मागच्या सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांचे कौतुक काय केले की, लगेच माध्यमांमध्ये ते भाजपात जाणार का?, अशा चर्चांना उत आला. हा पोरकटपणा आहे. लोकशाही संकेत माहिती नसल्याचा तो परिणाम आहे. विरोधक असणे म्हणजे शत्रू नाही, तर दुसरी बाजू तपासून घेणारी ती यंत्रणा असली पाहिजे, पण राहुल गांधींच्या काँग्रेसने विरोधासाठी विरोध आणि विरोधकांचे सगळेच चुकीचे हाच अजेंडा राबवल्यामुळे त्यांच्यात तेवढे मोठेपण नाही; पण ही संस्कृती जुन्या काँग्रेस नेत्याची नव्हती की, भाजपची नव्हती. मोदींनी मोठेपणाने आझाद यांचे मोठेपण मान्य करून कौतुक केले, तर लगेच त्याचे गैर अर्थ काढणे चुकीचे आहे. आज त्यांच्याबाबत काँग्रेसचे गुलाम की भाजप मित्र आझाद या भावनेतून पाहिले जात आहे, हे चुकीचे आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते असलेले आझाद ४१ वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यातील जवळपास २८ वर्षांपासून संसदीय राजकारणात आहेत. कधी ते लोकसभेत, तर कधी राज्यसभेत होते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री अशा अनेक जबाबदाºया त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या; मात्र आपल्या निरोप समारंभात केलेल्या भाषणामुळे आपण काँग्रेस पक्षातील अन्य नेत्यांपेक्षा वेगळे असल्याचे आझाद यांनी दाखवून दिले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझा जन्म झाला. पाकिस्तानात मी कधीही गेलो नाही, त्या देशाची स्थिती पाहिल्यानंतर हिंदुस्तानी मुस्लिम असल्याचा मला अभिमान वाटतो, असे प्रत्येक भारतीयाची मान उंचावी, असे राष्ट्रवादी उद्गार त्यांनी काढले; पण अशी भाषा वापरणे हे काही भाजपची मक्तेदारी नाही किंवा त्यामुळे लगेच ते भाजपात जाणार अशी चर्चा करणेही चुकीचे आहे. पण मोदींनी आझाद यांचे केलेले कौतुक काँग्रेसजनांना आवडले नाही. त्यादिवशी सभागृहात सर्वच जण गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे बोलत होते आणि आझाद यांचे कौतुक करत होते. मग ते राष्ट्रवादीत जातील, शिवसेनेत जातील असे कोणाला वाटले नाही; पण मोदींनी कौतुक केल्यावर मात्र ते भाजपात जातील या चर्चा सुरू झाल्या. विरोधकांचे कौतुक करणे चुकीचे आहे, हा कसला संदेश यातून माध्यमे देत आहेत? केवळ विरोधासाठी विरोध करायचा ही प्रवृत्ती चांगली नाही. आपल्याकडे यापूर्वी अटलजींनी इंदिरा गांधींचे केलेले कौतुक, नेहरूंनी अटलजींचे केलेले कौतुक हा इतिहास असताना तोच प्रकार आजकालच्या काळात घडला, तर लगेच त्याचा वेगळा अर्थ कसा काय काढला जातो?
वास्तविक आझाद यांनी आपल्या भाषणात जी भावना व्यक्त केली, त्याची आज देशाला नितांत गरज आहे. या देशातील प्रत्येक मुस्लिमाने स्वत:ला हिंदुस्तानी मुस्लिम म्हटले, तर आपल्या देशातील अनेक समस्या चुटकीसारख्या सुटतील. पाकिस्तानची सद्य:स्थिती पाहिल्यानंतर भारतातील विशेषत: जम्मू-काश्मीरमधील मुस्लिमांना पाकिस्तानबद्दल एवढे प्रेम का वाटते, याचे उत्तर अद्याप मिळू शकले नाही. पाकिस्तानचे गोडवे गात मुस्लिमांनी आपल्या अनेक पिढ्यांचे नुकसान करून घेतले. किमान आतातरी गुलाम नबी आझाद यांच्या भाषणाने त्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि त्यांनी स्वत:ला हिंदुस्तानी मुस्लिम जाहीर करून टाकले पाहिजे. याचे कौतुक न करता हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करणारे काँग्रेसी राजकारण जोपासले जात आहे, हे वाईट आहे. त्यामुळे आझाद यांच्यावर लगेच भाजपशी जवळीक असल्याचे संशयाने पाहिले जाते आणि लगेच त्यांना पत्रकार प्रश्नही विचारतात. हा पोरकटपणा म्हणावा लागेल. खरे तर आज काँग्रेस पडीच्या काळात पक्ष सावरण्यासाठी आझाद यांच्यासारखे लोक महत्त्वाचे आहेत. आझाद यांच्यासारख्या नेत्याला काँग्रेसने राज्यसभेची आणखी एक संधी द्यायला हरकत नाही; पण काँग्रेस त्यांना अशी संधी देईल, याची शक्यता आता कमी वाटत आहे. आझाद यांनी लोकसभेत यावे, असे एकेकाळी काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटत होते, तेव्हा त्या नेतृत्वाने त्यांना विदर्भाच्या वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. वाशीममधून आझाद विजयीही झाले होते. याचाच अर्थ, नेतृत्वाच्या मनात असेल, तर ते कुणाला कुठूनही निवडून आणू शकते आणि मनात नसेल तर अनेक कारणे समोर करू शकते. पण गुलाम नबी आझाद काँग्रेस पक्षातील गट-२३चे सदस्य आहेत. या २३ सदस्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षात सर्व स्तरावर संघटनात्मक निवडणुका घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे घराणेशाहीच्या जोरावर चाललेल्या काँग्रेसमध्ये आता आझाद यांचे खच्चीकरण करून त्यांना भाजप मित्र म्हणून शिक्का मारला जात आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांचा दुरूपयोग करून घेतला जात आहे.
यामुळे आझाद काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहातून या २३ नेत्यांसह बाजूला पडल्याचे चित्र निर्माण झाले. यातील काही नेत्यांनी नंतर पुन्हा पक्षाच्या नेतृत्वाशी जुळवून घेतले, त्याचा त्यांना फायदाही झाला. पक्षाला योग्य सल्ला देणे म्हणजे पक्षनेतृत्वाला आव्हान देणे असा होत नाही, पण आजकाल तसा अर्थ काढला जातो, हे दुर्दैवी आहे. आझाद यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी या गांधी घराण्यातील तीन नेत्यांसोबत काम केले. याचा त्यांना जसा फायदा झाला, तसेच काही वेळा नुकसानही झाले. आझाद पुन्हा राज्यसभेत परत येऊ शकतील का, हा मोठा प्रश्न आहे. कारण, आझाद यांना राज्यसभेत परत आणण्यासाठी काँग्रेस पक्षाजवळ कोणतेही राज्य आणि सोबत इच्छाशक्तीही आज शिल्लक नाही. कारण त्यांची भाजपशी जवळीक असल्याचे भासवले जात आहे. हा शिक्का काँग्रेसला एक विचारवंत, चांगली भूमिका गमावण्यावर बसणार आहे हे पण लक्षात आलेले नाही हे विशेष.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा