कोणतीही तपासयंत्रणा कामाला लागते तेंव्हा त्या तपासात अनेक गुन्हे उघड होत असतात. म्हणजे जेंव्हा एखादा गुन्हा तपासासाठी असतो तेंव्हा त्यामागे अनेक अपराध एकत्रित येउन तो गुन्हा घडलेला असतो हे आपल्या लक्षातही येत नसते. पण तपासयंत्रणेची नजर काही वेगळीच असते, याचे प्रत्यंतर सध्या येताना दिसते आहे. म्हणजे, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून अमली पदार्थ व्यवहाराचे एक वेगळेच प्रकरण समोर आलेले आहे. जे कोणी या आत्महत्येची चौकशी करा म्हणत होते, त्यापैकी कोणालाही हे प्रकरण अमली पदार्थांकडे वळेल असे तेंव्हा तरी वाटले नसेल. आता या प्रकरणाचा प्रत्यक्ष सुशांतसिंहच्या मृत्यू अथवा आत्महत्येशी थेट संबंध आहे की नाही हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. पण जेंव्हा गटर तुंबते, साफ करावे लागते तेंव्हा फक्त गाळच नाही तर अन्य अडकलेल्या गोष्टीही बाहेर येत असतात. तसेच इथे होताना दिसते आहे. यातून या बॉलिवूडच्या चंदेरी झगमगाटाआडची आणखी काही भुते मात्र या प्रकरणाच्या तपासाच्या निमित्ताने वर आलेली आहेत हे निश्चित.
सुशांतसिंह राजपूत हा जर अमली पदार्थांचे सेवन करीत होता, तर तो स्वतःहून ते करीत होता की त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉटस्ऍप चॅटमध्ये जे सांकेतिक संदेश आढळले आहेत, त्यात म्हटल्यानुसार तिचा त्यामध्ये वाटा होता हे स्पष्ट करायचे आव्हान तपास यंत्रणांपुढे आहे. त्याचा मृत्यू हा खरोखरच आत्महत्या आहे की अन्य काही कारणाने तो ओढवला आणि त्यावर पांघरूण घालण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचला गेला हेही तपासावे लागणार आहे. पण या प्रकरणाला आता वेगळ वळण मिळताना दिसते आहे, बॉलीवूडच्या वास्तवात एक नवे ट्विस्ट आता येणार हे दिसते आहे. परंतु बॉलीवूडमधील घटना, देशातील घटना, परिस्थिती, सहिष्णुता यावर बोलणारे अनेक विचारवंत यामध्ये काहीही बोलताना दिसत नाहीत. जावेद अख्तर, शबाना आझमी हे दांम्पत्य यावर काहीच रिअॅक्ट झाले नाही याचे आश्चर्य आहे.आतापर्यंत सुशांतसिंहशी संबंधित काही व्यक्तींना तपास यंत्रणेने अटक केली, त्यामध्ये त्याचा स्वयंपाकी दीपेश सावंत, व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक यांचा समावेश आहे. मंगळवारी रिया चक्रवतींलाही अटक करण्यात आली. तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. पण हे प्रकरण कुठल्या वळणाला जाते आहे हे आज अनाकलनीय झालेले आहे. अशा प्रकारे जेव्हा संशयितांना थेट अटक होते, तेव्हा निश्चितच त्यामागे काही ठोस धागेदोरे सापडलेले असतात. अमली पदार्थ व्यवहारासंदर्भात या व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळालेले असल्याखेरीज ही कारवाई झाली नसती. त्यामुळे अजूनही या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी वेळ देणे आवश्यक आहे.
सुशांतसिंहच्या मृत्यूच्या आधी त्याच्या पूर्वीच्या व्यवस्थापिकेचा दिशा सॅलियन हिचा आपल्या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून जो संशयास्पद मृत्यू झाला, ते प्रकरणही आता या अनुषंगाने तपासले जाईल. ज्या पार्टीच्या वेळी ती घटना घडली, त्यात कोण कोण उपस्थित होते, तेथे नेमके काय चालले होते याचाही शोध तपासयंत्रणांना घ्यावा लागेल. पण त्याहीपेक्षा आता ही सर्व प्रकरणे मुंबई पोलीसांकडून काढून दुसरीकडे सोपवल्याने बाहेर आलेली आहेत. याचा अर्थ मुंबई पोलीस काही लपवून ठेवत होते का, कोणाला पाठीशी घालत होते का असा संशय निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर ते चुकीचे असेल. मुंबई पोलीसांच्या आजवरच्या कामगिरीवर ते पाणी फिरवल्यासारखे होईल.
खरं तर हे संपूर्ण प्रकरण चक्रावून टाकणारे आहे, कारण ज्या चौदा जूनच्या सकाळी तो त्याच्या प्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला, त्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्याचे बहिणीशी बोलणे झाले होते. त्यानंतर एकाएकी तो संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढते. मुंबई पोलिसांनी सुरवातीला केलेल्या तपासकामामध्ये अनेक त्रुटी होत्या हे आता सीबीआयच्या हाती हे तपासकाम जाताच उघड झालेले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत होते का, त्यांना अमली पदार्थांचे हे धागेदोरे का शोधावेसे वाटले नाहीत असे प्रश्न आता नक्कीच उपस्थित होतात. त्याचे उत्तर आता गृहखात्याला आणि सध्याच्या सरकारला द्यावे लागणार आहे हे नक्की. पण एकुणच याचा वापर केवळ राजकारणासाठी होणार हेही स्पष्ट होते आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या सध्या मुंबई पोलिसांवर कंगना राणावतने केलेल्या शेरेबाजीचे एक प्रकरण गाजते आहे. शिवसेनेचे संजय राऊत विरुद्ध कंगना हा जो सामना रंगला आहे तो अनावश्यक व जनतेचे लक्ष सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासकामापासून अन्यत्र वळवणारा आहे, अशा टीकेला आमंत्रण देणारे आहे. शिवसेनेने कंगनाचे महत्व वाढवून तिला इतके मोठे करायची गरज नव्हती. पोलीसांनी त्यांचा तपास केला असता. त्याहीपेक्षा या प्रकरणामध्ये टीव्ही वृत्त वाहिन्यांनी नको इतका हस्तक्षेप केलेला पहायला मिळाला. त्यामुळे अर्णव गोस्वामीला हक्कभंगाची नोटीस दिली गेली हे योग्यच झाले. कारण वाहिन्या ज्या प्रकारे ताळतंत्र सोडून काम करत आहेत, त्यांना कुठेतरी समज देणे आवश्यक होतेच. अभिव्यक्तीच्या नावाखाली संशयाचे भोवरे तयार करण्याचे जे काम चालवले आहे त्याला आळा बसण्याची गरज आहे. कारण वाहिन्यांच्या अशा वक्त्यातून तपासयंत्रणांना चुकीची दिशा मिळण्याचा संभव असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अतिउत्साहाला या वाहिन्यांना आळा घालायला हवा. तपासयंत्रणांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. बाकीचे खूप प्रश्न पडलेले आहेत, त्याकडे जरा लक्ष दिले तरी चालेल ही जाण वाहिन्यांनी घेतली तर बरेचसे प्रश्न सुटतील. प्रश्न चिघळवण्याचे काम वाहिन्यांनी थांबवले पाहिजे हे यानिमित्ताने सांगावेसे वाटते. कारण आजकाल बातमीपेक्षा एखाद्या नेत्याला उचकावणे, भडकावणे असे प्रकार होत आहेत. यातूनच कोणीतरी कानफटात देण्याची भाषा करतो, कोणी हरामखोर म्हणतो. हे प्रकार थांबवले पाहिजेत. आता हे प्रकरण एवढे बहुचर्चित बनले आहे की त्यावर पांघरूण टाकणे कोणालाही शक्य होणारे नाही. त्यामुळे आज ना उद्या यातील सत्य उजेडात नक्की येईल हा विश्वास हवा.