गुरुवार, २० जानेवारी, २०२२

हवेतले गोळीबार


माणसानं एकतर करिअर करावं किंवा राजकारण करावं. हवं तर राजकारणात करिअर करावं; पण करिअरमध्ये राजकारण करू नये. नेमकं हेच लक्षात न आल्यामुळे अभिनेता किरण माने अडचणीत आला. चर्चेत राहून काही साध्य होते का, हे पाहण्याचा प्रयत्न केला; पण त्यातून जे बुमरँग आज त्याच्यावर उलटले आहे, ते फार वाईट झाले. त्याच्या कारकिर्दीला, करिअरला आणि त्याच्यातील कलाकाराला ते मारक ठरलेले आहे. आपल्या कोणत्या पोस्टमुळे भाजपने दबाव आणून आपले काम काढून घेतले हे किरणने पुराव्यानिशी सांगावे अथवा हे हवेतले गोळीबार थांबवावेत.


किरण मानेला मी लहानपणापासून ओळखतो. अगदी सातारला सातारा पॉलिटेक्नीकमध्ये शिकत असताना कॉलेज गॅदरींगसाठी केलेली पहिली एकांकिका त्याला मी दिली होती. त्या स्क्रीप्टचं नाव होतं, सायलेन्स... खटला चालू हाय.... त्यातील शिरस्तेदाराची सुंदर भूमिका करताना त्याला प्रेक्षकांची जी वाहवा मिळाली होती, तेव्हाच हा एक चांगला व्यावसायिक कलाकार होईल हे मी ओळखलं होतं. त्याप्रमाणे त्याने स्वत:च्या कष्टाने, जिद्दीने केलेही. गेली पंचवीस वर्षे सतत नाटक, मालिका यात संघर्ष करून आता कुठे नाव होत असताना, हे संकट कशासाठी त्याने ओढवून घेतले हे अनाकलनीय आहे.

संघ, भाजपवर टीका केली, म्हणून मला स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकले, असे त्याचे म्हणणे आहे; पण त्याने नेमकी काय पोस्ट केली होती, हे तो सांगत नाही किंवा कोणीच बोलत नाही. असे काय त्याने भाजप, मोदी, संघ यांच्याविरोधात लिहिले होते ते त्याने अगोदर सांगितले पाहिजे, म्हणजे त्याच्यावर खरोखरच कारवाई सांस्कृतिक दहशतवादामुळे झाली का हे समजेल. माझ्या सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे मला मालिकेतून काढले असे तो म्हणतो; पण त्याने नेमके काय पोस्ट केले होते, हे त्याने आता सांगितले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत संघ, भाजपला वेठीस धरण्याचा जो नवा ट्रेंड येत आहे, तो चुकीचा आहे. यामुळे भाजप, संघ विरोधी पक्ष त्याचा बाजार उठवतील, संघ, भाजपवर टीका करतील; पण हे राजकीय पक्ष डॅमेज झालेली किरणची कारकीर्द, करिअर सावरू शकणार नाहीत, हे नक्की. त्यामुळे अशा गोष्टीचे राजकारण करण्याचे काहीच कारण नाही.


संघ, भाजपच्या दबावामुळे वाहिनीने काढून टाकले, असा कांगावा केल्यावर वाहिनीने जो खुलासा केला आहे, तो अत्यंत वाईट आहे. त्यामुळे किरणला पुढे कोणी काम देण्यास तयार होईल का, याचा विचार केला पाहिजे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण माने यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आले. या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. याविषयी कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण येण्याची चिन्हे आहेत. याप्रकरणी आता वाहिनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. किरण माने यांना सोशल मीडियावरील राजकीय पोस्टमुळे नव्हे, तर त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना काढून टाकण्यात आले आहे, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अन्य वाहिन्याही याचा विचार करतील. त्यामुळे किरणने प्रसिद्धीसाठी हा स्टंट का केला, हा प्रश्न पडतो. माझ्या सातारच्या एका कलाकारावर अन्याय झाला याचे सुरुवातीला वाईट वाटले. किरणची अभियनाची क्षमता माहिती असल्याने त्याच्यावर असा अन्याय होणे योग्य नाही, असेही मनापासून वाटले; पण त्याने ज्याप्रकारे याचे राजकारण करण्याचे आणि राजकीय पक्षांना वेठीस धरण्याचे प्रयत्न केले, ते चुकीचे आहे. मोठमोठे कलाकार, दिग्गज नेहमीच राजकारणावर टीका करत असतात; पण त्यांची कारकीर्द बरबाद करण्याचे कोणालाही शक्य नसते, कारण त्यांचा रसिक त्यांना स्वीकारत असतो. रसिकांसाठी निर्माता, दिग्दर्शक हे कलाकारांच्या पाठिशी उभे राहतात. सरकारवर टीका अनेक कलाकारांनी यापूर्वीही केल्या आहेत. नाना पाटेकर, विक्रम गोखले, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे, अमोल कोल्हे असे असंख्य कलाकार आपल्या अभिव्यक्तीचा पुरेपूर फायदा उठवत असतात. विविध राजकीय पक्षांसोबत राहतात; पण स्वत:चे स्थान टिकवून असतात. फार पूर्वीच्या काळात पुलं देशपांडे यांनीही विविध सरकारांवर टीका केली होती. त्यांनाही टीकेला सामोरे जावे लागले होते; पण त्यांचे लाडके व्यक्तिमत्व हे पद कोणी हिरावून घेऊ शकले नाही. त्यामुळे कलाकाराची कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची ताकद कोणत्या राजकीय पक्षात नसते, तर आपल्याच कुठल्या तरी चुकीत असावी याचे आत्मचिंतन आता प्रत्येक कलाकाराने केले पाहिजे.

विशेष म्हणजे दोन-तीन दिवस गाजल्यानंतर या प्रकरणाबद्दल स्टार प्रवाह वाहिनीकडून अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आले आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेत विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे. असे स्पष्टपणे वाहिनीने या पत्रकात लिहिले आहे. अशाप्रकारे कोणत्याही वाहिनीने एखाद्या कलाकाराविरोधात पत्रक काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे विनाकारण आपल्या करिअरमध्ये राजकारण आणण्याचे काम कोणी करू नये इतके शहाणपण आता प्रत्येक कलाकार शिकेल, असे समजायला हरकत नाही.


विशेष म्हणजे, निर्मिती संस्थेने माने यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील अनेक सहकलाकारांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलाय. सह-कलाकारांसह, विशेषत: शोच्या महिला अभिनेत्रीशी केलेल्या गैरवर्तनामुळे हा निर्णय घेतल्याचे प्रोडक्शन हाऊसने म्हटले आहे. हे जाहीर होणे किती भयंकर आहे?, कारण नसताना एखाद्या राजकीय पक्ष आणि संघटनेला बदनाम करण्याचा आणि साप समजून भुई धोपटण्याचा प्रकार केल्यावर काय होते याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल.

या वाहिनीने आपल्या पत्रात म्हटले आहे की, इतकेच नाही तर इतर काही कर्मचाºयांनी देखील त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. अनेकदा समज देऊनही त्यांनी त्यांच्या वागणुकीत बदल केला नाही, त्यामुळे त्यांना मालिकेतून काढले गेले. या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो, असेही वाहिनीने म्हटले आहे. ही केवढी बदनामी स्वत:च्या हाताने किरणने केली आहे, याचा विचार केला पाहिजे. आता यातून कोणता आशेचा किरण सापडतो का, याचा विचार किरण मानेनी केला पाहिजे आणि त्याने सर्वात प्रथम राजकारणापासून दूर जावे आणि करिअरकडे लक्ष दिले पाहिजे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी शरद पवारांचा वापर करावा, असा विचार आला असेल, तर शरद पवार असे कोणाचे नसतात. त्यांना यातले नेमके तथ्य माहिती असते, म्हणूनच किरण आणि किरणसारख्या अनेकांनी करिअर आणि राजकारण याचा निट विचार केला पाहिजे.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

17/1/2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: