रविवार, १० मे, २०२६

गदिमांचा खरा वारसदार जगदीश खेबुडकर


कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात बालपण गेलेले आणि करवीर नगरीचा अभिमान आपल्या प्रत्येक बोलण्यावागण्यातून जाणवून देणारे जगदीश खेबुडकर हे एक प्रतिभावंत कवी होते. लोकगीताचे काव्यबीज बालपणापासून मनात आणि आत्म्यात पेरले गेलेले, आणि त्यामुळेच प्रत्येक कलाकृती ही त्या त्या वेळची श्रेष्ठ ठरलेले असे हे कवी. मराठी चित्रपट आणि काव्यसृष्टीमध्ये ग.दि. माडगुळकर यांचे स्थान सर्वश्रेष्ठ मानले जात होते. त्याचा खºया अर्थाने वारसदार कोण असेल तर जगदीश खेबुडकर यांचे नाव घ्यावे लागेल. आज १० मे हा त्यांचा जन्मदिवस.


लहानपणापासूनच वडिलांच्या शिक्षकी पेशामुळे मराठीचे बाळकडू घरातच पाजले गेलेले. अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही चांगल्या पद्धतीने माध्यमिक शिक्षण शहरात जाऊन घेतले. शालेय जीवनापासूनच कथा-नाट्य-काव्यामध्ये रस घेणाºया खेबुडकरांनी विश्वभारतीसारख्या मेळाव्यातून रुपये एक, इतक्या नाममात्र मानधनावर आपली कला जोपासली. मोठी संकटेसुद्धा या छंदाला भेदू शकली नाहीत आणि वयाच्या १६व्या वर्षी स्वत:च्या डोळ्यासमोर पेटते घरही त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेले आणि जन्माला आली, ‘मानवते तू विधवा झालीस!’ हे त्यांचे काव्य. गांधीहत्येनंतर जी जाळपोळ झाली त्यात त्यांचे घर जाळले गेले, हे त्यांनी कोवळ्या वयात डोळ्याने पाहिले आणि त्या भावना काव्यातून व्यक्त केल्या.

यानंतर त्यांची प्रतिभा उत्तरोत्तर फुलत गेली. मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय असल्याने लोकगीतांवरील प्रभुत्व त्यांच्या काव्यातून दिसू लागले. पुणे आकाशवाणीने त्यांची ५० नवीन गाणी स्वीकारून एक नवे दालन त्यांना उघडून दिले. आणि १९५६ साली त्यांचे पहिले भक्तिगीत रेडिओवर प्रसारित झाले.


नामवंत संगीतकार वसंत पवार यांनी ते ऐकले आणि त्यांना चित्रपट गीते लिहिण्यासाठी बोलावून घेतले. १९६० साली ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटासाठी खेबुडकरांना प्रथम लावणी लिहिण्याची संधी मिळाली आणि करवीर नगरीच्या प्रतिभेचा वारसा भिनलेल्या या कलावंताने ‘नांव गांव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची’ ही फर्मास लावणी लिहिली. या लावणीने अख्ख्या महाराष्ट्राला भुरळ घातली आणि गदिमांचा वारसदार तयार झाल्याची पावती दिली. १९६० सालचे प्रतिष्ठेचे रसरंग फाळके पारितोषिक या लावणीला मिळाले.

यानंतर भालजी पेंढारकरांच्या ‘साधी माणसं’, ‘मोहित्यांची मंजुळा’सारख्या चित्रपटांसाठी गीते लिहिण्याची संधी दिली आणि ‘ऐरणीच्या देवाला वाहिलेली ही ठिणगी’ मराठी चित्रपटसृष्टीत धगधगत राहिली. या गीताने त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपºयात तर पोचवलेच, पण अनंत माने, दत्ता माने, कमलाकर तोरणे यांच्या चित्रपटांतून मागणीचा ओघ वाढतच गेला आणि त्यांनी १९७३ साली व्ही. शांताराम यांच्या राजकमलपर्यंत मजल मारली. या चित्रमहर्षींनी खेबुडकरांना विचारले, ‘तुम्ही ज्यांना गुरू मानता अशा ग.दि. माडगुळकरांच्या स्थानी आम्ही तुम्हाला बसवू इच्छितो, तुम्हाला जमेल का?’ त्यावर, ‘‘मी कोल्हापुरी मातीचा अभिमान आणि तुमचा विश्वास व्यर्थ घालवणार नाही.’’ असे उत्तर दिले आणि ‘पिंजरा’ या १००व्या चित्रपटासाठी ११० गीते लिहून दिली. त्यातील ११ गीते चित्रपटासाठी निवडली गेली आणि ही सारी गीते आजही रसिकांना तितकीच ताजी वाटतात. त्यांच्या प्रत्येक गीतावर एक लेख होईल इतके त्यांनी त्या गीतामध्ये प्राण ओतलेले होते. लावणीसारखा ठसका आणि भक्तिगीतांची माया हे भिन्न प्रकार त्यांनी सहजतेने हाताळले होते. शरद पिळगांवकर यांच्या ‘अष्टविनायक’ चित्रपटासाठी ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे गीत म्हणजे अक्षरश: अष्टविनायकाची यात्रा घडवून आणणारे आध्यात्मिक गीत आहे. अशा असंख्य गीतांनी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली.


आपल्या कारकिर्दीत अंदाजे ४०० चित्रपटांसाठी गीतांचे सर्व प्रकार जगदीश खेबुडकरांनी हाताळले. बालगीतापासून प्रेमगीते, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाई गीते, कीर्तन, वासुदेव, कोळीगीत, गण, गौळण, वग, हादग्याची गाणी, भजन असे अनेक प्रकार हाताळले. सर्व थरांतल्या, सर्व वयोगटांसाठी अविस्मरणीय अशी गीतरचना सातत्याने त्यांच्याकडून होत आली आहे. शिक्षकी पेशामध्ये असल्याने आपल्या हाताखालच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मौलिक असे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत राहिले. त्यापैकी अनेक विद्यार्थी आता भारतभर अनेक प्रकारच्या उच्च पदांवर कार्यरत आहेत.

खेबुडकर म्हणायचे, ‘‘प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे या प्रतिभेला शब्दसामर्थ्य मिळते इतकेच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते, यापेक्षा ती किती दिवस टिकते, याला जास्त महत्त्व आहे. नाहीतर अशी कितीतरी पुस्तके, चारोळ्यांच्या रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकते आणि आठवणीत राहते ते खरे काव्य.’’


अत्यंत साधे तितकेच स्वाभिमानी असे हे व्यक्तिमत्त्व होते. संत एकनाथांची प्रत्येक कलाकृती सामाजिक भान ठेवून जन्माला आलेली, आणि म्हणूनच खेबुडकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाची. गदिमा, बा.सी. मर्ढेकर, भा.रा. तांबे ही त्यांची आदराची स्थाने. त्यांच्या मते भा.रा. तांबे हे कदाचित असे एकच कवी आहेत ज्यांनी काव्यरचना करताना वृत्तछंदाचा कोणताच प्रकार वर्ज्य मानला नाही. प्रत्येक प्रकारामध्ये त्यांच्या रचना आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील एक समृद्ध गीतकार आणि कवी म्हणून जगदीश खेबुडकरांची ओळख कायम राहील.

प्रफुल्ल फडके/ द स्क्रीन



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: