काही चेहरेच असे असतात की ते पोक्त म्हणून जन्माला येतात. लौकीक अर्थाने ते चेहरे सुंदर असतात. पण त्यांच्या चेहर्यावरील समजूतदारपणा, आकलन शक्ती त्यामुळे असे अनेक चेहरे हे प्रौढ भूमिकांसाठी जन्माला येतात. सौदर्य किंवा क्षमता असूनही त्या चेहर्यांना नायिका होण्याची संधी मिळू शकत नाही तर चरित्र भूमिकाच साकारावी लागते. त्यापैकी एक चेहरा म्हणजे मराठीतील अभिनेत्री सरोज सुखटणकर. वृद्धापकाळाने काल त्यांचे निधन झाले पण या पडद्यावर त्या तरूण वयातच अनेकवेळा वृद्ध झालेल्या दिसल्या होत्या. अशा या कलावतीला तीच्या पन्नासपेक्षा जास्त वर्ष केेलेल्या कारकीर्दीसाठी आदरांजली.
मराठी चित्रपट क्षेत्रातील या ज्येष्ठ अभिनेत्री सरोज धोंडीराम सुखटणकर यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 84 वर्षाच्या होत्या. त्यांनी अनेक नाटक तसेच 85 हून अधिक मराठी सिनेमात भूमिका केल्या.सुखटणकर यांनी मराठी नाटक, सिनेमात अभिनयाचा ठसा उमटविला होता. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने 2006 मध्ये चित्रकर्मी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. शिवाय राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 2017-18 मध्ये त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान केला होता.
‘न्यू भारत नाट्य क्लब’मधून त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली.‘वेगळं व्हायचय मला, मुंबईची माणसं, प्रेमा तुझा रंग कसा, दिवा जळू दे सारी रात, तुझं आहे तुझपाशी’ या नाटकात त्यांनी कामे केली. त्यांनी 85 हून अधिक मराठी सिनेमात भूमिका केल्या. यामध्ये ‘बाई मी भोळी,कुंकवाचा करंडा, जोतिबाचा नवस, सून लाडकी या घरची, कौल दे खंडेराया, एकटा जीव सदाशिव,सोयरिक, अष्टविनायक, भिंगरी, सावज, सहकार सम्राट, तोतया आमदार,भुजंग, धुमधडाका,लेक चालली सासरला, दे देणादण, बळी राजाचे राज्य येऊ दे’अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.‘धनगरवाडा’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा तर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतही त्यांनी भूमिका केली.
व्ही. शांताराम यांचेपासून , दादा कोंडके, सुषमा शिरोमणी, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर अशा सर्व दिग्गज निर्मात्यांबरोबर त्यांनी काम केले. पण कायम पोक्त भूमिकाच्या त्यांच्या वाट्याला आल्या. पण त्या भूमिका त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केल्या.
व्ही शांताराम यांच्या चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटात अरूण सरनाईक यांच्या वहिनीची भूमिका केली होती. संध्याबाईंपेक्षा कितीतरी वयाने लहान असतील कदाचित पण मोठ्या जावेची भूमिका केली होती. संध्या, अरूण सरनाईक, रमेश देव आणि एकूणच व्ही शांताराम यांची संपूर्ण टीम असूनही सरोज सुखटणकर यांची त्यातील भूमिका लक्षात राहणारी अशीच होती.
कायम नउवारी साडीतीलच भूमिका त्यांच्या पदरात पडल्या होत्या. म्हणजे काळ व्ही शांताराम यांचा होता तेंव्हाही आणि 1985 ला धुमधडाका हा महेश कोठारेंचा काळ होता त्यातही नउवारी साडीच त्यांच्या नशिबी होती. धुमधडाका या महेश कोठारे यांचा पहिल्याच चित्रपटात या सोज्वळ चेहर्याने महेश कोठारेंच्या आईची भूमिका केली होती. महेश कोठारेंचे चित्रपट विनोदी असले तरी यांच्या वाट्याला कधी विनोद आलेला नव्हता. फक्त अस्सल संस्कृतमिश्रीत मराठी बोलणार्या मास्तर जयराम कुलकर्णींची पत्नी रंगवण्याचे चांगले काम त्यांनी केले होते. महेश कोठारेंच्या त्यानंतर आलेल्या दे दणादण या चित्रपटातही त्यांनी लक्षाच्या आईची भूमिका केलेली होती. पण बहुतेक सर्व भूमिकांमध्ये त्यांनी अस्सल मराठमोठी नउवारी साडीच नेसली होती. डोक्यार पदर असलेली मराठी बाणा दाखवणारी ही मराठमोळी अभिनेत्री कोणताही चित्रपट असो लक्षात राहणारा अभिनय करत होती.
सूषमा शिरोमणींच्या पहिल्याच भिंगरी या चित्रपटात श्रीराम लागूंच्या पत्नीची आणि सूषमा शिरोमणींच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती. समोर दिग्गज अभिनेते असतानाही हा परिपक्व चेहरा अगदी सहजपणे काम करताना दिसत होता. दादा कोंडकेंच्या चित्रपटात काम करूनही कुठे खाष्टपणा दाखवण्याची किंवा पांचट विनोद करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. कारण कायम सोज्वळ आणि सहज भूमिकाच्या सरोज सुखटणकर यांच्या वाट्याला आल्या होत्या.
लेक चालली सासरला या चित्रपटात अलका कुबल यांची आई त्यांनी साकारली होती. शरद तळवलकर यांच्या पत्नीची भूमिका होती ती. पण यातही सर्व दिग्गज कलाकार असताना सरोज सुखटणकर कुठे कमी पडलेल्या दिसल्या नाहीत.
श्रीराम लागू, शरद तळवलकर, नीळू फुले, अरूण सरनाईक, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे हे दिग्गज अभिनेत तर दुसरीकडे संध्या, रंजना, सुषमा शिरोमणी, तनुजा, शशिकला यांच्यापासून ते अगदी अलका कुबल, सविता प्रभुणे, ऐश्वर्या नारकर यांच्यापयर्र्त अनेक कलाकारांबरोबर काम करूनही आपली छबी त्यांनी पडद्यावर कायम ठेवली होती. त्यामुळे पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ या चित्रपट नाटक क्षेत्रात असूनही चरित्र भूमिकांच त्यांच्या पदरात आल्या. पण जे पदरात पडले आहे ते या सोज्वळ चेहर्याने प्रामाणिकपणे केले हे नक्की.
सरोज सुखटणकर यांनी आपला काळ गाजवला आहे, लक्षात राहील अशा भुमिका केलेल्या आहेत. त्यामुळे कृष्णधवल सिनेमापासून ते रंगीत डॉल्बी सिस्टीमपर्यंत काम करून त्यांनी या क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या योगदानाला भावपूर्ण आदरांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा