गेल्या काही दिवसांपासून माणसांमधली नकारात्मक प्रवृत्ती वाढीस लागल्याचे दिसत आहे. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहण्याऐवजी नकारात्मकतेने पाहायचे. यातून खून, आत्महत्या यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे. अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. राजकारणातही परस्परविरोधी मतप्रवाह निर्माण करून नकारात्मकतेने बोलण्याची प्रथा वाढत आहे. ही एवढी नकारात्मकता कशाने निर्माण झालेली आहे? का हे पण कोरोनाचे लक्षण, कोरोनाचा परिणाम आहे, याचा शोध घेतला पाहिजे.
वसईत एका माणसाने बायकोचे केस कापले, एका महिलेला विवस्त्र करून झाडाला बांधून ठेवले, पनवेलजवळ लग्नाला नकार दिला म्हणून मुलगी आणि आईचा खून केला आणि स्वत:ही आत्महत्या केली. अनेक अभिनेते आत्महत्या करताना दिसत आहेत. रविवारी एका टीकटॉक हिरोने आत्महत्या केली. अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे, याचे कारण चालकाचे लक्ष विचलीत झालेले आहे. हे पण नकारात्मकतेचे कारण आहे. ही नकारात्मकता कशाने तयार झाली आहे? कसला विचार करत असतात माणसे? त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची गरज आहे. नाहीतर ते समाजहिताचे नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपºयात गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध घटनांवर नजर टाकली, तर समाजातील सर्वच स्थरातील लोकांना समजावायची गरज निर्माण झालेली आहे. नेत्यांवर, सरकारवर लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे भविष्यात आपले काय होणार या चिंतेने सामान्य माणूस नकारात्मक होत आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, रोजगारनिर्मिती नाही, शाळा-कॉलेज शिक्षणाचा प्रश्न लटकत आहे. त्यामुळे निराशेचे वातावरण मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. याला राजकीय कारणे असली, तरी लोकांचा कोणावर विश्वास नाही हे दिसत आहे. शेतकºयांचे आंदोलन थांबत नाही, कुठलाही प्रश्न आंदोलनाने सुटत नाही, त्यामुळे एक विचित्र मनोवृत्ती तयार झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी थोडे समाजप्रबोधन करून या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काही प्रयत्न आवश्यक आहेत. राशीन येथील एका डॉक्टराने केवळ आपल्या मुलाच्या आजारपणामुळे संपूर्ण कुटुंबाची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे आजकाल समाजमन किती कमकुवत झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ही नकारात्मकतेची लक्षणे आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका गावामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला स्वत:चे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयाचे नाणे बाहेर काढायला लावले. काय आहे हा प्रकार? विश्वास नावाची गोष्ट या जगात राहिली नाही का? स्त्रियांना आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी आजही अग्निपरीक्षा द्यावी लागते आहे? कोठून निर्माण झाली ही नकारात्मक प्रवृत्ती? कोरोनापेक्षा भयानक असा हा समाजाला लागलेला मानसिक, सामाजिक रोग आहे. त्यावर सर्व स्तरावर चिंतन, मार्गदर्शन, प्रबोधन करण्याची गरज आहे.
कोणत्याही साध्या गोष्टीने स्वत:चे किंवा इतरांचे जीवन संपवायला लोक का प्रवृत्त होतात, याचा सामाजिक शोध घेतला जात असतानाच समाजातील सर्वच घटकांना आता मानसिक समुपदेशनाची गरज असल्याची गोष्ट समोर येऊ पाहत आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये भारतासह जगात सर्वत्रच कोरोना महामारीने समाजातील सर्वच व्यवस्था कमकुवत आणि खिळखिळी केली असताना जगायचे कसे, हा प्रश्न समाजातील सर्वच घटकांना पडला आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर आता कुठे समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था सावरायला लागली असताना, पुन्हा एकदा भारताच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. कोरोना संपला या विचाराने नव्या उमेदीने पुन्हा एकदा कामाला लागण्याचा विचार करणाºया समाजातील सर्वच घटकांसाठी हा आणखी एक झटका मानावा लागेल. ही नकारात्मकता अनामिक चिंतेतून तयार झालेली आहे. चिता मेलेल्या माणसाला जाळते, तर चिंता जीवंत माणसाला जाळते. त्यामुळे चिंतेतून चितेकडे जाण्यापूर्वीच सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे. यासाठी सरकारी पातळीवरही काही प्रयत्नांची गरज आहे. नकारात्मकता वाढण्यामागे आपली काही धोरणे कमी पडतात काय, याचाही सरकारने विचार केला पाहिजे. लोकांचा आत्मविश्वास वाढेल, लोक सकारात्मक राहतील, आनंदी राहतील, असे वातावरण निर्माण करण्याची हीच ती वेळ आहे. नाहीतर ही वाढती नकारात्मकता घातक आहे.
सरकारमधील विविध मंत्र्यांची वक्तव्ये पाहता राज्यात कधीही पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या कालावधीमधील परिस्थिती पाहता लोकांना पुन्हा एकदा त्याच नकारात्मक परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही, तर पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल. रोजगार जाईल. अर्थचक्र थांबले या चिंतेनेच अनेक जणांना धडकी भरली आहे. त्यामुळे आता सरकारने जनतेच्या मनातील ही नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नव्या वर्षात नव्या उमेदीने कामाला लागण्याची तयारी सुरू असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊन झाले, तर लोकांना याच मानसिकतेशी सामना करावा लागणार आहे. सरकार सध्या ज्याप्रमाणे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला देत आहे, त्याचप्रमाणे सरकारने स्वत:हूनच समाजातील सर्व घटकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. सोशल मीडियावरून कोणीतरी कसला तरी व्हिडीओ, माहिती अथवा अफवा पसरवतो आणि समाजात घबराहट पसरते. या प्रकारांना कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्यासाठी अशा समाजमाध्यमांवरही नियंत्रण ठेवण्याची गरज आता वाटू लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा