निवडणूक आयोगाने शुक्रवारी पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यात सर्वात लक्षवेधी निवडणूक असणार आहे ती पश्चिम बंगालची निवडणूक. ८ टप्प्यांत घेतल्या जाणाºया या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न साकार होणार का, हा उत्सुकतेचा विषय आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन मोठे पक्ष आहेत. या दोन पक्षांना पश्चिम बंगालमध्ये शिरकावर करता आलेला नाही. २४ वर्ष डाव्यांची सत्ता उलथवून तृणमूल काँग्रेसने २०१२ला सत्ता हस्तगत केली. काँग्रेसची मदत घेतली; पण काँग्रेसला शिरकाव करू दिला नाही. अशा परिस्थितीत भाजप गेल्या सहा महिन्यांपासून तिथे ज्या आक्रमकपणे पावले टाकत आहे ते पाहता भाजपला जास्त जागा मिळतील यात शंकाच नाही. शिरकाव चांगल्या प्रकारे तिथे भाजप करणार हे नक्कीच. ममता बॅनर्जींच्या तृणमूलचे अनेक आमदार भाजपकडे वळलेले आहेत. म्हणूनच या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्य राज्यातील निवडणुकांचे तेवढे आकर्षण नाही; पण प. बंगालकडे मात्र देशाचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमधील गुंडगिरी, दहशतीचे वातावरण, नक्षलवादी वातावरण पाहता ८ टप्प्यांत या निवडणुका घेतल्या जात आहेत हे योग्यच आहे. त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार कमी होतील, पोलीस बळ योग्य ठिकाणी वळवणे सोपे जाईल; पण भाजपला रोखण्यासाठी तिथे सर्व विरोधी पक्ष एक होऊन आघाडी तयार करतात का, हाही उत्सुकतेचा भाग असेल.
पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपविरोधात तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात का, हे पहावे लागेल. अर्थात ज्या डाव्यांना ममता बॅनर्जींनी बाजूला केले, त्यांच्याशी त्या हातमिळवणी करणार का हा प्रश्न आहेच. अर्थात ममता बॅनर्जी या संधीसाधू आहेत. त्या वेळ येईल त्याप्रमाणे संधी साधत असतात. एनडीएमध्ये वाजपेयी सरकारमध्ये त्या रेल्वेमंत्री होत्या. नंतर पुन्हा यूपीएमध्ये गेल्या. मागच्या निवडणुकीत डाव्यांना हरवण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली. त्यामुळे आता भाजपला रोखण्यासाठी डावे आणि काँग्रेस दोघांनाही त्या बरोबर घेतील यात शंका नाही. भाजपचा विजयरथ थांबवण्यासाठी या तिनही पक्षांची एकजूट होऊ शकते. भाकप (माले)चे महासचिव दीपंकर भट्टाचार्य यांच्या सूचनेवर गांभीर्याने लक्ष दिलं, तर पश्चिम बंगालमध्ये वेगळं चित्र दिसू शकतं; मात्र पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षाच्या नेत्यांची वागणूक पाहिली, तर डाव्या नेत्यांनी बंगालमध्ये सर्वपक्षीय एकजूट विरोधी भाजप अशा चित्रावर केव्हाच पाणी सोडल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप विरोधी आघाडी हा फॉर्म्युला यशस्वी होताना दिसतो आहे. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर तो फॉर्म्युला यशस्वी केला गेला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाºया निवडणुका लक्षात घेता, दीपंकर भट्टाचार्य यांच्या विधानाने बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. डाव्या पक्षांनी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला नंबर एकचा शत्रू मानून निवडणुकीची रणनीती आखली पाहिजे. यासाठी गरज पडल्यास तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी शक्य आहे, असे भाष्य दीपंकर भट्टाचार्य यांनी केले होते. आता ते शक्य होईल का हे पहावे लागेल. अर्थात त्यावेळी दीपंकर भट्टाचार्य यांच्या सूचनेला डाव्या पक्षांनी स्पष्ट नकार दिला आहे, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे. याचा अर्थ ममता बॅनर्जींनी भाजपचा धसका घेतलेला आहे. भाजप विरोधी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी त्या या प्रस्तावाचे स्वागत करणे स्वाभाविक आहे; पण हे प्रत्यक्षात येणार का, हे येत्या काही दिवसांत दिसून येणार आहे; मात्र भाजपने प. बंगालमध्ये हवा निर्माण केलेली आहे. ती नुसती हवाच राहते का त्याची लाट निर्माण होते, हे २ मेच्या निकालादिवशीच कळेल. पण भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) नेते दीपंकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये डाव्या पक्षांनी १९ पैकी १२ जागांवर विजय मिळवला. बिहारमध्ये डाव्या पक्षांना यश मिळालं असलं, तरी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांचे नेते निवडणुकीचं हे नवं मॉडेल मानण्यासाठी अजिबात तयार नाहीत. डाव्या पक्षांचे अध्यक्ष विमान बसू सांगतात, बंगालचं एक वेगळं मॉडेल आहे. या राज्यात बिहार मॉडेलचा वापर करण्याची गरज नाही. त्यामुळे काँग्रेसला कोणाचाच आधार नसल्याने ती तृणमूल बरोबर जाईल आणि मिळेल ते पदरात पाडून घेईल; पण डाव्यांबरोबर तृणमूलच्या वाटाघाटी तशा अवघड आहेत. म्हणूनच येत्या काही दिवसांत जोरदार उलथापालथ बघायला मिळेल हे नक्की.
पश्चिम बंगालमध्ये भाजप फार मोठा जुगार खेळेल, असे दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी ज्या प्रकारे शक्तिप्रदर्शन केले आहे त्यावरून त्यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झालेली आहेच. भाजपने बंगालमध्ये २०० जागांचे लक्ष ठेवलेले आहे. त्यासाठी लाट निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न जोरदार आहेत. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पश्चिम बंगालवर भरपूर उधळण केल्याची टीकाही विरोधकांनी केली होती. त्यामुळे प. बंगालमध्ये मतदार सजगपणे मतदान करून भाजपच्या बाजूला जाणार की, पारंपरिक दंडेलशाहीने नक्षलवादी ताकदीवर मतदारांवर दबाव टाकून काही गैरप्रकार होणार का, हे पहावे लागेल. प. बंगालबरोबरच तामिळनाडू आणि केरळमध्येही निवडणुका आहेत. भाजपने तिथे सध्या तरी कंबर कसलेली नाही. दक्षिणेत शिरकाव करणे सोपे नाही. त्यामुळे तिथे घुसण्यासाठी भाजपला अजून काही वर्ष वाट पहावी लागेल; पण म्हणूनच बंगालकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.