भारतीय माणूस किंवा खरं तर कुठलाही माणूस हा श्रद्धेवर जगत असतो. या श्रद्धांना जपण्यासाठी तो जीवाची बाजी लावत असतो. त्यामुळेच या श्रद्धेच्या आधारावर माणूस जगत असतो. अशा श्रद्धास्थानांचे प्रमोशन करून, देव, संत, देवस्थानांचे प्रमोशन करून चित्रपटसृष्टीत धमाका उडवून देण्याचे तंत्र बॉलिवूडला १९७० च्या दशकात सापडले आणि अधूनमधून असे चित्रपट येत राहिले. वेगवेगळ्या देवस्थानांचे प्रमोशन होऊ लागले.
१९७० पूर्वी धार्मिक, पौराणिक असे चित्रपट बनत होते, पण ते प्रचारकी असे नव्हते. कथानकाला, काल्पनिकतेला त्यात वाव होता, पण १९७० नंतर मात्र एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या मंदिर, देवस्थान, संत यांच्यावरच चित्रपट निर्माण करून मर्यादित माहिती असलेल्या त्या देवांचे प्रमोशन करण्याचा ट्रेंड सुरू झाला. यातील सर्वाधिक गाजलेले चित्रपट म्हणजे ‘शिर्डी के साईबाबा’ आणि ‘जय संतोषी माँ’ हे चित्रपट. त्यानंतर अशा तºहेच्या देवस्थानांचे प्रमोशन करणारे अनेक चित्रपट आले.
१९७७ ला सरला चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. याची पटकथा मनोजकुमार यांनी लिहिली होती, तर दिग्दर्शक अशोक भूषण होते, पण हा चित्रपट मनोजकुमारचा ‘शिर्डी के साईबाबा’ म्हणूनच ओळखला गेला. राजेंद्रकुमार, हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा अशा दिग्गज कलाकारांबरोबर साईबाबांच्या भूमिकेत सुधीर दळवी यांनी ही भूमिका अजरामर केली. खरे साईबाबा पाहणारे तेव्हा कोणी हयात असतीलही कदाचित, पण त्यानंतर साईबाबा म्हटले की सुधीर दळवींचाच चेहरा समोर येऊ लागला इतकी सुंदर भूमिका त्यांनी केली होती. मनोजकुमारच्या स्टाइलने सुपरहिट गाणी हे तर या चित्रपटाचे बलस्थान होतेच, पण यामुळे शिर्डीला जाण्याचे लोकांचे प्रमाण लक्षणीय वाढले. त्यापूर्वी फारसे कोणी तिकडे जात नव्हते, पण या चित्रपटाने या संस्थानचे चांगले प्रमोशन केले. आजही लाखो भाविक इथे दर्शनाला आणि अनुभूतीसाठी येत असतात.
याच दशकात ‘जय संतोषी माँ’ नावाचा चित्रपट आला होता. आता ही देवी प्रत्यक्षात पुराणात कुठेही उल्लेख केलेली नाही, पण काल्पनिक दैवत निर्माण करून जवळपास दहा-बारा वर्षं चणे, गूळ, हरभरे आणि शेवयाची खीर, पुरीचा चांगला बाजार उठला होता. यातील कथानक पाहून घरोघर महिला संतोषी मातेचे शुक्रवारचे व्रत करून संतोष मिळवत होत्या. आंबट खायचे नाही, कडक उपवास करायचा. सोळा शुक्रवारनंतर उद्यापनाला लहान मुलांना जेवायला बोलवायचे. त्यांना हरबºयाची उसळ, खीर, पुरी खायला द्यायची. हळदी कुंकवाला फुटाणे आणि गुळाचा प्रसाद द्यायचा असले प्रकार खूप वाढले होते. या संतोषी मातेचे प्रमोशन या चित्रपटाने केले होते. हा १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला सुपर डुपर हिट आणि लो बजेट सिनेमा असूनही उत्पन्नाचे विक्रमाचे आकडे मोडणारा चित्रपट ठरला होता. त्या वर्षात भारतातील लोकांनी फक्त दोनच चित्रपट पाहिले होते, एक ‘शोले’ आणि दुसरा ‘जय संतोषी माँ’ हा चित्रपट होता. क्वचितच अशी व्यक्ती होती की, त्यांनी हे चित्रपट पाहिले नसतील. सतराम रोहिरा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय शर्मा यांनी केले होते. कानन कौशल, भारत भूषण आणि अनिता गुहा यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. सुपरहिट गाणी, भक्तिगीते यांमुळे हा चित्रपट चांगलाच गाजला, त्याची गाणी आजही लोकप्रिय आहेत. अर्थात हे काल्पनिक दैवत असल्याने आजकाल कोणी संतोषी मातेचे व्रत करताना दिसत नाही, पण त्या काळात केलेल्या प्रमोशनने दोन दशके चांगली गाजली होती.
अशा प्रकारचे देवस्थानांचे प्रमोशन करणारे अनेक चित्रपट सातत्याने येत असतात. त्यामुळे पर्यटनाला चांगले प्रोत्साहन मिळत असते. १९७८ च्या दरम्यान सचिन पिळगावकर यांच्या ‘अष्टविनायक’ चित्रपटाने अशाच प्रकारे अष्टविनायकांचा महिमा चांगल्या प्रकारे सांगितला होता. तेव्हापासून आजतागायत अष्टविनायक यात्रा कंपन्यांना चांगले दिवस आले. हा एक यशस्वी मराठी प्रयोग होता.
अलीकडच्या काळात किशोरी शहाणे यांची निर्मिती असलेला ‘मोहटाची रेणुका’ नावाचा एक चित्रपटही असाच त्या देवस्थानचे प्रमोशन करणारा होता. ‘आई माझी काळुबाई’, ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’ अशा चित्रपटांच्या निर्मितीतून त्या स्थानिक देवतांचे प्रमोशन अलका कुबल यांनी केले होते. याशिवाय अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ, गोंदवल्याच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, शेगावच्या गजानन महाराज यांच्यावरही या काळात अनेक चित्रपट आले आणि त्यांचे महात्म्य भाविकांपर्यंत पोहोचवले गेले. चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या श्रद्धास्थानांवर चित्रपट निर्मिती करून त्यातील चमत्कार, अनुभूती लोकांपर्यंत पोहोचवण्यास अनेक निर्मात्यांना सतत आवडते. अशाच प्रकारचा ‘महिमा वैभवलक्ष्मी’चा नावाचा एक चित्रपट अलका कुबल, प्रसाद ओक यांचा होता. त्यात या वैभवलक्ष्मीच्या व्रताचे महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण ‘जय संतोषी माँ’ इतके यश या चित्रपटाला मिळाले नाही, पण श्रद्धेचा पुरेपूर वापर निर्माते करतात हे अनेक वेळा दिसूनही आलेले आहे. यातून देवांचेही प्रमोशन करावे लागते हे दिसून येते. आजकाल जाहिरातीचाच जमाना असल्यामुळे आम्ही आहोत हे सांगण्यासाठी देवांचेही प्रमोशन करावे लागते हा विचार १९७० च्या दशकात रुजला, तो आजही आहे हे नक्की.
हिंदीत तर १९७०-८० च्या दशकात असे खूपच चित्रपट आले होते. त्या बद्रीनाथ धाम, जय मनसा देवी, असे उत्तरेतील देवतांचे प्रमोशन करणारे चित्रपट आल्यानंतर तिकडेही लोक पर्यटनाला जाऊ लागले होते. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून देवस्थानांचे प्रमोशन करून पर्यटनाला चालना देण्याचे काम बॉलिवूडने चांगल्या प्रकारे केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा