बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच

  गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्ष आणि माध्यमे सुशांतसिंह राजपूत, कंगना राणावत याशिवाय दुसरे काही दाखवत नाहीत. त्यातून वेळ मिळाला तर कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा होते. पण यामध्ये अन्य महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच होताना दिसत आहे. विशेषत: महागाईच्या मुद्दयावर कोणीही बोलायला तयार नाही याचे आश्चर्य वाटते.
 सध्या वाढलेल्या महागाईबद्दल कोणीच का तक्रार करत नाही, असा प्रश्न पडतो आहे. भाजीपाला, कांदा-बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव इतके वाढले आहेत की, त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाही, हे पंधरावे आश्चर्य म्हणावे लागेल. सणासुदीमुळे भाज्यांची मागणी वाढते. पण कोणतीही भाजी 80 ते 100 रुपयांच्या घरातच विकली जात आहे. काही भाज्या तर दोनशे रूपयांच्या पुढे आहेत. टोमॅटो 100 रूपये किलो तर मटार 160 रूपये किलोने विकला जात आहे. कोथिंबीरीची पेंडी पावसाळ्यातही सध्या  50 रूपयांना विकली जात आहे. अर्थात ही सामान्यांची लूट विक्रेते आणि दलालांकडून होत आहे. हेच पैसे जर शेतकर्‍याला मिळाले असते तर त्याचा आनंद झाला असता.  पण  त्यामुळे सामान्य माणसांचे जीवन प्रचंड महाग झाले आहे. परंतु या महागाईबाबत प्रसारमाध्यमे, राजकीय पक्ष अजिबात आवाज उठवण्यास तयार नाहीत.
     भारतीय जनता पक्ष सत्तेत नसताना कधीतरी महागाई विरोधात बोलायचा. 2010 मध्ये सर्वात प्रथम दरवाढ, महागाई, इंधन दरवाढ याविरोधात भाजप आणि सर्व डावे, उजवे पक्ष काँग्रेस सरकार विरोधात एकत्र येऊन बंद केला होता. मात्र आता भाजपच सत्तेत आल्यानंतर या महागाईकडे सर्वाचे दुर्लक्ष झाले. काँग्रेस निष्क्रिय आणि निष्प्रभ झाल्यामुळे महागाईपेक्षा त्यांची नजर भाजप नेते कुठल्या प्रकरणात अडकत आहेत काय, याकडे वेध लावून बसले आहेत. पेट्रोलव्यतिरिक्त अन्य वस्तूंच्या महागाईबाबत कोणालाच काही पडलेले नाही. त्यामुळे विरोधकांची प्रखर भूमिका घेऊन विरोधकांचे काम नेमके काय असले पाहिजे याचा विसर काँग्रेस आणि विरोधी पक्षांना पडला आहे. भडकलेल्या महागाईविरुद्ध कोणताही राजकीय पक्ष आवाज उठवायला तयार नाही.
     एक काळ असा होता, महागाई विरोधात मोर्चे निघायचे. घंटानाद व्हायचे. थाळीमोर्चे निघायचे. प्रसारमाध्यमे तुटून पडायची. सध्या प्रसारमाध्यमे कंगनाचे चुकले की बरोबर यावर वाद घालत आहेत. राजकीय पक्ष थाळी, टाळी वाजवून कोरोनाला प्रतिकार करत आहेत. हे सगळेच हास्यास्पद आहे.
  आज कामगार संघटनाही बोलत नाहीत. गृहिणींचे मोर्चे निघत नाहीत. महागाई विरोधात हातात लाटणं घेऊन रस्त्यावर उतरणा-या रणरागिणी मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर आज नाहीत. त्यांचे वारसदार निर्माण व्हावेत असे कोणत्याही महिला संघटनांना, महिला नेतृत्वाला वाटले नाही. कोरोनाचे एक निमित्त आहे. सहा महिने कोरोनामुळे गर्दी करायची नाही, मोर्चा काढायचा नाही, निषेध करायचा नाही यातून सरकारला झाकण्याचा प्रकार होत आहे, पण या बोक्याच्या पाठीत लाटणे घालणारे कोणीतरी हवे आहे असे आता वाटू लागले आहे. मृणालताई गोरे आणि अहिल्या रांगणेकर यांच्या महागाईविरोधी महिला संघटना 45 वर्षापूर्वी रुपया, दोन रुपयांनी महागाई वाढली तर थाळ्या वाजवत होत्या. आता या थाळ्या बंद झाल्या आहेत. 1970 च्या दशकात तेलाचे घाऊक व्यापारी शेठ किलाचंद यांना तेलाचे भाव पाच रुपये वरून सात रुपये किलो केल्यावर त्यांना सहा तास घेराव घालून मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर आदी महिलांनी कोंडून ठेवले होते. आज असे रस्त्यावर उतरणारे नेतृत्व नसल्यामुळे आहे ती परिस्थिती सामान्यांना स्वीकारावी लागते आहे. सगळेजण जणू आपलेच दात, आपलेच ओठ म्हणून गप्प बसत आहेत. कारण अच्छे दिन येतील या भ्रमात आपण राहिलो पण ते दिवस अजून दिसत नाहीत.
    समाजात जेव्हा नेतृत्व बधिर होते, तेव्हा सामान्य माणसाने कुणाकडे बघायचे, असा प्रश्न निर्माण होतो. आज गरज आहे ती सामान्य माणसाची खदखद बाहेर पडण्याची. पण ही खदखद बाहेर पडणार कशी? माणसांनाच कोंडून ठेवले आहे. कोरोनाच्या नावाखाली आतला आवाज दाबला जात आहे काय असा प्रश्न पडतो आहे. परंतु याचा उद्रेक झाला तर फार वाईट परिस्थिती निर्माण होईल. विरोधकांनी सामान्यांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामान्यांचा आवाज बनण्याचे कौशल्या विरोधकांनी साधले पाहिजे. आज सामान्य माणसे सगळया बाजूने हैराण आहेत. काँग्रेसच्या राजवटीत महागाईने जीवन अशक्य झाल्याचा प्रचार जोरात झाला. त्यामुळे सामान्य माणसांना असे वाटत होते की, एक प्रयोग करून पाहू या, एक संधी देऊन पाहू या. अच्छे दिनची घोषणा मोदींनी केली होती. काँग्रेसचे दिवस चांगले नाहीत, आम्ही अच्छे दिन घेऊन येऊ असा विश्वास मोदींनी दिला होता. त्यामुळे लोकांच्या मनातील महागाईबद्दलच्या अस्वस्थतेचा विषय नेमका हेरून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या काळात महागाई विषयावर रान पेटवले आणि काँग्रेस विरोधातील फलक झळकले. मोठया आशेने आणि अपेक्षेने लोकांनी मोदींना मतदान केले. त्यामुळे सामान्य माणूस आज महागाई झाली तरी मूग गिळून गप्प बसला आहे.
या सरकारकडून सामान्य माणसांची किमान एवढीच अपेक्षा होती की, मोदी सत्तेवर आल्यानंतर निश्चित दिवस बदलतील. ही सामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखून अच्छे दिनचा नारा दिला गेला. त्यामुळे जनता अधिक हुरळून गेली. पण सत्ता आली आणि शिखरावर गेलेल्या अपेक्षांचा चक्काचूर व्हायला सुरुवात झाली. आता या महागाईविरुद्धचा संताप व्यक्त करायला सामान्य माणसानेच सुरुवात केलेली आहे. आपली कुजबुज आता सामान्य माणूस सुरू करतो आहे. कारण जीवन जगणे अशक्य झालेली ही माणसे आहेत. या कुजबुजीतून भविष्यात आणि लवकरात लवकर आंदोलन उभे राहण्याची प्रतीक्षा आहे. आज ज्या शेतक-याने या देशाला समृद्ध केले, त्या शेतक-याला आत्महत्या करावी लागत आहे. शेतक-यांच्या आत्महत्यांबाबत, महागाईबाबत हे सरकार काहीच बोलत नाही. सामान्य माणूस आज महागाईत भरडला जातो आहे. तो ज्या दिवशी संतप्त होऊन रस्त्यावर उतरेल, त्या दिवशी या सरकारचे दिवस भरलेले असतील. दुधाचे भाव, डाळींचे भाव, कांद्याचे भाव आणि महागाईने या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे.
     वीस वर्षापूर्वी दिल्लीत भाजपची सत्ता होती. तेव्हा सुषमा स्वराज यांना कांदे महागले या कारणाने सत्ता गमवावी लागली होती. त्यानंतर दिल्लीकरांनी 3 निवडणुकीत भाजपला जवळ केले नाही. पंधरा वर्षाच्या वनवासानंतर आम आदमीला सत्तेवर पोहोचवले. विरोधक असणे हे कमीपणाचे न मानता विरोधक असलेल्या काँग्रेसने रस्त्यावर उतरून हा संताप कॅच केला नाही तर तिसरी शक्ती निर्माण होयास वेळ लागणार नाही. आज जनतेच्या या आवाजाला वाट करून देण्याची गरज आहे. कोरोनामुळे कोंडमारा करून घरात बसवून ठेवणे आणि महागाई आणि सामान्यांच्या प्रश्नांवर बोलायचे नाही म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: