काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी या शनिवारी उपचारासाठी, नियमीत तपासणीसाठी परदेशी रवाना झाल्याची बातमी रविवारच्या सकाळी सर्व वाहिन्यांनी दाखवली. त्यामुळे अत्यंत वाईट वाटले, कारण स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष झाली तरी आम्ही आमच्याकडे चांगली आरोग्य व्यवस्था निर्माण करू शकलो नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना नियमीत तपासणीसाठीही परदेशात जावे लागते. त्यामुळे हा इथल्या आरोग्ययंत्रणेवरचा अविश्वास म्हणायचा का? तसे असेल तर तो इथल्या डॉक्टरांचा अपमान आहे. म्हणजे कंगना राणावत यांना जसा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही तसाच सोनिया गांधींचा भारतीय डॉक्टरांवर विश्वास नाही असेच म्हणावे लागेल.
काहीही असले तरी ही अत्यंत खेदाची बाब आहे. सोनिया गांधींना चांगले उपचार मिळावेत आणि त्या लवकरात लवकर भारतात परत याव्यात. त्यांना परदेशी डॉक्टरांच्या उपचारांनी दीर्घायुष्य लाभावे या शुभेच्छा आहेतच. पण हे करण्याची संधी भारतीय डॉक्टरांना नाही, त्यांना उपचार करण्याची क्षमता एकाही भारतीय डॉक्टरकडे नाही ही देशाच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे.खरं तर राफेल, जीएसटी, नोटबंदी आणि कुठल्या कुठल्या प्रश्नावरून पेटून उठून टीका करणार्या राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला पाहिजे की गेल्या सहा वर्षात एकही चांगला डॉक्टर या देशात का तयार झाला नाही, की जो माझ्या आईवर उपचार करू शकेल? चांगली आरोग्य व्यवस्था असती तर आज काँग्रेस मृत्यूशय्येवर पडली नसती. पण राहुल गांधी हे विचारू शकणार नाहीत. कारण पंतप्रधान मोदी त्यांना नक्की उत्तर देतील.
मोदी राहुल गांधींना म्हणतील, माझ्या सहा वर्षांचा हिशोब विचारताय, पण पंचावन्न वर्षात या देशात एकही डॉक्टर काँग्रेसला निर्माण करता आला नाही का? जो सोनियाजींवर उपचार करू शकेल? सहा वर्षात आम्ही प्रयत्न करत आहोत, ते डॉक्टर लवकरच तयार होतील, पण 55 वर्षात आरोग्याकडे लक्ष काँग्रेसच्या सत्ताधिशाांनी दिले असते तर तुमच्या मातोश्रींना उपचारासाठी अमेरिका, फ्रान्स, इटली असे जावे लागले नसते.
आता प्रसारमाध्यमांनी रविवारी सकाळीच सांगितले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी परदेशी रवाना झाल्या आहेत. आता काही असाध्य आजार असेल, ज्याची उपचारयंत्रणा आपल्या देशात नसेल तर परदेशात जाणे अपरिहार्य असते. पण नियमीत तपासणीसाठीही त्यांना का जावे लागते? म्हणजे नियमीत आणि प्राथमिक तपासण्याही या देशात होउ शकत नाहीत का? म्हणजे पंचाहत्तर वर्षात देशातल्या एखाद्या प्रमुख व्यक्तिला उपचारांसाठी भारतात सोय नसावी हाच विकास आहे का?
खरं तर आपल्या देशातील अनेक मान्यवर नेते अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुकर्जी, अरूण जेटली, सूषमा स्वराज अशा कितीतरी लोकांनी भारतातच उपचार घेण्याचा मोठेपणा दाखवला. आमचे काही झाले तरी चालेल पण आमचा भारतीय डॉक्टरांवर एम्स सारख्या हॉस्पिटलवर विश्वास आहे. पण तसा विश्वास सोनिया गांधींना अजूनही वाटत नाही याचे नेमके रहस्य काय असावे? भारतीय डॉक्टरांच्या दृष्टीने ही अत्यंत शरमेची बाब म्हणावी लागेल की देशात लाखो डॉक्टर असूनही, हजारो चांगल्या दर्जाची हॉस्पीटल्स असूनही सोनिया गांधींसारख्या महत्वाच्या व्यक्तीला नियमीत उपचारासाठी परदेशात जावे लागते. काय करतात आमचे डॉक्टर? काय उपयोग आहेत मोठमोठ्या नेत्यांची नावे देउन चालवली जाणारी हॉस्टीटल?
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. विरोधीपक्षाच्या मोठ्या नेत्या, काँग्रेसच्या अध्यक्षा जर या अधिवेशनाला उपस्थितर राहु शकत नसतील तर कसे चालेल? संसदेच्या अधिवेशनासाठी 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परदेशी रवाना झालेल्या सोनियांसमवेत त्यांचे पुत्र राहुल गांधीही आहेत. काही दिवसांनी राहुल परततील. त्यामुळे पहिले काही दिवस राहुलही अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती पुढे येत आहे. राहुल गांधींनाही याबाबत वैषम्य कसे वाटले नाही याचे आश्चर्य आहे. पण ते याबाबत मूग गिळून गप्प बसतील. याचे कारण नेहरू गांधी घराण्याची ख्यातीच अशी आहे की त्यांना भारतापेक्षा परदेशात जाणे फार आवडते. पंडित नेहरूंबाबत अशी एक आख्यायिका आहे की ते सकाळचा नाष्टा एका देशात, जेवण दुसर्या देशात आणि कपडे बदलायला म्हणे तिसरीकडे जात असत. यातली अतियशोयक्ती आणि खरे खोटे देवालाच माहिती. पण तीच परंपरा सोनिया गांधी, राहुल गांधी जपणार का?
अधिवेशनाला उपस्थित राहता येत नसल्याने परदेशी जाण्यापूर्वी सोनियांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर व्यापक फेरबदल केले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. अधिवेशनात चांगला समन्वय ठेऊन देशाशी संबंधित महत्वाचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्याचे सांगण्यात आले. करोना संकट, अर्थव्यवस्थेची घसरण आणि भारत-चीन सीमेवरील तणाव आदी मुद्द्यांवरून प्रामुख्याने काँग्रेस मोदी सरकारला घेरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पण देशातील आरोग्य व्यवस्था गेल्या 75 वर्षात चांगली नाही आणि इथले एकजात सगळे डॉक्टर कुचकामी आहेत हा संदेश सोनिया गांधींनी यानिमित्ताने दिला आहे हा फार महत्वाचा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा