शुक्रवार, ८ मे, २०२६

तमाशाप्रधान रंजक चित्रपटांचे जादूगार अनंत माने


मराठी सिनेमातील तमाशाप्रधान आणि रंजक अशा चित्रपटांचे जादूगार म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल ते म्हणजे दिग्दर्शक अनंत माने. आज ९ मे हा त्यांचा स्मृतिदिन. आपल्या कल्पक, प्रेक्षकांची नाडी समजून केलेल्या कलाकृतीने प्रेक्षकांवर या दिग्दर्शकाने अक्षरश: गारुड घातले होते. म्हणून त्यांना जादूगारच म्हणावे लागेल. जर एखाद्या व्यक्तीकडे जिद्द, चिकाटी, संघर्षाची तयारी आणि आत्मविश्वास असेल तर यशापासून त्याला कुणीही आणि कधीही रोखू शकत नाही हे अनंत माने यांचे मराठी चित्रपटसृष्टीतील कर्तृत्व पाहिल्यावर सिद्ध होते. एकेकाळी प्रभातमध्ये बिनपगारी अक्षरश: हरकाम्या म्हणून काम करीत त्यांनी चित्रपटाच्या प्रत्येक अंगाचा अगदी बारकाईने अभ्यास केला. प्रभातमध्ये त्यांना मान्यवरांचे काम जवळून पाहता आले आणि त्यातूनच अनंत माने घडत गेले. त्यानंतर ते प्रभातमधून बाहेर पडून राजा नेने यांच्यासोबत काम करू लागले. त्यावेळी राजकमलमध्ये खुद्द शांतारामबापूंनी त्यांना आॅफर दिली होती. सिनेमाचा समाजावर समर्पक प्रभाव पडावा व सोप्या भाषेत आपला संदेश, आपले काम लोकांपर्यंत पोचावे यावर त्यांचा विशेष भर असायचा. हेच तर त्या जादूगाराचे वैशिष्ट्य होते.


आल्हाद चित्रच्या बाळा जो जो रेच्या वेळी अनंत माने व ग. दि. माडगूळकर यांच्यात अंगाई गीतावरून खटका उडाला. माडगूळकरांनी लिहिलेले अंगाई गीत ऐकून माने म्हणाले की, तुमचे गीत साहित्याच्या दृष्टीने उत्तम आहे. पण सामान्य प्रेक्षकांना ते बोजड होईल. तुमचे गीत घराघरातून प्रत्येक स्त्रीने म्हटले पाहिजे किंबहुना घरकाम करणा‍ºया मोलकरणीच्यासुद्धा ते तोंडात बसले पाहिजे. यावर माडगूळकर मानेंवर भडकले व गीताचा कागद टराटरा फाडून त्यांच्या अंगावर फेकत म्हणाले की, मी हे तुमचे गीत लिहिणार नाही. यावर माने खोलीतून निघून गेले. थोडा वेळ गेल्यावर माडगूळकरांनी मानेंना हाक मारली व म्हणाले की, या बसा आणि नवीन लिहिलेले अंगाई गीत त्यांनी ऐकवले. हे गीत होते बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे... हे गाणे ऐकून मानेंचा चेहरा खुलला. माडगूळकरही खूश होऊन म्हणाले की, कसे आहे? माने म्हणाले की, एकदम बेस्ट! पुढे हे अंगाई गीत विलक्षण लोकप्रिय झाले. अगदी एखादी माऊली आजही ते गीत गाताना दिसते. त्याचप्रमाणे विनायकराव देऊळगावकर यांच्या अजिंठा फिल्मच्या ओवाळणी, पुनवेची रात, प्रीतीसंगम, पैशांचा पाऊस अशा चित्रपटांचे दिग्दर्शन अनंत माने यांनीच केले. त्यानंतर १९५६ नंतर अनंत माने यांनी स्वत:ची चेतना चित्र ही संस्था सुरू केली. या संस्थेतर्फे त्यांनी पायदळी पडलेली फुले, सांगत्ये ऐका, सवाल माझा ऐका, केला इशारा जाता जाता, सांगू कशी मी, गण गौळण, अशीच एक रात्र होती, सुशीला हे प्रचंड गाजलेले चित्रपट निर्माण केले. यातील सांगत्ये ऐका या चित्रपटाने तर इतिहास घडवला.

दरम्यानच्या काळात अनंत माने यांनी अनंत चित्र या नावाचीही आणखी एक चित्रसंस्था काढली होती. या संस्थेतर्फे त्यांनी रंगपंचमी, भाग्यलक्ष्मी, प्रीतिविवाह, नार निर्मिते नरा व काय हो चमत्कार असे चित्रपट काढले. ग. दि. माडगूळकर, पु. वा. भावे, य. गो. जोशी, पं. महादेवशास्त्री जोशी, रणजीत देसाई, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील अशा मराठीतील थोर साहित्यिकांचा सहवास अनंत माने यांना लाभला. माने यांच्यामध्ये एक सुप्त कथाकार होता. विशेषत: पटकथा लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता. मानेंच्या एकूण ५३ दिग्दर्शित चित्रपटांपैकी सुमारे ३० चित्रपटांच्या कथा त्यांनी स्वत: लिहिल्या होत्या. अनंत माने, राम कदम व जगदीश खेबूडकर या त्रयीने सुमारे दोन दशके (१९६५ ते १९८५) मराठी चित्रपटसृष्टीवर व मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. यात बहुसंख्य तमाशाप्रधान चित्रपट होते. त्यातील अवीट गोडीची गाणी आजही ऐकली जातात.


नियोजनबद्ध काम हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ करायच्या आधीच, त्यांचे चित्रपट निर्मितीचे नियोजन पक्के असे. ठरलेल्या मुदतीतच ते चित्रपट पूर्णही कयायचेच. सांगत्ये ऐकाचे चित्रीकरण अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी पूर्णही केले. एक वग, एक द्वंद्व गीत, एक भूपाळी, एक स्त्री गीत आणि तीन लावण्या यासह आठ गाण्यांचा समावेश त्यात होता. हा चित्रपट पुण्याच्या विजयानंद थिएटरमध्ये तब्बल १३१ आठवडे मुक्कामी होता. हा विक्रम आजही अबाधित आहे. एक गाव बारा भानगडी हा त्यांचा चित्रपट राजकीय पाश्‍र्वभूमीचा होता. ग्रामीण राजकारण आणि भ्रष्टाचार हा त्यातील विषय आजही तितकाच ताजा वाटतो. पिंजराच्या वेळी अनंत माने प्रस्थापित दिग्दर्शक असताना केवळ आपल्या गुरूच्या हाताखाली काम करण्यासाठी ते सहायक दिग्दर्शक बनले. व्ही. शांताराम यांच्याबरोबर त्यांनी काम करताना आपले कसबही तिथे दाखवले. तमाशाप्रधान चित्रपटांची निर्मिती हा त्यांचा हातखंडा होता. आजही त्यांचे चित्रपट कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर दिसले की, प्रेक्षक आवर्जून बघतात हेच त्या कलाकाराचे कसब होते.

प्रफुल्ल फडके/द स्क्रीन



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: