हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका म्हणून हिराबाई बडोदेकर यांचे नाव खूप मोठे आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज येथे आजच्या दिवशी म्हणजे २९ मे रोजी १९०५ साली झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखाँ आणि ताराबाई माने यांच्या त्या कन्या होत्या. ताराबाई या बडोदे सरकारच्या सेवेत होत्या. या दाम्पत्यास सुरेशबाबू माने, हिराबाई बडोदेकर, कृष्णराव माने, कमलाताई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे ही पाच मुले. १९२२ मध्ये ताराबाई अब्दुल करीमखाँपासून वेगळ्या झाल्या आणि त्यांनी सर्व मुलांची आडनावे बदलली. त्याचवेळी हिराबार्इंचे बडोदेकर हे आडनाव लावण्यात आले.
हिराबार्इंना घरी चंपूताई असे संबोधत असत. गाण्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या हिराबार्इंना लहानपणापासून गाण्याची आवड होती; पण ताराबार्इंना आपल्या मुलींनी शिकून समाजात प्रतिष्ठितपणे जगावे असे वाटत होते. कारण त्याकाळी घरंदाज मुलींनी गाणे शिकण्याची प्रथा नव्हती. हिराबार्इंनी पुण्याच्या हुजूरपागा शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. पण त्यांच्या मूळ आवडीप्रमाणे त्या संगीताकडे वळल्या. त्यांचे सुरुवातीचे संगीताचे शिक्षण ताराबार्इंकडे आणि मोठे बंधू सुरेशबाबूंकडे झाले. त्यांच्याकडून हिराबार्इंना संगीताचे सतत मार्गदर्शन लाभत असे. ताराबाई तबल्यावर ठेका धरणे, स्वरलेखन करणे अशा गोष्टी लीलया करत. ताराबार्इंचे हे कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्यानंतर हिराबार्इंनी आग्रा घराण्याचे उस्ताद महंमदखाँ यांच्याकडे त्यांनी तालीम घेण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला. हिराबार्इंना किराणा घराण्याची रीतसर तालीम अब्दुल वहीद खाँ यांच्याकडून १९१८ पासून १९२२ पर्यंत मिळाली.
हिराबार्इंचे पहिले जाहीर गायन वयाच्या १६ व्या वर्षी गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत परिषदेमध्ये मुंबईत १९२१ साली झाले. तेथे त्यांनी पटदीप हा राग गायला आणि त्याला प्रचंड दाद मिळाली. त्यांचे गाणे लोकांना आवडले आणि त्यामुळे त्यांना प्रसिद्धीही मिळाली. ताराबार्इंनी अर्थार्जनासाठी म्हणून गिरगाव टेरेसेस या इमारतीत १९२० मध्ये नूतन संगीत विद्यालय सुरू केले होते. तेथे सुरेशबाबू आणि ताराबाई शिकवित असत. हिराबाईही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असत. १९२२ पासून हिराबाई संगीताच्या व्यवसायात उतरल्या आणि त्यांनी स्वतंत्र जलसे करायला सुरुवात केली. १९२३ साली एच.एम.व्ही. या प्रख्यात ध्वनिमुद्रिका बनवणाºया संस्थेने हिराबार्इंची जया अंतरी भगवंत ही मराठी भजनांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली. त्याचबरोबर सखी मोरी रुमझुम ही हिंदी ध्वनिमुद्रिकाही काढली. ध्वनीमुद्रिकांसाठी आवश्यक असणारे नेमके आणि मर्यादित वेळेत प्रभावीपणे गाण्याचे तंत्र हिराबार्इंनी अचूकपणे साधले होते. त्यांच्या ध्वनिमुद्रिकांना खूप लोकप्रियता व मागणी लाभली. त्यांच्या गायनाच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका त्या काळात निघाल्या. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून १९२८ सालापासून त्यांनी गाण्यास सुरुवात केली. जवळपास ४० आकाशवाणी केंद्रांवरून त्यांचे गाणे प्रसारित होई. आकाशवाणी आणि ध्वनिमुद्रिका यांतून त्यांचे गाणे सर्वदूर पसरले. पुण्याच्या आर्यभूषण थिएटरमध्ये हिराबार्इंनी पहिला जाहीर संगीत जलसा केला. स्वत:च कार्यक्रम लावण्यापासून ते जाहिरात करून तिकीट विक्रीपर्यंत सर्व कामे हिराबाई आणि त्यांच्या भावंडांनी केली. एखाद्या स्त्रीने तिकीट लावून असे जलसे करणे आणि त्यात शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करणे ही संकल्पनाच तेव्हा नवी होती. त्या काळात याला थोडाफार विरोधही झाला. तरीही तो पत्करून हिराबार्इंनी असे जलसे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही यशस्वी केले आणि आपले हिरा हे नाव चमकत ठेवले.
दरम्यानच्या काळात ताराबार्इंनी नूतन संगीत विद्यालय नाट्यशाखा या संगीत नाटक मंडळीची स्थापना केली. या नाटक मंडळीच्या सौभद्र या नाटकातून हिराबार्इंनी सुभद्रेची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले. यातील त्यांनी गायलेली गाणी गाजली. यानंतर साध्वी मीराबाई, संशयकल्लोळ, युगांतर, पुण्यप्रभाव, विद्याहरण तसेच जागती ज्योत, स्त्री-पुरुष आदी नाटकांतूनही भूमिका केल्या. कालांतराने ही नाट्यसंस्था बंद पडली. त्यानंतर रंगभूमीवर १९६५ पर्यंत अधूनमधून त्या भूमिका करत राहिल्या. हिराबार्इंनी चित्रपटातही भूमिका केल्या. मो. ग. रांगणेकर यांच्या सुवर्ण मंदिर, बाबूराव पेंटर यांच्या प्रतिभा तसेच रवींद्र चित्रच्या संत जनाबाईमध्ये त्यांनी भूमिका केल्या. अनेक चित्रपटांकरिता पार्श्वगायनही केले. त्यांनी १९४९ साली गाण्यासाठी आफ्रिकेचा दौरा केला. तसेच भारतीय शिष्टमंडळाबरोबर १९५३ साली त्यांनी चीनचा दौरा केला.
कोलकात्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत त्यांना गाण्याचे आमंत्रण मिळाले. जालंदरला दरवर्षी हरिवल्लभ मेळा भरत असे, या मेळ्यात गाणाºया त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. त्यांनी संपूर्ण भारतभर विविध ठिकाणी विविधप्रसंगी संगीताचे कार्यक्रम केले. विविध संगीत परिषदांमध्ये त्यांनी सातत्याने गायनाचे सादरीकरण केले. उस्ताद अब्दुल करीमखाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य संगीत महोत्सवात ८ डिसेंबर १९७३ रोजी त्यांनी आपले गाणे सादर केले. त्यानंतर त्यांनी गायनाच्या जाहीर कार्यक्रमातून निवृत्ती स्वीकारली. पण त्यांच्या संगीताच्या तालमी चालू राहिल्या.
हिराबार्इंनी अनेक गानप्रकार गायले. राग संगीताबरोबरच नाट्यपदे, ठुमरी, भावपदे, भजन, अभंग त्या आवर्जून गात असत. त्यांनी गाण्यातून भावनिकता आणि वैचारिकता यांचा सुरेख मेळ साधून ते संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. अत्यंत तलम, रेशमी, सुरेल आलापी आणि तारषड्जाचा हमखास प्रभावी लगाव ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये. सोज्वळपणा आणि शालीनता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुण त्यांच्या गाण्यातही दिसत होता. शांत व संयमी भाव हे त्यांच्या अभिव्यक्तीचे वैशिष्ट्य होते. हिराबार्इंनी स्त्रियांच्या गायनाच्या सादरीकरणाला शालीनता, शिस्त, प्रतिष्ठितपणा आणि भारदस्तपणा प्राप्त करून दिला. ज्या काळी हिराबाई मैफली करीत असत, त्याकाळी गाण्याच्या बैठकी सर्वसाधारणपणे राजदरबारी किंवा एखाद्या धनिकाकडे, इनामदाराकडे वा जमीनदाराकडे खासगी स्वरूपाच्या होत असत. इतर गायनाचे कार्यक्रम मुख्यत: कलावंतिणींचे असायचे. त्यांत अदाकारीला महत्त्व होते. त्यामुळे या सादरीकरणात काही अनिष्ट प्रथाही रूढ झाल्या होत्या. हिराबार्इंनी मात्र आपल्या मैफलींत बैठकीवर बसून शांतपणे, हातवारे न करता, शिस्तीने आणि भारदस्तपणे गाण्याचे सादरीकरण करण्याचा पायंडा पाडला आणि स्त्रियांचे गाणे गंभीरपणे, रसास्वद घेत, स्वरानंद अनुभवीत ऐकण्याची सवय श्रोत्यांना लावली. हे त्यांचे फार मोठे योगदान आहे.
१९२४ साली सोलापूरमधील माणिकचंद गांधी या खानदानी श्रीमंत गृहस्थांशी त्यांचा विवाह झाला. हिराबार्इंना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. किर्लोस्कर थिएटरतर्फे आयोजित केलेल्या जलशात सर चुनीलाल मेहता यांनी त्यांना गानहिरा या पदवीने गौरविले. मुंबई आकाशवाणीने त्यांना १५ आॅगस्ट १९४७ या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. मराठी नाट्य परिषदेने बालगंधर्व सुवर्ण पदक देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण किताबाने गौरविले. त्या विष्णुदास भावे सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या. कोलकात्याच्या आय. टी. सी. संगीत रिसर्च अकादमीने त्यांचा सन्मान केला. हिराबार्इंचा शिष्य परिवारही मोठा आहे. त्यांच्या भगिनी सरस्वतीबाई राणे, प्रभा अत्रे, मालती पांडे, जानकी वैद्य (अय्यर), मीरा परांजपे, सुलभा ठकार इत्यादींचा त्यांच्या शिष्य वर्गात समावेश होतो. हिराबार्इंचे वयाच्या ८४ व्या वर्षी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
प्रफुल्ल फडके/संस्कृती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा