मंगळवार, ५ मे, २०२६

अष्टदिक्पाल


आपल्याकडे सत्यनारायण किंवा अनेक विविध पूजांमध्ये कलशावरील तबकामध्ये सुपाºया मांडलेल्या आपण पाहतो. यात अष्टदिक्पालाच्या सुपाºया मांडलेल्या असतात. म्हणूनच अष्टदिप्काल म्हणजे नक्की काय असते आणि आपल्या संस्कृतीत त्याचे महत्त्व काय असते हे जाणून घेणे आवश्यक आहे. धर्मकार्य किंवा अध्यात्म, कर्मकांडातील कोणतीही गोष्ट ही न समजता करून घेऊ नये. समजल्यावर पटली तरच ती कृती करावी असा त्यामागचा उद्देश असतो. म्हणूनच आपण अष्टदिक्पाल म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊ.


आठ दिशांचे पालन करणाºया आठ देवांना ही संज्ञा दिलेली आहे. अष्ट म्हणजे आठ आणि दिक्पाल म्हणजे दिशा (दिक्) यांचे पालन करणारे किंवा रक्षण करणारे देव म्हणजे अष्टदिक्पाल. आपण दशदिशा किंवा दहा दिशा म्हणत असलो तरी व्यवहारात आणि पृथ्वीच्या अक्षानुसार आठ दिशाच विचारात घेतल्या जातात. तिसरा अक्ष किंवा थ्री डायमेन्शनचा येथे विचार केला गेलेला नसल्याने उर्वरित दोन दिशा उर्द्ध्व आणि अधर यांचा विचार केलेला नाही. किंबहुना उर्द्ध्व म्हणजे वरची दिशा ही स्वर्ग आणि खालची अधर ही दिशा म्हणजे नरक अशी संकल्पना असल्याने निरपेक्ष कर्मकांडात, धार्मिक तत्त्वज्ञातात या दोन्ही दिशांचा विचार केलेला नसावा.

अष्टदिक्पालांची संकल्पना प्राचीन वैदिक साहित्य, पुराणे, आगम व वास्तुशास्त्र यांमध्ये आढळते. यामुळे मंदिररचना, शिल्पकला, नगररचना आणि धार्मिक विधींमध्ये या देवतांचा महत्त्वपूर्ण वापर दिसून येतो. भारतीय धार्मिक व तात्त्विक परंपरेमध्ये विश्वाची रचना ही केवळ भौतिक नसून दैवी शक्तींनी नियंत्रित व संरक्षित अशी मानली जाते. या संकल्पनेत दिशा ही केवळ भौगोलिक संज्ञा नसून तिला दैवी अधिष्ठान आहे. हिंदू, बौद्ध व जैन परंपरेत या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. अष्टदिक्पालांची संकल्पना केवळ धार्मिक नसून तात्त्विक दृष्टिकोनातूनही ती महत्त्वाची आहे. त्यामुळेच गेल्या तीन दशकांत आपल्याकडे प्रसार झालेल्या फेंगशुई या शास्त्रात दिशांचा विचार मोठ्या प्रमाणात केला जातो.


दिशांचे रक्षण करणा‍ºया देवतांची पुराणकथा अनेक ठिकाणी आढळते. जसे भारतात अष्टदिक्पाल कल्पिले आहेत. तर जपानमध्ये बौद्ध पुराणकथांत चार दिशांचे धृतराष्ट्रादी चार दिक्पाल मानले आहेत. ईजिप्तमध्ये न्यायदानाच्या वेळी ओसायरिसच्या पुढे उभे असलेले व मृतांचे रक्षक असलेले होरसचे चार पुत्र हे चार दिशांचेही रक्षक मानले जाते. मेक्सिकन लोकांनीही चार दिशांचे चार देव मानले आहेत. तर अमेरिकेतील अल्गॉक्वियन लोकांनीही चार दिशांना चार देवता मानल्या आहेत.

इंद्र, अग्‍िन, यम, निर्ऋती, वरुण, वायू, कुबेर आणि ईशान हे अनुक्रमे पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य, पश्‍िचम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य या आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रत्येक दिशेवर एक विशिष्ट देवता अधिष्ठित आहे. या देवतांना त्या दिशेचे संरक्षण, संतुलन व नियंत्रण करण्याची जबाबदारी दिली गेली आहे.


इंद्र म्हणजे (पूर्व दिशा). या दिशेला ऐश्वर्य लक्ष्मीचे स्थान आहे. पूर्व दिशेचा अधिपती इंद्र हा देवांचा राजा मानला जातो. त्याचे वाहन ऐरावत आहे. इंद्र देवता ही शक्ती व नेतृत्वाची मूल्ये दर्शवते. तो वज्रधारी असून पर्जन्य, वीज आणि युद्धाचा देव आहे. पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा असल्याने ती नवजीवन, ऊर्जा व आरंभाचे प्रतीक असल्याचे मानले जाते.

अग्नि म्हणजे (आग्नेय) दिशा. याचे स्थान पूर्व आणि दक्षिण या दोन्हींच्या मध्यात असते. धान्यलक्ष्मीचे स्थान आग्नेय दिशेला असते. अग्नि हा आग्नेय दिशेचा दिक्पाल असून, मेष (मेंढी) हे त्याचे वाहन आहे. तसेच तो शुद्धीकरण व ज्ञानाची मूल्ये दर्शवतो. यज्ञ, हवन आणि देव-मानव यांच्यातील संवादाचा माध्यम म्हणून अग्निचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. त्यास शुद्धीकरण व परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते.


यम म्हणजे दक्षिण दिशा. आदिलक्ष्मीचे स्थान या दिशेला असते. दक्षिण दिशेचा अधिपती यम हा मृत्यूचा देव मानला असून, त्याचे वाहन म्हैस (महिषा) किंवा रेडा आहे. यम देवता ही न्याय व नैतिकतेची मूल्ये दर्शवते. तो धर्मराज म्हणूनही ओळखला जातो. यमाला न्याय, नैतिकता आणि कर्मफळ यांचे प्रतीक मानले जाते.

निर्ऋती म्हणजे नैर्ऋत्य दिशा. याचे स्थान दक्षिण-पश्चिम दिशांच्या मध्यात असते. भूत, प्रेत, पिशाच, राक्षस अशा वाईट शक्तींची ही दिशा आहे. नैर्ऋत्य दिशेची देवता नैर्ऋती किंवा निर्ऋती असून त्याचे गाढव हे वाहन आहे. ही देवता विनाश, अशुभता व अराजकतेशी संबंधित आहे. ती नकारात्मक शक्तींचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांचे नियंत्रण करते, अशी सर्वसाधारण धारणा आहे.


वरुण म्हणजे पश्चिम दिशा. ही गजलक्ष्मीची दिशा असल्याने ती शुभ असल्यास संपत्ती मिळते. पश्चिम दिशेचा अधिपती वरुण हा जलदेवता असून मकर हे त्याचे वाहन आहे. हा सत्य, नियम आणि शपथांचे प्रतीक मानला जातो. तो न्याय आणि नीतिमत्तेचा रक्षक मानला जातो. समुद्र व पाण्याशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. तो सर्व प्रकारच्या जलस्रोतांचा अधिपती असल्याचे मानले जाते.

वायू म्हणजे वायव्य दिशा. हिचे स्थान उत्तर आणि पश्चिम दिशांच्या मध्ये येते. वायव्य दिशेचा हा दिक्पाल आहे. तो प्राणशक्तीचा देव असून, हरीण हे त्याचे वाहन आहे. तो जीवन, गती व ऊर्जा यांचे प्रतीक आहे. तर विजयलक्ष्मीची दिशा असल्याने ही दिशा शुभ असल्यास शत्रूवर विजय प्राप्त करून देते असेही मानले जाते.


कुबेर हा उत्तर दिशा सांभाळतो. उत्तर दिशेचा अधिपती कुबेर हा धनाचा देव असून, त्याचे वाहन दशाश्वथ अथवा अश्व आहे. कुबेर देवता ही संपत्ती व संतुलन मूल्ये दर्शवते. त्याला यक्षांचा अधिपती मानले जाते. ही बुधाची दिशा असल्याने ती शुभ असल्यास बुद्धीचा विकास चांगला होतो, अशी सर्वसाधारण मान्यता आहे.

ईशान्य ही सर्वात महत्त्वाची जागा मानली जाते. हीच स्थान उत्तर आणि पूर्व दिशा यांच्यामध्ये येते. ईशान्य दिशेचा अधिपती ईशान हा भगवान शिवाचे एक रूप मानले असून, त्याचे वाहन वृषभ (बैल) आहे. ही दिशा आध्यात्मिकता, ज्ञान व पवित्रतेचे प्रतीक आहे. पुराणकथेनुसार अष्टलक्ष्मींपैकी संतानलक्ष्मीची ही दिशा असल्याने दिशा निर्दोष शुभ असता संततीसाठी लाभदायक असते. त्यामुळे साधारणपणे आपल्याकडे देवघर हे ईशान्य दिशेला स्थापित केले जाते.


याचे वास्तुशास्त्रातील महत्त्व काय आहे हे पण लक्षात घेतले पाहिजे. भारतीय वास्तुशास्त्रात अष्टदिक्पालांचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. घर, मंदिर किंवा नगर रचताना प्रत्येक दिशेचे गुणधर्म लक्षात घेतले जातात व त्यानुसार बांधकाम केले जाते. त्यामुळे जीवनात संतुलन व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे मानले जाते.

याशिवाय कला व स्थापत्यातील भूमिकाही इथे महत्त्वाची असते. अष्टदिक्पालांचे चित्रण भारतीय मंदिर शिल्पात मोठ्या प्रमाणावर आढळते. मंदिराच्या भिंती, स्तंभ किंवा प्रवेशद्वारांवर या देवतांची प्रतिमा कोरलेली दिसून येते. विशेषत: दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये अष्टदिक्पालांची सुंदर शिल्पे आढळतात.


बौद्ध व जैन परंपरेतील याचा उल्लेख आढळतो. अष्टदिक्पालांची संकल्पना बौद्ध व जैन धर्मातही स्वीकारली गेली आहे. बौद्ध धर्मात त्यांना लोकपाल अशी संज्ञा आहे. जैन मंदिरांमध्येही दिशांचे रक्षण करणाºया देवतांचे चित्रण आढळते. अनेक धर्मकृत्यांत अष्टदिक्पालांना नमन असते. त्यांना अष्टग्रहही कल्पिले आहेत. आपल्या प्रतिकात्मक संस्कृतीत कोणत्या बाजूने कोणती ऊर्जा प्राप्त होते हे सांगणारे हे तत्त्वज्ञान आहे.

प्रफुल्ल फडके/संस्कृती



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: