मराठी रंगभूमीवर किर्लोस्कर नाटक मंडळी, खाडीलकर नाटक मंडळी, गंधर्व मंडळी अशी जी काही ख्यातनाम घराणी तयार झाली, त्यात अलीकडच्या काळातील आणि तसे म्हटले, तर शेवटचेच घराणे म्हणजे शिलेदार कुटुंबीय. शिलेदार कुटुंबाने खºया अर्थाने उतरत्या काळात मराठी रंगभूमी सावरली आणि त्यातील एक अखेरचा दुवा म्हणजे कीर्ती शिलेदार. शनिवारीच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांच्या संगीत नाटक सेवेचा आलेख डोळ्यांपुढे उभा राहिला. संगीत नाटक मागे पडत असताना त्याची कीर्ती वाढवणाºया शिलेदार कुटुंबातील कीर्ती म्हणजे खºया अर्थाने रंगभूमीची कीर्ती वाढवणाºया त्या शिलेदार होत्या.
संगीत रंगभूमी गाजवणाºया कीर्ती शिलेदार कालवश झाल्या. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला हे त्यांचे वैशिष्ट्य होते. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली होती. १९७०च्या दशकात ओहोटीला लागलेल्या संगीत रंगभूमीला नवा चेहरा देण्याचे काम शिलेदार मंडळींनी केले होते. त्यापैकी कीर्ती हे एक फार मोठे रत्न होते.
संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. अशा ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार कीर्ती शिलेदार आज आपल्यातून निघून गेल्या आहेत. कीर्ती शिलेदार या संगीत नाटकांतील गायनाकरिता विशेष ओळखल्या जात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई होते. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहेत. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. आपल्या आई, वडिलांचा संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी कीर्ती आणि पैशांचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत.
रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वत:चे आगळे स्थान निर्माण केले होते. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी स्वर, ताल, शब्द संगती या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. विदेशात त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवल्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात, त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झाले आहेत.
संगीत रंगभूमी पुन्हा जोमाने बहरून येईल, असा विश्वास त्या नेहमी व्यक्त करायच्या. २०१८ साली पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. यावेळी हा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता आणि त्या कायम आशावादी होत्या. कायम प्रसन्न चेहºयाने सकारात्मक विचार करण्याने त्यांच्या गायनातून एक सकारात्मक सूर येत असे. १९७० नंतर संगीत नाटकाला अवकळा आली होती. त्यातील तोचतोचपणाला प्रेक्षक कंटाळला होता. सामाजिक, विनोदी नाटकांचा, प्रहसनांचा सुकाळ सुरू झाल्याने संगीत नाटकाचा प्रेक्षक कमी झाला होता. तेच पडदे, सोळा वर्षांची नायक-नायिका जुनाट मळकट कपडे घातलेले वृद्ध कलाकार अशी अवस्था झाल्याने संगीत रंगभूमीला अवकळा आली होती. मराठी संगीत नाटकाचे काय होणार, असा प्रश्न असताना शिलेदार कुटुंबीयांनी या नाटकांना संजिवनी दिली. त्यात तरुण अशा कीर्ती शिलेदारांचे योगदान मोठे होते. त्यावेळी ही सेवा घडली नसती तर आज जुन्या संगीत नाटकांचा ठेवा नव्या पिढीपुढे आला नसता. कारण या पिढीने रेकॉर्डप्लेअर, रेडीओ, टेपरेकॉर्डर, सीडी, व्हीसीडी अशी सर्व बदलांची साक्ष केलेली आहे. त्यामुळे हा ठेवा आता जतन करण्याची ऊर्जा शिलेदारांकडून मिळाली. त्यामुळे आजकाल विविध वाहिन्यांवरील संगीत कार्यक्रम, रिअॅलिटी शोमधून तरुण मुले नाट्यगिते गाताना दिसतात. हा विश्वास कीर्ती शिलेदारांच्या पिढीने तो ठेवा जतन केल्यामुळे आलेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कीर्ती शिलेदार यांना २०१४ सालचा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. अशा या कीर्ती शिलेदार यांच्या जाण्याने संगीत रंगभूमीला पुनरुजीवीत करणाºया घराण्यातील एक महत्त्वाचा दुवा नाहिसा झालेला आहे, पण त्यांनी केलेली कामगिरी मात्र चिरंतन राहील, त्यांची कीर्ती नावाप्रमाणेच कायम राहील हीच त्यांना श्रद्धांजली.
23/1/22
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा