मराठा साम्राज्य १६३० ते १८१८ दरम्यान भारतातील एक मोठे साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले होते. या साम्राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, तसेच याला हिंदवी स्वराज्य असेही म्हणतात. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबविरुद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या लढायांमुळे साम्राज्याचा विस्तार वाढला. १६८०मधील महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षांच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या, मात्र १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची हत्या केली. स्वराज्यात काही काळ अस्थैर्य माजले, सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव यांसारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांचे वंशज जरी राज्य करत असले, तरी पंतप्रधान असलेल्या पेशव्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सीमा वाढविल्या. पेशवे हे एक उत्कृष्ट सेनानी होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्य अधिक विस्तार पावले. या दरम्यानच्या काळात मराठी राजधानी रायगडावरुन साताºयात कशी आली आणि सातारा ही राजधानी कशी झाली याबाबतची माहितीही तितकीच महत्वाची आहे. आज १२ जानेवारी हा राजधानी साताराचा वर्धापन दिन आहे. आई जिजाऊंच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून याच मुहूर्तावर राजधानी साताराची उभाणरी छत्रपती शाहू राजे यांनी केली.
छत्रपती संभाजीराजेंचे पुत्र म्हणजे छत्रपती शाहूराजे भोसले (पहिले). छत्रपती शाहूराजे भोसले (१८ मे १६८२ ते १५ डिसेंबर १७४९) हा त्यांचा महत्त्वाचा कार्यकाल होता. भारताचा इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्त्वपूर्ण ठसा त्यांनी उमटवला. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला. सातारा हे त्याकाळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले. मध्य भारत, उत्तर भारत, माळवा, गुजरात हे महाराष्ट्राबाहेरील प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले, मुघल साम्राज्याचा अस्त होऊन मराठा साम्राज्याचा झेंडा भारतभर फडकला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझम नामक मुलाने शाहूंची सुटका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले; मात्र चौथाई व सरदेशमुखीसाठी १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. छत्रपती शाहूराजे यांनी १२ जानेवारी, १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्द केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्रमी माणसे निवडून राज्यविस्तार केला. या कामी त्यांना बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे पेशवे आणि कान्होजी आंग्रे, रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वत:हून वसूल करावे आणि त्याबदल्यात मोगल मुलखाचा बंदोबस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रुपये खंडणी द्यावी आणि १५,००० फौज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी; तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कब्जात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी, असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली; तथापि मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता, म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर युद्धाची तयारी केली, तेव्हा सय्यद हुसेन अली वरील करारानुसार मराठ्यांची फौज घेऊन दिल्लीला गेला. त्यासोबत बाळाजी विश्वनाथ, राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, सरसेनापती खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते. हे सर्व सैन्य यथावकाश फेब्रुवारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तुरुंगात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छ. शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कैदेत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सुटका करण्यात आली. शाहू महाराजांनी साताºयात १२ जानेवारीला राजधानी स्थापन केली आणि त्यामुळे सातारा ही नगरी शाहुनगरी म्हणूनही ओळखली जाते. तो आजचा दिवस मराठी इतिहासातील महत्वाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी आईसाहेब जिजाऊंचाही जन्मदिवस असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिक आहे.
बिटवीन द लाईन्स/ प्रफुल्ल फडके
9152448055\\
12/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा