मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

बाबा कामाला बाहेर पडले


वर्षानुवर्षाचे यांत्रिक आयुष्य झाले होते. सकाळी लवकर उठायचे. आंघोळपाणी करायचे. डबा घ्यायचा, ७:३५ ची लोकल पकडायची. अंबरनाथ ते सीएसएमटी प्रवास दोन तासांचा. सीएसएमटीपासून पुन्हा आॅफिसपर्यंत चालत जायचे. या घाईगडबडीत १० च्या काट्यावर घरी पोहचायचे. आॅफिसची आठ तासांची ड्युटी झाल्यावर पुन्हा धकाधकीच्या गर्दीच्या लोकलने ६:२५ची लोकल पकडायची. घरी येईपर्यंत ८:३० वाजायचे. मग जेवायचे आणि लगेच झोपायचे.

मुलांना हीच सवय लागली होती. रविवारी दिवसभर दिसणारे बाबा एरवी सकाळी ७ ला घरातून बाहेर पडतात आणि रात्री उशिरा येतात. रविवारी फक्त त्यांच्याशी बोलायची संधी. पण त्यात ते टीव्ही पाहणार, आठवड्याची भाजी, काही किरकोळ कामे करणार, कुणाकडे कधीतरी जाणार. यात सुट्टी कधी संपायची हेच कळायचे नाही. त्यामुळे मुलांच्या दृष्टीने बाबा एक पैसे कमावणारे यंत्र झाले होते. बारा तास घराबाहेर जाणारे हे यंत्र महिनाअखेरीला पगार घेऊन येत. आपले सगळे खर्च भागवत आणि शांतपणे झोपत. मुलांनी फक्त बाबा आज शाळेची परीक्षा आहे. बाबा आज शाळेत स्नेहसंमेलन आहे. बाबा आम्हाला इतके मार्क मिळाले, बाबा आज हे घडले असे सांगायचे आणि बाबांनी निमूटपणे ऐकायचे थोडे चेहºयावर स्मितहास्य करायचे आणि छान म्हणून झोपी जायचे. सगळा कोरडेपणा होता आयुष्यात. काहीच जिवंत असे वातावरण नव्हतेच.


पण अचानक लॉकडाऊन आला आणि बाबा घरीच थांबले. रविवारचा एक सुट्टीचा दिवस असला, तरी बाबांची चीडचीड होऊ नये म्हणून धडपडणारी आई आता किती दिवस बाबा घरी आहेत म्हटल्यावर सगळेच घाबरून गेलेले. त्या दिवशी फक्त एक दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारला; पण दुसºया दिवशी पुन्हा २१ दिवसांचा बंद. बाबा आता २१ दिवस घरी. आईबरोबर असणारा मोकळेपणा आता दिवसभर राहणार नाही. मुलं चिंतेत होती.

पण या लॉकडाऊनमुळे बाबांमधील माणूस जागा झाला. नेहमी तणावात असणारे आॅफिस आणि घरच्या जबाबदाºयांमध्ये पिचलेले बाबा आज सुट्टीच्या दुसºया दिवशी एकदम फ्रेश दिसले. कधी नव्हे ते लवकर उठून मुलांच्या जवळ येऊन बसले.


‘काय पिंट्या? आता शाळेला सुट्टीच सुट्टी. आता बहुतेक परीक्षा सुद्धा होतील की नाही, शंकाच आहे.’ बाबा आपण होऊन बोलायला आले. अभ्यासाची, शाळेची चौकशी केली म्हणून मुलांना आणि मुलांच्या आईलाही आश्चर्यच वाटले; पण आज त्यांना घराकडे लक्ष देण्यासाठी थोडी उसंत मिळाली होती. त्यामुळे त्या कोरोनाचेही सगळ्यांनी आभारच मानले. कोरोनाने सोशल डिस्टन्स पाळायला सांगितले खरे; पण आपल्या घरातील मनाने दुरावलेली माणसं जवळ आली हेही तितकेच खरे होते.

या सुट्टीच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात बाबा पार बदलून गेले. आपले बाबा किती गुणकारी आहेत, गोड आहेत हे मुलांना समजले. त्यांच्यातील रसिकता मुलांना कळायला लागली आणि ही मुलं जी बाबांपासून लांब होती ती त्यांची मित्रच बनून गेली. घरातले वातावरण एकदम जिवंत झाले. घरात हसणे खिदळणे सुरू झाले. आई म्हणत होती पैसा नाही मिळाला तरी चालेल; पण हा आनंद कायम टिकावा.


कारण एरवी आईने केलेल्या स्वयंपाकाबाबत कधीही कसलीही प्रतिक्रिया न देता घाईगडबडीत जेवायचे आणि झोपायचे एवढेच करणारे बाबा आता जेवणाकडेही शरीर चालवणारे इंधन म्हणून न पाहता पूर्णब्रम्ह म्हणून पाहत होते. आईने पानं वाढली आणि मुलांना आणि बाबांना जेवायला बसायला सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, ‘तू पण बस ना आमच्याबरोबर. सगळे एकदम जेऊ आपण.’ खरंच कौटुंबिक सहभोजनाचा आनंदच संपुष्टात आला होता.

प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेळा, प्रत्येकाची वेगळी पंगत. सहभोजन असे नव्हतेच. आज बाबांनी आग्रह केल्यावर आई मुलांबरोबर जेवायला बसली. बाबांनी आईच्या हातच्या स्वयंपाकाची तारीफ केली. मुलांना कौतुकाने सांगत होते,


‘बरं का पिंट्या तुझ्या आईच्या हातची भरल्या वांग्याची भाजी खाण्यासाठी म्हणून तर हिच्याशी लग्न केलं’

‘इश्य काहीतरीच.. ’ आई लाजली तशी दोन्ही मुलांनी एकमेकांना डोळा मारला आणि हसली. ते हसणे बाबांच्या नजरेतून सुटले नाही. पिंट्या म्हणाला, ‘आयला दीदी, बाबांच्या आयटमला लाजता पण येते बरका’ अन् आईने पाठीत एक दणका घातला. पण आजचा दणका पाठीत बसला तरी त्याचे दु:ख नव्हते, घराला आनंद देणाराच तो दणका होता. सगळे हसत आनंदात जेवत होते. घराला घरपण आले होते. एरवी आवरलेले स्वच्छ घर असले, तरी त्यात जिवंतपणा नव्हता कारण घरातील माणसं यंत्रवत बनली होती. म्हणजे एखाद्या शोरूममधील पुतळ्याला साडी नेसवावी आणि तीच साडी जिवंत बाईला नेसवावी यात जो फरक होता तोच फरक इथे होता; पण या लॉकडाऊनने मुलांना त्यांचे बाबा मिळाले होते. ते त्यांचे मित्र बनले होते. आपल्या लहानपणच्या गोष्टी सांगत होते. आपल्या शाळेतल्या करामती सांगत होते. कोणत्या शिक्षकांना काय टोपणनावे ठेवली होती हे सांगत होते. सांगताना लहान होत होते.


एकेदिवशी तर बाबांनी कमालच केली. आज आपण आईला सुट्टी द्यायची. सगळी कामं आपण करायची असे सांगून इतका छान स्वयंपाक केला की, सगळ्यांना आश्चर्य वाटले. ‘बाबा तुम्हाला इतके छान कुकींग जमते? काय सॉलिड केला आहे हा रस्सा? वॉव... बाबा आता आॅफिस सुरू झाल्यावर संडेला तुम्हीच स्वयंपाक करत जा.’

‘नाही हं... आठवडाभर काम केल्यावर त्यांना रविवारी विश्रांती मिळायला हवी.’ मुलं गप्प बसली. पण बाबांनी या दिवसात काय केले नाही मुलांबरोबर? त्यांना एकेदिवशी दडपे पोहे करून दिले, त्यांच्याबरोबर पत्ते, व्यापार, कॅरम खेळले. क्रिकेटची चर्चा केली, सिनेमावर बोलले. आपल्यावेळच्या हिरॉइन कशा होत्या, आताच्या कशा आहेत यावरून सर्वांना खूश केले. ते चार-सहा महिने अगदी सुखाचे होते. आपण घरातून बाहेर पडत नाहीये, याची खंतही वाटेनाशी झाली होती. आपल्या कुटुंबात आहोत हा आनंद होता.


अन् त्या दिवशी लोकलसेवा सुरू झाली आहे. आता कामावर जाता येईल, अशी बातमी आली. बाबा दुसºया दिवशी कामाला बाहेर पडले. निघताना आनंदात होतेच; पण प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. बाबांचे वेगळे रूप पाहायला मिळाले याचे ते अश्रू होते. आनंदाचे अश्रू होते. बाबा बाहेर पडले म्हणजे आपल्या घरातला आनंदच घेऊन गेले, असे भाव मुलांच्या मनात आले. आता पुन्हा ते यांत्रिक बाबा बघायला मिळणार आणि हा आनंद परत मिळणार नाही याचे दु:खही होते; पण जे काही सोनेरी दिवस चार-सहा महिने मिळाले त्यासाठी मुलं म्हणाली, थँक्यू लॉकडाऊन, आम्हाला आमचे बाबा कळले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: