दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ही एक आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. खरंतर जे खºया अर्थाने भारतरत्न होते त्यांचा सन्मान या निमित्ताने होणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते. ते नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यामुळे खºया अर्थाने ते स्वतंत्र भारताचे भारतरत्न आहेत.
स्वातंत्र्य लढ्यात नेताजींचे योगदान आणि प्रभाव इतका मोठा होता की, जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते, तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी ओडिशामधील कटक शहरात झाला. लहानपणी, सुभाषजी कटकमध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकत होते. या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाष यांच्यातील सुप्त देशभक्ती जागृत केली. वयाच्या १५व्या वर्षी, सुभाषचंद्र बोस हे गुरूच्या शोधात हिमालयात गेले होते. गुरूचा हा शोध असफल राहिला. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांना गुरूस्थानी मानले.
महाविद्यालयात शिकत असताना, कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत, म्हणून सुभाषबाबूंनी महाविद्यालयात संप पुकारला होता. भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले, परंतु इंग्रज सरकारची चाकरी करण्यास नकार दिला. त्यानंतर कोलकात्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने ते प्रभावित झाले. रवींद्रनाथ टागोर यांच्या सल्ल्यानुसार ते सर्वप्रथम मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. गांधींजीनी देखील कोलकात्याला जाऊन दासबाबूंबरोबर काम करण्याचा सल्ला दिला, मग सुभाषबाबू कोलकात्याला आले व दासबाबूंना भेटले. दासबाबू बंगालमध्ये असहकार आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू या आंदोलनात सहभागी झाले.
दासबाबू कोलकात्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले, तेव्हा कोलकात्यातील रस्त्यांची इंग्रजांची नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली. त्यानंतर सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. गांधीजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता; मात्र सुभाषबाबूंना पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. त्यानंतर कोलकात्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते, तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधीजींनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली, परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्द करावी ही मागणी गांधीजींनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती की, याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधीजींनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा; पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधीजींना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आली. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधीजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. युरोपमधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले. १९३८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले; पण गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. याच सुमारास युरोपात दुसºया महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की, इंग्लंडच्या कठिण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत या दिशेने पावले टाकण्यास सुरुवातही केली होती. गांधीजी या विचारसरणीशी सहमत नव्हते. त्यामुळे गांधींचा सततचा विरोध सहन करून काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सुभाषबाबूंनी फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्यासाठी जनजागृती सुरू केली. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. दुसरे महायुद्ध सुरू असताना, तुरुंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी सुभाषबाबूंनी तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले, तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली; पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले. नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले. आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंधींना भरती केले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झांसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली. आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहन त्यांनी केले. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुँगा असा नारा दिला. जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. १८ आॅगस्ट, १९४५ च्या दिवशी नेताजी कसे व कुठे बेपत्ता झाले, तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुत्तरीत रहस्य बनले आहे. १९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान करण्यात आले होते, परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे, असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे. देशाचे खºया अर्थाने रत्न असलेल्या व्यक्तीचा गौरव अशाप्रकारे कोणा याचिकाकर्त्याच्या याचिकेने काढून घेणे ही अशा देशभक्ताशी केलेली गद्दारीच आहे, परंतु नेताजी सच्चा देशप्रेमींच्या मनातील तुमचे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
23/1/22
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा