देशातील सर्वात पुरोगामी राज्य कोणते?, तर महाराष्ट्राचे नेते लगेच अभिमानाने छाती पुढे काढतात; पण पुरोगामी म्हणजे नेमके काय? केवळ चार-दोन लोक महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे आहेत, म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पुरोगामी झाला म्हणायचे काय?, इतके पुरोगामी लोक महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, तरीही पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक प्रश्नांना तोटा नाही. स्त्रीभ्रूण हत्या, सामाजिक बहिष्कार, स्त्रियांवरील वाढते अत्याचार आदी प्रश्नांमध्ये आता वाढत्या घटस्फोटांची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेली आकडेवारी ही अत्यंत धक्कादायक अशी आहे, म्हणजे शिक्षण आणि सुशिक्षतता आली म्हणजे घटस्फोटाचे लायसन्स मिळाले काय?, वयाच्या तिशीतील तरुणांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक गोष्टींवरून मोडीत निघणारे संसार व वाढत्या कौटुंबिक अस्थिरतेचे कोणालाच गांभीर्य नाही, म्हणूनच भारतीय परंपरा ही घटस्फोटांची नाही, तर नांदण्याची आहे. लग्न करण्याबरोबर लग्न टिकवण्याचा संस्कार करण्याची वेळ आता आली आहे.
काही दिवसांपूर्वी नागपूरमधील कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशकाने न्यायालयातील गेल्या १५ वर्षांतील खटल्यांचा अभ्यास केला. त्यानुसार २५ ते ३५ वयोगटातील विवाहितांचे सर्वाधिक घटस्फोट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुटुंब व्यवस्था मोडीस निघणे ही काही चांगली बाब नाही. हा पुरोगामीपणाही नाही. आज शहरी भागात घटस्फोटाचा वेग जास्त आहे. आधुनिकतेचा आग्रह धरणाºया तरुण पिढीतील वाढते घटस्फोट हा सामाजिक चिंतेचा विषय व्हायला हवा. शेती व्यवसायातील जोडप्यांच्या घटस्फोटाचे प्रमाण अवघे २ टक्केच आहे ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब आहे.
लोकांना वाटते की, घटस्फोट फक्त दोघांचा झाला. त्यामुळे नवरा-बायको यांचेच आयुष्य उद्ध्वस्त झाले, पण घटस्फोटामुळे दोन जीव नाही तर दोन कुटुंबे उद्ध्वस्त होत असतात. मुलगा आणि मुलगी दोघांच्याही भविष्याचा प्रश्न निर्माण होत असतो. लग्न ही तडजोड असते. सगळंच आपल्या मनासारखे झाले पाहिजे, असा अट्टाहास करून चालत नाही एवढी समज शिकल्या सवरलेल्या माणसांमध्ये नसते ही दुर्दैवाची बाब आहे.
म्हणजे शिक्षण वाढले, पण शहाणपण पुरेसे वाढले नाही, असाच प्रकार होताना दिसतो. अधिक शिक्षित म्हणजे अधिक अहंकार असे चित्र दिसू लागले आहे. परिणामी क्षुल्लक कारणांवरून पती-पत्नीत मतभेद वाढले. खटके उडू लागले. प्रेमाऐवजी वैरभावना वाढू लागली, म्हणून घटस्फोटही वाढले. सहमतीने काडीमोड घेणारेही कमी नाहीत. गेल्यावर्षी आमिर खानने किरण रावशी घटस्फोट घेतला की, त्याचे अनुकरण अनेकांनी केले. हे कोणत्या सभ्यतेत बसते?
आजकाल प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अधिक मिळवण्याचा हव्यास वाढला आहे. विभक्त कुटुंबे वाढली. पती-पत्नी दोघेही अधिक मिळवण्याच्या आशेने नोकरी व कामधंदा करू लागली. त्यातून कौटुंबिक जीवनात नवे ताणतणाव निर्माण झाले. परस्परांत गैरसमज वाढू लादले. वाढत्या घटस्फोटांनी कौटुंबिक जीवन अस्थिर बनत आहे. कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत; मात्र सर्वत्र आर्थिक प्रगतीला वेग आल्यामुळे कुटुंब व्यवस्थेला बसणाºया हादºयाकडे कुणाचेच लक्ष नाही.
भारतीय संस्कृतीचा उदोउदो करणारे अखंड भारताची स्वप्ने पाहत आहेत. अफगाणिस्तानापासून पाकिस्तान, नेपाळ, ब्रह्मदेश आणि श्रीलंकेसह भारताचा विस्तार करण्याची स्वप्ने दाखवणारे पायाखाली काय जळते आहे, याकडे मात्र सर्वस्वी दुर्लक्ष करत आहेत. अखंड भारताचा गजर करण्यासाठी लाखोंचे मेळावे भरवणाºयांनी समाज स्वास्थ्याच्या विचाराला प्राधान्य दिले नाही, तर कुटुंबसंस्थेचा कडेलोट कदाचित देशाला पाहावा लागेल. कुटुंब टिकले, तर समाज टिकेल. समाज टिकला तर राष्ट्र टिकेल. समाज धुरिणांनी वेळीच वाढत्या विवाहच्छेदांना आळा घालण्याचा विचार गांभीर्याने करावयास हवा. हा धोका टाळण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करणाºया सर्वांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतीय उच्च संस्कृती ही सहजीवनाची आहे. वसुधैव कुटुंबकम पद्धती म्हणता-म्हणता आपल्याला आपलेच कुटुंब, लग्न टिकवता येत नसेल, तर कसला अभिमान आपण सांगणार आहोत? कुटुंब, घर, लग्न टिकवता येत नसेल, तर शिक्षणाला तरी अर्थ काय आहे? त्यामुळे वाढते अत्याचार, वाढती व्यसनाधिनता या रोगांना बळी पडण्याचा प्रकार होत आहे. यावर कुठे तरी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन तोडगा काढला पाहिजे. लग्न टिकवण्याचे संस्कार करणारी संस्था निर्माण होण्याची आज गरज आहे.
तू म्हणशील तसं हे नाटकाचं नाव म्हणून ठिक असलं, तरी प्रत्येक गोष्टीत तू म्हणशील तसं हे शक्य नसतं. पण याचा अर्थ घटस्फोटापर्यंत गोष्ट गेली पाहिजे, असे नाही. त्यासाठी एकमेकांचे विचार समजून घेणे आणि तडजोड नाही, तर नवा विचार स्वीकारला असे समजून परस्परांच्या मतांचा आदर केला, तर संसार टिकतील. घटस्फोट आणि वेगळं होणं हा काही पर्याय असत नाही. ती एक पळवाट आहे. एकमेकांना समजून घेणे हे महत्त्वाचे आहे. अनेकवेळा मुलीच्या माहेरच्यांचा मुलीच्या सासरी अनावश्यक हस्तक्षेप असतो. त्यामुळे सासरी मुलीच्या आईने केलेल्या ढवळाढवळीने संसार मोडल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे चित्र बदलले पाहिजे. मुलीचे लग्न झाले, आपली जबाबदारी संपली. तिला तिचा संसार करू दे. भांडू दे नवºयाशी, सासूशी पण याचा अर्थ तिने परत आले पाहिजे असे नाही. घरात आई-मुलीचे कधी भांडण होत नाही का?, बाप लेकाचे भांडण होत नाही का?, मग सासू आणि नवºयाशी मतभेद झाल्यावरच घटस्फोट कसा काय होतो?, किरकोळ कारणाने होणारे घटस्फोट थांबवून लग्न टिकवण्याचे संस्कार करण्याची गरज समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
7/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा