मराठी नाटकाचा उगम विविध लोककलांपासून झाला. त्या त्या काळातल्या लोक जीवनाच्या प्रभावाने नाटकांचे विषय बदलत गेले, नाट्य सादरीकरणाची पद्धत बदलत गेली म्हणून प्रत्येक काळातले नाटकही बदलत गेले. मागच्या नाटकांमधल्या काही गोष्टींचे अनुकरण करत, काही नाकारत तर काही गोष्टी नव्याने सामावत त्या त्या काळातले नाटक सिद्ध होत गेले. अशा प्रकारे नाटकाच्या इतिहासाचा एक अखंड प्रवाहच निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पण इतिहास मोठा मनोरंजक असतो, त्यात काही प्रवाह मध्येच निर्माण होतात, काही आपल्या दिशा बदलतात, तर काही प्रवाह लुप्तदेखील होतात. मराठी नाटकांच्या एका महत्त्वाच्या प्रवाहाचा उल्लेख करायलाच पाहिजे. महाराष्ट्रापेक्षा लांब तामिळनाडूमधील तंजावर येथे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठीतून काही नाटके लिहिली गेली आणि सादरही झाली. त्यांना मराठी भाषेतील आद्य नाटके म्हणावी लागतील.
मराठी नाटकात लोककलांचे अनेक फॉर्म वापरले गेले. म्हणजे अगदी १९८०च्या दशकानंतर सतीश आळेकरांनी कीर्तनाचा फॉर्म वापरला आणि महानिर्वाण आणले, इंडियन नॅशनल थिएटरने शाहीर विठ्ठल उमप यांच्यासाठी खास गोंधळाचा फॉर्म वापरून ‘जांभूळअख्यान अर्थात लोक अहाभारत’ हे नाटक आणले. त्याने फारच धमाल उडवून दिली. पथनाट्याचे फॉर्म आले, त्यातून घाशीराम कोतवालसारखे अनेक प्रयोग झाले. लोकनाट्याच्या फॉर्ममध्ये काही नाटके आली. पण याशिवाय तंजावरी नाटकाचीही एक खासियत मराठी रंगभूमीवर राहिलेली आहे.
तंजावरातील भोसले घराण्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर नाट्यलेखन केले होते. स्थानिक थेरूकुतू, भागवतमेळ्यासारख्या लोकनाटकांचा त्याच्या सादरीकरणावर बराच प्रभाव होता. त्यांचे लिखाण हे तर नाट्यशास्त्र परंपरेत उल्लेख केल्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न होता. नाटकांत नृत्य-संगीताचा वापर बºयाच मोठ्या प्रमाणात केला जात असे. संगीत वृंद गायन-वादन करीत असे. सूत्रधार हा गद्यात भाषण करीत असे तर नट मुख्यत्वे करून गायल्या जाणाºया पदांवर नृत्य करीत असत. एका अर्थाने ते नट कमी आणि नर्तक अधिक असत. त्या नाटकांनाही नृत्य-नाट्य म्हणणे अधिक योग्य ठरेल. नाटकांची कथानके बºयाचवेळा धार्मिक असत. नाटकांचे प्रयोग राजदरबारात सादर होत असत आणि दरबारातील मानकरी, सरदार, उमराव हेच बहुधा प्रेक्षक असत. नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरुषच करीत असत आणि नाटकातल्या प्रस्तावनेतला सूत्रधार आणि कंचुकी नामक विदूषकाचा संवाद बºयाचदा अश्लील असे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण लोकनाट्य तमाशात वगापूर्वीची बतावणी ऐकतो तसे काहीसे इथे असे. पण ही एकप्रकारे जनजागृतीसाठी, लोकसंग्रह करण्यासाठी केलेली नाटके होती हे पण त्यावेळच्या परिस्थितीवरून लक्षात घेतले पाहिजे. मोगलांचे, परकियांचे होणारे आक्रमण या काळात गुप्तवार्ता, चर्चा करण्यासाठी, विचार आणि निरोप पोहोचवण्यासाठी संदेश वहनाचे काम म्हणूनही या कलेचा वापर केलेला असू शकतो हे लक्षात घेतले तर यातील नाट्य लक्षात येईल.
श्रीमंत शहाजीराजे भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले या तीन राजांनी विपुल नाट्यलेखन केले होते हे लक्षात घेतले पाहिजे. बहुतेक सर्व नाटकांचे विषय देव-देवतांच्या विवाहांचे होते. सीताकल्याण, लक्ष्मीनारायणकल्याण, श्रीकोर्वंजी ही त्यातली काही महत्त्वाची नाटके होती. या नाटकांनी इतिहास घडविला. १८५५ मध्ये इंग्रजांनी तंजावरवर वर्चस्व मिळवले आणि भोसले घराण्याची राजसत्ता गेली. त्यानंतर तिथे फारसे नाट्यलेखन वा सादरीरकरण झाले नाही. तंजावरी नाटकांचा प्रवाह हा तिथेच लुप्त झाला. त्याचा शोध नंतर विसाव्या शतकात लागला. ज्येष्ठ इतिहासकार वि. का. राजवाडे यांना एका रामदासी मठात तंजावरी नाटकांची बाडे सापडली. तंजावरी नाटकांमधील पदांचे नाते संस्कृत नाट्य परंपरेतील धृवांशी सांगता येते. तंजावरी परंपरेत त्यांना दरू असे संबोधत असत.
तसे पाहिले तर महाराष्ट्र आणि तंजावर यांच्यात भौगोलिक अंतर असल्यामुळे तेथील नाटकांचा महाराष्ट्रातील नाटकांवर कोणत्याच प्रकारचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. पण मराठा साम्राज्य कुठपर्यंत पोहोचले होते, त्याची साक्ष म्हणजे ही नाटके आहेत. नृत्यातून थोड्या प्रमाणात या परंपरेचा पुन्हा उदय झालेला असला, तरी मराठी नाटकांशी त्याची कुठल्याही प्रकारे नाळ जुळलेली दिसत नाही. अशी ही मराठी नाटकाची आद्य परंपरा नाटकाच्या इतिहासात एखाद्या बेटाप्रमाणे मराठी नाटकापासून आपले वेगळे असे अस्तित्व राखून आहे. मराठी नाटकाची आद्य परंपरा सर्वंकष आहे. पण १८० वर्षांचा इतिहास सांगताना त्यापूर्वीही मराठी नाटकासाठी झालेले तंजावरी प्रयत्न याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचा इतिहास त्याही अगोदरचा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या नाटकांवर संशोधन होणे गरजेचे आहे. तंजावरच्या भोसले संस्थानिकांनी लिहिलेल्या या मराठी नाटकांचे नूतनीकरण करून हा महाराष्ट्राचा रंगभूमीचा इतिहास परिपूर्ण केला पाहिजे. आज तंजावरी मराठी नाटकाची लांब पडलेली परंपरा लक्षात घेऊन त्याच्याशी नाते सांगणारे काम आणि संशोधन होणे गरजेचे आहे. नव्या नाटककारांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कथाकथी, चित्रकथी, यक्षगानप्रमाणे मराठी नाटकाशी नाते सांगणाºया तंजावरी नाटकांचे महत्त्व सांगण्याचे काम तरुण पिढीकडून होणे आवश्यक आहे.
प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\
8/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा