गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

न भरकटलेली मालिका गाथा नवनाथांची


कोणतीही पौराणिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक मालिका आली की, तिचे भरकटणे हे प्रेक्षकांच्या दृष्टीने त्रासाचे ठरते. आजवर प्रत्येक वाहिन्यांवर अपरिहार्यपणे पौराणिक, अध्यात्मिक मालिका सातत्याने येत असतात, पण या मालिकांचे कथानक गुंफताना मुख्य कथानक, त्यातला उद्देश सोडून काल्पनिक कथानके जोडण्याचे इतके प्रकार होतात की, त्या मालिकेमध्ये नको त्या गोष्टीचे उदात्तीकरण केले जाते, पण मालिका विश्वात आजपर्यंतच्या इतिहासात सोनी मराठीवरील एकमेव मालिका गाथा नवनाथांची ही अशी मालिका आहे की, ती अजूनही भरकटलेली नाही, तर पूर्णपणे कथानकाशी प्रामाणिक राहूनही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. याचे कारण निर्माता-दिग्दर्शक आणि कलाकारांचा यातील प्रामाणिक प्रयत्न.


नवनाथ संप्रदायावर मालिका बनवणे तसे अवघडच होते, पण त्याचा अभ्यास आणि त्यातील नेमकेपण दाखवणे सोपे नव्हते, पण नाथ संप्रदायाचा उद्देश, शिकवण हे तत्व खºया अर्थाने ही मालिका पोहोचवते. यापूर्वी स्टार प्रवाहवर दत्त संप्रदायावर दीपक देऊळकर यांनी एक मालिका आणली होती, पण त्यातील दत्त हे तत्वज्ञान सोडून मालिका दाखवायला सुरुवात केली आणि ती इतकी भरकटली की, त्यात गुरूदेवदत्त ऐवजी ती अलिफ लैला किंवा अरेबियन नाइट मधल्या कथांसारखी मालिका झाली. हे प्रेक्षकांना पटण्यासारखे नव्हते, त्यामुळे ती मालिका गुंडाळावी लागली. पौराणिक आणि अध्यात्मिक मालिका बनवताना अभ्यास असावा लागतो, त्याशिवाय काहीही पुढे रेटता येत नाही, याचे प्रत्यंतर दीपक देऊळकर यांना आल्याशिवाय राहिले नसेल.

सात वर्षांपूर्वी महेश कोठारे यांची जय मल्हार ही मालिका तुफान चालली, पण त्यातही प्रचंड भरकटलेला भाग होता, पण महेश कोठारेंची निर्मिती यंत्रणा एकूणच चमत्कृतीपूर्ण असल्यामुळे दे दणादण, थरथराट आणि झपाटलेला यातील प्रकारांप्रमाणेच ती मालिका हिट झाली. त्यातील भक्तीभाव कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे एकाचवेळी झी मराठीवर बानू, खंडोबा आणि म्हाळसा आणि गुरुनाथ, राधिका, शनाया या माझ्या नवºयाची बायकोसारख्या मालिका झाल्याचे जाणवत होते.


कलर्स मराठीवर जय जय स्वामी समर्थ मालिका गेले वर्षभर गाजत आहे, पण त्यातही अनेक अतर्क्य गोष्टी आणि काल्पनिकता दाखवून विनाकारण स्वामी समर्थांच्या नावावर काही प्रसंग खपवले जात आहेत, असे वाटते. स्वामी समर्थ प्रत्यक्षात कसे होते यापेक्षा ते असेच होते हे दाखवण्यासाठी चाललेला आटापिटा मनोरंजक आहे, पण अध्यात्मिक पातळीवर तो फसलेला प्रयोगच ठरताना दिसत आहे. यात काळाचे कुठेही भान नाही. याचे कारण तीन महिन्यांपूर्वी चांदुलीला महाराजांनी पुढचे पंधरा दिवस तू मला भेटायचे नाहीस, असे सांगितले आहे. ती जवळजवळ तीन महिने धडपडते आहे, पण अजून पंधरा दिवस पूर्ण झालेले नाहीत. या पंधरा दिवसांत काय-काय घडून गेले आहे. गोदावरी मुकुंदाचे महिनाभराचे वास्तव्य, लग्नाची गडबड, अनेक कथानकं झाली, पण अजून चांदुलीचे पंधरा दिवस पूर्ण झाले नाहीत. हे संकलन अतर्क्य झाल्यामुळे मालिका भरकटलेली आहे, पण या सर्व पार्श्वभूमीवर कथानक आणि सर्वच बाबतीत प्रामाणिक राहिलेली अध्यात्मिक मालिका म्हणजे गाथा नवनाथांची.

मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात आलेले असले, तरी ते फसलेले नाहीत. ते आदेश म्हणून तिथे आलेले आहेत. त्यांची पूर्णपणे निष्ठा ही नाथ संप्रदायावरच आहे, हे ज्याप्रकारे दाखवले आहे आणि त्यांचा स्त्री राज्यातील मैनावतीबरोबरचा व्यवहार पाहता कुठेही मच्छिंद्रनाथांची अवहेलना झालेली नाही, हे महत्त्वाचे. साधारणपणे नवनाथांच्या कथा वाचल्यावर प्रत्येकाला एवढेच माहिती की, स्त्री राज्यात ते फसले. पण ते फसले नाहीत, तर शंकराचा, गुरूचा आदेश, रामाची इच्छा पूर्ण करणे आणि हनुमानाला दिलेले वचन यासाठी ते तिथे गेलेले आहेत. पण आपल्याला सोडवण्यासाठी आपला प्रिय शिष्य येणार आहे, या विश्वासावर ते तिथे गेले आहेत. हे ज्याप्रकारे दाखवले आहे, त्यावरून खºया अर्थाने नाथसंप्रदाय निर्माता दिग्दर्शकाला कळला आहे, हे जाणवते. कुठेही काल्पनिकतेला थारा न देता, काळाचा अभ्यास करून योग्य वेळी योग्य कथानक पुढे सरकताना दिसत आहे, हे या मालिकेचे यश आहे. सहा-सात महिन्यांत या मालिकेने इतकी छान उंची गाठली आहे की, पौराणिक मालिका अशाप्रकारे असावी हे दाखवण्यास ही टीम यशस्वी झाल्याचे दिसते.


गोरक्षनाथांची तपश्चर्या पूर्ण होणे, त्याचे स्वागतासाठी संपूर्ण कैलास येणे, शंकराचे गणांना त्याचे दर्शन होणे यातील भव्यता अतिशय सुंदर होती. त्याचप्रमाणे श्री गोरक्षनाथ हे साक्षात शंकराचे प्रतिरूप आहेत, हे दाखवण्यासाठी महादेवांनी पार्वतीला दिलेला दृष्टांत आणि त्याचवेळी योगमायेने मच्छिंद्रनाथांना त्याचे होणारे दर्शन अतिशय सुरेख आहे. नाथ संप्रदायातील तिसरा नाथ म्हणजे गहिनीनाथ. बाल गोरक्षनाथांच्या हातातून तयार झालेला हा नाथ आता मोठा झालेला आहे, पण तो स्वत:ला शोधतो आहे. ही त्यांची घुसमट आणि आता दिक्षेची आलेली वेळ हे ज्याप्रकारे दाखवले आहे, तो कथाक्रम अतिशय सुयोग्य पद्धतीने बांधलेला दिसतो. त्याचवेळी जालंधर नाथांपर्यंत आपला निरोप पाठवण्याची केलेली व्यवस्था हे अतिशय चांगल्या प्रकारे घेतलेले आहे. मैनावतीच्या मनातील दु:ख, भानामतीच्या काळ्या कारवायांना मच्छिंद्रनाथांनी दिलेली समज हे अतिशय योग्यप्रकारे दाखवले आहे. त्यामुळे ही मालिका आता आणखी लोकप्रिय होईल यात शंकाच नाही.

प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा


9152448055\\

6//1/2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: