मंगळवार, १२ मे, २०२६

आनंद यात्री संगीतकार आनंद मोडक


मराठी संगीतकारांमध्ये अनेक दिग्गज होऊन गेले. त्यांचे वैशिष्ट्य आणि वैविध्य पाहता कोणाही सामान्य माणसाला तिथेपर्यंत पोहोचणे शक्य नाही. या स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण करणे आणि संगीतकार म्हणून प्रस्थापित करणे हे सोपे काम नाही. पण यातही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे संगीतकार म्हणजे आनंद मोडक. आज १३ मे हा त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याची आठवण आपण केली पाहिजे.


आनंद मोडक हे मराठी संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे, मराठी रसिकांना आपल्या संगीताच्या जादूने मंत्रमुग्ध करणारे जादूगार होते. पुणेकर आनंद यांचे अकोला आणि शेगाव हे वीकपॉइंट. मूळचे अकोल्याचे असलेले आनंद मोडक हे बँक आॅफ महाराष्ट्रतील नोकरीमुळे शिक्षण अर्धवट सोडून पुण्याला गेले. मात्र, अकोल्यावरील त्यांचे प्रेम तीळमात्रही कमी झाले नव्हते.

आनंद मोडक यांच्या बालपणाची सुरुवातच रंगमंचावर झाली. आनंद मोडक यांची आई कुंदाताई व गुरू सूरमणी शकूताई पळसोकर या दोघी मैत्रिणी होत्या. त्यांनी सौभद्र, एकच प्याला, रुक्मिणी स्वयंवर अशा अनेक संगीत नाटकांमध्ये एकत्र काम केले. कुंदातार्इंची भूमिका असली की शकूताई बाळ आनंदला घेऊन विंगेत थांबायच्या, तर शकू तार्इंची भूमिका असताना कुंदाताई. अशा रीतीने कितीतरी नाटके आनंद मोडकांनी बालपणीच पाहिली होती. त्यांच्यासाठी कुंदाताई प्रेरणास्रोत होत्या. शकूताई जशा त्यांच्या गुरू होत्या, तशाच त्या मावशीसुद्धा. शकूतार्इंच्या विदर्भ संगीत अकादमीमध्येच आनंद मोडक यांनी हार्मोनियमचे धडे गिरवले. एकनाथपंत कुळकर्णी, सुधाकर प्रधान यांच्याकडूनही आनंद मोडकांना संगीताचे संस्कार मिळाले.


शाळेत असताना क्रिकेटवरील प्रेमामुळे त्यांना क्रिकेटर व्हायचे होते. परंतु पुढे कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांचे क्रिकेटवेड कमी झाले. कॉलेजमध्ये ते प्रचंड खोडकर होते. असे एकही प्राध्यापक नाहीत, ज्यांची आनंद यांनी नक्कल केली नाही. कॉलेजात आलेल्या नवीन प्राध्याप्रकाची खोडी करणे, नक्कल करणे हा त्यांचा छंदच होता. तसेच एखाद्यावर कविता करणे आणि चिठ्ठीवर नाव न लिहिताच सर्वांना संभ्रमात ठेवणे, असे प्रकार रोजचेच असायचे. कोणी आपल्याला चिठ्ठी दिली, याचा शोध कॉलेजभर घेतला जायचा. यातून प्राचार्यदेखील सुटले नाहीत. पण त्यांनी केलेल्या कविता सर्वांच्या पसंतीस उतरायच्या. सर्वजण अत्यंत खेळकरपणे त्या प्रतिभावंताची दखल घेत होते.

कॉलेजमध्ये त्यांच्यापेक्षा तीन-चार वर्षे सीनियर विद्यार्थ्यांचा नाटकाचा ग्रुप होता. त्यांनी बसवलेल्या एका नाटकासाठी त्यांनी प्रॉम्प्टर म्हणून काम केले. दुसरे नाटक सुंदर मी होणार, हे बसवत असताना, मी परत प्रॉम्प्टर म्हणून काम करतो, असे ते म्हणाले. त्यांचे नाटकावरील प्रेम पाहून त्यांना नाटकातील एक छोटीशी भूमिका देण्यात आली. त्यांनी ती दोन-तीन वाक्ये एवढी जबरदस्त उच्चारली की सर्व भारावून गेले. दोन वाक्य असली तरी तालमीच्या वेळी ते त्यांच्या भूमिकेबद्दल फार गंभीर असायचे. त्यांची शब्दफेक, संवादाची लकब पाहून त्यांनी नाटक क्षेत्राकडे वळावे, असे प्रत्येकाला वाटायचे आणि जेव्हा त्यांनी जब्बार पटेलांचे घाशीराम कोतवाल हे पहिले नाटक केले, त्या वेळी त्यांच्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्या मित्रांना झाला. शिवाय त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला, त्या वेळी अनेकांनी त्यांना पत्र, तर काहींनी त्यांच्यावर लेख लिहिले. प्रतिसाद म्हणून मोडक यांनी प्रत्येकाला न विसरता उत्तर पाठवले. कितीही मोठा झालो तरी, तुमच्यासाठी मी तोच खोडकर आनंद आहे, अशी विनम्र भावना त्यांनी त्या वेळी व्यक्त केली होती.


कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आनंद मोडकांनी संगीताचे सादरीकरण केले. सुरुवातीला ते गोंधळले. कॉलेजचे संस्थापक सचिव बाबूराव जोशी यांनी हटकले. त्या वेळी आनंद यांनी आली आली गं भागाबाई हे लोकगीत म्हटले. ते ऐकून हा संगीताचा बादशहा होणार असे उद्गार जोशी यांनी काढले आणि पुढे ते खरे झाले. बीएस्सीला असताना मोडक यांना पुण्याला बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये नोकरी लागली आणि घरच्या काही अडचणींमुळे त्यांनी शिक्षण सोडून नोकरी स्वीकारली. त्याचदरम्यान त्यांच्या बहिणीचे अकस्मात निधन झाले. तिच्या दोन्ही मुलांना त्यांनी आईचे प्रेम दिले. आज त्यांचा भाचा अमेरिकेत नोकरी करत आहे, तर भाचीचे लग्न होऊन ती सासरी सुखी आहे.

आनंद मोडकांनी प्रत्येकासोबत केवळ नाते जोडले नाही, तर ते मनापासून निभावलेसुद्धा. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, परोपकारी वृत्तीमुळे ते सर्वांचे आवडते होते. पुण्यात बँकेत काम करत असताना त्यांच्या याच लाघवी स्वभावामुळे जनरल मॅनेजरने त्यांचे टेबल मोडकांच्या टेबलसमोर हलवले. मित्र आल्यानंतर चक्क जब्बार पटेलांना नाटकाची तालीम रद्द करायला सांगायचे. अकोल्यात त्यांचा एट फेलुअर्स नावाचा आठ मित्रांचा ग्रुप होता. त्यांचे गुरू प्रा. पंढरीनाथ मांडवगणे पुण्याला एका सेमिनारनिमित्त गेले होते. तेथे त्यांना शोधण्यासाठी मोडकांनी जब्बार पटेलांना कितीतरी तास फिरवले आणि पहिल्या सत्रानंतर ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगायचो, ते हेच माझे सर अशी ओळख जब्बार पटेलांना करून दिली.


अकोल्यातील संगीत क्षेत्रातील व्यक्ती पुण्यात गेली की तू येथे क्लास सुरू कर, पुण्यात संगीतातील बेसिक शिकवणारे कोणीच नाही, असा त्यांचा आग्रह असायचा. अकोल्यातील अनेक कलावंतांना पुणे फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण करण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली. शेगावच्या गजानन महाराजांवर त्यांची निस्सीम भक्ती. कुठेही जाताना मोडक शेगावला थांबायचेच. गजानन महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या एक दिवस आधी ते शेगावला आले आणि दर्शनानंतर न विसरता पारायण केले. अकोल्यात ज्या सीताबाई कला महाविद्यालयात ते शिकले, तेथे २०१०मध्ये उभारलेल्या साऊंड रेकॉर्डिंग स्टुडिओचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी परिसंवादात त्यांचा सहभाग होता. २०२० मध्ये भारत महाशक्ती बनेल का आणि त्या वेळी भारतीय संगीत कुठे व कसे असेल याविषयी त्यांनी नुसतेच भाषण केले नाही तर, संगीताचे सादरीकरणदेखील केले.

आनंद मोडक केवळ नावापुरते नव्हे तर ख‍ºया अर्थाने सर्वांना भरभरून आनंद देणारे आनंद यात्री असे कलावंत होते. वेगळ्या विषयावरचे चित्रपट असले की हमखास त्याला आनंद मोडक यांचे संगीत असायचे. यामध्ये १९७९ला चाफेकर बंधूंवर आलेला २२ जून १८९७ या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय नशिबवान, कळत नकळत, सूर्योदय, चौकट राजा, लपंडाव, घायाळ, मुक्ता, आई, दोघी, सरकारनामा, तू तिथं मी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, रमा माधव, खैरलांजीच्या माथ्यावर असे अनेक चित्रपटांचा उल्लेख हा करावा लागेल. जब्बार पटेल यांनी तर कायम आनंद मोडक यांनाच संधी दिली. स्मिता तळवलकर यांनीही आनंद मोडक यांचे संगीत आपल्या चित्रपटांना वापरले. कारण या आनंद यात्रीबरोबर काम करताना सर्वांना आनंद मिळत होता.


- प्रफुल्ल फडके/द स्क्रीन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: