फिल्मी जगतात एक नवा प्रवाह सुरू झाल्याचे दिसत आहे. तो म्हणजे पंधरा, वीस वर्षे संसार करायचा आणि नंतर घटस्फोट घ्यायचा. दक्षिणेतील नामांकित अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी अशाच प्रकारे विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त होत आहेत. धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. हे समाजाच्या दृष्टीने घातक आहे. धनुषने ट्विटरवर एक छोटी पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. १८ वर्षांची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही सहजीवनाचा प्रवास केला होता. आज आम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या खासगीपणाचा आदर ठेवा, असे धनुषने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांचे खासगी जीवन जरी हे असले, तरी कलाकारांचे अनुकरण समाज करत असतो. कोणतेही संयुक्तिक कारण नसताना सुखी संसार मोडायचा आणि स्वत:चा शोध घेण्यासाठी बाहेर पडत आहोत म्हणायचे हे थोडे विचित्र वाटते.
गेल्या वर्षी हिंदीतील अभिनेता आमिर खानने अशाच प्रकारे आपला अठरा वर्षांचा संसार मोडून मैत्रिपूर्ण काडीमोड घेतला. त्याचीच ही कुठेतरी पुनरावृत्ती झाल्याचे दिसत आहे. असे प्रकार पुन: पुन्हा होत राहतील. चित्रपटसृष्टी बाहेरच्या समाजातही दहा, पंधरा वर्षे संसार केल्यानंतर अशा प्रकारे स्वेच्छा काडीमोड घेण्याचे प्रकार वाढतील. विशेष म्हणजे धनुष व ऐश्वर्याला मुलेही आहेत. या मुलांचे भवितव्य काय असू शकते? त्यामुळे असे प्रकार समाजात घातक असे आहेत.
चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सर्वात प्रथम आपल्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप आणली होती. कालांतराने ती प्रथा समाजात रुजली. आता त्याचप्रमाणे जर अर्धवट संसार सोडून घटस्फोट घेण्याचे प्रकार अशा प्रकारे वाढीस लागले, तर ते धोक्याचे आहे. नट-नट्यांचा आदर्श कोणीच घेत नाही. तसा त्यांच्याकडे तो अभावानेच असतो. पण त्यांच्या वाईट गोष्टींचे मात्र अनुकरण पटकन होत असते. नटांनी केलेली फॅशन, व्यसन याचे अनुकरण होते. त्याचे परिणाम समाजावर होत असतात. म्हणूनच अशाप्रकारे जर घटस्फोटाचे प्रकार वाढत असतील, तर ते चुकीचे आहे. संसार टिकवण्याची आपली संस्कृती आहे. घटस्फोट घेऊन स्वैराचार करणारी आपली संस्कृती नाही. म्हणूनच ही बाब चिंतेची आहे. धनुष व ऐश्वर्या यांचा संसार ही त्यांची वैयक्तिक बाब असली, तरी त्याचे अनुकरण झाले तर ती बाब चिंतेची असेल हे नक्की.
धनुषची बायको ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. ती दिग्दर्शिका आणि पार्श्वगायिकाही आहे. धनुष आणि ऐश्वर्याचा २००४मध्ये विवाह झाला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. धनुष आणि ऐश्वर्या दोघेही तमीळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज कुटुंबातले आहेत. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे, तर धनुष हा प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक कस्तुरीराजा यांचा मुलगा. दोघांचीही भेट धनुषच्या एका चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेस झाली. ऐश्वर्याने धनुषचे त्याच्या चित्रपटातील परफॉर्मन्सबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर दोघांचे प्रेम जमले आणि लग्न झाले होते. १८ नोव्हेंबर २००४ ला धनुष आणि ऐश्वर्या विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाच्यावेळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते, कारण त्यावेळी धनुषचे वय केवळ २१ वर्षे होते. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. तरीही दोघांनी अठरा वर्षे संसार केला. आता स्वत:चा शोध घेण्याचे कारण सांगून ते वेगळे होत आहेत. ही गमतीची बाब आहे. स्वत:चा शोध घेण्यासाठी संन्यास घेतला जातो. निवृत्ती घेता येते. पण काडीमोड कसा काय घेतला जातो? हा शोध स्वत:चा आहे की, नव्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी चाललेला आटापिटा आहे? आमिर खानने घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा तिसरे लग्न केले. ही बाब समाजात अनुकरण होणारी असते. म्हणूनच अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाय योजना कराव्या लागतील.
बॉलीवूड, टॉलीवूडची लग्न म्हणजे काय राजकीय युती, आघाडी आहेत का? जमले तर जमले नाहीतर दुसरा जोडीदार बघितला. राजकीय पक्ष ज्याप्रमाणे प्रत्येक निवडणुकीत नवीन युती, आघाडी करतात तोच फॉर्म्युला लग्नाच्या बाबतीत लावायचे म्हटले तर चुकीचे आहे. राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो असे म्हणतात. त्याप्रमाणे चित्रपटसृष्टीतील कलाकारांमध्ये लग्न या संस्थेत कोणीही कोणाचा कायमचा साथीदार असू शकत नाही, असा नवा ट्रेंड बिंबवण्याचे नवे प्रयत्न होत आहेत का?
खरंतर बॉलीवूडमधील किंवा चित्रपटसृष्टीतील संसार टिकण्याचे प्रमाण कमीच असते. लग्नापेक्षा नट-नट्यांचे घटस्फोट जलदगतीने होत असतात. त्यांचे वाद, भांडणे, लफडी ही नेहमीच चर्चेची ठरत असतात. पण त्यातही काही चांगले टिकलेले आदर्श संसारही आहेत. असे असताना गोडीगुलाबीत, संगनमताने, शोध घेण्यासाठी, होणारे घटस्फोट हे चिंतेचे आहेत. राजकारणात मैत्रिपूर्ण लढती होत असतात. पण मैत्रिपूर्ण घटस्फोट मात्र समाजासाठी चिंतेची बाब ठरू शकतात.
19/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा