आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर जे जे पंतप्रधान झाले त्यांनी काही ना काही घोषणा केल्या होत्या. पंडित नेहरूंनी आराम हराम है, ही घोषणा दिली होती. तर त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसानला जय विज्ञान ही जोड दिली होती. पण आज जवानांपुढे युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे डोळ्यात तेल टाकून त्यांना सीमेचे रक्षण करायचे आहे. त्यामुळे त्यांना आराम हराम है ही घोषणा आहे. किसानचीही तीच अवस्था आहे. पण खर्या अर्थाने आराम करावा लागत आहे, तो कामगार, कर्मचारी, नोकरदारवर्गाला. कोरोेनामुळे घरात बसावे लागले त्यांना. आज त्यांना मनातून वाटते आहे की आराम हराम आहे, पण ही हरामखोरी नाईलाजाने त्यांना करावी लागत आहे.
काँग्रेसच्या काळात 55 वर्षात काहीच घडले नाही असे म्हणता येणार नाही. कारण आराम हराम है ही घोषणा देउन नेहरूंनी लोकांनी काम केले पाहिजे, नुसते बसता कामा नये, असे शिकवले आहे. पण आज कोरोनामुळे दुर्दैवाने 70 टक्के लोकांच्या नशिबी आराम हेच काम आलेले आहे.पंडित नेहरूंनी काम केले पाहिजे हे सांगितले तर आज आपल्याला गरज असतानाही काम नका करू असे सांगावे लागत आहे. कारण काम करायला बाहेर पडलो तर कोरोनाचा प्रसार होईल या भितीपोटी लोकांना काम करायला जाण्यापासून रोखले जात आहे. म्हणजे काम करणे हे विकासाचे लक्षण असेल तर आता काम करायचे नाही हे कसले लक्षण म्हणायचे? आज आम्हाला विकासापासून रोखले जात आहे का? सध्याच्या सरकारच्या मते गेल्या सहा वर्षात आज कितीही विकास झाला आहे, असा गाजावाजा केला जात असला, तरी नेहरूंच्या किंवा त्यानंतरच्या काँग्रेसच्या काळातही काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले होते, याकडे डोळेझाक करून चालणार नाही. किमान घरी बसा असे तरी सांगायची वेळ आलेली नव्हती.
पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. आज मुंबई महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात अनेक संस्था, योजना या नेहरूंच्या नावाने आहेत, पण ते फक्त नावापुरते असणे योग्य नाही, तर त्यांचे थोडेतरी कार्य आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. साधारणपणे सरकार ज्या पक्षाचे असते त्या पक्षाच्या नेत्यांची नावे कामांना दिली जातात. याचा अर्थ त्या सगळ्या योजना त्यांनीच केल्या असे नसतो. तळे राखी तो पाणी चाखी असाच तो प्रकार असतो. त्यामुळे पूर्वीच्या काळात ज्यांची सत्ता होती त्यांनी आपल्या नेत्यांच्या नावाने त्या योजना सुरू केल्या इतकेच. अर्थात नामांतराने किंवा नावे देऊन आणि नावे ठेवून कोणी लहान-मोठा होत नसतो, तर प्रत्येकजण मोठा होतो तो त्याच्या कार्याने. त्याच्या कार्याचा गौरव म्हणून ही नावे दिली जातात. आपल्याकडे जेवढे मोठे, महान नेते किंवा व्यक्तिमत्त्व आहेत, त्यापैकी प्रत्येकजण गरिबीतून वर आलेला आहे. त्यांच्या संघर्षातून डोळयातून पाणी येते. अगदी कोणी चायवाला असतो, कोणी हमाली करत असतो, कोणी वार लावून जेवत असतो, पण नेहरूंच्या बाबतीत तसे नव्हते. ते चांदीचा चमचाच तोंडात घेऊन आले होते. ते निवांत बसा म्हणू शकले असते. तरीही त्यांनी आराम हराम है हीच घोषणा दिली होती, हे विशेष. म्हणूनच आज लोकांना काम पाहिजे असताना, काम करत असताना, कामाचे कौशल्य असतानाही घरात बसावे लागले आहे हे फार वाईट आहे.
आज शेतकर्याचे प्रश्न खूप आहेत. आपला शेतकरी हमीभावासाठी, अवकाळी पाउस, दुष्काळ, नापिकी, मालाची खराबी होणे अशा अनेक प्रश्नांनी गांजलेला आहे. म्हणजे जय किसान ही घोषणा देउनही त्याचा जय कुठे होताना दिसत नाही. तो कायम कर्जबाजारच. त्याचा सातबारा कोरा करण्याची हमी देणारेही तो कोरा करू शकत नाहीत. कारण अशी हमी देउन सत्तेरवर आल्यावर कोरोना आला. त्यामुळे साता बारा कोरा नाही झाला. पण आजपासून शंभर वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. शेतकरी तेंव्हाही कंगाल होता. पण वाईट परिस्थिती अशी आहे की तेंव्हा आपण पारतंत्र्यात होतो. आज स्वातंत्र्यानंतरही शेतकरी कंगालच आहे. ही मोठी विचित्र परिस्थिती आहे. शेतकरी कधीच आराम करत नाही. त्यामुळे त्यांना आराम हराम है ची घोषणा देण्याची गरज नव्हती. पण बिगरशेतकरी असणार्या माणसांना काम करण्याची ती उर्जा होती. पण नेहरूंनी शेतकर्यांचा कैवार श्रीमंतीत जन्म घेउनही घेतला होता. कारण 1920 साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला.
पंतप्रधानपदाची पहिली माळ गळयात पडल्यानंतर पंडित नेहरूंनी सर्वात प्रथम देशाच्या विकासासाठी नेमके कसे धोरण असावे, याचा विचार केला होता. त्या काळात भांडवलशाही आणि डावी विचारसरणी, अशा दोन टोकाच्या भूमिका सर्व जगभर होत्या. एकीकडे अमेरिकन भांडवलशाही, तर दुसरीकडे रशियन साम्यवादी विचारसरणी. बाकी सगळे देश या दोन देशांचे अनुकरण करत असतानाच भारताने मात्र, मिश्र अर्थव्यवस्थेचे धोरण आखून दोन्हींचा समतोल साधत दोन्ही विचारसरणीचे फायदे मिळवण्याचा प्रयत्न केला. हे नेहरूंच्या विचारसरणीचे महत्त्व आहे. त्यामुळेच जेव्हा भाकरा नांगल धरणाचे उद्घाटन त्यांनी केले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले होते की, आता विकासकामातून आपल्याला प्रगती साधायची आहे. आता देवधर्म, तीर्थयात्रा यात वेळ घालवण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. अशी धरणे हीच या देशाची तीर्थस्थाने आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. आराम हराम आहे, ही घोषणा देऊन त्यांनी कृषी विकासावर भर देण्याचा संकल्प केला होता. माणसांनी कामावर जावे असे सांगावे लागले होते. आज माणसे कामावर जाण्यासाठी इच्छुक आहेत तरी त्यांना घरी बसा म्हणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आमची अर्थव्यवस्था घाईला आलेली आहे. विकास चाचपडत आहे. देशात नेमके काय घडते आहे हेच सामान्यांना कळेनासे झाले आहे. हा आराम आम्हाला किती नामोहरम करत आहे हे आता बघायचे दिवस येणार आहेत असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा