पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी लागला. मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे आणि एक्झिट पोलवरचा पूर्ण विश्वास उडवणारा असा हा निकाल होता. या निवडणुकीत बंगालची वाघीण म्हणून ख्याती असलेल्या ममता बॅनर्जींचा पराभव करत भारतीय जनता पक्षाने आम्हीच इथले टायगर आहोत हे दाखवून दिले. हेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे थलपती विजय यांनी तामिळनाडूत मिळवलेले यश या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य असेल. जे भविष्यातील राजकारणातील नवीन समीकरण मांडेल याचे संकेत देते.
जवळपास संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना विरोधातील एकांड्या शिलेदाराप्रमाणे भाजपला आजपर्यंत शरण न गेलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याची दाट चिन्हे दिसत होतीच. पश्चिम बंगालमध्ये गेली १५ वर्षे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे सरकार होते. देशातील अनेक राज्ये भाजपच्या ताब्यात जात असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा गड टिकवून ठेवला होता. मात्र, सोमवारी जाहीर झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून आता याठिकाणी भाजपची सत्ता येताना दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी १४८ जागांची गरज आहे. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत इथे आपला विजय नोंदवला आहे. सत्ताधारी तृणमूलला अवघ्या १००च्या आत जागांवर समाधान मानावे लागले आहे. आता पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता येणार आहे. हे भाजपसाठी ऐतिहासिक यश मानले जात आहे.
यापूर्वी २०१६ आणि २०२१ या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये तितक्याच इर्ष्येने लढून ममता बॅनर्जी यांनी भाजपची डाळ शिजू दिली नव्हती. मात्र, यंदा भाजपने कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच, असा चंग बांधला होता. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अमित शाह हे पश्चिम बंगालमध्ये स्वत: सूत्रे हलवत होते. पश्चिम बंगाल निवडणुकीचा प्रचार आणि मतदान या काळात अमित शाह हे अक्षरश: पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून बसले होते. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या विजयाचे भाकीत केले होते. ते खरे ठरले.
पश्चिम बंगालमध्ये २४ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान झाले होते, तेव्हा अमित शाह यांनी भाजप १५२ जागांपैकी ११० जागी विजय मिळवेल, असा अंदाज वर्तवला होता. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपला १७० जागांवर विजय मिळेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. अमित शाह यांच्या तोंडातून बाहेर पडलेले हे वाक्य तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपली संपूर्ण यंत्रणा पश्चिम बंगालमध्ये उतरवली होती. या निवडणुकीच्या मतदानावेळी तब्बल दोन लाख सीआरपीएफ जवान आणि कडेकोट बंदोबस्त पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आला होता. तसेच या निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर मोहिमेंतर्गत जवळपास ९१ लाख मतदारांची नावे निवडणूक यादीतून काढून टाकली होती. ही गोष्ट पश्चिम बंगालच्या निवडणुकीत निर्णायक ठरल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगालप्रमाणेच अन्य चार राज्यांत झालेल्या निवडणुकांचे निकालही अत्यंत आश्वासक आहेत. यामध्ये आसाममध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत सलग तिसºयांदा सत्ता मिळवली आहे. हे यश भाजपने केलेला या भागातील विकास, रोजगार निर्मिती, नागरी सुरक्षा यामुळे आहे. त्याचप्रमाणे हेमंता बिस्व सरमा यांच्या कामाला, स्पष्टवक्तेपणाला, आक्रमकपणाला मतदारांनी दिलेली पसंती आहे. एक काळ आसाम आणि त्यांच्या सात भगिनी या भारतापासून खूप दूर होत्या. पण जसे भारतीय जनता पक्षाकडे या भागाचे नेतृत्व गेले तसा हा भाग भारताचा असल्याचे जाणवू लागले. इशान्येकडील राज्यांना भाजप सरकारने दिलेले संरक्षण, चीन, बांगलादेशपासून होणारे नुकसान, घुसखोरीला घातलेला आळा, आसाममधील माओवादाला रोखण्यात मिळवलेले यश यामुळे इथे विकासगंगा वाहू लागली. मुख्य प्रवाहात या राज्याला आणण्याचे काम भाजपने केले. त्या कामाची पोचपावती म्हणजे हे यश आहे.
तिसरा महत्त्वपूर्ण निकाल म्हणजे तामिळनाडूचा आहे. तामिळनाडूत सातत्याने द्रमुक आणि अद्रमुक हे सत्तेत राहिले आहेत. १९६७ पासून या दोघांशिवाय इथे कोणालाही संधी मिळाली नव्हती. गेल्या दोन टर्म द्रमुक इथे सत्तेत आहे. देशातील दोन मोठे राजकीय पक्ष काँग्रेस आणि भाजपलाही या दोघांशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे काँग्रेस द्रमुकबरोबर तर भाजप अद्रमुक बरोबर सोयीनुसार राहिला. पण या दोन्ही पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना इथे मोठे होऊ दिले नव्हते. त्यामुळे जोपर्यंत एखादा स्थानिक प्रादेशिक पर्याय तयार होत नाही, तोपर्यंत द्रमुक, अद्रमुकला रोखता येणार नव्हते. हा पर्याय तयार करण्यासाठी रजनीकांत आणि कमल हासन या अभिनेत्यांचा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला. पण तो काही यशस्वी झाला नाही. त्यामुळे सध्या तेथील जनतेच्या गळ्यातील ताईत असलेल्या थलपती विजय जोसेफ या अभिनेत्याला पुढे आणले गेले. त्याला मोठे करण्यात अर्थातच महासत्तेचा हात होता हे वेगळे सांगायची गरज नाही. नवा प्रादेशिक पर्याय तयार करून आपला मित्रपक्ष करण्याची ही भाजपची खेळी इथे यशस्वी होताना दिसली. बाहेरून आलेल्या राष्ट्रीय पक्षाला कोणी स्वीकारणार नाहीत, म्हणून प्रादेशिक पातळीवर नवा पर्याय निर्माण करण्याचे आखलेले धोरण या निवडणुकीतील धक्का तंत्र होते. त्यात सगळ्या अदृश्य शक्ती यशस्वी झाल्या. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. यामुळे भाजपचा दक्षिण प्रवास भविष्यात सुकर होईल याचे हे संकेत आहेत. त्यामुळे पाच राज्यांतील या निवडणुकीत प. बंगाल आणि तामिळनाडू या राज्यातील निवडणुका या वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. नवी राजकीय समीकरणे तयार करणारे हे फॅक्टर असतील यात शंका नाही.
तामिळनाडूचा प्रभाव असलेले पण केंद्रशासित प्रदेश असलेले राज्य म्हणजे पुद्दुचेरी. इथेही भारतीय जनता पक्षाने सहज विजय मिळवत आपली सत्ता कायम राखली आहे.
उर्वरित राज्य म्हणजे केरळ. एलडीएफ आणि यूडीएफ या दोघांशिवाय इथे कोणी सत्ता मिळवली नव्हती. भारतीय जनता पक्षाने इथे प्रयत्न केले होते. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला यापूर्वी थोडे यश मिळाल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्या प्रमाणातच भाजपला इथे माफक यश मिळाले आहे. इथे यूडीएफकडे सत्ता जाताना दिसत आहे. काँग्रेसचा इथे प्रभाव असल्यामुळे हे यश यूडीएफला मिळाले आहे.
परंतु एकूणच या निवडणुकांमधून भाजपने आपणच प. बंगालचे टायगर आहोत हे दाखवत नव्या समीकरणांची दखल घेण्यास भाग पाडले आहे.
- प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा