रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

लॉकडाउनने नेमके काय साधले?

    भारतात गेल्या आठवड्यापासून दररोज कोरोनाचे 75 हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गुरूवारी हा आकडा 80 हजारांच्या पुढे गेला आहे.  सध्या इतर कोणत्याही देशात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झालेले रूग्ण नाहीत. दैनंदिन रुग्ण वाढीची संख्या भारतात सर्वाधिक आहे. मग गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही सगळं बंद ठेवून काय मिळवले? सहा महिने बंद पाळून, लॉकडाउन पाळून रोज इतक्या रूग्णांची वाढ होणार असेल तर आम्ही या लॉकडाउनमुळे काय मिळवले? लोकांची गैरसोय केली, लोकांना बेरोजगार केले आणि काय मिळवले?

    खरं तर कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग अमेरिका आणि नंतर ब्रिझीलमध्ये झालेला दिसून येतो. कोरोना संसर्गाच्या एकूण रुग्णांच्या बाबतीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. पण दर 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे एक नंबरवर जायला आता वेळ लागणार नाही.
  त्यामुळेच भारतात कोरोनाचे रुग्ण ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहता संसर्गाच्या बाबतीतही येत्या काही दिवसांत भारत पहिल्या स्थानावर पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
   काहीजणांना वाटते की लॉकडॉऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. केंद्र सरकारने 1 जूनपासून लॉकडॉऊन शिथिल करण्यास सुरूवात केली. ज्याला अनलॉक-1 असे संबोधण्यात आले. त्यानंतर ही वाढ होत गेली. याचा अर्थ अनलॉक करणे चुकीचे होते का? नागरिकांना कायम घरातच बसवून ठेवायचे होते का? मग रोजगार नाही, काम नाही, फक्त जीवनावश्यक सेवा सुरू यात सामान्य माणसांनी बसून मरायचे होते का?
   अनलॉक-1 नंतर आर्थिक व्यवहार होऊ लागले. पण त्यासोबतच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली. त्यामुळे लॉकडॉऊनमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गावर मिळवलेले नियंत्रण अनलॉक-1 मुळे आटोक्याबाहेर गेले का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पण याला काहीच अर्थ नाही. एकीकडे सरकारने कोरोनाबरोबर रहायला शिकायचे आहे असे म्हटले होते. मग आता पुन्हा अनलॉकनंतर हे चुकले की बरोबर होते यावर कात्थ्याकूट कशासाठी चालवला आहे?
   सरकारच्या बोलात बोन नाही. प्रत्येकजण आपल्या सोयीने निर्णय घेतो आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात संवाद नाही. यात भरडली जात आहे ती जनता. याचा फटका आगामी निवडणुकांत सर्वच राजकीय पक्षांना बसणार आहे. अर्थात निवडणुका घेतल्या तर.
     म्हणजे 25 मार्च रोजी लागू झालेले लॉकडॉऊन 21 दिवसांनंतर शिथिल करण्यात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोकांचे जीव वाचवणे किंवा सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था टिकवणे अशी दोन आव्हानं होती. त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडॉऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉकडॉऊनचा कालावधी 14 एप्रिलवरुन 3 मेपर्यंत करण्यात आला. पुढेही मुदत वाढत गेली आणि अखेर 1 जूनपासून अनलॉक सुरू झाले. त्यावेळी जून जुलैमध्ये या रोगावर नियंत्रण मिळवले जाईल असे सांगितले जात होते. पण खर्‍या अर्थाने या काळानंतर मोठ्या संख्येने वाढ होत गेली. आता दररोज 80 हजारांच्यापुढे रूग्ण देशात सापडत आहेत. या गतीने फेब्रुवारीपयर्र्त रोज अडीच लाख रूग्णांची नोंद अशी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे देशातील प्रत्येक घरात याची लागण होईपयर्र्त हा रोग थांबणार नाही का? असे असेल तर तीन महिने लॉकडाउन घेउन काय मिळवले? अनलॉकमध्ये नियम शिथिल करून साध्य काय झाले? त्यापेक्षा सर्व कारभार सुरळीत चालवला असता, काहीच प्रिकॉशन घेतली नसती तरी हीच परिस्थिती राहिली असती. मग या लॉकडाउन करून लोकांना देशोधडीला लावून काय मिळवले?
  अनलॉकचे तीन टप्पे पार केल्यानंतर भारतात अनलॉक-4 सुरू झाले आहे. पण कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक संख्या समोर येते आहे. याचा सरळ अर्थ आहे की भारतात लॉकडॉऊन अयशस्वी झाला आहे. सरकार हे कबूल करणार आहे का? केंद्र आणि राज्य सरकार परस्परांवर जबाबदारी ढकलण्यातच धन्यता मानणार का?
   काही प्रमाणात स्थानिक प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे लॉकडॉऊन अयशस्वी ठरला आहे. यामध्ये जे काळेधंदे झाले आहेत त्यासाठी कोणी चौकशी, कोणता आयोग नेमला जाणार का हा प्रश्न आहे. म्हणजे सुशांतसिंग राजपूतच्या एका आत्महत्येसाठी एवढी मोठी तपास यंत्रणा राजकीय अट्टाहासाने कामाला लावली आहे. मग हजारो मृत्युंसाठीही एखादी चौकशी करणे आवश्यक आहे. कित्येक लोकांना कोरोना नसतानाही डांबून ठेवून छळले गेले आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना छळले गेले आहे. वैद्यकीय व्यवस्थेने अन्य कोणत्याही रोगावर उपचार न करता सामान्यांना छळले आहे. कोणताही आजार झाला तर तो संशयीत कोरोना रूग्ण म्हणून सरकारी हॉस्पीटलकडे पिटाळण्याचे काम कमीशन एजंट प्रमाणे काही डॉक्टरांनी केलेले आहे. ही जी काही लूट चालली आहे, छळवणूक झाली आहे त्याच्याकडे कोणी दुर्लक्ष केले? सरकारी हॉस्पीटलकडे नसलेले रूग्ण पाठवायचे आणि लागण करून घरी आणायचे असेच तंत्र या काळात विकसीत झाले आहे. याचीही चौकशी करण्याची गरज आहे. कारण अन्य रोगांवर औषधोपचार करण्याचे डॉक्टरांनी काही काळ का थांबवले होते? हे लॉकडाउनच्या काळात घडले. तिथेच या रोगाचा प्रसार झाला असावा. अगदी आपल्या जवळचे, कानाकोपर्‍यातले, फॅमिली डॉक्टरही रूग्ण किरकोळ आजारासाठी गेल्यावर तपासण्यास नकार देत होते व कोव्हीडची टेस्ट करण्यासाठी पाठवत होते. म्हणजे एकीकडे गर्दी करू नका असे सांगितले जात होते आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये गर्दी करून या रोगाचा प्रसार केला जात होता. त्यमध्ये याचा रिपोर्ट त्याला, त्याचा रिपोर्ट याला असेही प्रकार झाले होते. या सगळ्या प्रकारांची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याकडे लॉकडॉऊन यशस्वी झाला असे वाटत नाही. खरंतर  सुरुवातीला कडक लॉकडॉऊनची आवश्यकता नव्हती. टप्याटप्प्याने लॉकडॉऊन करणं गरजेचे होते. केवळ हॉटस्पॉट परिसरात कडक निर्बंध लावणे अपेक्षित होते. पूर्ण देशात एकाच वेळी लॉकडॉऊन लागू करण्यात आल्याची ही पहिलीच घटना होती. संपूर्ण देशाला वेर्ठीला धरले आणि या रोगाचा प्रसार वाढवला गेला आहे. यासाठी सरकारच्या यंत्रणेत असलेल्या या सर्वांचीच चौकशी करायला हवी असे वाटते. कारण यापूर्वी साथीच्या आरोग्य संकटात असे कधीही झाले नव्हते. आता जेव्हा संसर्ग वाढतोय तेव्हा अनलॉक करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. लोकांचा जीव वाचवायचा आहे असे सुरुवातीला सांगितले गेले. त्यानंतर लोकांच्या उपजीविकेचा विचार करायचा आहे असे सांगण्यात आले. यावेळी तसे झाले नाही. अनेकांचा रोजगार गमावला गेला. याला जबाबदार कोण?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: