नाशिकला झालेल्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महिनाही पूर्ण झालेला नसतानाच आता ९५व्या साहित्य संमेलनाची घोषणा करण्यात आलेली आहे. ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यांचे नाव सुरुवातीपासून चर्चेत आघाडीवर होते. त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चितच मानली जात होती. लातूरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे.
कोरोनाच्या दुसºया लाटेमुळे गतवर्षी नाशिक येथे होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलत ढकलत ते वर्षाअखेरीला घेण्यात आले. या संमेलनाला डॉ. जयंत नारळीकरांसारखे दिग्गज विज्ञान साहित्यिक अध्यक्षपदी लाभूनही त्यांचा काहीच फायदा झाला नाही. ते संमेलनालाही येऊ शकले नाहीत. तर केवळ राजकीय आखाडा अशाप्रकारे ते साहित्य संमेलन उरकले.
आता यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष चालता-बोलता हवा, अशी अपेक्षा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी नाशिकच्या संमेलनात व्यक्त केली होती. ती अपेक्षा लगेच उदगीरच्या संमेलनात पूर्ण झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी रविवार उदगीर येथे महामंडळाची बैठक होती. या बैठकीत प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या नावावर अध्यक्ष पदासाठी एकमताने शिक्कामोर्तब झाला आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर या महामंडळाच्या तीन घटक संस्थांनी अध्यक्षपदासाठी जी नावे सुचवली आहेत, त्यात सासणे यांचे नाव एक सारखे होते. याशिवाय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या मनातील नावही सासणे हेच असल्याने तेच अध्यक्षपदी निवडले जातील, अशी साहित्य वर्तुळातही चर्चा होती. सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती. मुंबईच्या संस्थेने भारत सासणे व प्रवीण दवणे यांची नावे सुचविल्याची माहिती समोर आली होती. तर, छत्तीसगडच्या संस्थेने अनिल अवचट यांचे नाव पुढे केले आहे, तर पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून जी तीन नावे महामंडळाला पाठवण्यात आली आहेत त्यात सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे होती. याआधीचे लागोपाठ तीन संमेलनाध्यक्ष निवडताना महाराष्ट्र साहित्य परिषदेने जे नाव सुचवले तेच अंतिम झाले होते. यावेळीही पुण्याच्या यादीत सासणे यांचे नाव होतेच. त्यामुळे सासणे यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होते. अर्थात गेल्या चार वर्षांपासून अध्यक्ष पदाची निवडणूक न होता त्याची निवड होत आहे, ही तरी समाधानाची बाब आहे. कारण पाच वर्षांपूर्वी त्या साहित्यिकांच्या प्रचारयात्रा, संपर्क यात्रा, मतदान आणि वाद याला मराठी वाचक कंटाळला होता. त्यामुळे ही निवड होणे हे चांगले आहे. आता भारत सासणे यांच्या रूपाने चालते-बोलते अध्यक्ष संमेलनाला मिळाले आहेत. त्यामुळे आगामी साहित्य संमेलन चालते का, पळते हे पहावे लागेल. पण या निवडीसाठी भारत सासणे यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
भारत सासणे हे मराठी कथाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचा जालना येथे जन्म झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते. त्यांच्या कथांमधून व्यक्त होणारे जीवनानुभव हे नावीन्यपूर्ण, असांकेतिक, गूढगहन व चमत्कृतिपूर्ण असतात, पण त्यांचे वास्तवाशी घट्ट अनुबंध जुळवलेले असतात. त्यांच्या कथांतून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेक पदरी चित्रण करणाºया त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात. कित्येकदा या कथांतून गंभीर, शोकाकुल, व्यामिश्र भावजीवनाचा विलक्षण अस्वस्थ करणारा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात.
विशेष म्हणजे काही कथांतून मुस्लीम संस्कृतीच्या छायेत जगणाºया मराठवाड्यातील शहरांचे व व्यक्तींचे सखोल, तपशीलवार चित्रण आढळते. त्यांच्या कथनशैलीत कथाशयाला अनुरूप अशा अन्वर्थक प्रतिमा, प्रतीके, तरल काव्यात्मता, गूढ चमत्कृती अशा अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ साधलेला दिसतो. त्यामुळे या अध्यक्ष पदासाठी एक चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व लाभले आहे. त्यांच्याकडून काही नवे प्रयोग ९५व्या संमेलनात पाहायला मिळतात का, हे पहावे लागेल.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\
3 /01/ 2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा