काही वर्षांपूर्वी दादा कोंडके यांनी पळवापळवी नावाचा व्यंगात्मक चित्रपट काढला होता. त्यात जसे प्रत्येक जण दुसºयाचे पळवायला पाहतो, तसेच आज बहुतेक राजकीय पक्षांचे होताना दिसत आहे. आपला पक्ष विचाराने वाढवण्यापेक्षा दुसºयाचा पक्ष फोडून वाढवण्याचे पळवापळवीचे तत्व सध्या जोपासले जात आहे. अर्थात कोणत्याही निवडणुका आल्या की, या झाडावरचे कावळे त्या झाडावर उडून जातात त्याप्रमाणे या पक्षातून त्या पक्षात जाणारे असतात. सर्वच राज्यात हा प्रकार आहे. भाजपचे काही आमदार, मंत्री समाजवादी पक्षाने फोडल्यावर उत्तर प्रदेशात या पळवापळवीला आणखी वेग आला. समाजवादी पक्षाने आपले नेते पळवल्याचा राग भाजपला आल्याने त्यांनी मुलायम यांच्या सुनेलाच आपल्या कळपात ओढले. गोव्यातही अशी फोडाफोड सुरू आहे.
विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, पक्ष उमेदवार निवडण्यात गर्क आहेत. आपल्या पक्षात कोणी मिळाला नाही, तर दुसºया पक्षांतून त्यांची आयात केली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक आमदार, मंत्री समाजवादी पक्षात गेले. त्यामुळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना तर झटका बसलाच; पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही बोलती बंद झाली होती. आता काय करायचे हा प्रश्न पडला होता. भाजपमधून आलेल्या सर्वांचे समाजवादी पक्षाचे सध्याचे मुख्य अखिलेश यादव यांनी समारंभपूर्वक जंगी स्वागत केले. लगेचच त्या सर्वांविरुद्ध कोरोनाचे नियम तोडल्याबद्दल स्थानिक प्रशासनाने गुन्हा दाखल केला, मात्र त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपला आनंदी होण्याची संधी मिळाली ती अपर्णा यादव यांच्या रूपाने. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या अपर्णा या धाकट्या सुनबाई. त्यामुळे अपर्णा यादव यांचे स्वागत करण्यास स्वत: पक्षाध्यक्ष नड्डा, आदित्यनाथ आदी उपस्थित होते.
अर्थात ही पळवापळवी भाऊबंदकीतली किंवा सवतीमत्सरातली आहे. कारण अखिलेश व प्रतीक हे सावत्र भाऊ आहेत. अपर्णा प्रतीक यांच्या पत्नी आहेत. त्यांना प्रथमपासून राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. २०१७ मध्ये लखनऊ कँटोन्मेंट मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. तेव्हा स्वत: मुलायम यांनी आपल्या छोट्या बहुसाठी प्रचार केला होता. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या रीटा बहुगुणा जोशी यांनी अपर्णा यांचा पराभव केला होता. अपर्णा यांनी अनेकदा मोदी व भाजपचे कौतुक केले आहे. समाजवादी पक्षाची व कुटुंबाची सत्ता गेल्यानंतर त्यात वाढ झाली. आदित्यनाथ ज्या बिश्त समाजाचे आहेत त्याच समाजाचे अपर्णा यांचे माहेर आहे. त्यांचा भाजपविषयीचा ओढा त्यातून अधिक स्पष्ट होतो. त्यामुळे त्या आता भाजपच्या माहेरवाशिण झाल्या आहेत. अर्थात जर समजा अखिलेश यांना सत्ता मिळाली, तरी त्यात आपले स्थान काय असेल? हा प्रश्न त्यांना सतावत असेल. कौटुंबिक मालमत्तेतही अखिलेश यांच्यापेक्षा प्रतीक यांचे स्थान बरेच कमी असल्याचे बोलले जाते. अखिलेश सध्या आपली पत्नी डिंपल, काका किंवा वडील यांनाही फार प्रकाशात आणणे टाळत आहेत. मुलायमसिंहांपेक्षा आपली प्रतिमा वेगळी निर्माण करण्याचे प्रयत्न मागच्या दोन निवडणुकांपासूनच त्यांचे चाललेले आहेत. त्यामुळे या पळवापळवीचा त्यांना तसा फार धक्का बसलेला नाही. जेवढी भाजपची हानी झालेली आहे त्याप्रमाणात समाजवादी पक्षाची झालेली नाही, पण हे पळवापळवीचे राजकारण आता देशभर सुरू आहे.
अपर्णा यादव यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट आहे. सध्या भाजप समाजवादी पक्षापेक्षा थोडाच पुढे आहे असे काही पाहण्यांचे मत आहे. त्यामुळे याच दोन पक्षांत ये-जा सुरू आहे. तिकडे उत्तर प्रदेशात काँग्रेसला कोणी विचारतही नाही. पण गोव्यात वेगळे चित्र आहे. पक्षांतर घडवून तेथे भाजपने सत्ता मिळवली; पण ऐन निवडणुकीपूर्वी भाजपचे मंत्री, आमदार काँग्रेसमध्ये जात आहेत. एकजण तर तृणमूल काँग्रेसमध्ये गेले व चार दिवसांत परतले. पंजाबातही एक आमदार भाजपात गेले व सहा दिवसांत स्वगृही परतले. हे सर्व प्रकार समारंभपूर्वक होतात हे विशेष आहे. त्यामुळे या पळवापळवीच्या राजकारणात विचारांना सगळ्याच पक्षांनी तिलांजली दिलेली दिसते.
ज्या पक्षात आपण अनेक वर्षे काढली, ज्या विचारसरणीचा पुरस्कार केला, त्याच्यापेक्षा वेगळ्या किंवा विरुद्ध विचारांच्या पक्षात, ज्या पक्षाविरुद्ध आपण पूर्वी लढलो त्या पक्षात ही माणसे सहज प्रवेश करतात. पटले नाही की बाहेरही पडतात. बºयाचदा उमेदवारी न मिळणे हे पक्षांतराचे कारण असते, मात्र त्याला विचारधारेचा मुलामा दिला जातो. आपण हे जनहितासाठी करत आहोत हा तर राजकीय नेत्यांचा लाडका व जुना दावा आहे. अमुक एका पक्षात असल्याबद्दल जनतेने निवडून दिले असताना पक्षांतर केल्याने जनहित कसे साधले जाते? हा प्रश्न कोणी त्यांना विचारत नाही. सर्व पक्ष सध्या निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष लक्षात घेतात. स्वत:ला वेगळा म्हणवणारा आप देखील त्यातलाच. सत्तेची चव आणि नशा वेगळीच असते. ती मिळवण्यासाठी पक्षफोडीचा हा खेळ चालूच राहातो. सध्या गोव्यात आम आदमी पार्टी, काँग्रेस सगळेजण उत्पल पर्रिकरांना आपल्याकडे आणण्याचा, पळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता या पळवापळवीत कोण यशस्वी ठरतो हे दोन दिवसांत समजेल. पण पळवापळवीचे राजकारण हा पक्ष मोठा करण्याचा निकष ठरत आहे, तिथेच पक्षांची वैचारिक बैठक संपुष्टात आल्याचे स्पष्ट होत आहे.
22/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा