भारतीय जनता पक्षाचे लढवय्ये, आक्रमक नेते रविवारी सिंधुदुर्गात आले होते. त्यांचा येथे गृहमंत्री असा उल्लेख न करता भाजप नेते असाच करण्याचे कारण ते गृहमंत्री म्हणून नाही, तर भाजप नेते म्हणून नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आम्ही कमरा बंद चर्चा करत नाही, खुल्या मैदानात चर्चा करतो, कोणताही शब्द दिलेला नव्हता वगैरे वगैरे.
हे सगळं खरं-खोटं देव जाणे, देवेंद्र जाणे; पण प्रश्न पडतो तो इतकाच की, हे सगळं सांगायला अमित शहांना सव्वा वर्ष का लागली?
म्हणजे अमित शहा किंवा भाजपचे नेते म्हणतात तसे हा युतीला कौल होता, हे मान्य आहे; पण त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केल्यावर नकार देणारे फक्त महाराष्ट्रातील नेतेच होते. आमच्या जागा जास्त आहेत, आमचा मुख्यमंत्री होणार हा फॉर्म्युला आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे जाहीरपणे फक्त महाराष्ट्रातलेच नेते बोलत होते. त्यावेळी जे. पी. नड्डा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नव्हते. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद अमित शहांकडेच होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राकडे भाजपने, अमित शहांनी दुर्लक्ष कसे काय केले? त्यावेळी त्यांनी मौन राखले आणि आता सव्वा वर्षानी तोंड कसे काय उघडले?
त्यावेळी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी मध्यस्ती केली असती, तर कदाचित युती तुटली नसती. मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असती, चर्चा केली असती तर आज कदाचित भाजपचा मुख्यमंत्री झाला असता; पण तेव्हा सव्वा वर्षापूर्वी कसलीही प्रतिक्रिया दिली नाही, अमित शहा काय बोलतात, नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष असताना त्यांनी काहीच वक्तव्य केले नव्हते; मात्र अचानक नारायण राणे यांच्या कार्यक्रमाला आल्यावर यावर त्यांनी तोंड उघडले हे थोडे संशयास्पद वाटते.
त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चाही नव्हती. फक्त शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे हा विषय होता. उद्धव ठाकरे हे पक्ष चालवण्यात खूश होते, शिवसेनाप्रमुखांप्रमाणे त्यांना पक्ष मोठा करायचा होता. फक्त शिवसैनिक मुख्यमंत्रीपदावर असावा अशीच ते अपेक्षा करत होते. मुख्यमंत्रीपदाची धुरा महाविकास आघाडी तयार झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी घेतली, कारण तिन्ही पक्षांचे या नावावर एकमत झाले म्हणून. भाजपसोबत जर शिवसेनेचा मुख्यमंत्री करायची वेळ आली असती, तर कदाचित दुसरे नाव पुढे आले असते, कारण ठाकरे कुटुंबीयांना त्या पदाची अपेक्षा नव्हती. असे असताना अमित शहा त्यावेळी काहीच कसे बोलले नाहीत. त्यामुळे हा हट्ट देवेंद्र फडणवीस यांचा होता. अमित शहा आणि मोदींचे ते ऐकत नाहीत, असा समज सर्वांचा झाला. अमित शहा यांच्या त्यावेळी गप्प बसण्यामुळे स्पष्टपणे झाले होते की, त्यांनी बंद कमºयात चर्चेत तसा शब्द दिलेला होता; पण आता फडणवीस यांच्या हट्टामुळे ते काहीच बोलत नाहीत. दिलेला शब्द फडणवीस पाळत नाहीत, म्हणून ते मूग गिळून गप्प आहेत. यात फडणवीस यांची नाचक्की केली गेली.
सगळ्या देशाला आश्चर्य वाटत होते की, छोटी छोटी राज्य तडजोडी करून उचापात्या करून भाजप मिळवत असताना महाराष्ट्रासारखे मोठे राज्य भाजपने कसे काय गमावले? पण त्यावेळी अमित शहा पक्षाचे अध्यक्ष असतानाही काहीच बोलले नाहीत. देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या वाºया करत होते; पण त्यावर त्यांनी काहीच स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळे असा शब्द दिला असणारच; पण आता भाजप शब्द फिरवत आहे, असा समज संपूर्ण महाराष्ट्राचा झाला. त्यावेळी जर अमित शहांनी तोंड उघडले असते, तर खूप फरक पडला असता. आम्ही असा कोणताही शब्द दिला नव्हता, शिवसेनेचा हा हट्टीपणा आहे, आम्ही सत्ता सोडू; पण मुख्यमंत्रीपद देणार नाही, असा बाणेदारपणा अमित शहांनी दाखवला असता, तर आज जी भाजपची नाचक्की होत आहे, तशी नाचक्की झाली नसती.
एकूणच बंद कमरा, वचन याबाबत भाजपची भूमिका संशयास्पद आहे. याला आणखी बळकटी कालच्या वक्तव्याने मिळाली आहे. भाजप आणि नारायण राणे यांनी जरी शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्याला विश्वासार्हता नाही. याचे कारण सव्वा वर्ष अजिबातच यावर तोंड उघडले नव्हते. ते नेमके आजच का उघडले गेले? शेवटी रिक्षा ही तीन चाकीच असते. त्यामुळे हे सध्याचे सरकार तीनचाकी रिक्षा जरी असले, तरी त्याचा बॅलन्स योग्य त्या चालकाच्या हातात आहे. त्यामुळे अमित शहांच्या येण्यापूर्वी नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य खरे ठरण्याची शक्यता बिल्कुल नाही. अमित शहांच्या पायगुणाने हे सरकार कोसळेल, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी केले होते; पण त्यांचा पायगुण असा की, ज्या दिवशी यायचे त्याच्या एक दिवस उशिरा ते आले. कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलावा लागला. त्यातून पायगुण वगैरे शब्द या पुरोगामी महाराष्ट्रात चालत नाहीत. उलट नारायण राणे जिथे जातात तिथली सत्ता पुन्हा येत नाही, असेच चित्र आहे. १९९९च्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून मनोहर जोशींना हटवले आणि शिवसेनाप्रमुखांनी मराठा मुख्यमंत्री असला, तर जादा जागा येतील, पुन्हा सत्ता येईल, म्हणून राणेंना मुख्यमंत्री केले; पण शिवसेनेची सत्ता त्यावेळी गेली. काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेसची घसरण झाली. त्यामुळे पायगुण नेमका काय आहे हे महाराष्ट्र समजला आहे; पण अमित शहा सव्वा वर्ष गप्प का बसले हा अनुत्तरीत प्रश्न कायम राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा