असे. वसंतराव देशपांडे आणि प्रभाकर कारेकरांनी यातील अनेक पदे लोकप्रिय केली आणि ‘संगीत संशयकल्लोळ’चा ठेवा मराठी संगीत रंगभूमीला अजरामर केला. राहुल देशपांडे हे पण मृगनयना रसिकमोहिनी हे अलीकडच्या काळात अप्रतिम सादर करतात. एका गाण्यातून दुसºया गाण्यात प्रकाश बदल करून ते घुसतात आणि त्यावेळी प्रेक्षकांची मिळणारी दाद आजही राहुल देशपांडे घेतात. त्यावेळी जाणवते की, हे नाटक किती एव्हरग्रीन आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: