सत्तेसाठी आणि सत्यासाठी नेमका काय निर्णय घ्यावा हे न समजल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक भांबावून गेल्याचे दिसते. आज जे दिल्लीच्या सीमेवर चित्र दिसत आहे, ते वेदनादायी असेच आहे. आपल्याच लोकांविरोधात लढावे लागणे यांसारखे दुसरे दु:ख नाही. हे तर नवे महाभारत म्हणावे लागेल. म्हणजे, दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाºया शेतकºयांच्या संबंधात केंद्र सरकारने आता त्यांची चारही बाजूने नाकाबंदी करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. मोठमोठी बॅरिकेट्स टाकून त्यांचा संपर्क तोडला जात आहे. रस्त्यावर चक्क खिळे ठोकून तिथून कोणतेही वाहन ये-जा करणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. रस्ते खणले जात आहेत, सीमांवर तारांचे पक्के कुंपण टाकून आंदोलकांना बाहेर पडता येणार नाही आणि तेथे कोणाला येताही येणार नाही, अशी व्यवस्था केली जात आहे. हे कुरूक्षेत्रावरचे नवे महाभारतच आहे काय?
तशातच शेतकºयांची वीज, पाणी आणि इंटरनेट बंद करून त्यांची पूर्ण कोंडी केली जात आहे. तेथील स्थितीचे जे फोटो बाहेर आले आहेत ते भीषण आहेत. हे सगळे पाहिल्यानंतर एखादे सरकार आपल्याच देशातील नागरिकांविरोधात इतके कू्ररपणे कसे वागू शकते, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही; पण विरोधकांद्वारे भडकावून शेतकरी आंदोलनाचा मार्ग अवलंबला जात असेल, त्यांच्या हिताचे त्यांना समजत नसेल तर काय होणार? आज या युद्धात आपण विनाकारण सरकारविरोधात लढत आहोत, हे समजणारे अनेक द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य असतील. पण सत्य झाकून सत्तेच्या मोहापायी विरोधासाठी विरोध करण्यासाठी शेतकºयांचा वापर केला जात आहे, हे सर्वात भयंकर आहे. महाभारताच्या युद्धात निरपराध सैनिकही मारले गेले. ते त्यांच्या राजांच्या हट्टापायी मारले गेले. आज जे शेतकरी तिथे मरत आहेत ते राजकीय नेत्यांच्या भडकावण्यामुळे मरत आहेत; पण विवश होऊन हे आंदोलन केले जात आहे. याचा शेवट सर्वांना माहिती आहे, तरीही हे आंदोलन सुरू ठेवलेले आहे. या कायद्यांची दीड वर्ष अंमलबजावणी होणार नाही, असे खात्रीने सरकारने सांगितले आहे. न्यायालयाने त्यात मध्यस्ती केलेली आहे. अर्थसंकल्पातही शेतकºयांना भरभरून दिलेले आहे. असे असतानाही हट्टाला पेटून आंदोलन सुरू केले आहे. तो प्रकार म्हणजे एकप्रकारे लादलेले हे नवे महाभारत युद्ध आहे. त्यामुळे आपलेच आपल्या लोकांविरोधात लढत आहेत. याचे दु:ख कोणाही सामान्य माणसाला झाल्याशिवाय राहत नाही. काँग्रेस आणि काही कडव्या पक्षांच्या हट्टासाठी शेतकºयांचा बळी दिला जात आहे, याचा विचार कोणी करत नाही त्यामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे.
दुसरीकडे शेतकरी आंदोलन चिघळवून ते दाबून टाकण्याचे या आधीचे फंडे यशस्वी न झाल्याने आता त्यांची फिजिकली कोंडी करून त्यांची जिरवायची, अशा नादात हे सरकार दिसते आहे आणि शेतकºयांच्या नेत्यांनीच तसा आरोप केला आहे. या रस्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात जवान आणि पोलीस तैनात केले गेले आहेत की, त्याचे समग्र फोटो पाहिल्यानंतर सरकार जवळपास शेतकºयांसाठी आता युद्धच करायला निघाले आहे काय, असे वाटल्याशिवाय राहत नाही. खरं तर या आधी अशी स्थिती नव्हती; पण २६ जानेवारीचा प्रकार झाल्यानंतर सरकारने शेतकºयांची कोंडी करण्याची ही नवीनच स्ट्रॅटेजी आखलेली दिसते आहे. त्याचे संसदेतही पडसाद उमटले आहेत. शेतकºयांची नाकेबंदी करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर जितकी दक्षता घेतली गेली आहे, तितकी दक्षता चीनच्या सीमेवर घेतली असती, तर चीनने पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत भारतीय हद्दीत घुसखोरी केली नसती, असेही टोमणे विरोधकांकडून सरकारला ऐकवले गेले आहेत. त्यातून सरकारकडून नमती भूमिका घेतली जाण्याऐवजी शेतकºयांची अधिकाधिक कोंडी कशी होईल, याच्याच उपाययोजना तेथे वाढीव प्रमाणात करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे दिसते आहे; पण हे जे चालले आहे ते वेदनादायी असेच आहे. सर्वस्व संपेपर्यंत, तुटेपर्यंत ताणण्याचा प्रकार शेतकºयांनी करता कामा नये. खरोखरच आपले हित यात आहे की नाही, याचा अभ्यास केला पाहिजे. अधिवेशनात विरोधकांनी चर्चेसाठी वेळ दिला आहे. इतके सगळे असतानाही विरोधक शेतकºयांची ढाल करून त्यांना मारायला आंदोलन सुरू ठेवण्यास भाग पाडत आहेत, हे अत्यंत वाईट आहे. कदाचित सरकार नमते घेत हे कायदे रद्दही करेल; पण नंतर त्याचा फायदा सरकार उठवल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की. त्यामुळे काहीही झाले तरी याचा फायदा भाजप सरकारला होणार आहे हे नक्की. शेतकºयांची दुरावस्था झाली, तरी हे कायदे रद्द करावे लागल्यामुळे विरोधक काँग्रेसने तुमचा घात केला असा प्रचार करणे त्यांना शक्य होणार आहे. कायदे आणले तर त्याचे लाभ मिळाल्यामुळे शेतकºयांना सरकारला पाठिंबा देण्याची वेळ येईल. या दुहेरी कोंडीत काँग्रेस अडकल्यामुळे शेतकºयांच्या कोंडीकडे लक्ष वेधण्याचा प्रकार होत आहे; पण हे एक प्रकारे नवे महाभारत आहे.
महाभारत युद्धात पांडवांचा विजय झाला असला, तरी त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते. त्यामुळे या शेतकºयांवर विजय मिळवून सरकारला काय मिळणार आहे याचाही विचार केला पाहिजे. कौरवांनाही सर्वस्व गमवावे लागले होते याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे. सीमेच्या आत सीमाबंदी हा प्रकारच वाईट आहे. दिल्लीची ही झालेली रणभूमी आज साक्षात नवे महाभारत घडवत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा