झी मराठी वाहिनीवर सध्या दोन रहस्यमय मालिका सुरू आहेत. एक ‘देवमाणूस’ आणि दुसरी ‘काय घडलं त्या रात्री’. या दोन्ही मालिकांमधील खून, रहस्याचा तपास करण्यासाठी महिला पोलीस अधिकाºयांची नेमणूक केलेली आहे, पण यामधून फार वेगळा संदेश जात आहे हे मालिका निर्माते, दिग्दर्शक, लेखक विसरत आहेत. मालिकांमधील महिला पोलीस अधिकारी या दोन्ही मालिकांत अत्यंत एकसूरी दाखवल्या आहेत.
अगोदर या दोन्ही मालिकांतील महिला पोलीस अधिकाºयांची साम्य पहायला हवीत. ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेत रेवती ही पोलीस अधिकारी आहे. तीही अचानक तपासासाठी येते आणि आधीच्या अधिकाºयाकडचा तपास ती आपल्याकडे घेते. तोच प्रकार ‘देवमाणूस’मध्ये दिसतो. ‘देवमाणूस’मध्ये दिव्यासिंग नावाची पोलीस अधिकारी येते आणि ती तपासाची सूत्रं आपल्या हातात घेते. या दोन्ही महिला पोलीस अधिकारी अत्यंत सुंदर दाखवल्या आहेत. त्यांच्या सौंदर्यावर सगळे खूश होताना दाखवले आहेत. ‘देवमाणूस’मध्ये तर अतिरेकच दाखवला आहे, पण दिग्दर्शक हे विसरत आहेत की त्यात कर्तबगार अधिकारी दाखवणे आवश्यक आहे, सुंदर नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे या दोन्ही महिला पोलीस अधिकाºयांना एक मुलगी दाखवली आहे. मुलीचे सगळे करून या बायका ड्युटी करताना दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महिला पोलीस अधिकारी, एक मुलगी पदरात किंवा पँटच्या खिशात असूनही घटस्फोटित आहेत. मुलींची कस्टडी आपल्याकडे ठेवून नवºयापासून वेगळ्या झालेल्या आहेत. यातून नक्की काय दाखवायचे आहे?
यातून एकच संदेश जातो की, महिला पोलीस खात्यात भरती झाल्या की त्या संसार करू शकत नाहीत. घरातही त्या आपला पोलिसी खाक्या दाखवतात आणि त्यामुळे कायदे कानून माहिती असल्याने त्या सहजपणे घटस्फोट मिळवून वेगळ्या होतात. असा जर संदेश या मालिकांमधून नकळत दिला असेल, तर महिला पोलीस अधिकाºयांशी कोणी लग्न करायला तयार होईल का? त्या चांगला संसार करून, घर सांभाळून आपल्या हुशारीने तपास करत आहेत हे दाखवले असते, तर काय फरक पडला असता? पण नवºयाबाबत त्या जितक्या कठोर दिसतात तेवढ्या गुन्हेगारांबाबत दिसत नाहीत असेच दिसते.
‘काय घडलं त्या रात्री’मध्ये तर घटस्फोट झालेला आहे, पण रेवती आणि तिचा नवरा एकमेकांना भेटतात. तो तिच्या विरोधातील केस घेतो आणि मुलीशीही भेटत राहतो. ‘देवमाणूस’मध्ये अजून तसे काही दाखवले नाही, पण ती पहिल्याच भेटीत डॉक्टरला सांगून टाकते की मी डिव्होर्सी आहे. डिव्होर्सीच पोलीस महिला अधिकारी का दाखवल्या आहेत हे न उलगडणारे कोडे आहे. लग्न न झालेली तरुणी दाखवली असती, किंवा वयस्कर किरण बेदी यांच्याप्रमाणे दाखवली असती, तर काय फरक पडला असता? पण यातून चुकीचा संदेश जात आहे हे नक्की.
याशिवाय या महिला अधिकारी आपल्या हाताखालच्या पोलीस कर्मचाºयांना तुच्छ लेखतात, विश्वासात न घेता काम करतात, डॉमिनेट करतात, असे सातत्याने दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणीच कामावर असताना मग कोणतेही क्षेत्र असो राजकारण, एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडत असतात, पण पोलिसांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे, तपासात अडथळे आणण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात असे या मालिकांमधून दाखवले आहे. विशेषत: ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेत आयएसपी रेवती बोरकर काय करणार आहे याची इत्यंभूत माहिती रमाकांत ढवळे हा पोलीस राजनला देत असतो. पोलीस आपल्या तपासाची दिशा गुंडांना कळवतात आणि तपासकार्यात अडथळा आणतात. गुंडांना, राजकारण्यांना सामील असतात आणि त्यांच्या तालावर नाचतात असे स्पष्टपणे दाखवले आहे. अर्थात हे काही जुने नाही. आजवर निर्माण झालेल्या लाखो चित्रपटांतील ७० टक्के चित्रपटांतून हे आपण नेहमीच पाहत आलो आहे, पण त्यात प्रामाणिक अधिकाºयांपेक्षा जास्त अधिकारी भ्रष्ट असतात हे दाखवण्याचे नेमके कारण काय असते हे समजत नाही. रेवती बोरकर आपल्या सहकाºयांवर विश्वास ठेवत नाही. जे विश्वासात घेऊन सांगते ते अगोदरच जगजाहीर होते. यातून पोलिसांची प्रतिमा किती मलिन केली जात आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
तोच प्रकार ‘देवमाणूस’मध्ये केलेला दिसतो. दिव्यासिंगपण गावातील पोलिसांच्या तपासावर विश्वास ठेवत नाही. आल्या आल्या दुसºया दिवशी किंबहुना ती बाहेरगावी असताना तिला या खुनांच्या मालिकेची इतकी छान कल्पना आहे की तिथे असलेल्या पोलिसांना नाही. हा जादूचा प्रयोग वाटतो. म्हणजे ‘काय घडलं त्या रात्री’मध्ये मीडियामुळे, वृत्तवाहिन्यांमुळे पोलिसांवर दबाव येतो, सिद्धांत छाया हा सेलिब्रिटी असल्याने त्याचे चाहते लाखो आहेत. साहजिकच त्याच्या आत्महत्येची बातमी होते, पण ‘देवमाणूस’मध्ये झालेल्या कोणत्याही खुनाची कुठेही वाच्यता झालेली नसताना, कोणाचाही खून झाल्याचे निष्पन्न झालेले नसताना, त्याची कुठेही बातमी आलेली दाखवली नसताना बाहेरच्या अधिकाºयांची तपासासाठी नेमणूक करण्याची मागणी कोण करते? हा तपास तिकडे कसा जातो हे अनाकलनीय आहे. या मालिकेत दिव्यासिंगची एण्ट्रीही दिव्यच दाखवली आहे. गावात गाडी घेऊन येते, गाडी पंक्चर होते. ती स्वत: आपल्या ताकदीने कोणाही पुरुषाच्या मदतीशिवाय स्टेफनी चेंज करते. मग दुसºया दिवशी तोकड्या कपड्यांत जॉगिंगला संपूर्ण गावभरातून पळते. सगळं गाव तिला पाहण्यासाठी आतूर होतो. ती पोलीसच्या वेशात कार्यालयात एण्ट्री करते, पण तिच्या मागावर अख्खा गाव असताना ती पोलीस अधिकारी आहे हे कोणालाच समजत नाही. किती पोरकटपणा आहे ना हा? ती तपासासाठी गाडीतून हिंडते आहे, पोलिसांबरोबर आहे. हे उघडपणे ती करत असताना गावात फक्त चर्चा काय, तर कोणीतरी नवीन देखणी बाई गावात आली आहे. ती सर्वांना चाळवती आहे. किती फालतूपणा आहे हा? ती पोलीस अधिकारी आहे हे कोणाच्याच लक्षात आले नाही, ती उघडपणे हिंडत असतानाही, हा विनोदच म्हणावा लागेल.
पण मालिकांमधून दाखवण्यात आलेले महिला पोलीस अधिकारी म्हणजे महिलांचे, पोलिसांचे अवमूल्यन करणारे दाखवले जात आहे हे नक्की. त्यामुळे फार चुकीचा संदेश जात आहे याचे भान राखायला पाहिजे. ‘काय घडलं त्या रात्री’मध्ये मानसी साळवीने पोलीस अधिकाºयाची भूमिका केलेली आहे. तर ‘देवमाणूस’मध्ये नेहा खान ही भूमिका करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा