नाटक हे एक प्रकारचे काव्य असते. त्यामुळे यातील संवादफेक करताना एक प्रकारची गेयता असली पाहिजे हे अभिप्रेत असते. त्यामुळेच आपल्याकडे नाटकातून चांगले संवाद, टाळी देणारे संवाद असले पाहिजेत ही प्रथा होती. कालांतराने ती प्रथा मागे पडली, पण स्वगत, शब्दांचा चांगला वापर, अलंकारिक भाषा ही नाटकाची एक शैली होती. आजकाल विनोदी आणि प्रहसनात्मक नाटकांत ती प्रथा मागे पडली, पण नाटकांतील शब्दबंबाळ संवाद हे एक भाषेच्या समृद्धीचे लक्षण होते.
राम गणेश गडकरी यांच्या नाटकात असे शब्दसामर्थ्य प्रचंड पहायला मिळायचे. त्यानंतर आचार्य अत्रे यांच्या नाटकात असे शब्दबंबाळ संवाद असायचे. बाळ कोल्हटकर यांची नाटके ही अशीच शब्दबंबाळ आणि गेयता असलेली असायची. नाटकात चांगली स्वगते असली पाहिजेत यासाठी नाटककार परिश्रम घेत असत. ‘एकच प्याला’ या नाटकात सुधाकर, तळीराम यांची सुंदर स्वगते आहेत. सुधाकराचे शेवटचे स्वगत नीट ऐकले आणि वाचले, तर आयुष्यात कोणी दारू पिणार नाही, पण या नाटकांना विषय आणि आशयापेक्षा संगीताने पराभूत केले आणि त्याचा उद्देश मागे पडला. दारूचा रंग लाल का आहे हे सांगताना यात सुधाकरच्या तोंडी जो शब्दबंबाळ संवाद आहे त्यात म्हटले आहे की, या दारूमुळे अनेक महिला विधवा झाल्या. त्यांच्या कपाळाच्या लाल कुंकवाला या दारूने प्यायल्याने हा लाल रंग आलेला आहे. अशी भयानकता या संवादातून देण्याची किमया शब्दबंबाळ नाटकातच असते. गडकरींनंतर शब्दबंबाळ नाटके लिहिण्याचे धाडस फारसे कोणी केले नाही. कानेटकरांच्या नाटकात एखादे स्वगत असायचे, पण त्यांनी संवादाला जास्त महत्त्व दिले.
पण बाळ कोल्हटकर यांची नाटके मात्र शब्दबंबाळ आणि भाषेचे सौंदर्य दाखवणारे असायचे. ते शब्दोच्चार ऐकण्यासाठी म्हणून लोक नाटकाला पुन्हा पुन्हा जात असत. ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ तर अशा शाब्दिक सौंदर्याने भरलेले नाटक. मैल्याचा वास लांबवरूनही येतो, पण मोगºयाचा वास घेण्यासाठी फूल नाकाला लावावे लागते. चांगल्या, वाईटातील फरक सांगण्यासाठी केलेली ही शाब्दिक जुळवाजुळव कटू सत्य अशी आहे. काही सज्जन कोणी दुर्जन/तरुण कोणी, कुणी वृद्ध पण/ या सर्वांनी विविध गुणांनी/जशी घडवली, तशीच घडली/ आयुष्याची जुडी...वाहतो ही दुर्वांची जुडी. या नंतर स्वगतं, मनाची कबुली देत दिलेले संवाद ऐकणाºयाला आनंद देतात तितकेच काळजाला घरेही पडतात. कारण हा सुभाष हा नायक कुठेतरी आपल्याच आसपास असतो. हे नाटक आपल्या शेजारीपाजारी, आसपास किंवा कदाचित आपल्याच घरात घडतंय असं वाटत असतं. सुभाष हा जन्मानं आलेला गुन्हेगार नाही, पण योग्य संगती नसल्याने वाया गेलेला हुशार मुलगा आहे. त्याची काव्यप्रतिभा आणि निरागसवृत्ती ही आपण सतत कुठेतरी पाहत असतो असे नाटक पाहताना वाटते. त्यामुळे या शब्दबंबाळ नाटकातील संवाद अत्यंत अंगावर येतात.
महाराष्ट्राचा छोटा गडकरी अशीच ख्याती बाळ कोल्हटकरांची होती. त्यामुळे त्यांनी गडकरींच्या भाषेत, शैलीतच सगळी नाटके लिहिली. गडकरींना गुरूच मानून त्यांनी ही लेखणी चालवली. गडकरींच्या नाटकाला गडकरी पंचाक्षरी म्हणून ओळखले जात होते. पुण्यप्रभाव, एकच प्याला, प्रेमसंन्यास, राजसंन्यास अशी त्यांनी सगळी पाच अक्षरी नाटके लिहिली होती, तर बाळ कोल्हटकर यांनी कोल्हटकर नवाक्षरी सुरू केली. त्यांची सगळी नाटके ही नऊ अक्षरी होती. नऊ अक्षरी नावाची त्यांची सगळी नाटके चालली. यात ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘सीमेवरून परत जा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘देणाराचे हात हजार’, ‘वेगळं व्हायचंय मला’, ‘एखादी तरी स्मित रेषा’, या नाटकांचा उल्लेख करावा लागेल.
ही सगळी नाटके शब्दबंबाळ होती. शब्दांचा चांगला वापर त्यात केलेला असायचा. अलंकारिक सुशोभित अशी भाषा होती. नाटकाची अशी खास भाषा होती. वास्तव किंवा समांतर नाटकांचा वास त्या नाटकांना लागलेला नव्हता. त्यामुळे यातील संवादफेक करताना कलाकाराचा कस लागायचा. टाळी देणारी वाक्य हमखास निर्माण झालेली असायची. त्यामुळे अभिनेत्याला काम करतानाही वेगळा आनंद होता. भाषाच नाट्यमय होती. ‘काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छंती धीमताम’ म्हणतात तसं एखादं दीर्घ काव्य वाचावे तसे शब्दबंबाळ नाटकांचे असायचे. आजकाल शब्दबंबाळ नाटके लिहिली जात नाहीत. मोठे संवाद लिहायला नाटककारांची प्रतिभा आटली आहे. कलाकारांना पाठांतराला वेळ नाही, प्रेक्षकांना ऐकायची सवय नाही. कारण मोबाइलमधली चॅटिंगची शॉर्टकटची भाषा ज्यांना समजते त्यांना शब्दबंबाळ नाटकातील सौंदर्य समजेलच असं नाही.
वसंत कानेटकरांनी आपल्या काही नाटकांत अशी गेयता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बदलत्या काळानुसार आणि आवडीनुसार त्यांनी तो मोह नंतर आवरलेला दिसतो. तरीपण त्यांनी आपल्या ऐतिहासिक नाटकात या शब्दबंबाळतेचा भरपूर वापर केलेला दिसून येतो. यामध्ये मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? असा छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून आवाज आल्यावर सगळेजण पुढचा संवाद पूर्ण ऐकण्यासाठी श्वास रोखून धरायचे. आचार्य अत्रेंनी आपली शाब्दिक किमया ही विनोदाच्या मार्गाने नेली. त्यामुळे ‘लग्नाची बेडी’मध्ये त्याची झलक दिसते. यात सामर्थ्य हे पुरुषांचे सौंदर्य आहे, तर सौंदर्य हे स्त्रियांचे सामर्थ्य आहे अशी सहजता त्यांनी जपत टाळ्या घेणारे, शाब्दिक कोट्या करणारे संवाद लिहिले होते, पण ही किमया सर्वांना जमेलच असे नसते. किंबहुना आधुनिक प्रेक्षकांना काय पचनी पडेल ते लिहायचे असा कल सुरू झाला आणि प्रेक्षकांची अभिरुची वाढवण्यापेक्षा त्यांना साधे साधे देण्याची प्रथा रुजली. त्यामुळे शब्दबंबाळ नाटके लिहिणे थांबले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा