शनिवार, ६ फेब्रुवारी, २०२१

रूपांतरित मराठी नाटके


आज मराठी रंगभूमीला पावणेदोनशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असल्याचे आपण बोलत असलो, तरी मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांमध्ये सर्वाधिक नाटके ही भाषांतरित, रूपांतरित, परकीय कल्पनांवर आधारित अशीच आहेत. आपल्या मराठी नाटककारांनी आपल्या भाषेवरील प्रभुत्वाने त्याचे अस्सल मराठीकरण केलेले असले, तरी ती मूळ मातीची नाहीत. गेल्या साठ वर्षांत यशस्वी लेखक नाटककार म्हणून गाजलेल्या आचार्य अत्रे, चि. त्र्यं खानोलकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, रत्नाकर मतकरी, मधुसूधन कालेलकर, मधुकर तोरडमल, विजय तेंडुलकर अशा दिग्गज नाटककारांनी आपल्या गाजलेल्या नाटकांना परकीय भाषेतून मराठीत आणले होते हे लक्षात घेतले पाहिजे.

पु. ल. देशपांडे यांची गाजलेली जेवढी नाटके आहेत त्यापैकी सर्वाधिक नाटके परकीय भाषांमधून आलेली आहेत. पु. ल. देशपांडे म्हटले की, ‘ती फुलराणी’ या नाटकाची आठवण होणारच. हे नाटक जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियन’ या इंग्रजी नाटकावरून आलेले नाटक आहे. भाषाशास्त्रावर बेतलेले हे नाटक त्यांनी आपल्या कौशल्यावर अस्सल मराठीत रुजवले होते. याशिवाय पुलंची जी नाटके आहेत त्यामध्ये ‘अंमलदार’ हे नाटक रशियन नाटककार निकोलाय गोगोल याच्या ‘इन्स्पेक्टर जनरल’ या नाटकावर बेतले होते. ‘एक झुंज वाºयाशी’ हे नाटकही रशियन नाटक ‘द लास्ट अपॉइंटमेंट’ या नाटकावरून आलेले आहे. पु.लंचं १९७० च्या दशकात गाजलेले एक नाटक म्हणजे ‘तीन पैशांचा तमाशा’. हे नाटक जर्मन लेखक ब्रेख्तच्या ‘थ्री पेनी आॅपेरा’ या नाटकावरून आलेले आहे. ‘राजा ओयादीपौस’ हे पु.लंचे नाटक सोफोक्लीसच्या ‘इडिपस’ या ग्रीक नाटकावरून आलेले आहे. पु.लंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक इंग्रजी नाटककार रुडॉल्फ बेसीर याच्या ‘बॅरेटस आॅफ विपोल स्ट्रीट’ या नाटकावर आलेले होते. ही सर्वच नाटके तुफान गाजली, पण यात आपले मराठीपण कुठेही कमी पडले नाही हे महत्त्वाचे होते.


साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांची अनेक नाटके गाजली. त्यात ‘मोरूची मावशी’ आणि ‘कवडीचुंबक’ ही तुफान विनोदी गाजलेली नाटकं. यातील मोरूची मावशी हे नाटक इंग्रजी नाटककार बॅडन थॉमस याच्या ‘चार्लीज् आँट’ या नाटकावरून आलेले आहे, तर कवडीचुंबक हे नाटक फ्रेंच नाटककार मोलियर याच्या ‘लाव्हार द मायझर’ या नाटकावरून आलेले आहे. जी नाटके पाहताना आपण खो-खो हसतो ती नाटके परकीय भाषेतून मराठीत चपखल बसवण्याची किमया या सर्वच शब्दप्रभूंनी केल्याचे दिसते.

चि. त्र्यं. खानोलकरांचे ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक जर्मन लेखन बेख्तच्या ‘द कॉकेशियन चॉक सर्कल’ या नाटकावरून आलेले आहे. वसंत कानेटकरांनी तब्बल ४ दशके मराठी रंगभूमीला चांगली दर्जेदार नाटके दिली. त्यापैकी काही नाटके ही परकीय नाटकांवरून आलेली होती. त्यामध्ये गगनभेदी हे नाटक विशेष होते. शेक्सपिअरच्या ‘आॅथेल्लो’, ‘किंग लिअर’, ‘मॅकबेथ’ आणि ‘हेम्लेट’ या चार नाटकांवरून त्यांनी तयार केले होते. यशवंत दत्त यांनी त्या नाटकाचे सोने केले होते. कानेटकरांचे ‘बेईमान’ हे नाटक जॉ अनुई या फ्रेंच नाटककाराच्या ‘बेकेट’वरून आलेले होते. ‘बेकेट’चे आकर्षण अनेकांना होते. याच नाटकावरून वि. वा. शिरवाडकरांनी ‘महंत’ हे नाटक आणले होते. अर्थात ‘बेईमान’इतके ते गाजले नाही.


नाटककार मधुसुदन कालेलकर यांनी लिहिलेले ‘उद्याचे जग’ हे इंग्रजी नाटककार कॅरेल कॅपॉकच्या ‘मदर’ या नाटकावरून आले होते. रत्नाकर मतकरींचे ‘कार्टी प्रेमात पडली’ हे नाटक इंग्रजी नाटककार पी. जी. वुडहाऊसच्या ‘द स्मॉल बॅचलर’ या नाटकावरून आलेले होते, तर वसंत सबनीस यांचे गाजलेले नाटक ‘कार्टी श्रीदेवी’ हेदेखील इंगजी नाटककार नील सायमन याच्या ‘आय वाँट टू बी इन पिक्चर्स’ या नाटकावरून आलेले आहे. अगदी गोविंद बल्लाळ देवल यांचे दशकानुदशके गाजत आलेले नाटक ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटकदेखील इंग्रजी नाटककार मर्फीच्या ‘आॅल इन द राँग’ या नाटकावरून घेतलेले आहे.

विजय तेंडुलकरांचे ‘आधे अधुरे’ हे नाटक हिंदी नाटककार मोहन राकेश यांच्या ‘आधे अधुरे’ या नाटकावरून आलेले आहे. याशिवाय भारतीय भाषांवरून आलेली नाटकेही अनेक आहेत. गिरीश कर्नाड यांच्या कानडी नाटक ‘नागमंडल’वरून राजीव नाईक यांनी ‘नागमंडल’ मराठीत आणले, तर गिरीश कर्नाड यांचे ‘तलेदंड’ हे कानडी नाटक उमा कुलकर्णी यांनी मराठीत आणले. वि. वा. शिरवाडकर यांनी ‘आनंद’ या हिंदी चित्रपटावरून ‘आनंद’ हे मराठी नाटक आणले होते. अरविंद देशपांडे यांनी बादल सरकार यांच्या ‘एवम इंद्रजीत’ या बंगाली नाटकाचे ‘एवम इंद्रजीत’ या नावाने मराठीत रूपांतर केले होते. प्रायोगिक रंगभूमीवर आणि स्पर्धांमधून ते नाटक खूप चालले. याशिवाय बादल सरकार यांच्या ‘बाकी इतिहास’चे रूपांतरही मराठीत अरविंद देशपांडे यांनी केले होते.


मराठीतील तमाम नाटककारांनी इंग्रजी, रशियन, फ्रेंच, जर्मन, ग्रीक रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांना मराठीत आणण्याचे फार मोठे काम अत्यंत कौशल्याने केलेले आहे. त्या तुलनेत मराठीत असलेली अस्सल मातीची नाटके मात्र अन्य भाषांत गेलेली नाहीत, पण परकीय भाषांमधील नाटकांचे भाषांतर,रूपांतर करताना जो शब्दांचा कस लावून आपल्या लेखकांनी ती अस्सल मराठीशी जुळवली आहेत त्याला तोड नाही. पाश्चिमात्य आणि परकीय भाषांमधून मराठीत नाटकांचे रूपांतर करण्याची परंपराही आपल्याकडे अनेक दशकांची आहे. शेकडो नाटके अन्य भाषांमधून गाजलेल्या लेखकांनी मराठीत आणलेली आहेत. त्या प्रत्येकाचाच उल्लेख इथे करणे शक्य नाही, पण त्यांनी केलेली कामगिरी तितकीच महत्त्वाची आहे हे नाकारता येणार नाही, पण आपली अस्सल मराठमोळी नाटकेही अन्य भाषेत कशी जातील यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: