पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी राहुल गांधी आसाम आणि प. बंगालच्या निवडणुकीचे निकाल स्वीकारत नाहीत. त्यांच्या शब्दांत आसाम आणि पश्चिम बंगाल ही स्पष्ट उदाहरणे आहेत, जिथे भाजपने निवडणूक आयोगाच्या पाठिंब्याने निवडणुका चोरल्या. प. बंगालमध्ये शंभरहून अधिक जागा चोरल्या गेल्या या ममता बॅनर्जींच्या मताशी आम्ही सहमत आहोत. हाच डावपेच आपण यापूर्वी मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पाहिला आहे. निवडणुकीची चोरी, संस्थांची चोरी, मतांची चोरी आणखी काय करायचे आहे? हाच तो खोटेपणा आहे. आपण जिंकलो की, जनादेश आणि विरोधक जिंकले की मतांची चोरी, ईव्हीएम घोटाळा, निवडणूक आयोगाला दोष देणे हे प्रकार हे लोक कधी थांबवणार आहेत? यामुळे ते आणखी विश्वास गमवत आहेत. कारण हा मतदारांचा ते अपमान करत आहेत हे या बावळट लोकांना समजत कसे नाही?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांनी केरळम्, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीबद्दल असे काहीही म्हटले नाही. ते केरळम्बद्दल काही बोलूच शकले नसते, विशेषत: तिथे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने विजय मिळवला होता. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी तामिळनाडूमध्ये प्रचंड विजय मिळवलेल्या टीव्हीकेचे प्रमुख जोसेफ विजय यांचे अभिनंदन केले आणि पराभूत झालेल्या स्टॅलिन यांच्याशीही संवाद साधला.
येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, स्टॅलिन यांनी निवडणुकीचे निकाल सहजपणे स्वीकारले आहेत. राहुल गांधी यांनीही ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला आणि निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात टीएमसीच्या पराभवाचा आनंद साजरा करणाºयांना सावध राहण्याचा सल्ला दिला. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांनी प. बंगालमधील मतदानाच्या दुसºया टप्प्याच्या अगदी आधी ममता बॅनर्जींवर निशाणा साधत म्हटले होते की, प. बंगालमध्ये नोकरी शोधणाºया प्रत्येकाचा टीएमसीशी काहीतरी संबंध असलाच पाहिजे, नाहीतर त्यांना काम मिळणार नाही. ममता बॅनर्जी केवळ टीएमसीच्या गुंडांसाठी आणि स्वत:च्या पक्षाच्या सदस्यांसाठी काम करतात आणि जनतेला कोणतीही मदत करत नाहीत. राहुल गांधी असेही म्हणाले की, आज प. बंगालमध्ये लोकशाही नाही, तर टीएमसीचे राज्य आहे.
राहुल स्वत:चेच शब्द इतक्या लवकर कसे विसरू शकतात? मान्य आहे की, नेत्यांची स्मरणशक्ती काहीशी अल्पजीवी असते, पण १०-१२ दिवसांपूर्वी आपण काय बोललो हे कोणी कसे विसरू शकेल? प. बंगालमधील आपल्या प्रचारादरम्यान राहुल यांनी ममता बॅनर्जींबद्दल असेही म्हटले होते की, बंगालमधील वाढत्या ध्रुवीकरणामुळे भाजपला संधी मिळाली. हे नाकारता येणार नाही की, प. बंगालमधील भाजपच्या विजयामागे मतदारांचे ध्रुवीकरण हे अनेक कारणांपैकी एक होते. मोठ्या संख्येने हिंदू मतदार भाजपच्या मागे उभे राहिले, ज्यामुळे त्यांना प्रचंड विजय मिळाला, असा निष्कर्ष काढण्यासाठी पुरेशी कारणे आहेत. मात्र, हे केवळ भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणामुळेच नव्हते. यामागे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससारखे पक्ष तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली मुस्लीम मते एकवटण्याचे काम करतात हेही एक कारण आहे. वास्तविक पाहता धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करणारे बहुतेक पक्ष हेच करतात. काँग्रेस देशभरात हेच करते आणि ममता बॅनर्जी प. बंगालमध्ये तेच करत होत्या आणि त्या हे इतक्या उघडपणे करत होत्या की, त्याचे रूपांतर मुस्लीम तुष्टीकरणात झाले.
मुस्लीम सामान्यत: मोठ्या संख्येने एका पक्षाला मतदान करतात आणि भाजपच्या उदयापासून ते केवळ त्याच पक्षाला मतदान करत आहेत जो त्यांना हरवू शकतो असे वाटते. यामुळे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांना त्यांना संघटित करण्यासाठी अधिक मेहनत घेण्यास प्रवृत्त केले. ते भाजपचे भूत उभे करून आपले काम सोपे करत असत. मुस्लीम मतांच्या या एकत्रीकरणाला ध्रुवीकरणाऐवजी धर्मनिरपेक्ष राजकारण म्हटले जाऊ लागले.
या खोट्या धर्मनिरपेक्ष राजकारणामुळे एक वेळ अशी आली की, मुस्लीम मते भाजपविरोधी पक्षांसाठी एक प्रकारची नकाराधिकार शक्ती बनली. जेव्हा मुस्लीम मतांच्या एकत्रीकरणाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर ध्रुवीकरण करणारे जातीय राजकारण करत असल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली. भाजपने या आरोपाकडे दुर्लक्ष करून धर्मनिरपेक्षतेला ढोंगी धर्मनिरपेक्षता म्हटले आणि तेच सत्य असल्यामुळे ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
नि:संशयपणे, मुस्लीम मतांच्या विभाजनामुळे प. बंगालमध्ये टीएमसीला नुकसान झाले, परंतु जर ममता यांनी उघडपणे मुस्लीम समाजाचे लांगूलचालन केले नसते, तर हिंदूंनी इतक्या उघडपणे भाजपला पाठिंबा दिला नसता. ममता केवळ मुस्लीम मतांचे विभाजन झाल्यामुळे आणि बहुसंख्य हिंदू मते भाजपला गेल्यामुळेच हरल्या नाहीत, तर त्यांचे शासन पक्षपातीपणा आणि त्यांच्या नेत्यांचा भ्रष्टाचार व गुंडगिरी यांचे समानार्थी बनल्यामुळेही त्या हरल्या. महिला मुख्यमंत्री असूनही राज्यात महिलांची असुरक्षितता हा एक मोठा मुद्दा बनला.
घुसखोरांकडे दुर्लक्ष करण्याची आणि मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याची किमतही ममता यांना चुकवावी लागली. आसाममध्ये काँग्रेसलाही तीच किंमत मोजावी लागली. हे लक्षात घ्या की, बद्रुद्दीन अजमल ज्यांनी एकेकाळी काँग्रेससोबत युती करून आसाममध्ये निवडणूक लढवली होती, त्यांनी काँग्रेसला आजची मुस्लीम लीग म्हटले होते. त्यांनी असे का म्हटले हे माहीत नाही, पण मुस्लिमांना संघटित करणे म्हणजे धर्मनिरपेक्ष राजकारण आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदूंना एकत्र करणे म्हणजे जातीय राजकारण, हा ढोंगीपणा आता संपला पाहिजे. आसाम आणि प. बंगालमध्ये याच वृत्तीमुळे मुस्लीम मतांनी आपला नकाराधिकारही गमावला, ज्यामुळे त्यांची मते पक्षाला विजय मिळवून देऊ शकतात हा मिथक मोडीत निघाला, कारण त्यांचे ध्रुवीकरण केल्याने उलट ध्रुवीकरण होते. यातून भोंदू आणि खोट्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा