कराडचा बैलबाजार म्हणजे चांगलीच गर्दी असते, पण सध्या गर्दी करायची नसल्याने या बाजारात अंतरा अंतरावर बैल ठेवून ग्रामीण भागातून आलेले शेतकरी जेवायला बसले होते. दुपारची वेळ होती. बैलांना खुंटीला बांधून शेतकरी झाडाखाली बसले होते. दलालही खांद्यावर टॉवेल टाकून हिंडत होते. पुढे पडलेली वैरण रवंथ करण्यात बैलं गुंतली होती.
एका खुंटीला बांधून ठेवलेल्या गवळ्या, ढवळ्या, वेताळ्या, पवळ्या या बैलांच्यात चर्चा सुरू झाली.
गवळ्या म्हणाला, ‘हम्माम... किती वेळा विकलं मला कोण जाणे. लहानपणी आईपासून तोडलं अन् गाडीला जुंपलं, पण नंतर दर चारदोन वर्षांनी या बाजारात आणून बसवलं. ते टोपीवाले खांद्यावर टॉवेल टाकून येतात. मालकाचा हात टॉवेलखाली दाबून बघतात. माझ्या पाठीवर थाप मारतात आणि पैसे घेऊन मालक बदलतात. मला आता याची सवयच झालीय.’
वेताळ्या म्हणाला, ‘आपलं थोडंच कुत्र्यागत असतंय? हम्माममाम. ज्याच्या हातात आपली वेसण असेल त्याच्यासाठी तोंडातून फेस येईपर्यंत राबायचं. वर्षातून येकदा रंगवून घ्यायचं अन् पाठीवर फटके मारून घ्यायचे.’
ढवळ्या तिथेच हंबरत जवळ आला. हा थोडा पोक्त आणि वयस्कर बैल होता. पाय वाकवून बसला आणि रवंथ करत बोलू लागला, ‘हम्ममममम ºहॅ हमम.. पोरांनु, तुम्ही अजून जवान आहात तवर विकला जाल. आता माझा मात्र हा शेवटचाच बाजार असेल बरं का.’
गवळ्या, वेताळ्या, पवळ्या सगळे सरसावून ढवळ्याकडे बघू लागले. तेव्हा ढवळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. ढवळ्या बोलू लागला, ‘काय नाई केलं मी आजवर? शेतात नांगराला जुंपल्यावर दिवसाला चार चार एकर नांगरून दिलं. गाडी ओढली. बैलगाडीतून या माणसांना गावभर फिरवलं. यांच्या मजेसाठी पौषातल्या जत्रेत बैलगाडीच्या शर्यतीत धाव धाव धावलो. जोरात पळावं म्हणून पाठीवर चाबकाचे फटके बसायचे. फटके बसू नयेत म्हणून जोरात पळायचं. त्यांना जिकायचं आहे म्हणून खाचाखळग्यातून, धुरळा उडवत पळायचं. ढाल यांनी मिळवायची आणि नाल आपल्या पायाला ठोकायची.’
गवळ्या म्हणाला, ‘आपल्या सर्वांच्याच वाट्याला हा भोग आहे.’
ढवळ्या, ‘पण तुम्ही आता सुखी आहात थोडेतरी. आता ट्रॅक्टर आलेत. तुम्हाला नांगराला जुंपले जात नाही. वर्षभर पोसायचे आणि शर्यतीत पळण्यासाठी खायचे. आमचं तसं नव्हतं. आम्ही वर्षभर नांगर ओढणार, गाडी ओढणार, उसाच्या हंगामात गुºहाळात घाणा पण ओढणार. गोल गोल फिरून चक्कर यायची. तोंडातून फेस यायचा. माणसं हावरटपणानं रस प्यायची आणि हा चोथा आपल्या पुढ्यात टाकायचा. कसलं हे बैलाचं जीवन?’
गवळ्या, वेताळ्या आणि आसपासची बैलं यांचा संवाद ऐकत होते. ढवळ्या बोलत होता, ‘एक काळ असा होता की माझा भाव खूप होता. पुसेगांवचा बाजार मी जिंकायचो. सर्वात महागडा बैल म्हणून लोक माझा फोटो काढायचे. गुलाल उधळत आनंदानं मला घरी न्यायचे. माझ्यासारखे कितीतरी बैल विकल्याचा, गुलाल उधळल्याचा आनंद घ्यायचे आणि नेतील त्या मालकाबरोबर जायचे. गेल्यावर घरात ओवाळून घ्यायचे. पाठीवर आनंदानं थाप मारायचे. खूप बरं वाटायचं, पण हा आनंद काही फार काळ टिकायचा नाही.’
ढवळ्या गप्प बसल्यावर पवळ्या त्याला विचारतो, ‘हा आनंद फार काळ का टिकायचा नाही?’
ढवळ्या, ‘तुला माहिती नाही का? दुसºया दिवशी मैदानात खांबाला धरून बांधायचे. उलटं करून ताकदीने दाबून धरायची ही माणसं. जीव गुदमरून जायचा. डोक्यावर शिंग असूनही काही फायदा नव्हता. त्यांच्या ताकदीपुढं आपली ताकद कमीच पडायची. पायाच्या खुरांमध्ये हातोडीने लोखंडी नाल ठोकायचे तेव्हा तो हातोडा पायावर इतक्या जोराने मारायचे की त्या वेदनांची माणसाला जराही किंमत नव्हती. या माणसांना रस्त्यावरून चालताना पायताणं लागतात. खडे टोचू नयेत म्हणून ते चपला घालतात. आपणही घाण लागू नये म्हणून नाल ठोकून घ्यायचो, पण त्याच्या वेदना आपल्यालाच ठाऊक.’
सगळ्या बैलांनी उसासा सोडला. कारण नाल ठोकल्याने काय त्रास होतो हे सर्वांनाच माहिती होते. त्यावर गवळ्या म्हणाला, ‘उन्हाळ्यात खूपच त्रास होतो हे त्या माणसांना जराही समजत नाही. रस्ते तापलेले असतात. पायातले नालही उन्हाने गरम होतात. त्याचे चटके सोसत चालण्यासाठी आपण जोरात पाय टाकतो, पण त्या डांबरी सडकेतून जाताना किती त्रास होतो? उसाचे गाडे भरून रात्र रात्र कारखान्याच्या दारात थांबायचे म्हणजे वैताग असायचा.’
ढवळ्या म्हणाला, ‘कष्ट करून आपल्या नशिबी काही सुखच नाही. समोरून गाई मोकाट हिंडत असतात. कित्येकदा वाटतं त्यांना प्रेमानं पहावं, पण त्या गाई जराही आपल्याला भाव देत नाहीत. ढुंकूनही बघत नाहीत. गाई दिसल्यावर कित्येकदा हंबरायचा प्रयत्न केला तरी त्या दुर्लक्षच करायच्या. त्यावेळी वाईट वाटायचं. कसला हा बैलाचा जन्म?’
पवळ्या हसला, खिन्नपणे हसला, ‘त्या कशाला आपल्याला भाव देतील? त्यांना जे हवं ते आपण नक्कीच देऊ शकत नाही. नाल ठोकण्याबरोबर आपलं सर्वच ठेचून काढलेलं असतं. आपल्याला बाकी काही करायला लागू नये म्हणून गुलाम बनवलेलं असतं. गार्इंची इच्छा आपण कशी पूर्ण करणार आहोत? आपण गुलाम आहोत गुलाम. गुलामांवर मुक्त गायी कशाला प्रेम करतील? त्यांना खूश करण्यासाठी तिकडे मोकाट वळूच हवे असतात. माणसांनी नेमके वळू हेरून ठेवलेले असतात. कोणता वळू केव्हा वापरायचा हे त्यांना माहिती असते. त्यामुळे आपण फक्त झुरत राहायचं.’
गवळ्या हसत म्हणाला, ‘पण एक बरं झालं, ते ट्रॅक्टर आले म्हणून बरं झालं. नाहीतर त्या दिल्लीतल्या आंदोलनाला आपल्याला जावं लागलं असतं. बैलगाडी घेऊन शेतकरी आंदोलनात उतरले असते तर आपल्या शेणाचाही बाजार केला असता या माणसांनी आणि पाठीवर चाबकाचे फटके खावे लागले असते ते वेगळेच.’
बराच वेळ गप्प असलेला वेताळा म्हणाला, ‘हम्ममम.. ट्रॅक्टर होते म्हणून ते गप्प बसले. ट्रॅक्टरची चाकं पंक्चर करायला त्यांनी रस्त्यावर खिळे ठोकले, पण बैलगाड्या आणल्या असत्या तर आपल्याला त्या खिळ्यांवरूनही चालावे लागले असते. नाल ठोकल्याने आपल्याला खिळ्यांची भीती नसतेच. काटेकुटे, खड्डे तर आपल्या पाचवीलाच पूजलेले.’
इतक्यात जेवणं आटोपून शेतकरी, दलाल आले. ढवळ्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याच्या डोळ्यात पाणी आले. कारण हा त्याचा शेवटचा बाजार होता. या बाजारात त्याला शेतीकामासाठी कोणी नेणार नव्हते. बैलगाडीला जुंपणार नव्हते. वय झाल्यामुळे त्याला आता खाटिकखान्याकडे नेले जाणार होते. त्यामुळे त्यानं सगळ्या बैलांकडे केविलवाणे बघितले. त्यांना आपले भविष्य माहिती नव्हते. त्यामुळे गुलालाच्या वासानेच ते खूश झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा