एकाच विषयावर अनेक चित्रपट निघणे तसे या बॉलीवूडला किंवा सीनेसृष्टीला नवे नाही. कालांतराने त्याच त्याच त्या विषयावर येणारे चित्रपट असतात पण एकाचवेळी एकाच विषयावर अनेक चित्रपट येण्याचा चमत्कारही आपल्याकडे घडलेला आहे. पण पौराणिक, अध्यात्मिक, भक्तीमय वातावरणातील विषयावर अनेकजण चित्रपट बनवत असतात. त्यात शिरडीच्या साईबाबांचा मोह अनेक निर्माता दिग्दर्शकांना होत असतो. 1977 ला मनोजकुमारचा शिर्डी के साईबाबा तुफान चालला खरा, पण त्याहीपूर्वी 22 वर्ष अगोदर याच विषयावर एक चित्रपट बनून गेला होता. टिव्हीचे माध्यम आल्यावर साईबाबांवर अनेक मालिकाही झाल्या. म्हणूनच आजवर कोणी कोणी साईबाबांवर चित्रपट काढले हे पाहणेही तितकेच माहितीपर आणि मनोरंजक असेल.
साईबाबा म्हटले की सुधीर दळवी आणि मनोजकुमार यांचा सुपरहिट चित्रपट इतकेच बर्याचवेळा लक्षात राहते. पण त्यापूर्वी 22 वर्ष अगोदर म्हणजे 1955 ला शिर्डीचे श्री साईबाबा हा मराठीत चित्रपट येउन गेला होता. मराठीतील कृष्णधवल असा हा चित्रपट नंदादीप चित्र या कंपनीने बनवला होता. याचे निर्माते होते, केशवराव साठे. रॉय किणीकर यांची यात कथा, पटकथा आणि संवाद होते. या चित्रपटात संत कबीर, संत एकनाथ, दासगणू महाराज यांची भक्तीगीते अभंगांचा चपखल वापर केला होता. त्याशिवाय पांडुरंग दीक्षित यांची काही गीते होती. पांडुरंग दीक्षित यांच्याच संगीतात त्यावेळी मोहम्मद रफी, आशा भोसले, मन्ना डे यांच्याशिवाय तत्कालीन गायक विनोदीन दीक्षीत, प्रमोदीनी देसाई, सुहासिनी कोल्हापुरे यांचीही गीते होती.या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दत्तोपंत आंगरे हे कलाकार होते. तर त्याशिवाय इंदिरा चिटणीस, रेखा, दादा साळवी, मधू आपटे, आत्माराम भेंडे यांच्यासह तत्कालीन कंपनीचे कलाकार होते. त्या काळात तो चित्रपट गाजला होता. पण मराठीत निर्मिती असल्यामुळे तो मागे पडला. मनोजकुमार यांनी आपल्या चित्रपटाची निर्मिती करण्यापूर्वी याचाही संदर्भ घेतला होता. या चित्रपटात साईबाबांची प्रमुख भूमिका दत्तोपंत आंगरे यांनी केली होती.
शिर्डी च्या साईबाबांवर खर्या अर्थाने सुपरहिट झालेला चित्रपट म्हणजे मनोजकुमारचा शिर्डी के साईबाबा. सगळे स्टार कलाकार, रंजक कथा पटकथा संवाद, सुंदर श्रवणीय गाणी यांनी संपूर्ण देशभरातील वातावरण ढवळून निघाले. यामध्ये शिर्डीच्या साईबाबांची मध्यवर्ती भूमिका सुधीर दळवी यांनी केली होती. त्याशिवाय मनोजकुमार, राजेंद्रकुमार, शत्रुघ्न सिन्हा, प्रेमनाथ, हेमामालिनी या तत्कालीन दिग्गजांबरोबरच धीरजकुमार, मदनपुरी आणि शत्रुघ्न सिन्हाच्या मुलीचे काम करणारी होती नम्रता शिरोडकर. याशिवाय मराठीतील उषा चव्हाण, रत्नमाला आणि सचिन हे दोघेही होते. सरला चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने हा चित्रपट बनवला होता आणि याचे दिग्दर्शक होते अशोक भूषण. याची पटकथा संवाद मनोजकुमारने लिहीले होते. या चित्रपटामुळे साईबाबा इतके लोकप्रिय झाले की त्याचवर्षी मनमोहन देसाईंनी निर्माण केलेल्या अमर अकबर अँथनी या चित्रपटात चमत्कारासाठी म्हणून म्हणून त्यांना शिरडीवाले साईबाबा हे गाणे टाकावे लागले. ज्या मंदीरात हे चित्रिकरण झाले होते ते दुसर्याच देवाचे होते, त्यामुळे पुढे साईबाबांची मूर्ती ठेवून कथानकात बदल करण्यात आला होता. हा सारा चमत्कार शिर्डी के साईबाबा या चित्रपटाच्या प्रभावामुळे झाला होता.
या चित्रपटाचा प्रभाव खूप वर्ष होता. किंबहुना अजूनही आहे. याचेकारण यातील भक्तीमय वातावरण, गाणी आणि चमत्काराबरोबरच साईबाबांचे दाखवलेले चरित्र. यानंतर असे म्हणतात की अनेकवर्ष दर गुरूवारी मनोजकुमार शिर्डीला दर्शनाला येत असे. लोक मनोजकुमार आणि साईबाबांच्या दर्शनासाठी म्हणून गुरूवारी शिर्डीला येउ लागले. त्यामुळे शिर्डीचे मनोजकुमार आणि सुधीर दळवी हे जणू ब्रँड अँम्बेसिडर बनले होते.
त्यानंतर अनेकांनी यावर मालिका आणि चित्रपट बनवले. रामानंद सागर यांनीही यात चांगला प्रयोग केला आणि दुरदर्शनसह अनेक वाहिन्यांवरून तो दाखवला. विविध वाहिन्यांवर या विषयावर अनेक निर्मात्यांनी मालिका काढल्या.
शिरडी साईबाबा हा 2001 ला एक चित्रपट झळकून गेला. त्यानंतर ईश्वरी अवतार साईबाबा या नावाचा एक चित्रपट येउन गेला. नुसता साईबाबा या नावाचा एक चित्रपट होता. यातील दोन चित्रपट दीपक बलराज वीज यांनी बनवले. यात नाना पाटेकर, सयाजी शिंदे असे दिग्गज कलाकारही होते. पण त्यामध्ये श्रद्धा सबुरी हा विषय होता. साईबाबांची भक्ती हा विषय होता. साईबाबांच्या जीवनातील कथानक किंवा प्रसंग त्यात नव्हते.
पण हिंदी चित्रपटात भगवान शंकर, विष्णू किंवा दुर्गामाता यांच्याप्रमाणेच साईबाबांचे मंदीर, फोटो भक्ती रूढ झाली हे नक्की.
साईबाबांची भक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली तस दाक्षिणात्य निर्मातेही या विषयावर चित्रपट काढू लागले. दाक्षिणात्य निर्मात्यांनी त्यांच्या पद्धतीने चित्रपट काढल्यानंतर ते पुन्हा हिंदीत डब होण्याचा आणि प्रदर्शित होण्याचा चमत्कारही आपल्याकडे घडलेला दिसून येतो. यामध्यें मराठीत शिर्डीचे साईबाबा या 1955 च्या चित्रपटानंतर पुन्हा एक साईबाबा नावाचा चित्रपट आला होता. त्यानंतर तेलगू भाषेत श्री शिरडी साईबाबा, साई महिमा, शिरडी साई हे चित्रपट बनले. कानडी भाषेत भगवान साईबाबा नावाचा चित्रपट बनला. तामिळी भाषेत माया, सदगुरू साईबाबा, शिर्डी साईबाबा असे चित्रपट बनले. यातल्या नागार्जूनचा तेलगू चित्रपट अनेक भाषांत डब होउन चांगला गाजला. पण चित्रपटसृष्ट्री जेंव्हा जेंव्हा संकटात येते तेंव्हा तेंव्हा साईबाबांवरील विषयाने अनेक निर्मात्यांना तारले आहे. मनोजकुमार हा देशभक्तीवर चित्रपट काढणारा कलाकार अचानक साईबाबांकडे कसा वळला असा प्रश्न अनेकांना असेल. पण आणीबाणीच्या काळात रोटी कपडा और मकानसारखे चित्रपट पुन्हा बनवणे शक्य नसल्याने साईचरणी ते समर्पित झाले आणि एक सुपरहिट चित्रपट निर्माण झाला. त्यामुळे साईबाबांना केद्रस्थानी देउन अनेक अविष्कार या चित्रपटसृष्टीत घडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा