मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

पाहुणे कलाकार (गेस्ट अ‍ॅपिरिअन्स)


मराठी, हिंदी चित्रपटांत एखादा कलाकार नामांकित झाल्यावर त्याला लो बजेट चित्रपटातून किंवा हलक्याफुलक्या चित्रपटातून पाहुणा कलाकार म्हणून आणण्याची पद्धत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनचाच तो एक भाग असतो, पण ही परंपरा फार जुनी आहे. मराठीतही अनेक हिंदी कलाकारांनी पाहुणे कलाकार म्हणून काम केलेले दिसून येते. सेकंड हीरो किंवा दुय्यम भूमिका करणारे, पण चांगले कलाकार जेव्हा चित्रपट बनवतात तेव्हा ते आपल्या ओळखीचा फायदा घेत आपल्या मित्रांना गेस्ट अ‍ॅपिरिअन्स करायला भाग पाडतात, काहीजण आनंदाने करतात. काही सेकंद ते मिनिटांचाच हा रोल असतो, पण त्या चित्रपटात नामांकित कलाकाराचे नाव लावून, टायटल्समध्येही पाहुणे कलाकार म्हणून स्पेशल नाव टाकून त्या कलाकाराचा गौरव केला जातो.

मेहमूदने जेव्हा ‘कुँवारा बाप’ हा चित्रपट काढला तेव्हा त्यात अनेक कलाकारांना पाहुणे कलाकार म्हणून आणले होते. यात धर्मेंद्र, हेमामालिनी, अमिताभ बच्चन, दारा सिंग या सगळ्यांना त्याने पाहुणे कलाकार म्हणून आणले होते. अमिताभची ती तशी सुरुवात होती, पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शोले’मुळे धर्मेंद्र-अमिताभ ही जोडी गाजली होती. त्यामुळे मेहमूदने या चित्रपटात गाडी बंद पडली म्हणून मेहमूदच्या सायकलरिक्षात बसण्याचे काम धर्मेंद्र, हेमामालिनीला दिले होते. त्यात सापडलेले मूल त्यांच्या गळ्यात मारायचा प्रयत्न करतो म्हणून धर्मेंद्रचा हातोडाछाप ठोसा खातो आणि कुठल्या कुठे कोलमडून पडतो, तर अमिताभ बच्चनला या चित्रपटात त्याने सायकलच्या दुकानात बसलेले दाखवले आहे.


आपल्याच चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून चेहरा दाखवण्याचे सुभाष घईचे कसब तर काही औरच. ‘मेरी जंग’मध्ये ‘रॉक अँड रोल...’ या गाण्यात तर ‘हीरो’मध्ये ‘डिंग डाँग...’ गाण्यात ते आपले दर्शन घडवतात, मात्र अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता खूप असल्याने त्यांनी अनेक चित्रपटांत पाहुणा कलाकार केलेला आहे. अमोल पालेकरच्या ‘गोलमाल’ चित्रपटात सुपरस्टार अमिताभप्रमाणे आपणही सुपरस्टार होऊ अशी स्वप्नं पाहणाºया अमोल पालेकरला सही घेण्यासाठी अमिताभच्या मागे जसे फॅन लागतात आणि आपण कोपºयात बसतो हे स्वप्न मोडून आपण हीरो झालो आहे आणि अमिताभ कोपºयात बसला आहे, असे दाखवले आहे. काही सेकंदासाठी अमिताभने ही भूमिका केली होती.

‘जलवा’ चित्रपटातही अमिताभ बच्चन चार-पाच सेकंदासाठी आपले दर्शन दाखवतो. रस्ता चुकलेल्या नसिरला रस्ता दाखवण्यापुरता अमिताभ तिथे दिसतो. अमिताभप्रमाणेच धर्मेंद्रने अनेक चित्रपटांत पाहुणा कलाकार म्हणून दर्शन घडवले आहे. रजनीकांतचा पहिला हिंदी चित्रपट चालावा यासाठी अमिताभ बच्चन यांना विशेष भूमिकेत आणले होते, तर या चित्रपटात एक मिनिटासाठी धर्मेंद्रला आणले होते. पोलीस स्टेशनमधून रजनीकांतला पळवण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दारात ट्रकचा अपघात करण्यापुरता धर्मेंद्रला आणले होते.


काही चित्रपटांतून कलाकारांना एखादे गाणे देऊन पाहुणा कलाकार म्हणून आणले गेल्याचे दिसून येते. मराठीत असे प्रयोग सर्वाधिक सुषमा शिरोमणीने केलेले आहेत. तिने निर्माण केलेल्या प्रत्येक चित्रपटात एक गाणे हिंदी कलाकारांसाठी होते. पहिल्याच ‘भिंगरी’ चित्रपटात अरुणा इराणीला आणले होते आणि तिच्यावर ‘तू सुपारी मी अडकीत्ता...’ असे काही गाणे चित्रीत केले होते. त्यानंतरच्या ‘फटाकडी’तील रेखाचे पाहुणी कलाकार म्हणून केलेले लावणी गीत तर अजरामर झाले. ते म्हणजे ‘कुठं कुठं जायाचं हनीमूनला?’ याशिवाय तिने रती अग्निहोत्रीला घेऊन ‘दूध केंद्राचं ओपनिंग करा’ हे गाणे सुषमा शिरोमणीच्याच ‘मोसंबी नारंगी’मध्ये होते. ‘भन्नाट भानू’मध्ये मोसमी चटर्जीला नाच करायला लावला होता. हिंदी चित्रपटात कधीही बागेत जितेंद्रभोवती गाण्यापुरत्या फेºया मारणाºया मोसमीने नाच केल्याचे, स्टेजवर नाचल्याचे दिसत नाही. ‘रोटी कपडा और मकान’मध्ये ‘थोडी मेहंगाई मार गई’ गाण्यामध्ये मनोजकुमारने गिरकी घ्यायला लावली तेवढीच, पण सुषमा शिरोमणीने तिला लावणीनृत्य दिले होते.

अशोक कुमारने अनेक मराठी चित्रपटांत पाहुणा कलाकार म्हणून काम केले आहे. ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटात त्याने काशिनाथ घाणेकरच्या वडिलांची भूमिका केली आहे. यात त्यांच्या जोडीला रत्नमाला आहे. ‘जानकी’ चित्रपटातही अशोक कुमार, ओमप्रकाश यांनी काम केले होते. ‘हा खेळ सावल्यांचा’ चित्रपटात मांत्रिकाच्या भूमिकेत आशा काळेचे भूत उतरवण्यासाठी देवेन वर्माने पाहुणा कलाकार म्हणून काम केलेले आहे. हिंदी चित्रपटातील कलाकार मराठीत काम करतात तेव्हा त्यांचे मराठी बोलणे हा बºयाच वेळा हशा मिळवण्याचा प्रयत्न असतो, पण पाहुणे कलाकार चित्रपटात आणण्याची फार जुनी प्रथा आहे.


सचिन पिळगांवकर याने अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती केली. यातील त्याच्या वडिलांची निर्मिती असलेल्या ‘अष्टविनायक’ चित्रपटात अनेक पाहुणे कलाकार होते. ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा?’ या गाण्यात सूर्यकांत, अशोक सराफ, जयश्री गडकर, उषा चव्हाण, आशा काळे, रवींद्र महाजनी या तत्कालीन आघाडीवरच्या कलाकारांनी पाहुणे कलाकार म्हणून कामे केली होती. हे गाणे आजही तुफान चालते. सचिनने आपल्याच ‘भूताचा भाऊ’ या चित्रपटात जॉनी लिव्हरला पाहुणा कलाकार म्हणून आणले होते. त्याशिवाय सचिनचा ‘नवरा माझा नवसाचा’ या सदाबहार गाजलेल्या चित्रपटात सोनू निगम, रिमा लागू, जॉनी लिव्हर हे प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात पाहुणे कलाकार म्हणून दर्शन देतात. पाहुणे कलाकार म्हणून येऊन भाव खाऊन जायची संधी कलाकार साधत असतात. चित्रपटाच्या आणि स्वत:च्या प्रमोशनसाठी ते आवश्यक असते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: